मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश| एकत्रिंशत्तम किरण श्री माधवनाथ दीपप्रकाश अनुक्रमणिका आभार प्रथम किरण द्वितीय किरण तृतीय किरण चतुर्थ किरण पंचम किरण षष्टम किरण सप्तम किरण अष्टम किरण नवम किरण दशम किरण एकादश किरण द्वादश किरण त्रयोदश किरण चतुर्दश किरण पंचदश किरण षोडश किरण सप्तदश किरण अष्टादश किरण एकोनविंशति किरण विंशतितम किरणः एकविंशतितमः किरण दीपप्रकाश -द्वाविंशतितम किरण त्रयोविंशतितम किरण चतुर्विंशतितम किरण पंचविंशतितम किरण षड्विंशतितम किरण सप्तविंशतितम किरण अष्टविंशतितम किरण नवविंशतितम किरण त्रिंशत्तम किरण एकत्रिंशत्तम किरण द्वात्रिंशत्तम किरण त्रिस्त्रींशतितम किरण चतुस्त्रिंशतितम किरण पंचत्रिंशतितम किरण दीपप्रकाश - एकत्रिंशत्तम किरण Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India. Tags : granthamadhavanathmarathiग्रंथमराठीमाधवनाथ कर्मयोग Translation - भाषांतर श्रीसद्गुरुनाथायनमः -- प्रेममूर्ती प्रेम सागरा । तुझा न लागे अंत खरा । सर्वांसी तूं देशी थारा । निज उदरीं ॥१॥येवो गरीब मासोळी । अथवा देवमासा सर्वबळी । तयांतेंहि तूं माउली । सांभाळीसी कौतुकें ॥२॥विकराल नक्र जरी आले । तरी तूं त्यासी न उपेक्षिलें । तुज सर्वही एक वाटलें देशी विश्रांती ॥३॥या सर्व जलचरांचा । करिसी सांभाळ साचा । तुझ्या विचित्र मायेचा । खेळ कोण जाणें ॥४॥प्रेम हेंच तुझें कार्य । प्रेम हें तुझें स्वरूप होय । प्रेमावीण आहे काय । तुझ्यामध्यें ॥५॥तुझ्या प्रेमाचें बिंदु । किती घेऊं कृपासिंधू । घेतलें जरी ब्रह्मांडू । तरि तूं पूर्णची ॥६॥गतकिरणी नाथराणा । सोडवी वृद्धेच्या जीवना । करी एक लीला पुन्हा । योगेश्वर ॥७॥असे एक शिष्य काशीनाथ । तयास देई विभूत । ठेवीं ही अंतर्वस्त्रांत । सांगे प्रेममय ॥८॥या पुडीची होतां विस्मृती । तुज देईन शिक्षा पुरती । आधीं विचार करीं चित्तीं । मग घेई मागुनी ॥९॥शिष्यें दिधलें आश्वासन । करीन विभूतीचें जतन । गेला जरी माझा प्राण । तरी जाऊं नेदी ॥१०॥ठेविली संजीवनी खिशांत । निघाला वंदुनि तात । क्षणक्षणा । पाही तेथ । न विसरी घडिभरी ॥११॥एक योजन आला दूर । पाही श्रीनाथ प्रसाद सत्वर । तों पुडीनें केला पोबार । न दिसे कोठें ॥१२॥आठविली प्रभूची वाणी । म्हणे व्यर्थ बोललों वचनीं । आता प्राण वेंचावा झणीं । प्रतिज्ञेसम ॥१३॥सर्व कर्तृत्व जगदीशाचें । व्यर्थ बोललों वचन गर्वाचें । धांवुनी धरिलें देवाचे । पाय भक्तानें ॥१४॥प्रतिज्ञेसम श्रीनाथ । आतां करीन प्राणांत । न कळतां श्रीनाथ कृत्य । बोललों अभद्र गर्वानें ॥१५॥जरी न सांपडे माझी पुडी । तरि सुखानें प्राण मी सोडी । मज आज्ञा द्यावी आधीं । सद्गुरुराया ॥१६॥नाथ म्हणें तूं भीष्मप्रतिज्ञ । देई सुखानें प्राण । अभिमान हा नाश पूर्ण । करील गा ॥१७॥बालकासम खुदकन । हांसला आनंदघन । काढी आपुल्या खिशांतून । तीच पुडी ॥१८॥तोच कागद तीच पुडी । पाहुनि झाला शिष्य आनंदी । प्रभु सांगे न वेंचावे शब्द कधीं । असमर्थानें ॥१९॥तेथून आला नंदीग्रामीं । प्रिय वासुदेवाश्रमीं । जगदुद्धार करी स्वामी । नाथ माझा ॥२०॥कोठें करी मोठी हवनें । नव चंडी शतचंडीनें । कोठें सहस्त्रही करणें । सप्तशती पाठ ॥२१॥कोणाची बाधा दूर करी । कोणा संपत्तीच्या सरी । कोणा पुत्र कुमारी । देई सर्वदाता ॥२२॥कोठें नाम - सप्ताह केले । महाराष्ट्र देशा जागविलें । कोठें राजकारणाचें जाळें । उकली न कळतां ॥२३॥न वाची कधीं वर्तमानपत्रें । सांगे सृष्टीचीं यंत्रें । आसनीं बसूनि जगन्नाथें । लीला ऐसी करावी ॥२४॥मंदिर बांधण्याची कार्ये । केली अनेक प्रभुरायें । निवृत्तीवरीं कळस सदयें । झळकविला ॥२५॥धर्मशाळाही तेथें बांधिली । धारा नगरीस स्वारी गेली । लक्ष्मीनारायण देउळीं । वेंची द्रव्य अपार ॥२६॥“ बहुत जनांसी चालवी । नाना मंडळें हालवी । ऐसी हे समर्थ पदवी । विवेकें होतें ” ॥२७॥ही रामदास - प्रभु - वाणी । सार्थ करी प्रभु अवतरोनी । सदा कर्मयोग संवाहनीं । रत राहे समर्थ ॥२८॥कोठें खोदी तळीं विहिरी । कोठें बांधी पिंपळ पार । कोठें पादुका शुभंकर । स्थापी दत्ताच्या ॥२९॥खानदेशीं थोरगव्हाण । नामक गांव लहान । तेथे एक सद्भक्त जाण । राहे सुखवस्तु ॥३०॥श्रीनाथ हें त्याचें ध्यान । श्रीचरण हें पूजन । श्रीनाथ नाम हें भजन । करी सर्वदा ॥३१॥देखोनि शिष्याचा भाव । म्हणे येथें राहीन सदैव । गृह भागाचें देवालय । करी कौतुकाने ॥३२॥तेथें पादुका - स्थापन । केलें यथाविधि प्रमाण । देई आशीर्वाद पूर्ण । शिष्योत्तमा ॥३३॥एके दिनीं या शिष्याप्रतीं । आत्मलिंग दाखवी शंकरमूर्ती । देई वरप्रसाद जगज्योती । लोकोपकारी ॥३४॥या मंदिरीं भावनायुक्त । जो येईल साधक सत्पात्र । तो मिळवील आपुलें इच्छित पूर्णपणें ॥३५॥या पिशाच्चें दुरोनीच पळतीं । डाकीणींची होईल फजिती । जे करिती नित्य आरती । ज्योति तयातें ॥३६॥प्रभुवचन ही आकाशवाणी । मानुनी येती बंधुभगिनी । निज दुःखाची आटणी । करून घेती ॥३७॥सोलापुरी अप्पा वारद । नामे होता भक्त प्रसिद्ध । करी करणी अगाध । तयाचे गृहीं ॥३८॥द्यावे रूपये एक सहस्त्र । बांधीन एकाच खोलीस । अप्पासाहेब म्हणती अवश्य । परि दिवाण आड येई ॥३९॥सखारामबापूसम तो दिवाण । दावी धन्यासी हित वरून । एक चौकेंत सहस्त्र जाण । ऐकिलें ना पाहिलें ॥४०॥न द्यावा इतुका पैसा । शत रूपयांची काय दिशा । नायकतां तो भक्त सहस्त्रा । वोपी सद्गुरु चरणीं ॥४१॥मग प्रभूनें काय केलें । मुहूर्तेच एक स्थल घेतलें । मुहूर्तें सर्व कार्य वरिलें । या गृहाचें ॥४२॥काष्ठेंही आणिली सुमुहूर्तें । त्यातें तासिलें मुहूर्तें । रोविलें सर्व मुहूर्तें । मुहूर्तनाथें ॥४३॥खिळाही ठोकिला मुहूर्ती । मुहूर्त संपता स्वस्थ बसती । संवत्सर होता कार्यपूर्ती । झाली नाथपूभूची ॥४४॥बोलावी प्रिय शिष्यासी । भरावें येथें तृणासी । पहावी प्रचीत कैसी । मम कृतीची ॥४५॥अप्पानें तैसेंच केलें । परिजन म्हणती वेड लागलें । ऐसे साधू नाहीं पाहिलें । विचित्रकृती ॥४६॥ भरवोनी त्यांत गवत । टाकी अग्नि नाथ तेथ । ज्वालांचे लोट क्षणांत । पसरले चोहींकडे ॥४७॥हंसून सर्व चाकर म्हणती । अपुल्याच हस्तें अग्नि लाविती । काय करावें सत्तेपुढती । शहाणपण चालेना ॥४८॥आला जनतेचा बहुमेळा । पाण्याचाही बंब आला । परि अप्पानें प्रतिकार केला । सकळांसी ॥४९॥अग्नि झाला स्वयेंच शांत । घेई अप्पासी सवें नाथ । पाहीं आपुलें घर नेत्रीं । बोलावी दिवाणासी ॥५०॥गृहांत जें सामान भरलें । तेंचि सारें दग्ध झाले । परि कांहीं एक न जळालें । मंदिराचें ॥५१॥खिडक्या तैसीं लांकडी द्वारें । कोरे दिसती मोठे - सरे । आश्चर्य करिती जन सारे । नाथकृती अगाध ॥५२॥मग बोधी प्रिय शिष्यासीं । न समजावा चमत्कार मानसीं । स्वधर्माची कीर्ति ऐसी । हें मुहूर्त फल ॥५३॥यातेंच म्हणती मुहूर्त काय । उगाच निंदिती स्वधर्म राय । न कळतां वर्म । हाय हाय करिती ॥५४॥वाढवोनी धर्ममहिमा । नाथ येई नंदिग्रामा । अनेकांच्या पूर्ण कामा । करी पूर्णानंद ॥५५॥महादुआबा नामें भक्त । घेई विश्रांती तेथें नाथ । सूर्य तळपला प्रखर ज्योत । द्वादश कलांनीं ॥५६॥उपसर्ग न व्हावा सद्गुरुसी । म्हणोनी लाविती द्वारासी । कुलूप कडी बाह्य भागासी । किल्ली आबाजवळी ॥५७॥कांहीं कालानंतरी । भुंकला श्वान अंतरीं । श्वानातें काढावया बाहेरी । उघडती द्वार ॥५८॥तों नाहीं तेथें नाथ । झाले सारे भयभीत । कोठें जाहला गुप्त । न कळे नाथ ॥५९॥चिंतातूर सारे होती । कोठे पहावी गुरूमूर्ती । तों ‘ विठ्ठल विठ्ठल ’ ध्वनी ऐकती । मधुर भारी ॥६०॥ऐकूं येई मंजुल ध्वनी । परि न दिसता लोचनीं । बावळे होती भक्त मनीं । तों दिसला आसनीं ॥६१॥इतुक्यामाजीं एक अबला । सांगें प्रेमें वासुदेवाला । नाथ जाऊन बैसला । मशीदींत ॥६२॥प्रभूची काया सुकुमार । तळपे प्रखर हा भास्कर । कां ताप देता फार । गुरूराया ॥६३॥वासुदेव म्हणे श्रीनाथ । आहे आबांच्या गृहांत । येरू वदे तो उरूसांत । देखिला म्यां ॥६४॥वासुदेव म्हणे श्रीनाथा । कोणी आवरावें आतां । क्षणीं सूक्ष्म क्षणांत मोठा । क्षणांत दाही दिशा ॥६५॥यातें जो सांभाळू म्हणे । तोचि विसरीं स्वयें देहानें । प्रभुसमागमें पळ घेणें । हेंच तया उचित वाटे ॥६६॥नाथ आहे सूर्यचंद्र । त्यास कोण तापवी अभद्र । येईल चालुनी श्रीरामचंद्र । प्रभुराणा ॥६७॥ती भाविक स्त्री झाली कोपवश । म्हणे कैसे हे दुष्ट शिष्य सांगू महादू आबास । म्हणोनि निघाली ॥६८॥तेथें देखिला नटवर । झाली लज्जित ती नार । सांगे प्रभूचा संचार । भक्तजनांसी ॥६९॥वासूदेव भगिनीचे नयन । एकाएकी झाले तेजहीन । विनवी भावें कर जोडून । समर्थासी ॥७०॥केला उपदेश तियेला । जो सर्वत्रांही लागला । न पूजितां कुलदेवतेला । त्याचें हेंच फल ॥७१॥असो संत वा असंत । राही जो व्यवहारांत । असावें त्यानें स्वधर्मरत । करावें हव्यकव्य ॥७२॥कुलदेवता कुलाचार । हें कर्तव्यकर्म साचार । जो न करील भावें नर । तो भोगील पीडा ही ॥७३॥कुलाचार ही पूर्वजस्मृती । गृहस्थाश्रमाची दिव्य ज्योती । कुलाचारें सात्वीक वृत्ती । दृढ होई ॥७४॥घेवोनीं तळहातीं विभूती । अंगुष्ट त्यावरी फिरविती । तों दिसली देवीची मूर्ती । सर्वत्रासी ॥७५॥तव गृहींचा सुवर्ण टाक । तयाचे नेत्र एकदां देख । पडतीं छिद्रें तेथें अनेक । करी गे नवा टाक ॥७६॥आज्ञेसमान केलें तियेनें । जाहली तेजस्वी नयनें । ऐसें प्रवर्तविलें प्रभूनें । कर्तव्यकर्मा जनातें ॥७७॥पाचारून वासुदेवा प्रती । कर्मयोगाचे महत्व वर्णिती । निष्काम कर्माची महती । देई नाथराआण ॥७८॥कर्माशिवाय प्राणिमात्राचा । न जाय एक क्षण साचा । कायीक वाचीक मानसाचा । व्यापक सदा राहे ॥७९॥कर्म म्हणजे केवळ नव्हें वैदिक धर्म बाळ । इंद्रियांचे व्यापार सकळ । कर्म हें नाम तयासी ॥८०॥प्राण्यासी अकर्म - स्थिती । कदा न येई निश्चितीं । अकर्मीं शरीर संपत्ती । राहणार नाहीं ॥८१॥केवळ स्वस्थ बसावें । ही अकर्म - स्थिती नोहे । अंतः करणाचा जेथें व्यापार चालूं राहे । तेंही कर्म होय ॥८२॥सृष्टीचें मूळ माया । ती कर्माचीच ज्योति राया । सदा चालवीं देहें प्रिया । अकर्मी न राहे ॥८३॥कर्म हें बंधासि कारण । त्याचा आश्रय कधीं मी धरी ना । ऐसा आग्रह धरवेना कोणासीही ॥८४॥मग या कर्मजालांतून । कैसें जावें सुटून । विनवी वासुदेव नंदन । सद्गुरुराया ॥८५॥बाळा ! जे फळासक्ती धरून । करिती कर्माचें आचरण । ते होती बंधासी कारण । एरव्ही नाहीं ॥८६॥निष्काम कर्म आचरितां । चित्त शुद्ध होईल सुता । तें अविनाशी फल तत्वतां । घ्यावें तुवां ॥८७॥विनवी शिष्य नाधासी । फलाविण आचरावें कर्मासी । हें कथिलें पूर्वीच आम्हासी । आतां विपरीत सांगतां ॥८८॥ जयाचें मिळेल फल । तें निष्काम कैसें होईल । निवारावें संशयजाल । सद्गुरुराया ॥८९॥नाथ म्हणें तुझा आक्षेप भयद जाण । अद्वैत तत्वज्ञानासी कारण । त्या चित्तशुद्धीच्या मुळीसी कुठार जाण । टाकिली त्वां ॥९०॥काम म्हणे केवळ हेतु । यावत्काल राहे जिवंतु । तावत्काल फलासक्तु । प्राणी होय ॥९१॥हेतुफलाची शृंखला । जखडितां आपुल्या पायाला । चित्तशुद्धी - स्वातंत्र्याला । मुकतो नर ॥९२॥म्हणोनि घ्यावें ऐसें कर्म । ज्याचें मिळेल फळ उत्तम । तें अन्य विषयक काम । नाश करी ॥९३॥चित्तशुद्धीप्राप्त्यर्थ । जो निष्काम कर्म आचरीत । तयाच्या हृदयीं ज्ञानज्योत । उज्वल होई ॥९४॥ज्ञान होता प्रज्वलित । जाईल मुक्तिरूप नगरांत । मग तेथें फलाचा हेत । राहत नाहीं ॥९५॥कर्तृत्वाभिमान लया गेला । भोक्तृत्वभाव शून्य झाला । सर्व कर्ता प्रभु ठरला । हीच चित्तशुद्धीं ॥९६॥ऐशा चित्ताचें जें कार्य । तें निष्काम कर्म होय । निवारी आपुला संशय । वासुदेवा ॥९७॥ज्याचें चित्तीं असें ध्यान । तेंचि कर्मरूप जाण । फलाभिसंधीं नसतां मन । फलजनक न होय ॥९८॥तरी फलासक्ती त्यागून । करीं कार्य श्रुतीस अनुसरून । काम्य कर्म हें बंधास कारण । होईल गा ॥९९॥स्वधर्माचरणीं राहीं दक्ष । करी सर्व नित्य नैमित्तिक । इंद्रियांचा न व्हावा वरपक्ष । कदापिही ॥१००॥विषयवासना हेंही कर्म । तूं करीं गा सदा निष्काम । न लागे तयाचा लगाम । तुजला मग ॥१॥कोणी विहिताचरणाचा त्याग । करोनि धरिती संन्यासमार्ग । परि तो नव्हे श्रेष्ठ योग । कर्माहुनी ॥२॥कर्मयोग हा सर्वासाठीं । जणूं तारूं समुद्रावरती । बलवंतीं वा अशक्तीं । बसूनी जावें त्यांत ॥३॥कर्म केल्याविण नोहे सुटका । हा सिद्धांत ठरला निका । म्हणोनि निष्काम कर्म बालका । आचरीं तूं ॥४॥जनातें मानून जनार्दन । करीं निष्काम प्रपंच जाण । हें कर्मयोगाचें ज्ञान । तुज सांगतों ॥५॥कर्मयोगानें जनसमाज । होईल व्यवस्थित सहज । दुर्बलतेचें नासें राज्य । कर्मयोगें ॥६॥धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरूषार्थाची साक्ष । कर्मयोगेंच प्रत्यक्ष । प्राप्त होई ॥७॥मायामोहे पार्थ । जाहला जेव्हां निर्बल सत्य । कळवळोनि श्रीभगवंत । उपदेशी तया ॥८॥कर्मयोग - विद्युच्छक्तीनें । केलें जागृत तया श्रीकृष्णानें । विजय मिळविला विजयानें । कर्मयोगें ॥९॥निर्मल जल श्रीभगवद्गीता । परिस्थिती - रंग - त्यांत मिळवितां । रूपाप्रति जाई त्या त्या । ऐसी अगाध ॥११०॥पांडवकालीं अर्जुन मोहिला । स्वकर्तव्य - विन्मुख झाला । कर्मयोगी त्यातें केला । भगवंताने ॥११॥कर्मांगाचें माजलें बंड । म्हणोनि घेतला संन्यास दंड । त्यागरंग भरविला अखंड । श्रीमत् आचार्यांनी ॥१२॥धर्माते न्यावया उज्वलतेस । भक्तीचा रंग चढवी श्रीज्ञानेश । कर्मयोगाचा करी प्रकाश । लोकमान्य ॥१३॥पडला कर्तव्याचा मोह । जनता केवळ निर्बल होय । म्हणोनि काढी तिलकराय । कर्मयोग बीज ॥१४॥हा काळ नव्हे संन्यासाचा । केवळ कर्मयोगाचा । घ्यावा करीं लोकसेवेचा । दंड बाळा ॥१५॥कर्मा अंगीच भक्ति राहे । कर्मानेंच कर्मानेंच त्याग होय । कर्म त्रिकालाबाधीत आहे । करिं निष्काम ॥१६॥कर्म भक्ति ज्ञान - योग । चौथा श्री राजयोग । हे स्वरूप नगराचे मार्ग । असती चार ॥१७॥जो मार्ग जया सुलभ वाटे । त्या पंथेंच जावें तेथें । न शोधावें श्रेष्ठ कोणतें । अथवा कनिष्ठही ॥१८॥वितंडवाद सकल सोडावा । पंथ एकचि धरावा । तो वाद करी बुद्धीभ्रंश जीवा । वासुदेवा ॥१९॥किंवा प्रभूची लीला गावी । अनुभवेंच हृदयीं ठसवावी । मग आनंद ज्योत पहावी । साधकानें ॥१२०॥आनंद हा सांगता नये । आनंदाची मूर्ती नव्हे । आनंदी होऊनी पहावें । आनंदकंदा ॥२१॥आनंदापाशीं आनंद । मिळें हें तत्व सिद्ध । याहो याहो श्रोतृवृंद । भजा आनंदासी ॥२२॥पुढील किरणी योगी नायक । तारील एक गुरूनिंदक । त्यातें बोधील रसयुक्त । म्हणें नाथसुत ॥१२३॥इति श्रीमाधवनाथ दीपप्रकाशे नाथसुतविरचिते कर्मयोग - संक्षिप्तवर्णनं नाम एकत्रिंशत्तमः किरणः समाप्तः । N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP