मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश|
द्वादश किरण

दीपप्रकाश - द्वादश किरण

Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.


श्री सद्गुरुनाथायनमः --
आदि शक्ती जगज्जननी । वंदू ब्रह्मरंध्रगड स्वामिनी । येई गे जनन्मोहिनी । नाथमाये ॥१॥
आई तूं जन्म देऊन । कोठे गेलीस गे टाकून । मज तुझ्यावीण सर्व शून्य । जाहले गे ॥२॥
तूं वात्सल्याची खाण । तुजविण कोण करिल पालन । मी केवळ दीन हीन । जाहलों तुजविणें ॥३॥
तूं हरिणी मी पाडस । तूं पक्षिणी मी अंडज खास । तूं कर्दली मी कोमल अंश । तुझाचि जननी ॥४॥
जैसी वानरी घेई निज पिलासी । तैसें मज धरी पोटासी । जाई घेऊनी ब्रह्मवनासी । फलें खावया ॥५॥
आई तूं माझें सोहं नांव । ठेवूनी रक्षिलें मास नव । मग घेतलीस धांव । कोठें गे प्रेमळे ॥६॥
माते तूं टाकून जातां । उचली मायीक माता । करी अनेक आघाता । मजवरी ॥७॥
ठेविलें नाम कोहं । मज पाजी दुग्ध भ्रम । तुझे विसरवी प्रेम । बलात्कारें ॥८॥
परी मायबाप संतांनी । मज जागृती देउनी । तुझे ठिकाण कथिलें दुरूनी । परी तुजजवळीं न नेती ॥९॥
म्हणती घेई अनुभव । करी यत्न स्वयमेव । मग दिसेल तुज ठाव । जगन्मातेचा ॥१०॥
केला प्रयत्न जावया । तों प्रथमची दिसली बया । महासर्पिणी वेटोळे घालुनिया । मार्ग रोधी आमुचा ॥११॥
तेथेंच राहिलों गे आई । मज भीति उत्पन्न होई । तरी कृपा करी कांहीं । मज भेटण्याची ॥१२॥
प्रसन्न झाली माझी माय । सगुणरूपधारी होय । शारदेच्या मंदिरीं जाय । मज घेउनी ॥१३॥
म्हणे हाच तुझा मार्ग । याच मार्गें जाई लगबग । दावीन निजरूप मग । तुजलागीं ॥१४॥
न येती विघ्नांच्या राशी । पळतील सर्प - राक्षसी । कल्पना न ठेवी मानसीं । पुत्रराया ॥१५॥
माय भेटतां दुःख गेलें । भीतीचे पर्वतहि लोपले । प्रभु आज्ञेनें कंठी बळें । आपुला मार्ग ॥१६॥
या मार्गीं जातां नीट लाभला आनंद अमित । तो करवेना प्रगट । संतजनहो ॥१७॥
मज न दिसती कंटक । न होती श्रम अधिक । आधिभौतिकादिक । दुःखेंही नाठविती ॥१८॥
सर्व रसाचा विसरू । पाडी माझा नाथ सद्गुरु । चरित्र पक्कान्नाचे वोगरू । घाली प्रेमें ॥१९॥
श्रीनाथलीला वर्णन । श्रीनाथरूपाचें गायन । रमावें पायीं रात्रंदिन । हेंच मज आवडे ॥२०॥
गत किरणीं नामसप्ताह । आता काशीनाथ जीव । जाईल कलेवरासह । ते सादर ऐकावें ॥२१॥
काशीनाथ परमभक्त । सदा सेवी एकांत । देखोनि जवळ त्यांचा अंत । पाचारी सद्गुरु ॥२२॥
प्रिय भक्ता काशीनाथा । निकट आली निवृत्तियात्रा । आपुले गृहाच्या पंथा । लागे आतां ॥२३॥
तुझी निवृत्तियात्रा । पौषमासीं येईल पुत्रा । करी तयारी विशेषतः । जावया तेथें ॥२४॥
ऐकोनि भक्त गंहिवरला । म्हणे आनंदाचा दिन उगवला । परि तव पदाची दयाळा । विस्मृति न व्हावी ॥२५॥
मी जेथें जेथें जाईन । तेथें यावें तुझे चरण । देई हें वरदान । सद्गुरुराया ॥२६॥
प्रभु बोले हें मम ब्रीद । भक्तांचे पुरविणें कोड । तुज भेटेन मी गोविंद । सर्व काळीं ॥२७॥
निरोप घेउनि गेला भक्त । देवपूजनीं होई रत । परि कोणा न सांगे गुप्त । निज देहाचें ॥२८॥
करी सर्व संसार - कार्य । उबग न ठेवी भक्तराय । निज अन्हिकातें अंतराय । येऊं नेदी ॥२९॥
उगवला दिन षष्ठीचा । मनिं म्हणे आज दिन यात्रेचा । करोनी गजर नामाचा । जाऊ आपुल्या गांवीं ॥३०॥
पाचारी सर्व संतांस । आज यावे जी भजनास । मज वाटे भारी हौस । भजनाची ॥३१॥
सकल कार्यें सोडावीं । ही विनवणी ऐकावी । भजनानंदी करावी । वृत्ति आपुली ॥३२॥
झाला माध्यान्हीचा काळ । आले भजनाचे दळ । मृदंग वीणा टाळ । नाद दुमदुमला ॥३३॥
काशीनाथें नाथमूर्ती । शिरीं ठेविली दोन्ही हातीं । ध्यान करोनी नाचती । आनंदानें ॥३४॥
पायीं घुंगुर बांधिलें । जनलज्जेतें सोडिलें । वस्त्राचें भान नुरलें भक्तराया ॥३५॥
नाचतां नाचतां पाय अडकला । काशीनाथ अधः स्थळीं पडला । घाली नमस्कार जन्मभूमीला अखेरीचा ॥३६॥
संतांनीं त्याच्या जीवास । जिंकिले हो षष्ठीस । धन्य काशीनाथ शिष्य । धन्य सद्गुरुनाथ ॥३७॥
काशीनाथें सोडिले प्राणा । नाथ होते नाशीकस्थाना । प्रिय आत्माराम - पूजना । करीत होते ॥३८॥
तों दिव्य शक्तीचा प्रकाश । दिसला सर्व भक्तगणांस । नाथ साठवी त्यास । आपणांत ॥३९॥
मग मायावी रुदन करी । अंतरला काशीनाथ दुरी । प्रभुसत्तेपुढें युक्ती खरी । न चाले ॥४०॥
ऐसें रुदन करून । केलें प्रभूनें पुनरपि स्नान । चाले संध्यापूजन । योगीरायाचें ॥४१॥
तों आला एक दर्शना । मनीं म्हणें कां पूजावे चरणा । कांहीं चमत्काराच्या खुणा । दावितां नमूं ॥४२॥
देखोनि त्याची कल्पना । नाथ निवारी तन्मना । कां लागसी नंदना । सिद्धीमागें ॥४३॥
अरे या सिद्धीचे खेळ । तुज सत्य रे बुडवितील । सिद्धी हें मायावी खूळ । जगीं चाललें ॥४४॥
होतां वश सिद्धीस । अंती जाशील नरकास । नको मोहूं य मोहास । भक्तराया ॥४५॥
अरे सिद्धी या केवळ डाकिनी । सिद्ध पुरुषा टाकिती मोहुनी । सिद्धी अधोगतीच्या कोंदणी । करिती विहार ॥४६॥
सिद्धी हा क्षणाचा वारा । तुज शांतवील सुकुमारा । प्रवृत्तीच्या पडतां गारा । मुकशी इहपर ॥४७॥
सिद्धीनें मोहिला गाधिज मुनी । केली तपश्चर्येची झाडणी । इंद्रादिकांची केली फोडणी । सिद्धीनें या ॥४८॥
चांगदेवाचें पाही चरित्र । जो जिवंत करी जीवमात्र । परि अवतरोनी ज्ञाननाथ । केला पद परिहार ॥४९॥
तूं न होई वश सिद्धींसी । करी तयांना आपुल्या दासी । मग परमामृत चाखी । आनंदें ॥५०॥
पहा पहा रे चमत्कार । म्हणोनि उघडीली मूठ सत्वर । तों त्यांत खडीसाखर । दिसली तयासी ॥५१॥
निवळिली भ्रांति । मग त्यातें अनुग्रहीत करिती । सृष्टीच्या किल्ल्या देती । उघडावया ॥५२॥
ऐसी नाना लीला करी । भक्तांचें कौतुक करी । न देखिली देखो अंतरीं । ऐसी माता ॥५३॥
सहस्रावधि भक्तजन । येथेंहि करी पावन । सर्वांवरी परीपूर्ण । छाया करी ॥५४॥
भेटाया प्रिय भक्तजना । जाई देवगांवीं आपण । तेथें उत्कीरावरी निमग्न । जाहला स्वानंदीं ॥५५॥
पाहती लोक कौतुकें । म्हणती येथेंही नाथ ठाकें । वृत्ति देखोनि तुके । मान तयांची ॥५६॥
देखोनि सकल जना । नाथ सांगे आपुल्या खुणा । येथें देवालयाचें दृश्य जाणा । मज दिसतसे ॥५७॥
पश्चिमाभिमुख देऊळ । त्यांत व्यंकटेश दिसे अचळ । चित्रकूटाचे सर्व खेळ । येथे चालवील ॥५८॥
उच्चारितां ऐसें वचन । जाती सुवासिनी दोन । माथां जलकलश पूर्ण । भरियेला ॥५९॥
हाचि शुभ शकून । समजून केलें आवाहन । स्वहस्तीं कुदळी घेऊन । खोदिलें प्रभूनें ॥६०॥
देखोनी मानस प्रभूचें । धांवती शिष्य गावोगांवीचें । यथाशक्ति द्रव्याचें । सहाय्य करिती ॥६१॥
कोणी आणि ती लाकडें । कोणी दगडाचे फाडे । कोणी चुन्याचे गाडे । आणोनि सोडिती ॥६२॥
बांधिलें मंदिर सुंदर । चिरेबंदी तटही थोर । जयाचा पाया खडकावर । खोदियेला ॥६३॥
बांधिला सन्निध मोठा वाडा । पुढें वाजे चौघडा । आंत चौक उघडा । ठेविला प्रभूनें ॥६४॥
केल्या सर्वहि सोई । कोठें न्यून नाहीं । व्यवहार ठेवी सर्वांठायीं । योगेश्वर ॥६५॥
ज्यानें व्यवहार नाहीं पाहिला । ना स्वयें आचरिला । बघोनी त्याची ही लीला । नवल वाटे ॥६६॥
हंड्या झुंबरें झळकती । आरशांची झाली दाटी । नाथकन्या शेले गुंफिती । कांच मणींच्या ॥६७॥
कोणी करिती पोतींचीं देऊळें । त्यात प्रभूतें ठेविलें । कोणी मंगल तोरण बांधिलें । देवद्वारी ॥६८॥
ऐसा बाह्य सोहळा जाहला । मग आणाया श्रीमूर्तीला । नाथप्रभू जाई गिरीला । सुतां समवेत ॥६९॥
जेथें विठ्ठलनाथें तप आचरिलें । तेथें नाथें ठाणें दिधलें । म्हणे भेट देई दयाळे । तव भक्तासी ॥७०॥
तूं देशील ज्या मूर्ती । त्याचि नेईन मंदिराप्रती । ऐसी करोनी विनंती । राही चार मास ॥७१॥
देव - देवांत लागलें भांडण । नाथ म्हणे मूर्ती आण । मी वाहतो तुझी आण । न जाईन येथुनी ॥७२॥
आला एक ब्राह्मण । करी शोभती मूर्ती तीन । श्रीभूदेवी व्यंकटरमण । देई नाथप्रभूसी ॥७३॥
द्यावया जाई रुपये सात । तो द्विज झाला गुप्त । व्यंकटेशाकारणें व्यंकट । घेई ब्राह्मणरूप ॥७४॥
शुद्ध दशमी फाल्गून मास । प्रस्थापीं तो व्यंकटेश । बोलवी द्विजसमूहास । प्रतिष्ठे कारणें ॥७५॥
जैसा जन्मकाळीं जाहला सोहळा । तैसा येथेंही करी मंगला । भजनाचा ध्वनि चालिला । अखंडीत ॥७६॥
नानापरी वाद्यें वाजती । चंवरी चामरें छत्र्या ढाळिती । मंगलकालीं मंगलमूर्ती । बसविली ॥७७॥
दक्षिणेस श्रीविठ्ठलमूर्ती । शोभवी आपुली दिव्य कीर्ती । त्याखाली गुंफा स्थापिती । चित्रकूटासम ॥७८॥
नाथें सोडिलें चित्रकूटास । म्हणोनी आला व्यंकटेश । धन्य या उभयतांस । करूं साष्टांग नमस्कार ॥७९॥
चित्रकूटाची प्रतिकृती । हे मंदिर आहे निश्चितीं । बघावें जाऊन श्रोती । एकवार ॥८०॥
निजामाचें लासूरग्राम । अग्नीरथाचें विश्रामधाम । एक योजन देवग्राम । तेथुनि असे ॥८१॥
प्राणप्रतिष्ठेस्तव जन । येती आनंदें धांवून । सहस्त्राहुनि अधिक जाण । येती दर्शना ॥८२॥
त्यां सर्वां देई भोजन । करी ब्राह्मणसंतर्पण । चाले मधुर कीर्तन । श्रीहरीचें ॥८३॥
प्रतिवार्षीक हा नियम । चालवी आमुचा राम । अनेक भक्तांचे काम । पूर्ण करी त्या दिनीं ॥८४॥
कोणा सांगे योगज्ञान । कोणा शिकवी नामभजन । कोणा शिकवी गायन । शास्त्रोक्त ॥८५॥
ऐसें भरवी सम्मेलन । त्यांत करी आपुलें मीलन । आनंदाचें दृश्यपण । दाखवी सर्वांसी ॥८६॥
नाथ माझा विश्वंभर । उकिरड्यासी करी मंदिर । प्रभुकृपेचे तुषार । काय न करिती ॥८७॥
एकदां या देवग्रामीं । येती उत्सवालागीं स्वामी । नवल वर्तवी नामीं । सहजचि ॥८८॥
उत्सवा जे भक्त येती । ते प्रभुचरणा वंदुनि जाती । प्रभुही निरोप देती । प्रेमभावें ॥८९॥
तरी विष्णुनामा एक सुत । बैसला नाथापाशीं निवांत । न विचारी प्रभुशीं मात । जावयाची ॥९०॥
श्रीनाथचरण ध्यानीं रमला असे तो मुनी । अग्निरथाची वेळ चुकुनी । गेली तयाची ॥९१॥
लागला प्रभुचरणासी । आतां कैसें जावें गृहासी । मज जाणे आहे नोकरीसी । उद्याच ॥९२॥
“ तूं जाई बाळा पंख लावुनि । मग सहज उडोनि ” । इतुकें वचन अंतः करणीं । ठेविलें तयाने ॥९३॥
घेतला दुग्ध - प्रसाद पळीभर । आक्रमी मार्ग - लासूर । कोणासी न कळवी विचार । आपुला हा ॥९४॥
सांगे सकल बंधुवर्गासी । उद्या जाणे उक्त आम्हांसी । परि चुकवुनि सर्वांसी । जाहला मार्गस्थ ॥९५॥
तो नव्हता अशिक्षित । अथवा शिशु सत्य । आंग्ल विद्येच्या प्रवेशांत । विजयी जाहला असे ॥९६॥
भोजन समयीं त्यासी । पाचाराया जाती स्नानासी । पाहतां उपानह्य वस्त्रांसी । वाटे गेला दिशेसी ॥९७॥
जाहली एक घटिका । परि न देखिती त्या सद्गुरुसेवका । देती त्यातें बहु हांका । परि अवघें शून्य ॥९८॥
चिंता लागली सकलां । मग नाथसुत प्रभुपदीं गेला । कोठें धाडिले बंधूला । सांगावें जी समर्था ॥९९॥
आम्ही शोधिलीं वनें उपवनें । परि न देखो स्पष्टपणें । आम्हांसी पुसल्यावीण जाणे । अशक्य आहे ॥१००॥
ऐकोनि हें वचन । नाथ जाहला कोपायमान । त्यांतें लासुरीं पाठवून । मीच दिलें काय ॥१॥
हा तुम्हा बंधुबंधूंचा खेळ । चालती गप्पा फजूल । शोधाव्या विहिरी जल । तया कारणें ॥२॥
देखोनी प्रभूचा आवेश । नाथसुत घाबरला विशेष । मग करोनी हास्य । म्हणती पहा कोठेंतरी ॥३॥
परि नाथसुत विवेकानें । ऐकिलीं प्रभूचीं प्रथम वचनें । लासुरमार्गी तयानें । जाणें केलें ॥४॥
सद्गुरुनाथ करी लीला । सांगती नाथसुताला । पाही धान्याच्या पेंवाला । अथवा भंडारींत ॥५॥
नाथसुत जाहला केवळ वेडा । उतरला पेंवांत बापुडा । विष्णुदादा दादा । म्हणोनियां ॥६॥
तया न राहिले भान । तो कैसा । राहील येथें बसून । जेथें उछ्वासही पूर्ण । टाकणें अशक्य ॥७॥
उघडलीं सारी कपाटें । परि बंधू नसे तेथें । मग पाठविलें नाथें । नर्तक मेळ्यांत ॥८॥
होता शिमग्याचा दिन । तेथेंही नाथसुत गेला जाण । परि ऐका भाव पूर्ण । भक्त कैंचा तेथें ॥९॥
नाथसुताचें हरिले मीपण । आले तयास काष्ठपण । सूत्रधार नाचवी दोरी धरून । तैसा तोही नाचला ॥११०॥
प्रभु करी बहुत चिंता । कोठें गेला बाळ तत्वतां । मी कटु वचनही सर्वथा । बोललों नाहीं ॥११॥
आतां आम्ही काय करावें । कोठें त्यातें शोधावें । बोलाविले ज्योतिषी बरवे । सोडवा प्रश्न आमुचा ॥१२॥
कोणी सांगती उत्तर दिशा । कोणी पश्चिमेचा धींवसा । कोणी म्हणती भरंवसा । न वाटे ॥१३॥
प्रभु म्हणे सांगावी एक दिशा । हे बोल न कळती ज्योतिषां । मग तोडग्याचा केला हांशा । नाथदेवें ॥१४॥
घाली लोहपळी सांखळींत । ठेविला पात्रीं उलटा पाट । तांदूळ करोनी अभिमंत्रित । टाकी चहूंकडे ॥१५॥
दाविली भारी हळहळ । जाहला अंतरी विकळ । परि हर्षित वदन - कमल । करी मधूनची ॥१६॥
इकडे विष्णुदास नाथभक्त । गेला योजन घटिकेंत । माध्यान्हींचा सूर्य तळपत । परि ताप नाहीं वाटला ॥१७॥
जैसा वायु नेई झाडपाला । तैसेंच या भक्ताला । वायूच घेऊन पळाला । लासूरास ॥१८॥
पाहतां लासूर स्टेशन । मनीं विस्मय करी आपण । येथें मज आणी कोण । कशास्तव ॥१९॥
आम्ही आजीं नच जाणे । मग येथें केवी झालें येणें । तों अग्निरथ देखिला त्यानें । पुनरपि जाहला भ्रांतिष्ट ॥१२०॥
द्याया रथाचें वेतन । जाई तो भ्रांतपणें । परि तूं न जावें गाडीनें । ऐसा भास जाहला ॥२१॥
वारंवार जाई वेतन द्याया । तों हाच भास झाला राया । मग स्वस्थ राही एक ठायां । बसुनियां ॥२२॥
नाहीं अन्न नाहीं जल । न जाहला क्लांत विमल । शून्यावस्थेंची रसाळ । चाखी अवस्था ॥२३॥
आला विवेक वाहन घेऊन । देखिला बंधु अचेतन । तलहस्तीं मस्तक ठेवून । पहुडला उन्हांत ॥२४॥
देखिलें तयानें विवेकराया । परि न पाचारी तया । जैशा चित्राच्या बाहुलिया । तैसा पाही टकमकां ॥२५॥
हलविलें विवेकें जाऊन । कां सखया येशी पळून । येरू वदे न कळे कोणे । मज येथें आणिलें ॥२६॥
आला नंतर शुद्धीवर । चालला नेत्रीं अश्रूपूर । मज पंख लावोनी योगीश्वर । आणी येथें ॥२७॥
दीनदयाला भक्तवत्सला । व्यर्थ कष्टवीलें म्यां तुजला । मी कुपुत्र जाहलों स्नेहाळा । मज नेसी वाहुनी ॥२८॥
मी केवळ कुलांगार । माता केली सेवेकरी । धिक् धिक् माझें शरीर । आणि परवशता ॥२९॥
करी दीर्घस्वरें रुदन । आठवोनी सद्गुरुचें चरण । मग शांतवी विवेक भूषण । विवेकराय ॥१३०॥
देव - ग्रामीं आणिलें परत । जों पातले ग्रामसीमेंत । वदती “ आलारे आला धांवत । भक्तोत्तम ॥३१॥
तुम्हां गमे म्यां त्यांस नेलें । परि मम कलेवर येथोनी हललें । ऐसें कोणी पाहिलें । सांगावे जनीं ” ॥३२॥
तों आला विष्णु बाळ । प्रभु सांगे आपुले खेळ । भक्तें न काढितां बोल । मुखांतुनी ॥३३॥
केला प्रभूनें उपदेश । ठेवी सदैव शांतवृत्तीस । वृत्ति हीच तव लक्ष्मी खास । पुत्रराया ॥३४॥
मी पाही खेळ जगाचे । मग तेथें तव नौकरीचें । मज विस्मरण साचें । कैसें व्हावें ॥३५॥
परी तव राजद्वार । उद्यां नसे रे मुक्तद्वार । मग जाणे श्रेयस्कर । कैसें व्हावें ॥३६॥
म्हणोनी निरोप नाहीं दिधला । मानसीं खिन्नत्व पावला । मग घेतली ऐसी लीला । तुज कारणें ॥३७॥
तितिक्षा साधन हें शस्त्र खंबीर । देई गृहस्थाश्रम्यासी ईश्वर । तें ठेवितां सदैव प्रखर । भव वन तो तोडील ॥३८॥
येवो संकटांचे पर्वत । राहो अथवा जावो धन गोत्र । परि समाधानवृत्ति नांदत । त्यास म्हणिजे तितिक्षा ॥३९॥
तूं मज वाहिलें शरीर । मी जाहलों तुझा सूत्रधार । मग कां घेसी जोजार । चिंता - नलाची ॥१४०॥
ऐसें पाजोनी बोध - बिंदु । पुण्य प्रांती येई सिंधू । केले पावन अनेक बंधू । पावनेश्वरें ॥४१॥
चंपाबाई नामें एक युवती । सवें घेउनि वर्षाची पुत्रीं । नाथ चरणीं विश्रांती । घेई भाव ठेवुनि ॥४२॥
कन्येनेंही डोई ठेविली । तों तेथेंच निश्चल जाहली । नाथमाता हंसुनि बोलली । हा पूर्वसंस्कार ॥४३॥
चंपाबाई गतधवा बाला । ग्रंथिज्वरानें आणिला घाला । सर्व कुटुंबाचा झाला काला । राहिली एकटीच ॥४४॥
आधींच दुःखानें गांजिली । मग वैराग्याची भरती आली । प्रभूस विनवी ठेवा भालीं । वरदहस्त ॥४५॥
या त्रिविध -- तापें मी पोळलें । मज पदरीं घ्यावें दीनदयाळे । तोडावें बंधन सगळे । मम दुःखाचें ॥४६॥
स्वगृहीं यावें आपण । अनन्यभावें पद सेवीन । न करावा आनमान । भक्तवरदा ॥४७॥
तूंच माझें माहेर । तूंच माझें सोयरे घर । तूं चिर सौख्याचें सार । माधवनाथा ॥४८॥
पाहोनी तिचा पूर्ण भाव । बालकन्येचा स्वभाव । करी पावन भक्त - हृदय । जाई तियेचें घरीं ॥४९॥
होती केवळ झोंपडी । जेथें हवा ही रुसली आधीं । चोहोंकडे दुर्गंधी । पासरली सदा ॥१५०॥
प्रकाशानें केला अंधेर । भूमी झाली आर्द्र फार । नाचती मच्छरें स्वैर । त्या गृहांत ॥५१॥
जो वसे सदा प्रासादीं । त्यानें घेतली झोंपडी । केरसुणी घेउनि झाडी । आंगण तिचें ॥५२॥
शोभे सिंहासन रत्नजडित । त्यावरी जरीची गादी शोभत । तेथें राही आसन स्थित । तो बैसे चटईवरी ॥५३॥
परि देव भावाचा भुकेला । न पाही उपचार सगळा । भक्तीसाठीं तयाला । सम वाटती दोन्हींही ॥५४॥
वैकुंठाधीश विठ्ठल । सखूबाईचा होई बाळ । वृक्ष - छायेचें गृह शीतळ । केलें दयाळे ॥५५॥
तैसा नाथ सद्गुरु दयाघन । भक्ताकारणें सोडी देवपण । भक्तमाता नाथ शिशुपण । स्वीकारी आनंदें ॥५६॥
धन्य धन्य ते देवभक्त । जेथें लोपलें सारें द्वैत । त्यांना वंदी नाथसुत । एकचित्तें ॥५७॥
चंपाबाई प्रिय भगिनीस । नाथें दिधलें अष्टांगयोगास । वृत्तींत वृत्तीचा लय प्रवेश । करी नाथराय ॥५८॥
नाथ - कीर्ती सुमनावली । सृष्टी - नंदनवनीं पसरली । ती वेचावया सगळीं । मी पामर ॥५९॥
मज एकही सुमन घेतां नये । परी कृपा केली गुरुरायें अंजुली भरूनी सदयें । मज दिधली ॥१६०॥
तितुक्याच फुलांचा गंध । तुम्हापुढें करितसे विशद । अवघ्राणोनि अखंड । ठेवा हृदयीं ॥६१॥
पुढील किरणी नाथ । करील एकभक्तपुनीत । हृदय संपुटांत । सांठवील तया ॥६२॥
श्री नाथशिष्य अगणित । कोणी महंत कोणी पंत । कोणी योगानंदीं रत । सदैव असती ॥६३॥
कोणी परमार्थ उपदेशिती । कोणा राजकारणाची प्रीती । कोणी स्वच्छंदीं रमती । स्वतंत्रपणें ॥६४॥
सूर्यपुष्पाच्या पाकळ्या । अनंत असती विखुरल्या । त्या गणाया सगळ्या । एक श्रीमर्थ ॥६५॥
तैसी नाथदीपाची अनंत किरणें । श्रीमाधवनाथची जाणें । इतर बापुडें दीनवाणें । अनंत म्हणतील ॥६६॥
जाहली किरणें द्वादश । आतां पुढील किरणप्रकाश । निरूपणाचा वेष । घेईल ॥६७॥
सकल श्रोतीं तो पहावा । सार तो ग्रहण करावा । निःसार मज द्यावा । कृपाळूपणें ॥१६८॥
इति श्रीमाधवनाथ दीपप्रकाशे नाथसुतविरचिते श्रीव्यंकटेशमंदिरस्थापनं नाम द्वादश किरण समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP