मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश|
अष्टविंशतितम किरण

दीपप्रकाश - अष्टविंशतितम किरण

Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.


श्रीसद्गुरुनाथायनमः --
जयजयाजी लोकनायका । लोक - दुःख - छेदका । लोकलयाणकारका । तुज साष्टांग ॥१॥
लोकांकारणें कष्ट सोशिशी । लोकांकारणें स्वरूपीं येसी । लोकांकारणें लोकां ऐशी । कारिशी कृती ॥२॥
लोकांकारणें करिसी कर्म । लोकांस्तव सांगसी धर्म । लोकहितार्थी अधर्म । निःपात करिसी ॥३॥
लोकांस लावावया धर्मनादीं । लोकांचीच करिसी स्तुति आधीं । म्हणसी लोकांसी ठेविसी हृदीं । सदोदित ॥४॥
लोकांस्तव घेसी लघुत्व । लोकांतें देशी देवत्व । करिसी लोकांचें सेवकत्व । धांवुनिया ॥५॥
तूं केवळ परमात्मा । नामरूपातीत रामा ! । परी लोकां आणाया परंधामा । लोकासम होसी ॥६॥
देशकालस्थित्यनुसार । तूं घेसी अवतर । मच्छ - कच्छ - वराह थोर । होसी लोकांकारणें ॥७॥
भक्त लोकाग्रणी प्रल्हाद । त्यास रक्षिसी अखंड । हिरण्यकश्यपूचा केला वध । लोकवंद्या ! ॥८॥
राखिलें भक्तांचे वचन । तेवीं ब्रह्मयाचें वरप्रदान । म्हणोनी नरकेसरी समान । धरिलें रूप गा ॥९॥
बली होता भक्तराज । परी न पाही तो लोककाज । म्हणोनी पातालीं सहज । घातला वामनरूपें ॥१०॥
क्षत्रियांनीं केला कहर । बुडविलें लोकसत्वाचें माहेर । होवोनि परशुराम द्विजवर । करिसी निःपात तमाचा ॥११॥
झाला लोकांत दुःखभार । बंदीत पडती सुरवर । म्हणोनी रामरूप सुकुमार । धरोनी मारिलें रावणा ॥१२॥
मायेचें माजलें थोतांड । लोक विसरले धर्मबंध । विपरीत मतांचे झाले बंड । घेतला कृष्णावतार ॥१३॥
निशाचरांचा निःपात केला । भगवद्गीतेचा अरूण प्रगटविला । कर्मयोग रवि उदयाला । आणिलासी ॥१४॥
मग होउनि बौद्ध । करिसी बुद्धीचा प्रभाव शुद्ध । ऐसा लोकहिताचा छंद । तुज सर्वकाल लागला ॥१५॥
तुझ्यासम लोकाग्रणी । न सापडें गा त्रिभुवनीं । आतां माधवनाथ रूपें जनीं । येसी लोककाजास्तव ॥१६॥
पूर्वी जे त्वां अवतार घेतलें । त्यात कांहीं न्यूनत्व राहिलें । म्हणोनी कां हें शुद्ध रूप घेतलें । सद्गुरुराया ॥१७॥
वामनावतारीं बली फसविला । परशुरामें मारिलें मातेला । पित्याच्या मृत्यूसी कारण झाला । रामावतार ॥१८॥
श्रीकृष्णावरी आरोप फार । जन म्हणती त्या चोर जार । परी सर्व शुद्धीचें सार । सद्गुरु माझा ॥१९॥
जैसे भेटतील लोक । तैसाची होई लोकनायक । लोकोद्धाराचें व्रतएक । दृष्टीपुढें ठेवी ॥२०॥
गत किरणीं श्रीनारायणानंद । सांठविती हृदीं योग्याभ्यानंद । वली शिष्य जो परमानंद । त्यातें संकटीं सोडविती ॥२१॥
वली सदा आनंदांत राहे । भोगी सुख शांतीदेवीसवें । भार्या पुत्र असती । परी हे नादलुब्ध ॥२२॥
एकदां आले तीन कानफाटे । अंगावरी भगवीं वस्त्रें । शैली श्रृंगी वाजविती ते । बाह्योपचारें ॥२३॥
मागती भिक्षा वलीजवळी । येरू गेला तों माता दिसली । तिला न कळतां घातली । धान्य भिक्षा ॥२४॥
परी भिक्षेकरी झाले कोपिष्ट । शापिती वली भक्त । त्वां भिक्षा दिली अल्पमात्र । सर्पदंश तुज होई ॥२५॥
वली विनवी कर जोडून । मी केवळ दीन हीन । इतुकी भिक्षा घेऊन । पावन करावें ॥२६॥
परी तयांनीं नायकिलें । क्रोधेंच निघोनि गेले । वली - मातेनें सर्पदंशा ऐकिलें । जाहली दुःखीत ॥२७॥
अनाथाचा कैवारी श्रीनाथ । आली तेथ आई धांवत । सांगितली जोग्यांची मात ।म्हणे रक्षीं बालका ॥२८॥
नाथें दिधलें अभय तियेला । वली दंशातीत झाला । तो न मानील काळाला । सर्पाचा पाड काय ॥२९॥
जरी दंश करील तक्षक । तरी सुखी राहील मम बालक । तूं सांभाळीं प्रिय तोक । न जाऊं देई मोरीकडे ॥३०॥
मातेनें वलीसी प्रतिपाळिलें । कोठेहीं न जाऊं दिलें प्रेमळें । परी एकदां वली सहजीं गेले । मोरीपाशीं ॥३१॥
तेथें होता सर्प विखारी । वली पदातें दंश करी । रक्तबिंदुद्वय सत्वरी । निघालें तेथें ॥३२॥
घाबरली ती मायेची देवता । नाथपदीं आणी प्रियपुत्रा । कटुनिंबाचा बांधिला पट्टा । योगेंद्रानें ॥३३॥
बसविलें भजना वलीस । मृदंग वाजवी योगेश । लाविली समाधी सर्वास । आनंदानें ॥३४॥
बांधितां प्रभुनें पाला । वली दुःखमुक्त झाला । ऐसा रक्षी नानावेळां । सर्व बाळकांसी ॥३५॥
भक्त कोठेंही असो बसला । पूर्ण ध्यास तयानें घेतला । तेथें तेथें धांवला । योगीराज ॥३६॥
वैदर्भ प्रांतीं यवतमा: । तेथें होती नाथ बाला । जाई सरोवरीं स्नानाला । मंगलदिनीं ॥३७॥
कुमारीचा पाया निसटला । जीव बहु व्याकुळ झाला । म्हणे नाथा ! । धांव दयाळा । प्राण व्याकुळ ॥३८॥
नाथा ! मी केवळ अनाथ । आलें घोर संकट । तुजवीण तारक येथ । नाहीं अन्य ॥३९॥
कोणी तरी उचलोनी । ठेविली तीरीं ती भामिनी । पाही लोचन उघडोनी । तों शून्यवत् ॥४०॥
नंदिग्रामीं प्रभु दर्शना । आली ती भाविक कन्या । प्रेमें म्हणें योगीराणा । तूं मज बुडविसी ॥४१॥
मी पोहणें न जाणें । परी माझे कन्यासुत विलक्षण । मज नदींत बोलावून । आणती गा ॥४२॥
जलग्रामीं येई गुरु नारायण । करी नाथसुतातें पावन । तयाचा ज्येष्ठ बंधु कृष्ण । त्यातें गुप्त अनुग्रह ॥४३॥
बघोनी तयाचें वृत्ति वैभव । नाथें दिधली भक्तिनाव । तूं यांत बसोनी जाय । कृष्णराया ॥४४॥
तूं जीं जीं कर्में करशील । तीं मदार्पण करीं बाळ ! । खाणें पिणें भोगी सकल । पाही मजलागीं ॥४५॥
सृष्टी सुंदरीचें हें विचित्र उपवन । येथें जीवतरू वेली संपूर्ण । नाना रूपें करिती धारण । तैसाची वेष माथा ॥४६॥
या वनांत फिरावयाचें । यम नियम हे मार्ग साचे । खळगे असती भ्रांतीचे । ते ओलांडावे त्वा ॥४७॥
यम नियमाचा मार्ग सोडून । तूं न जाई रे कृष्णा । ना तरी मायेच्या गुंफेत जाण । शिरणें लागे ॥४८॥
तेथें षडरी हीं श्वापदें । तुज छळतील गाढें । होतील रे तुकडे तुकडे । तरी मार्ग न सोडीं ॥४९॥
यम मार्गानें तूं जाशील । तेथें तुज हृदयगृह दिसेल । चक्राचें द्वार उघडशील । तैं मे दिसेन ॥५०॥
या उपवनाचा माळी । मीच आहे वनमाळी । म्हणोनी समर्पी क्रिया सगळी । भक्तराया ॥५१॥
करीं तुझा देहव्यवहार । न घेई हटयोगाचा जोजार । सर्वाभूतीं संचार । पाहीं माझा ॥५२॥
मी रवि चंद्र तारकांत । नद्या ओढे समुदांत । वालुका तेवीं मृत्तिकेंत । मीं भरला असे ॥५३॥
पर्वत हें मम रूप असे । सर्व योनींत मीच भासें । अणुरेणूसहि प्रकाशे । मी आत्माराम ॥५४॥
मी नाहीं तें स्थल नाहीं । मी नाहीं तें दृश्य नाहीं । ऐसा सर्वांठायी मज पाहीं । फार काय सांगों ॥५५॥
शिष्य विनवी सद्गुरुसी । मज न कळे ही ज्ञानराशी । तूं ज्ञानाचा केवळ शशी । प्रकाशवीं मज ॥५६॥
तुझी मोहक मूर्ती मातें । न आकळितां जेथें । मग विश्वरूप समुद्रातें । कैसा आकळीन ॥५७॥
तरी देवा ऐसें न करावें । मज दीना पदरीं घ्यावें । सुलभ मार्गावरी न्यावें । कृपाळुपणें ॥५८॥
मज नाहीं दुजा ईश्वर । तूंच एक केवल आधार । दाखवितां ध्यानाचा डोंगर । कैसा उल्लंघूं ॥५९॥
हंसुनी म्हणे योगीश्वर । सांगेन भक्तीचा विचार । तोची सुलभ आधार । बघाया मूलरूप ॥६०॥
सर्व कर्में करी मदर्पण । हें तुज पुर्वीच सांगितलें जाण । सदा वृत्ती ठेवीं समान । भक्तराया ॥६१॥
स्तुतीचा न मानावा गर्व । निंदेचा न व्हावा खिन्नभाव । जैसें गगनीं येती मेघ सर्व । परी गगन शांत ॥६२॥
किंवा समुद्रीं येवों पर्जन्य । परी सोडी सीमा जाण । तैसें करीं आपुलें मन । निर्विकार ॥६३॥
निंदक हा मोठा उदार । करीं मार्गांतील कंटक दूर । निंदका सारखा उपकार । दुसरा कोणी न करी ॥६४॥
निंदकाविणें कार्य न होई । निंदक ही ममतेची आई । निंदकासारखा सखा नाहीं । जगतत्रयीं ॥६५॥
निंदक हा रजक वाटे । मलिन मन - वस्त्राचे धुतो गट्ठे । न घेईं अल्प मजुरीतें । आपणापासुनी ॥६६॥
निंदक हा तीर्थराज । करी पापक्षालन सहज । निंदक वाढवी वोज । शक्ति सदा ॥६७॥
निंदकाचें साह्य आहे । म्हणुनीच परमार्थ लाभ होय । निंदक नसतां प्राणी राहे । अभिमान - गर्तते पडुनी ॥६८॥
ऐशा निंदका निशिदिन । तूं करीं साष्टांग नमन । उपकृति त्याची स्मरून । राहीं निश्चल अंतरीं ॥६९॥
आतां स्तुतिपाठक कोणी भेटेल । न मानीं तयाचा डौल । तूं न पात्र स्तुतीस केवळ । परी तत्व असें ॥७०॥
तुझ्या अंतरीं जें तत्व खेळें । स्तुतिपाठके त्यातें स्तविलें । ऐसा निश्चय ठेवीं स्वबळें । मग तुज भीति नाहीं ॥७१॥
मनी संतोष ठेवावा । कोणाचा द्वेष न करावा । सुखदुःखाचा न मानावा । आनंद वा खेद ॥७२॥
सर्व इंद्रियें गुरुसेवेंत । त्वां अर्पण करावीं उचित । नरदेहींच यथार्थ मुक्ती । लाभते गा ॥७३॥
चौर्‍यांशी लक्ष असती योनी । परी नरदेह हेंचि मुक्तिसाधन । अपूर्व भाग्येंच हा जन्म । लाभतो जीवासी ॥७४॥
स्वर्गींचे देवही इच्छिती । या नरदेहाची व्हावी प्राप्ती । परी किती एक दुर्मती । करिती त्याची मृत्तिका ॥७५॥
असोनी ज्याची श्रफ़्वण । न करिती प्रभुलीला श्रवण । जैसी भिंतीसी बिळें दोन । तैसे कान तयाचें ॥७६॥
मस्तकीं चढविला रूमाल जरतारी । किंवा पगडी तुरेदारी । अथवा मुकुट नानापरी । शोभविले ॥७७॥
ऐसें मस्तक सद्गुरुपायीं । न लवे जयाचें कदाही । तें गर्दभावरील ओझें पाहीं । शिष्यराया ॥७८॥
जयाची वाणी रसाळ । परी विषयासी वाचाळ । नामोच्चार ना करील । ती वाणी व्यर्थ गा ॥७९॥
जैसा बेडूक रात्रभरी । करी बडबड भारी । तेवीं वाणी निःसत्व सारी । त्या देहाची ॥८०॥
हस्तीं घातलीं सुवर्ण - कंकणें । परी व्यर्थ प्रभुसेवेविणें । प्रेताचे कर भूषविणें । तैसें होय ॥८१॥
मृग - नयना परी नयन । परी न पाहती प्रभूचें ध्यान । ते काष्ठमूर्तींचे जणूं नयन । तेजहीन दिसताती ॥८२॥
नासिका भासे चांफेकळी । श्री गुरुपदींची सुमनावली । परी न अवघ्राणी कदाकाळीं । ती दुर्गंधी केवळ ॥८३॥
कमलापरी वदन । न करी तीर्थप्रसाद ग्रहण । तो घाणीचा पेंव जाण । शिष्योत्तमा ॥८४॥
कंठीं ज्याच्या बहु माधुरी । परी प्रभु - गायन न करी । तो रासभाच्या कंठापरी । जाण बाळा ॥८५॥
पाय असतीं बळकट । परी न तीर्थयात्रा करिती । प्रभुमंदिरीं न जाती । ते वृक्ष - खोडासम ॥८६॥
ऐकोनी प्रभुचें नामोच्चारण । जयाचें न द्रवें चित्त जाण । तो केवळ आहे पाषाण । समज बाळा ॥८७॥
तरी सर्व इंद्रियांना । तूं भक्तिमार्गीं नेई कृष्णा । मग तींही ब्रह्मरूप जाणा । होतील निश्चयें ॥८८॥
जयाचें चित्त तत्पदीं रमेल । तो सर्वांसी तुच्छ मानील । राज्यवैभवहि तृणवत् समजेल । निश्चयेसी ॥८९॥
प्रभु भजनें मिळेल शांति । मग इंद्रियेंहि निर्बल होतीं । सहज समाधीची प्राप्ति । त्या योगें मिळेल ॥९०॥
निष्कामभक्तिचें सोनें । घेउनि करी भूषणें । सर्व काया बाह्यांतरीं शोभविणें । हा राजमार्ग ॥९१॥
आतां भक्तीचे प्रकार । असती नऊ साचार । सांगे नारद योगेश्वर । प्रल्हाद पुत्रासी ॥९२॥
श्रवण, कीर्तन, स्मरण, । चरण - सेवा, अर्चन, वंदन, । दास्य, सख्य, आत्मनिवदेन । नवविधा भक्तीही ॥९३॥
आतां श्रवण भक्तीचें लक्षण । तुज करीन निवेदन । ऐकाव्या ईशलीला जाण । किंव अध्यात्म ग्रंथ ॥९४॥
सगुणापासून निर्गुण । हा सिद्धांत जाण । म्हणोनी सगुण कीर्ति ऐकोन । व्हावें निर्गुण ॥९५॥
नाना पुराणें ऐकावी । प्रभु - गुण - कथा चाखावीं । अंतरीं सदैव रूझवावीं । श्रवण भक्ति ॥९६॥
अध्यात्म ग्रंथ ऐकोन । तितिक्षेचें मिळे साधन । सहज जाई मज रमून । आनंदांत ॥९७॥
नाटकें अथवा कादंबर्‍या । त्वां न ऐकाव्या कुमारा । विषयाचा वारा । भेदील शरीरीं ॥९८॥
अध्यात्म ग्रंथ प्रथम । तुज वाटतील कठिणतम । परी अभ्यास करितां उत्तम । चाखशील गोडी ॥९९॥
मनन करोनी ऐकावें । मग त्यांतील रहस्य घ्यावें । रहस्य कळतां वीट ये । क्षुद्र ग्रंथांचा ॥१००॥
पक्कान्नाची मिळतां माधुरी । कोण खाईल भाकरी । अध्यात्म ग्रंथाची थोरी । अपूर्व असे ॥१॥
शब्द - ब्रह्माचें जें सार । तें अध्यात्म - ग्रंथ - भांडार । पूर्वजें ठेविलें उघडें साचार । वेंचावीं रत्नें त्यांतुनी ॥२॥
दुसरें लक्षण कीर्तन । सतत करावें भजन । वर्णावें प्रभूचें गुण । नानाप्रकारें ॥३॥
हरि - कथेचें कीर्तन । करी वृत्ती तल्लीन । कीर्तनें होई समाधान । चित्तवृत्तीसी ॥४॥
कीर्तनें होतें आत्मकार्य । कीर्तनें होई परांचे कार्य । कीर्तनें स्वार्थ परमार्थ होय । हा सिद्धांत ॥५॥
कीर्तनें होतें चित्तशुद्धी । कीर्तन ही भक्तीची गोडी । कीर्तनेंच तुकोबा जाण । परमामृत चाखिती ॥६॥
कीर्तना ऐसें साधन । नाहीं जगतीं आन । कीर्तनेंच तुकोबा जाण । परमामृत चाखिती ॥७॥
सोडुनी भगवत् किर्तन । करिती विषयांचे कथन । ती अधोगति जाण । निश्चित बाळा ॥८॥
करिती मंगल महोत्सव । तेथें कीर्तनाचा अनुष्टुप होय । नाचविती वेश्या समूह । धिक् धिक् जिणें तयांचे ॥९॥
तरी कीर्तन आदरें करावें । कीर्तनीं जन रंगवावे । हें कीर्तन भक्ति - लक्षण बरवें । तुज सांगितलें ॥११०॥
आतां नामस्मरण ही तिसरी भक्ती । अनेक किरणीं प्रकाशविली ज्योती । स्मरणाविणें न तुटती । इंद्रियबंध ॥११॥
स्मरणें होई शुद्ध शरीर । स्मरणें पीडा जाई दूर । स्मरणें विकल्पाचें घर । नाहींसें होई ॥१२॥
या स्मरणाचा महिमा अपार । गाती श्रीज्ञानेश्वर । स्मरणाविण नाहीं उद्धार । नरदेहाचा ॥१३॥
नाम गावें नाम ध्यावें । नाम सद्गुरुसी वहावें । नामाविण केव्हांहीं नसावें । भक्तराया ॥१४॥
अशनीं शयनीं भोजनीं । रमावें चित्त नामस्मरणीं नाम महिमा जाणे मुनी । महादेव ॥१५॥
नामानें तरला अजामीळ । नामेंच वाल्मिक मराळ । नाम हा सोपान सोज्वल । साधकासी ॥१६॥
कांहीं न झालें जरी कार्य । परी नामें रंगवी हृदय । तो निश्चयें मुक्त होय । पुण्यवान् ॥१७॥
असेल जरी दुराचारी । नामाचा जप करील अंतरीं । त्याचीं पापें दुरी । भिऊनी पळतील ॥१८॥
अभ्यास योग नाहीं घडला । परी नामाचा सदा चाळा । राखील यमनियमाला । तोही होईल योगी ॥१९॥
अंतीं येतां नाम मुखीं । तोची खरा सार्थकी । त्या पुनर्जन्म नाहीं ही उक्ती । भगवंताची प्रसिद्ध ॥१२०॥
नामाचा ठेवितां हव्यास । तेंचि अंतकाळीं करील प्रकाश । येरव्हीं न ये नाम मुखास । मरण समयीं ॥२१॥
चौथी भक्ती पादसेवन । जावें सद्गुरुसी शरण । करावी सेवा मानस पूर्ण । अहर्निश ॥२२॥
काया - वाचा - मन । वहावें सद्गुरु - चरणीं । कायेनें करावें बाह्य सेवन । सद्गुरु पदाचें ॥२३॥
वाचेनें सद्गुरुचीं स्तोत्रें गावीं । नाना काव्यें करावीं । सद्गुरु - पदीं समर्पावीं । प्रेमभावें ॥२४॥
मनानेंही सेवा करावी । सद्गुरु - चरणीं दृष्टी ठेवावी । श्रीगुरुसी आवड ज्या गांवीं । तें मी होईन ॥२५॥
मी होईन सुवास । श्रीगुरुच्या नासिकी वास । जें जें आवडें श्रीगुरुस । तें तें मी होईन ॥२६॥
जरी देहाची झाली माती । तरी सेवीन सद्गुरुप्रती । जेथें प्रभु उभें राहती । त्या स्थळीं माती होईन ॥२७॥
शरीरांतील उदक तत्व । जेथें स्पर्श करील गुरुराय । तेथेंच ठेवीन निःसंशय । ही मानसीक सेवा ॥२८॥
जेथें सद्गुरुस ओवाळती जन । तेथें तेज तत्व मिळवीन । जेथें वारा घालिती विंझणें । वायूसी ठेवीन ॥२९॥
ज्या अवकाशीं श्रीगुरु वसती । तेथेंच मिळवीन आकाश ज्योती । न पाहीन दिवस रात्री । सेवीन सद्गुरुला ॥१३०॥
गुरुसेवा हें धर्माचें सार । गुरु - वचन ॐ कार । गुरु मूर्ति हा ब्रह्म साक्षात्कार । ऐसी पूर्ण भावना ॥३१॥
जन्म - मृत्यूची यातायात । सोडायासी सद्गुरु समर्थ । वेदांत सिद्धांत मत । सद्गुरु - वांचुनी नाकळे ॥३२॥
ब्रह्मा विष्णु महेश । न देती मुक्तीस । सद्गुरुविण चित् प्रकाश । मिळणार नाहीं ॥३३॥
म्हणोनी त्रिपुटीनें । सेवावें सद्गुरु - चरण । याचे नांव आत्मनिवेदन । चवथी भक्ती ॥३४॥
पांचवी भक्ती अर्चन । करावें सद्गुरुचें पूजन । घालोनी सहजासम । भक्तीनें गा ॥३५॥
करावें गृही देवमंदिर । देव्हाराही मनोहर । सजवावें आसनें अलंकार । मनसोक्त ॥३६॥
ठेवावी सद्गुरुंची मूर्ति । अथवा चित्रें पुरती । आणावीं नाना पुष्पें प्रीतीं । शोभवावें प्रभूसी ॥३७॥
षोडशोपचारें पूजा करावीं । मनाची वृत्ती दवडावीं । मानसोपचारें पूजावीं । श्रीगुरुमूर्ति ॥३८॥
मानसपूजेचें विधान । सांगितलें षोडशतम किरणीं । त्यापरी वर्तोनी । अर्चन भक्ती करावी ॥३९॥
सहावी भक्ती वंदन । सर्वासीं करावें नमन । साधूसंतसज्जन । आदरें नमावें ॥१४०॥
सर्व देवांसी नमावें । कोणा न उल्लंघावें । नमना ऐसी लीनता नोहे । कोठेंही ॥४१॥
नमनें येई निरभिमानता । नमनें जाती दोष तत्वतां । नमनें सद्गुरूची प्रसन्नता । सदा राहे ॥४२॥
कोपिष्ट जरी असला प्राणी । त्यास करितां साष्टांग नमनें । तो शांत होई ते क्षणीं । ऐसे नमन महात्म्य ॥४३॥
नमनें बुद्धीचा विकास होई । नमना न लागे खर्च कांहीं । नमनें अमृताच्या डोहीं । सदा राही मानव ॥४४॥
सद्गुरुपदीं घालितां लोटांगण । सर्वापराधांचें करील क्षालन । आतां सातवी भक्ती दास्य जाण । ती त्वां स्वीकारावीं ॥४५॥
करावे श्रीगुरुचें दास्यत्व । न ठेवावा दुजा भाव । जी आज्ञा करील गुरुदेव । ती पाळावी ॥४६॥
सख्यत्व आठवें लक्षण । याचे करावें फार जतन । प्रेमसूत्रें बांधून । सद्गुरुसी ठेवावें ॥४७॥
जेणें पंथें प्रभुतुष्ट । तोच घ्यावा पंथ । न दुखवावें गुरुचित्त । कदाकाळीं ॥४८॥
प्रसंग कैसाही येवो । परी न ढळावा भावो । सख्यभक्तीचा ऐसा निश्चयो । ठेवीं मनीं ॥४९॥
प्रभूच्या सख्यत्वास्तव । सोडावे व्यवहार सर्व । कांता सुताचें भय । बाळगूं नये ॥१५०॥
सख्यत्वासी जेणें बिघाड । त्याचा तोडावा संबंध । सख्यत्वेंच सद्गुरुदेव । आकळला जाये ॥५१॥
नववी भक्ती आत्मनिवेदन । करावें आत्मानात्म विवरण । पिंड ब्रह्मांडाचें शोधन । करीत जावें ॥५२॥
त्वंपद तत्पद विचार । यांचा भेद करावा दूर । जीव शीवाचा अलंकार । करावा एक ॥५३॥
मी - पणाचा जेथें विसर । तेंचि आत्मनिवेदन थोर । याचा तूं करीं स्वीकार । भक्तराया ॥५४॥
पंचतत्वीं जैसें आकाश । देवामाजीं सद्गुरु परेश । गुणामाजीं सत्व विशेष । तैसी भक्ती नववी ॥५५॥
ऐसे भक्तीचें प्रकार । सांगे श्रीगुरुवर । भक्ती हे सर्वांचे सार । म्हणे श्रीनाथा ॥५६॥
भक्तीने मिळे ज्ञान । भक्ति हें योगसाधन । भक्ती हें वैराग्य - भूषण । साधकांसी ॥५७॥
कलीयुगीं भक्ती हें अमृत । सर्वांसी करी जीवंत । भक्तीनेंच जीवन्मुक्त । प्राणी होय ॥५८॥
सलोकता समीपता सरूपता सायुज्यता । या चतुर्मुक्तींत पाहतां । सायुज्य श्रेष्ठ ॥५९॥
भक्तीयोगें सायुज्य मुक्ती । साधका लाभे निश्चितीं । तरी नवविधा भक्ती । करी साधका तूं ॥१६०॥
या भक्तीचें साधन । पूर्ण होता जाण । तुज सर्वांतरी मी दिसेन । कृष्णराया ॥६१॥
ऐसी होतां विश्वदृष्टि । तूंची विश्व होसी । ‘ मी ’ ‘ तूं ’ पणा विसरसी । हा निश्चय ॥६२॥
आतां कृष्णरायाचें चरित्र । पुढील किरणीं करू प्रगट । ऐकाहो श्रोते समस्त । म्हणे नाथसुत ॥६३॥
इति श्रीमाधवनाथ दीप प्रकाशे नाथसुतविरचिते भक्तियोग वर्णनंनाम अष्टविंशतितमः किरणः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP