दीपप्रकाश - नवविंशतितम किरण
Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.
श्रीसद्गुरुनाथायनमः --
जयजय श्रीनाथसद्गुरु । तुझा नसे रे पारू । उपासनेसी आधारू । तूंचि एक ॥१॥
ज्ञेय आणि तत्व वस्तू । तीं तूंच अससी जगन्नाथू । तुजविणें नाहीं अन्य वस्तु । कोठेंही गा ॥२॥
तुझ्याहुनि जें विलग भासत । तें नव्हें तव रूप सत । जें मायागुणानें ओतप्रत । भरलें असें ॥३॥
तुझ्याठायीं ज्ञान जागृती । सदैव राहे जगत्पती । करिसी अज्ञानाची निवृत्ती । कर्पुरासम ॥४॥
भक्ताचा कराया उद्धार । तूं होसी साकार । परि तूं निर्विकार । आनंदमय ॥५॥
तूं सृष्टीचा उत्पन्नकर्ता । सृष्टीहुनी भिन्न अससी नाथा । कार्याहूनि कार्य कर्ता । भिन्न असे हा न्याय ॥६॥
करावया भक्तांचें कल्याण । घेसी हें सुंदर ध्यान । एरव्हीं तूं केवळ शून्य । सद्गुरुराया ॥७॥
कित्येक करिती तुझा अनादर । तव रूपाविषयीं वाद घोर । कुतर्क - नरकाचें माहेर । तयासाठीं ॥८॥
ऐसे कुतर्की जन । निरय मार्गाई नेती जाण । मज नको तयांचा संग जाण । एक निमिष ॥९॥
तुझ्या चरण्कमलाचा मकरंद । सदा सेवीन आनंद । मज नको बा वादविवाद । पंडितांचा ॥१०॥
यावत्काल तुझा आश्रय । न घेई निश्चयें जीव । तावत्काळ तयातें भय । संसारपाशाचें ॥११॥
जे तव कथा किर्तनीं । विन्मुख होती जाणुनी । ते भवरूप विपिनीं । आपदा भोगिती ॥१२॥
करितां तव कथा श्रवण । शुद्ध होई अंतः करण । तव प्राप्तीचा मार्ग जाण । दिसे मग उज्वल ॥१३॥
जरि तूं अससी एक । परि सर्वांठायीं व्यापक । जे तुज भजती निर्मनस्क । त्यांस घेसी सांठवूनी ॥१४॥
निष्काम भक्तीची तुज आवड । कामिनि कांचनाचेही पुरविसी कोड । परि निजरूपाचा स्वाद गोड । देसी निप्कामियां ॥१५॥
सोडोनियां परमेश्वरा । यज्ञयागाचा घेती पसारा । स्वर्गीं अंतीं नरकाचा थारा । तया मिळे ॥१६॥
व्रत वैकल्य तपश्चर्या । यानें संतुष्ट होई राया । परि न देसी चाखाया । आत्मरस ॥१७॥
जे तुज भजती सदैव । न ठेविती कांहीं हाव । त्यासींच तूं वश होय । भगवंता ॥१८॥
गत किरणीं श्रीनाथें । कथियलें भक्तियोगातें । संतोषोनीं कृष्णनाथे । प्रभूसी विनविलें ॥१९॥
देवा त्वां आळशावरी । गंगा सोडिली साजिरी । मज धन्य केलें त्रिपुरारी । या जगीं ॥२०॥
साष्टांगें करूनि नमन । जाई गृहीं श्रीकृष्ण । करी श्रीनाथांचें ध्यान । निरंतर ॥२१॥
ध्यानांत घालवी निशी सगळी । प्रपंच धंदा करी सकाळीं । षण्मासाची अवधी गेली । या क्रियेंत ॥२२॥
कृष्णाची वृत्ति तामस । स्वाभिमानी विशेष । महत्वाकांक्षेचा अभ्यास । बहुत होता ॥२३॥
परि नाथें त्यास सांठवितां । सर्वत्र झाली शांतता । शत्रु मित्राची समता । उत्पन्न झाली ॥२४॥
श्री चरणाची श्रद्धा अढळ । सदा गाई गुण वेल्हाळ । बहकलेल्या जीवा विमल । मार्ग दावी ॥२५॥
देउनी श्रीगुरुची विभूती । अनेकांची हरी दुःखापत्ती । एक नवल कथा निश्चितीं । सांगेन गा ॥२६॥
कानळदे ग्रामीं एक वैश्य । धनुर्वातें पीडिला विशेष । धरणीवरी ठेविती रोग्यास । परिजन ॥२७॥
वय होतें केवळ वीस । विवाहाचा घेतला पाश । मात्यापित्यांच्या दुःखास । पार नसे ॥२८॥
आणिले वैद्य नामांकित । वोपुनी द्रव्य बहुत । दिसतां पुत्राचा अंत । हंबरडा फोडिला ॥२९॥
येती धांवोनी कृष्णाकडे । वांचवा माझें लेंकरूं एवढें । पदर पसरीतों आपणांपुढें । कृष्णराया ॥३०॥
द्रवला मनीं कृष्ण दयाळ । अभय देई पितयाला । विनवी अंतरीं प्रभूला । तारावें कुमारा ॥३१॥
कांहीं तया भास झाला । सांगें आदरें वैश्याला । देईन मी विभूतीला । द्यावें एक वचन ॥३२॥
इतर उपाय न योजावा । विश्वास पूर्ण ठेवावा । मग कार्यभाग पहावा । आनंदानें ॥३३॥
देतां औषधाची मात्रा । अंतराल आपुल्या पुत्रा । दोषी ठरवाल समर्था । निष्कारण ॥३४॥
घेउनी तयाचें अभिवचन । गोमूत्रीं दिली विभूती जाण । या संजीवनीचा गुण । तत्काल लाभला ॥३५॥
कथिलें होतें वैश्यासी । जें इच्छील तें खायासी । द्यावें न धरितां शंकेसी । आपुल्या मनीं ॥३६॥
विभूतीनें झाला सावध । मागूं लागला शिरा गोड । परि मायामोहें हें कोड । न पुरविती ॥३७॥
बाधेल शिरा कुमारा । म्हणोनि देती कांजी नरा । तों वमन होउनी घाबरा । झाला पुनरपि ॥३८॥
कृष्णाकडे येती धांवत । घाबरा झाला हो पुत्र । तों एकाएकी आभासांत । काय वदला ॥३९॥
तुम्ही न दिलें त्याचें इच्छित । आतां घ्यावें प्रायश्चित्त । मी प्रत्यक्ष न येई तेथ । चिंता न करावी ॥४०॥
केवळ भक्तियोगें ही योग्यता । आली श्रीकृष्णनाथा । बघोनि जनां समस्तां । नवल वाटलें ॥४१॥
मध्यरात्र होता कृष्ण । जाई तेथें आपण । श्रीनाथाचें नामस्मरण । सांगे आर्तासी ॥४२॥
आरती करी प्रभूची । मीनली वृत्ति साची । गती सहज समाधीची । प्राप्त झाली ॥४३॥
एक सप्ताहांत रोगी झाला रोगमुक्त । धन्वंतरी कृष्णनाथ । देई विभूति - मात्रा ॥४४॥
जयानें देखिलें हें कृत्य । तो मनींच होई चकित । जेथ नाथभक्त इतुका श्रेष्ठ । तेथ नाथ कैसा असेल ॥४५॥
कृष्णरावाची पत्नी । गेली स्वर्गभुवनीं । होतें यौवन म्हणोनि । करावा विवाह ॥४६॥
ऐसा परिजनांचा आग्रह । तरि तो प्रतिकूल - हृदय । अनायासें मिटलें भय । प्रपंचाचें ॥४७॥
आतां न करीन लग्न । होईन प्रभूंशीं संलग्न । करीन इंद्रियांना नग्न । भावयोगें ॥४८॥
परिजनांची अंध दृष्टी । नाथ देवातें विनवीती । आज्ञा द्यावी कृष्णाप्रती । चतुर्भुज व्हावया ॥४९॥
नाथ म्हणे होतां चतुर्भुज । मुक्त जाहला आज । पुनरपि बांधतां कैसी उमज । नाहीं तुम्हां ॥५०॥
परि कृष्णरावाची माता । आग्रह करी समर्था । एवढी दया करावी नाथा । तयास उद्युक्त करावें ॥५१॥
असती लहान चिलें पिलें । त्यांना कोणी रक्षावें बळें । मी तरी आतां वृद्ध झाले । भरवंसा नाहीं ॥५२॥
स्त्रियेवीण राहतां पुरुष । जैसा फुलावीण वृक्ष । तयाची स्त्री पाहतां संतोष । मज लाभे ॥५३॥
आला कृष्ण बाहेरूनी । पाणी द्यावया नाहीं कोणी । नसतां गृहाची स्वामिनी । गृह कैसें ॥५४॥
सुना लेकी जरी असती । परि सेवेसी स्त्रीच योग्य ती । वळवावी तयाची वृत्ति । गुरुराय ॥५५॥
पहावें पुनरपि सुन्मुख । शोभवावें माझे अंक । तुम्ही सर्व सिद्धिदायक । करावें कार्य इतुकें ॥५६॥
नाथ चित्तीं दुःख करी । मायेची कठीण फेरी । श्रीनाथ अनंत लीलाधारी । करी एक लीला ॥५७॥
पाचारी आपुले भक्तासी । तुज चतुर्भुज करावें ऐसी । इच्छा आहे मातृ - मानसीं । ती पुरवावीं ॥५८॥
मजही वाटे त्वां लग्न करावें । संसाराचें सुख भोगावें । सानुकूल दिसतां हें । करूं मंगल कार्य ॥५९॥
आहे एक सुंदर नोवरी । वीस वर्षांची कुमारी । सांभाळील मुलें चारी । करील प्रपंच ॥६०॥
ऐकोनी श्रीनाथ वाणी । कृष्ण हांसला आपुलें मनीं । मज पाहिजे एकच पत्नी । जी चिरकाल राहील ॥६१॥
माझी पत्नी श्रीनाथ । तिच्यासवें मी राहीन निवांत । आतां न करावें कष्ट । विवाहाकारणें ॥६२॥
नाथ म्हणे गा भक्तराया । तूं म्हणसी मज जाया । परि माझें कोड पुरवावा । तुज कष्ट बहुत होतील ॥६३॥
मी नव्हे इतर कामिनी । तुला पाहीन कसा लावुनी । मग पुरवीन जी वांच्छा मनीं । धरिसी ती ॥६४॥
तनूचें बांधावें घर । मनाचा करावा संसार । साधन - संपत्ति सत्वर । आणावीं त्वां ॥६५॥
आधीं शीलाचें जरतारी । पाताळ पाहिजे केशरी । निरभिमानतेचे कंचुकी बरी । मज वाटे ॥६६॥
विमल वृत्ति - मोत्यांचा सर । शोभवीं कंठीं हार । अष्टभावांचें अलंकार । घालीं आंगावरी ॥६७॥
माझी क्षुधा अनिवार । गिळिलें जरी ब्रह्मांड थोर न येई गा ढेंकर । तृप्तीचा कदा ॥६८॥
परि तुझ्यास्तव अल्पाहारा । करीन मी प्रियकरा । देतां त्रिगुणांचा शिरा । संतोष मानीन ॥६९॥
विषयवासना तुझी दासी । न येऊं द्यावी मजपाशीं । ती केवळ विवशी । करील घात ॥७०॥
वैराग्यरूप चाकर । देउनी त्याग भाकर । रक्षावया आपुलें घर । ठेवीं नित्य ॥७१॥
मग तुझ्या सौभाग्याचा । लावीन तिलक भालीं साचा । करीन अंगीकार सेवेचा । संतोषानें ॥७२॥
ध्यानाचें तुज देईन जेवण । चतुर्मुक्तीची शय्या जाण । तुझ्या सवें मी रमेन । चिन्मय निद्रेंत ॥७३॥
शिष्य बहु संतोषला । परि हळुच वदला । हें न जाणें मी दयाळा । तव कृपेवीण ॥७४॥
पदांगुली हीच माझी पत्नी । म्यां कधींच वरिली ती भामिनी । आधींच घेतले वश करोनि । तिये लागीं ॥७५॥
देवभक्त झाले समरस । काय वर्णावें त्या कौतुकास । आनंदातिशयें जगदीश । ठेवी कर मस्तकीं ॥७६॥
त्या दिवसापासून । वृत्तींत राहे शून्य । जन म्हणती वेडेपण । जाणें एक श्रीनाथ ॥७७॥
ऐसें क्रमितां कालें कांहीं । आला भोग कृष्णावरही । पोटदुखी ज्वर करी लाही । शरीराची ॥७८॥
कर्मभोग हा कोणाला । कदाकालीं नाहीं सुटला । योग्यास वा भोग्याला । भोगणें लागें ॥७९॥
परि हे भोग भोगितां । योगी ठेविती जाणीवता । अज्ञानी होई दुःखिता । देह मी म्हणोनी ॥८०॥
तैसा भक्त कृष्णराव । भोगी दुःखाचा डाव । मनीं खिन्न ना होय । सदा राहे आनंदी ॥८१॥
देखोनी दुःखाची स्थिति । परिजन सारे कष्टती । उपाय करावा म्हणती । रोगावरी ॥८२॥
भोगावरी भरंवसा ठेवणें । हें अयोग्य म्हणती शाहणे । असती अनेक प्रयत्नें । सर्वांसी गा ॥८३॥
प्रयत्नानें व्याधी हटे । प्रयत्नें असाध्य साध्य होतें । प्रयत्नेच ईश्वर भेटे । हा नियम ॥८४॥
प्रयत्नेंच टिटवीनें । सागरातें आटविणें । प्रयत्नेंच पिपीलिकेनें । मारावें सर्पासी ॥८५॥
तरी आधीं प्रयत्न करावा । द्यावें औषध कृष्णरावा । मग दैवावरी घालावा । भार आपण ॥८६॥
ऐसा पोक्त सल्ला देती । परि नायके कृष्णमूर्ती । म्हणे घेईन मी विभूती । नको औषध गा ॥८७॥
विभूतीनें जाती उपाधी । ऐसेंही न इच्छी कधीं । विभूती जागृतींची वाढी । करील हा भरवंसा ॥८८॥
मुखीं नाथ जयनाथ । अंतरींही खेळला नाथ । नाथावीण ध्येय अन्यत्र । ठेविलें नाहीं ॥८९॥
मातेंचें हृदय कोमल । बघोनि पुत्राचे हाल । क्षणक्षणा होईल विकल । अंतर्यामीं ॥९०॥
श्रीनाथ होते पुण्यपत्तनी । तेथें पाठवी सुता जननी । अक्षयांत क्षय ही ध्वनी । नाथें काढिली ॥९१॥
तुझें भोक्तृत्व दूर कराया । तुज देईन औषध राया । नको चिंतूं या क्षया । तूं अक्षय अससी ॥९२॥
तुझें भोक्तृत्व जाईल । खरें सुख तूं भोगशील । कटुनिंबाचे खाई फल । होई अमृतमय ॥९३॥
प्रेमें निरोप दिधला । मी तुझ्या जवळीं आहे बाळा । न सोडी चिंतनाला । हीच आज्ञा ॥९४॥
येतां ग्रामीं भक्त परत । नाथ पाठवी परिजनां पत्र । मार्गशीर्ष शुक्लमासपर्यंत । न दीजे औषध ॥९५॥
या उक्त दिनानंतर । करावे नाना उपचार । ईशकृपा असतां कुमार । होईल चिरसुखी ॥९६॥
दिवसानुदिवस कृष्ण भक्ताचा । होई शक्तिपात क्षयाचा । परि न सोडी निश्चय मनाचा । दृढनिश्चयी ॥९७॥
होती शरीरासी यातना । उठोनि बसे क्षणक्षणा । “ जयनाथ ” या दिव्य वचना । सदा उच्चारी ॥९८॥
बोले अनुभवाचे शब्द । मी नसे दुःखें बद्ध । मी केवळ महदानंद । मग दुःख कोठलें ॥९९॥
माझे भोग अनंत । याच जन्मीं भोगवी समर्थ । केलें प्रभूनें उपकृत । मजलागी ॥१००॥
आतां बोलवावें समर्था । सांगें प्रेमे नाथ सुता । विद्युत्संदेशें समर्था कळविलें ॥१॥
जों जों वाढला भक्तांचा ध्यास । तों तों नाथास लागे अवकाश । ऐसे गेले तीन दिवस । एकध्यानीं ॥२॥
मंगल दिन उदया आला । म्हणे आज होईल काला । सद्गुरुनाथ कैसा नाही धांवला । मजकारणे ॥३॥
वाजले मग साडेदहा । “ जयनाथ ” ऐसा गजर महा । सोडिलें तत्क्षणीं नश्वर देहा । कृष्णात्म्यानें ॥४॥
परिजन करिती दुःख फार । उचला म्हणती कलेवर । यातें अग्नी द्यावा सत्वर । गृहीं ठेवणें अनिष्ट ॥५॥
तों आला योगीराणा । पाहिलें मृत्युवश कृष्णा । रडोनि म्हणे जननी कृष्णा । नाथराय आले ॥६॥
ज्याच्यासाठीं धरिला ध्यास । तो आला जगन्निवास । ज्यास्तव तूं होतां उदास । निधान तें पातलें ॥७॥
ज्यातें तूं म्हणसी प्रेमें ‘ आई ’ । ती धांवली नाथ - माई । आतां हंसून पाहीं । तिजकडे एकदां ॥८॥
ज्या कारणें ठेविला होता प्राण । तो प्राणेश्वर आला धांवून । आतां कां धरिसी मौन । वेल्हाळा रे ॥९॥
आनंद मूर्ती बघाया । तुझे नेत्र होते भुकेले राया । आतां कां धरिसी मौन । उघडी नयन ॥११०॥
ऐसें बोलतां आक्रंदोन । कलेवरें उघिडलें नयन । कण्हण्याचा स्वर काढोन । पाहिलें प्रभूकडे ॥११॥
ठेविला ब्रह्मरंध्री हस्ते । पुनरपि झालें सर्व शांत । धन्य भक्त धन्य नाथ । परस्परां भेटले ॥१२॥
न अभ्यासिला योग त्यानें । न केलीं यागदानें । ज्ञान - तत्व जाळेंहि नेणें । कृष्णराव ॥१३॥
केले नाहीं तपाचरण । न सोडिलें प्रपंच साधन । परि आकळिता दयाघन । भक्तिमार्गे ॥१४॥
भक्तियोगी जो नर । तोचि खरा परमेश्वर । दावी अनुभव प्रखर । इतरांसी ॥१५॥
भक्तीचा उघड पसारा । तेथें गौप्य नसे हो जरा । प्रेमानंदें स्नान करा । भक्ति - गंगेत ॥१६॥
परि भक्तीसीही पाहिजे । यमनियम जाणिजे । त्यावीण न पाविजे । परम धाम ॥१७॥
जरी भक्तीसीनको ब्रह्मचर्य । तरि विषयाची नको हांव । विषयवासना हा निरय । ऐसी पूर्ण भावना असावी ॥१८॥
नैष्ठिक ब्रह्मचर्य हें भक्तीसी । पोषण करील अहर्निशीं । त्याविणें होईल उदासी । भक्तिमाता ॥१९॥
यम नियम न साधितां । भक्ति न होई साध्य भक्तां । हा निश्चय सर्वथा । कितीवेळ सांगावा ॥१२०॥
श्रीनाथ दीपाची किरणें । आतां थोडीच आहेत प्रकाशविणें । सकळ श्रोतृवृंदानें । ती आदरें पाहावीं ॥२१॥
पुढील किरणें महाराज । करील वृद्धेचें काज । भेटवील पंढरीचा राज । पांडुरंग ॥१२२॥
इति श्रीमाधवनाथ दीपप्रकाशे नाथसुत विरचिते कृष्णचरितकथनंनाम नवैंशतितमः किरणः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP