मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश|
एकोनविंशति किरण

दीपप्रकाश - एकोनविंशति किरण

Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.


श्रीसद्गुरुनाथाय नमः --
जयजयाजी सद्गुरुनाथा । सच्चिदानंदा स्वानंदमूर्ता । मायाधारा मायातीता । निरंजना ॥१॥
तुझ्या मायागुणांचें वर्णन । नाथसुत म्हणे मी करीन । परि तूं मायातीत जाण । मग निवांत झालों ॥२॥
करावी तुझ्या रूपाची स्तुती । तों तुझी निर्गुण मूलस्थिती । तुझ्या नामाची गावी महती । तरी तूं नामातीत ॥३॥
सर्वातीत तूं असतां । तुज कैसें स्तवावें भगवंता । म्हणोनि करितों विश्वनाथा । साष्टांगें वंदन ॥४॥
तूं अससी विश्वांत । विश्व हें खेळे तुझ्यांत । म्हणोनि तुज विश्वनाथ । हें नाम शिभलें ॥५॥
तूं केवळ महावन । सर्वांचें होसी अधिष्ठान । संतासंतांसी पोटीं घेऊन । वागविसी ॥६॥
परमार्थ - तरूची मधुर फळें । तेंवी विषयवृक्षांची कुळें । नाना श्वापदांचे मेळे । तुझा घेती आश्रय ॥७॥
हरिणबालें खेळती । ससेही प्रेमें बागडती । मयूर आनंदें नाचती । तव राज्यीं ॥८॥
ऐसा तूं सर्वांचा आधार । नसे तुला विषम विचार । घेई साष्टांग नमस्कार । बालकाचा ॥९॥
गत किरणीं विनायकें । स्वग्रामीं केलें गमन निकें । पत्नी - सन्मुख जाऊनी ठाके । म्हणें ऐकावें ॥१०॥
मी तंव पित्याचे गृहीं । गेलों होतों आज बाई । सत्यनारायणास्तव तुलाही । पाचारिलें असें ॥११॥
तरी सारोनि सकल कार्ये । उभयतांही तेथे जावें । हें मज रूचतें स्वभावें । झणीं सिद्ध होई साजणी ॥१२॥
ऐकोनि पतीचे बोल । तियेसी वाटलें नवल । म्हणे श्वशुरगृहींचा पान्हा विमल । कैसा सुटला हो आजी ॥१३॥
हें विपरीत दिसे मातें । परि सत्यनारायणास्तव येते । भेटेन मातापितयातें । आनंदानें ॥१४॥
बसविली पत्नी घोड्यावरी । आपण झाला पदचारी । मधु मधु गोष्टी करी । देखोनि पत्नी विस्मित ॥१५॥
मनीं म्हणे आज काय झाले । मम पति कैसेम निवळलें । मी कधीं नाहीं अनुभवलें । ऐसें सुख ॥१६॥
झालें मज बाळ एक । परि न येऊं देई सन्मुख । आज शिशूची चुंबनें अनेक । कां घेतसे ॥१७॥
विनायक म्हणे गे सखये । मीं तुज उगीच दुखविलें बये । आतां करीन प्रेमें तुझ्या सवें । नाना विहार ॥१८॥
राही मनीं निश्चिंत । तव पूर्व दिन गेले निश्चित । आतां सांगेन एक मात । ती श्रवण करावी ॥१९॥
मी न गेलों तव पित्याचे घरीं । सत्यनारायणही नाही परि । माझा सत्यनारायण नाशीक शहरीं । विलसत असे ॥२०॥
तयाच्या पुण्यदर्शनास । न्यावें माझ्या प्रिय सखीस । सत्य सांगतां न येतीस । म्हणोनि असत्य वदलों ॥२१॥
पाहोनि पतीची युक्ती । जाहली क्रोधवश पत्नी । म्हणे पित्यानें व्यर्थ माझी गांठीं । आपुल्याशी बांधली हो ॥२२॥
मज आधींच नवल वाटलें । कैसें आजी मन निवळलें । सांभाळा आपुलें बाळ सांवळें । मी जातसे पितृगृहीं ॥२३॥
विनायक बोले देवी । ठेवितों डोई तंव पायीं । सद्गुरुमूर्ती नयनीं पहावीं । एक वेळ तुवां ॥२४॥
ते तुज जे प्रश्न करिती । प्रत्युत्तर देई होकारार्थी । एवढीच मागणी मजप्रती । देई सहचारिणी ॥२५॥
पत्नी बोले मी न ओळखे गुरु । जो मम जुळवील संसारू । तोचि माझा सद्गुरु । इतर ते भोंदू मानी ॥२६॥
विचारितां आपुल्या गुरूने । “ मज विनायकाते नेणे ” । मग मी तया होय वदणें । सांगा काय ॥२७॥
विनू म्हणे प्रियेसी । मी न करी तंव त्यागासी । मज प्रपंच साधुनी परमार्थासी । घेणें आहे ॥२८॥
मीच तुझा तात माता । मीच तुझा सौख्यकर्ता । टाकुनि तुज अनाथा । मज परमार्थ न घडे ॥२९॥
“ नको आपुले गोड बोल । सांगेन मज जें रूचेल । असतील नशीबीं जे भोग । ते भोगणें लागती ” ॥३०॥
हें दांपत्य येई नाशिकास । कळलें वृत्त सासूबाईस । आल्या धांवत मुक्कामास । झाला खिन्न विनायक ॥३१॥
विघ्न आलें रे आलें । आतां कार्य दुष्कर झालें । नाथा मज सांभाळिलें । पाहिजे त्वां ॥३२॥
येवो आपदेचे पर्वत । परि मी उल्लंघीन त्वरित । घेईन माझे ध्येय - रत्न । निश्चयानें ॥३३॥
दुसरें दिनीं प्रभातीं । उठोनि शोधे गुरूमूर्ति । कथिलें नाथें ज्या स्थलाप्रती । तेथें असे मशीद ॥३४॥
गेला मशिदींत विनू । काजीस करी वंदनू । कोठें असे नाथ - भानू । सांगावेंजी ॥३५॥
येरू बोले ही मशीद । येथें हिंदूंचा नसे संबंध । तू होता इस्लामबद्ध । मी दावितों अल्ला ॥३६॥
विनू देई गोड उत्तर । मज दावा योगेश्वर । सुखें करीन धर्मांतर । काजीराया ॥३७॥
मग फिरोनि चोहींकडे । गेला आपुल्या आनंदाकडे । विनवी आलों पायांकडे । पत्नीसवें ॥३९॥
नाथ सांगे सासूला । जांवई घेती योगदीक्षेला । तुमची अनुमती असतां त्याला । करीन मी योगी ॥४०॥
“ नाथा ! आपण थोर संत । जांवई असती विचित्र । यांना दीक्षा देतां व्यर्थ । कन्या मम नाडेल ॥४१॥
हे दोघे असती तरूण । यांचे असती प्रपंचाचे दिन । भलभलत्या मार्गी लागून । करतील आयुष्य - क्षय ॥४२॥
मिळवावें द्रव्य अपार । करावा सुखें संसार । घरीं मुले दोन चार । असावींत कीं ॥४३॥
करावा नित्य कुलाचार । पूजावा श्रीमहेश्वर । तेणें तो सुख अपार । देईल संसारीं ॥४४॥
पत्नीचें पहावें सुखदुःख । करावें बालांचे कौतुक । हे सुख खरें अलौकिक । भोगावे यांनी ॥४५॥
साधावें थोड्या परोपकारा । द्यावे चार दाणे भिक्षेकर्‍या । क्कचित येतां ब्राह्मण घरा । द्यावे भोजन ॥४६॥
सोडोनि ऐसा उत्तम पंथ । हे शिरतीं योगांत । तयानें लक्ष्मी प्राप्त । कैसी व्हावी ॥४७॥
गृहस्थाश्रमीयां योग । कधीं न ऐकिला हा मार्ग । जो असे केवळ फटिंग । तया योग्य ” ॥४८॥
ऐकोनि सासूचें पुराण । नाथ म्हणे कैसे मायावी जन । दुःखातें सुख समजून । राहताती ॥४९॥
जेवी गोचीड गाईचे स्तनीं । दुग्धास्तव राहे रुतुनी । तुऋप होई रक्त प्राशुनी । दुग्ध म्हणोनी तया ॥५०॥
किंवा श्वान चाखे हाडूक । परी ते असे बहु कडक । तोडितां तोडितां रक्त । वाहे दातांतुनी ॥५१॥
आपुलेंच रक्त आपण प्राशी । मानी महा पक्वान्नासी । तैसी ही माया विवशी । मोही जीवासी ॥५२॥
सासूबाई चिंता न करणें । मजही न रुचे प्रपंच त्यजणें । स्त्रीपुत्रांचे शाप घेणे । योग्य नव्हे ॥५३॥
विनायकाते मिळेल धन । राहील अखंड घर भरून । खर्‍या स्त्रीसवें नांदून । करील अचल प्रपंच ॥५४॥
न सोडील तुमच्या कन्येला । कन्या ही तरी माझी बाला । ती दुःखी असतां मजला । रूचेल कैसें ॥५५॥
त्याच्या संसाराचें ओझे । सुखें घेतों शिरीं माझें । नाथबोधाचें बीज रूजे । झाले सर्व अनुकूल ॥५६॥
मग विनायक भक्तास । केला दयाळें मंत्रोपदेश । प्राणायाम खेचरी क्रियेस । दाखवी त्याच दिनीं ॥५७॥
सांगे सकल योगांचे सार । तें परिसावें योगेश्वर । नाथ मुखांतुनी गंगा - धार । आतां वाहील ॥५८॥
वाहील पहा हो स्वैर । ती निर्मल तैसी मधुरतर । स्नान करोनी प्यावी सत्वर । साधकांनीं ॥५९॥
नाथ सांगे एक आख्यान । होते गुरूशिष्य दोघेजण । शिष्य म्हणे मी कोण । हें न कळे मज ॥६०॥
जाहलों भ्रांत मी सद्गुरु । तुम्हावीण कोणा विचारूं । संशयाचा सागरू । कोण निरसील ॥६१॥
हा विचार मम मानसीं । करी अनंत वृत्तीसी । बाध येई नित्य नियमासी । त्यायोगें ॥६२॥
तूं निवृत्तिसागर । निवृत्त करिशील हा कुमर । म्हणोनि धरोनि धीर । प्रश्न केला ॥६३॥
सद्गुरु मूर्ती आनंदली । मज ऐसीच पाहिजे शिष्यावली । वत्सा तव भ्रांती सगळी । निरसीन गा ॥६४॥
तूं अससी का वृक्ष वेल । किंवा मृत्तिका शिलातल । येरू म्हणे मी देह केवळ । इतर नाहीं ॥६५॥
अरे ! तव देहाची तुज ओळखण । इतर वस्तु असती भिन्न । परि घोर निद्रेंत देहाची स्मृति जाण । असते काय ॥६६॥
जो तूं तुझा म्हणविसी । त्यातेंच कैसा विस्मरसी । मग सांग बा भिन्न अससी । किंवा नाहीं ॥६७॥
शंकित झालें शिष्यमन । झोपेंत नसे शरीरस्मरण । या योगे देह भिन्न । जाणला पाहिजे ॥६८॥
विनवी आपुल्या स्वामीसी । देह भिन्न दिसे या तत्वासी । मग मी कोण या कोड्यासी । कैंसे सुटावें ॥६९॥
सद्गुरु सांगती प्रेमपूर्ण । बाळा ही अनुभवाची खूण । येथें शब्दाचें पडे मौन । अनुमानें तुज सांगतों ॥७०॥
या सर्व उत्पत्तीचें कारण । एक आत्मा असें जाण । जो सर्वत्र भरला पूर्ण । परि अदृश्य ॥७१॥
ब्रह्म हें केवळ अविनाशी । न घेई नामरूपासी । उत्पत्ति स्थिति तयासी । न होई कदाही ॥७२॥
तो असे केवळ शुद्ध । न होई पाप पुण्य बद्ध । तो परमेश्वर सच्चिदानंद । रूपरहित ॥७३॥
माया ही दुसरी निर्गुण । परब्रह्माची छाया पूर्ण । ही आहे निश्चयें अंतवान । ब्रह्म अनंत ॥७४॥
तें ब्रह्म जैं मायाधिष्टित । तईं दिसे दृश्य रूपांत । येख्हीं तें असोनि अदृश्य । दृष्टीपुढें ॥७५॥
सर्व कर्तृत्व मायेचें । ब्रह्म हें निधान शून्याचें । माया हीच या जगताचें । सार बाळा ॥७६॥
जैसें जल असे रंगरहित । परि ज्या रंगी होय समाविष्ट । तैशाच रंगाच्या ढंगांत । दिसे लोचनासी ॥७७॥
किंवा शुद्ध कांच करीं घ्यावा । तो ज्यावरी ठेवावा । तैसाच करील उठावा । निरंतर ॥७८॥
आत्मारूपी शुद्ध कांच । रंगरहित असे साच । यासी कारण ती मायाच । पुत्रराया ॥७९॥
देह हा केवळ छत्तीस तत्त्वांचा । आहे पसारा मायेचा । त्यातें प्रकाश आत्मयाचा । तोच तूं असे ॥८०॥
हें केवळ शाब्दीक वचन । तुज न कळे अनुभवावीण । करी रे तत् स्वरूपीं मीलन । मग जाणसी ॥८१॥
केला शिष्यें नमस्कार । तूंच सर्वांचा आधार । तूंच माझा ईश्वर । परब्रह्म ॥८२॥
सद्गुरु वदती तयासी । तूं तत्व न उमजसी । मी तुझ्यास्तव रूपासी । आलों बाळा ॥८३॥
श्रीनामदेव भक्त प्रेमळ । पांडूरंगासवें करी खेळ । परि तया स्वरूप विमल । कळलें नाहीं ॥८४॥
गोर्‍या कुंभारानें मारितां । रडूं आलें त्या भक्ता । नामदेव कच्चा म्हणतां । मनीं तापला ॥८५॥
गेला पंढरीरायापाशीं । देवा तुझी संत मंडळी कैसी । कच्चा म्हणती मारूनी मजसी । हे नवनवल ॥८६॥
देव म्हणे गा नामदेवा । मी तुझ्या सवें करितो सर्व कार्या । परी माझा मूलरूप ठावा । हा नसे ॥८७॥
मृत्तिका आणि तूं एक । हें तुज दावील गुरुनायक । त्यासी होई शरणैक्य । मग जाणिशील ॥८८॥
तैं श्रीविसोबा खेचरास । आला शरण नामदेव शिष्य । सारिलें पटल विशेष । तो नामदेवची पांडुरंग ॥८९॥
तरी ऐक शिष्योत्तमा । बघावें जरी आत्मारामा । विवेकवैराग्यादी शमदमा । आधीं साधन करी ॥९०॥
तूं नामयापरी होतां संपन्न । मी तुज दावीन दर्पण । मग अनुभवसी खूण । आत्मरायाची ॥९१॥
होती एक सुशील नारी । पतीसह सुखें संसार करी । नाथेची तियेला हौइ भारी । म्हणे मज द्यावी नाथा ॥९२॥
नथ तेवी मंगळसूत्र । हा स्त्रियांचा अलंकार पवित्र । तोही न मिळतां येथ । व्यर्थ जिणें ॥९३॥
हळदकुंकवास्तव जातां कोठें । लाज वाटे जिवातें । लावोनि कुंकम नासिकेतें । जाणें लागे ॥९४॥
तरी करोनि बहु यत्न सखया । मज नथ द्यावी पतिराया । स्त्रियेनें दावितां माया । मोहिला पति ॥९५॥
कष्टोनि केली नथ । आनंदविलें कलत्र । परि एके दिनी विचित्र । जाहलें गा ॥९६॥
टोंचिले होतें नाक पुन्हा । त्यायोगें संतत जाणा । अलंकार ठेवूं शकेना । नासिकेंत ॥९७॥
म्हणोनी ती भामिनी । अडकवी मंगळसूत्रीं नथ झणी । परी ते स्थान विस्मरूनी । म्हणे नाथ कोठें ॥९८॥
जाहली अंतरीं व्याकुल । गृहींचा सर्व भाग शोधिला । दुःख करी ती अबला । आतां काय करूं ॥९९॥
पतीस करोनी आर्जव । केलें भूषण अभिनव । परि तेंही नेई दुर्दैव । धिक् जीवन माझें ॥१००॥
गेली देवगृहीं त्वरित । करी नाना नवसांप्रत । विनवी अंबेसी देई नथ । तव पूजा करीन गे ॥१॥
करीन मी शनिवार । मम देई अलंकार । शनि देवा तूं सत्वर । पावसी नवसा ॥२॥
न जाई शेजारीं पाजारीं । मज मूर्ख म्हणतील सारी । म्हणोनी गृहीच तळमळ करी । भ्रमित बाई ॥३॥
तों आला एक साधुवर । कां वो होसी दुःखित फार । गेला माझा अलंकार । सद्गुरूराया ॥४॥
येतां पतीची गृहीं स्वारी । मारील हो यमापरी । सोडवावा प्रश्न लौकरी । दीनेचा या ॥५॥
साधू निर्भ्रांतीचा आरसा । दाखवी स्त्रियेसी खासा । पाही तुझा अलंकार कैसा । कोठे असे ॥६॥
दिसली नथ गळ्यांत । झाली स्त्री हर्षित । म्हणे तूंच माझा सद्गुरुनाथ । हरविली भ्रांती ॥७॥
साधू बोले तियेसी । तुंवा आदर्श पाहिलासी । त्या आदर्शातुनि मजपाशीं । नथ देई ॥८॥
तव कंठांतील तूं सांभाळी । परि देई मज दर्पणांतली । हंसुनी म्हणती बाळी । हें नवल ॥९॥
तव दर्पणानें दयाळा । मज नथेचा ठाव दिधला । परि प्रत्यक्ष वस्तुकला । माझी मजपाशीं ॥११०॥
ऐक शिष्या ही गोष्ट । तुज प्रकाशवील उक्त । गुरु केवळ उघडून पट । दावील वाट ॥११॥
आत्मज्ञानाची किली । आहे सत्य रे मज जवळी । परि तूं होतां संपन्न वेळीं । तुज देईन ॥१२॥
त्याविणें नसे माझी कृपा । या केवळ शब्दांच्या थापा । तूंचि आपुला शत्रु मित्र पां । लागे प्रयत्नासी ॥१३॥
विनवी शिष्य कळवळीनें । मज आतां मार्ग सांगणें । जाईन त्यावरूनी निश्चयानें । गुरूराया ॥१४॥
आत्मज्ञानाची साधनें अनेक । परि योगासम नाहीं आणीक । तूं अभ्यासयोग निःशंक । स्वीकारी गा ॥१५॥
योगाचें मार्ग कठीण । यद्यपि त्यांत सुलभ जाण । या योगाचें विंदाण । सांगती मुनी ॥१६॥
नरदेही या योगांचे साधन । आहे सर्वांसी साध्य जाण । याची पंथें झाले स्वरूपी निमग्न । अनेक साधक ॥१७॥
नरदेहासारखी अन्य योनी । नाहीं कोठेही त्रिभुवनी । येथेंच मुक्ती साजणी । माळ घाली ॥१८॥
या नरदेहा घेऊन । जाहले नर नारायण । नरदेहा ऐसा जन्म । नाहीं आणिक ॥१९॥
नर आणील स्वर्गाते भूतलीं । नर घेईल समुद्राची खोली । खेळवील सृष्टी सगळी । अतुल प्रभावें ॥१२०॥
पंचतत्वांचेंही खेळणें । नर करील गा स्वाभिमानें । नर शोधील सर्व लोकांचीं स्थानें । निःसंशय ॥२१॥
नरदेहा ऐसा समर्थ । दुजा असे रे कचित । नरदेह हा सोपान खचित । मुक्तिमंदिराचा ॥२२॥
या नरदेहींच येऊनी ऋषी । जाहले थोर योगाभ्यासी । ऐक्य करिती जिवशिवासी । योगबळें ॥२३॥
कोणी कर्मयोगी होऊन । बुद्धीचें करिती उन्मन । कोणी ज्ञानसंपन्न । आत्मयाचें ॥२४॥
कोणी भक्तियोगाचा जिना । चढून जाती प्रभूच्या आंगणा । या नरदेहीं चार मुक्ति जाणा । इतरा अशक्य ॥२५॥
ऐसा हा नरदेह श्रेष्ठ । जो आचरील येथींचें व्रत । तोच निश्चयें जीवन्मुक्त । होईल गा ॥२६॥
सर्वजन्माचे मागुती । हा नरजन्म देई जगपति । तयाचा उपयोग निश्चितीं । करावा परमार्थी ॥२७॥
इतकी या देहाची श्रेष्ठता । परी कोणी न आणी चित्ता । भुलती सारे मायेच्या गोत्रा । करिती अकर्म ॥२८॥
माया कर्दमीं बहुत लोळती । त्यामाजीं कित्येका वाटे खंती । परि ते मनातें निंदिती । नावरे म्हणुनी ॥२९॥
मन असे किंकर केवळ । त्यासी नसे स्वतंत्र बळ । व्यर्थ करिती जन कल्लोळ । मनांचे नांवें ॥१३०॥
मनासम आज्ञाधारक । नाहीं या जगीं दुसरें देख । जेथ ठेविती जन कल्लोळ । होउनी राही ॥३१॥
मनासी न लागे बरे वाईट । अथवा न विचारी पात्रापात्र । ये विषयीं सांगेन दृष्टांत । तो आदरें परिसावा ॥३२॥
आपुल्या कुरूप बाळासंनिध । परक्याचा असतां सुंदरनंदन । मनुज घेई आधी चुंबन । कुरूप पुत्राचें ॥३३॥
घरी असोनि सुंदर नारी । जाती कुरूप कुलटेच्या द्वारी । शर्करेचा येई वीट भारी । कडू सुरा आवडे जीवाहुनी ॥३४॥
एवंच मन हें ताबेदार । त्यास ठेवाल तैसें राहणार । उगीच दोष देती थोर । मनरायासी ॥३५॥
कित्येक लागती अभ्यासी । प्राणापानाची करिती एकगती । परि मोहुनी सिद्धीस शेवटी । करिती घात आपुला ॥३६॥
कित्येक करिती वितंडवाद । माजविती शब्दांचें पाखंड । कित्येक राहुनी असावध । आचरिती निज क्रिया ॥३७॥
ऐशा अनेक विकल्पांत । सांपडती साधक खचित । सहस्त्रामाजी दिसे क्कचित । सिद्धपुरूष होई ॥३८॥
या आत्मसंयम योगासम । नाही गा सुलभ कर्म । तूं स्वीकारी हाचि धर्म । शिष्योत्तमा ॥३९॥
पूर्वी जे झाले संत । त्यांनीं धरिला हाचि पंथ । योगाविणें झाला मुक्त । असा क्कचित प्राणी ॥१४०॥
सर्व कार्यांचें अधिष्ठान । आहे हा योग नारायण । त्याते चिंतील जो नर सुलक्षण । तों स्वयेंच होईल योग ॥४१॥
या योगातें विघ्न । आलस्य आणि संशय जाण । व्याधि अस्थिर मन । विषय लुब्धी ॥४२॥
योगाभ्यासाची मुख्य साधनें । दोन असती शिष्या ऐकणे । गुरुपदीं दृढ श्रद्धा ठेवणें । निश्चय हें दुसरें ॥४३॥
या साधनांचा ज्यास योग । तो साध्य करील राजयोग । हा सिद्धांत अभंग । जाण बाळा ॥४४॥
जरी या अभ्यासाचा क्रम । चुकला साधक उत्तम । तरी त्या येईल गा पुनर्जन्म । साध्य व्हावया ॥४५॥
या जन्मीं तो योगभ्रष्ट । होईल मुक्त हे निश्चित । पार्थाप्रती ग्वाही देत । श्रीकृष्ण भगवान ॥४६॥
साधकें ठेवावा मिताहार । विशेषतः दुग्धाहार । तांदूळ घृत साखर । सत्त्वगुणी सेवावे ॥४७॥
करावें उदराचे चार भाग । दोहीं अन्न एकीं जलसंघ । एक्या भागीं वायूचा मार्ग । राहूं दीजे ॥४८॥
तिखट तैल वर्जावें । तामसी अन्न न सेवावें । तयातें योग न साधवें । जे तामसी ॥४९॥
अन्नावरी सर्व भार । अन्न हें चित्ताचें घर । जैसे खाद्य तैसें स्थिर । होईल मन ॥१५०॥
या अभ्यासी सर्वा अधिकार । तरूण वा वृद्ध जर्जर । स्त्रियाही होती योगिनीवर । अनुसूयादि ॥५१॥
आतां अभ्यासा कैसें स्थळ असावें । हेंच चतुर्दश किरणीं कथिलें बरवें । श्रोतीं तें किरण पहावें । कळोनि येईल ॥५२॥
स्थलाचें मुख्य लक्षण । सदा शुचिर्भूत असावें जाण । एकांत स्थानीं आसन । स्थिर करावें ॥५३॥
प्रभातकाळीं मध्यान्हांस । सायंकाळीं मध्यरात्रीस । करावा योगाचा अभ्यास । निश्चलपणें ॥५४॥
परि सद्यः कालानुसार । जरि सर्व न वाटती सोईस्कर । प्रभाती आणि निशीं सुखकर । होईल गा ॥५५॥
पुढील किरणीं योगांगें । विशद करून गुरु सांगे । ऐसें श्रीमाधवनाथही सांगे । विनायकासी ॥५६॥
नाथसुत केवळ स्तंभ जड । श्रीमाधवनाथदीप प्रचंड । ठेवुनी किरणें बहुविध । प्रकाशवी ॥५७॥
नसतां दीप जरी उजळला । मग कोण विचारी स्तंभाला । जनांच्या नयनयुगुला । तोष नच देता तो ॥१५८॥
इति श्रीमाधवनाथ दीपप्रकाशे नाथसुत विरचिते भक्त विनायकानुग्रहनाम एकोनविंशति किरणः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP