मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश|
दीपप्रकाश -द्वाविंशतितम किरण

दीपप्रकाश -द्वाविंशतितम किरण

Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.


श्रीसद्गुरुनाथायनमः --
सद्गुरुनाथा श्रीमाधवा । तुझा महिमा किती गावा । करिसी मुक्त नाना जीवा । नानापरी ॥१॥
तूं मनोहर कल्पतरू । श्रांत जीवांचा आधारू । जो येईल छायेखाली नरू । ताप हरिसी तयाचा ॥२॥
अमृत फलेंही देऊन । हरिसी क्षुधा तहान । त्यासी न दाखविसी ऊन । पुनरपि गा ॥३॥
तूं स्वयें गंगा निर्मल । तुला दुर्गंधाचाही मिळे नाला । परि हृदय संपुटीं तयाला । सांठविसी ॥४॥
तूं भक्तसंकटाचा मेरू । करांगुलीवरी उचलिसी सद्गुरु । जारज अंडजाही कृपारस मधुर । पाजिसी नित्य ॥५॥
तूं सूत्र भक्त मोतीं । प्रेमें गुंफिसी हार सुमति । घालिसी आपुल्या कंठी । अहर्निश ॥६॥
तुझें कराया स्तवन । नाना शब्द आणूं कोठून । शब्द हेंचि तुझें स्तवन । योगेंद्रा रे ॥७॥
शब्दसृष्टीचें भांडार फोडुनी । आणिले जरी हे जननी । तरि तेच शब्द फिरूनी । येतील आई ॥८॥
म्हणोनी मुख मिटवुनी । दृष्टी वरती नेउनी । कंठकूपीं हनुवटी ठेवुनी । करीन तव स्तुति ॥९॥
न घेई शब्दांची माळ । एकच वाहीन मन कमल । अंगीकारीं तमालनीळ । एवढी शोभा ॥१०॥
गत किरणीं विनायका । नाथें दिधली स्वानुभव नौका । चित्तसागरीं फिरूनी नेटका । करी विहार ॥११॥
मग जाई पुण्यपुरीस । पाही चंपाबाई कन्येस । देखतां तियेचा वृत्तिभास । आनंद न समाये ॥१२॥
चंपाबाईचें कन्याभूषण । तिचें नांव ठेवी रतन । श्रीनाथासी केलें कन्येनें । प्रेमें वश भारी ॥१३॥
नाथाविण न घेई अन्न । न घाली वस्त्र भूषण । न जाई कोठें सोडून । नाथराया ॥१४॥
नाथ हीच तिची खरी माता । विसरली आपुली मायमाता । पूर्व जन्मींचा उदय तत्वतां । झाला वाटे ॥१५॥
नाथ देई शिक्षण कुमारिला । नाना स्तोत्रें भूपाळ्या । भगवद्गीतेचाही पाठ सगळा । प्रभूनें दिधला हो ॥१६॥
अष्ट वर्षांची ही बाला । करीं घेउनी श्रीगीतेला । शुद्ध वाणीनें वाचितां । सगळ्या जनां नवल वाटे ॥१७॥
जेथे सर्व शुद्धांचें सार । शिकवी नाथ योगेश्वर । तेथें अशुद्ध कैसें रहाणार । कन्येच्या वाणींत ॥१८॥
घेऊनी आपुल्या सवें । दाविली सर्व तीर्थें देवें । पुरवी कोड भावें । कुमारीचे ॥१९॥
रत्नातें केलें रत्न । निज माळेंत गुंफून । सदा ठेवीं जैसें वत्सलांछन । हृदयीं गा ॥२०॥
नाशीक प्रांतीं नांदगांव । तेथें येई नाथदेव । असे भक्त वासुदेव । थत्ते उपनामक ॥२१॥
वासुदेवाचें वर्णन । आतां यथार्थ करीन । तो केवळ नांवाचा देव जाण । परि कृति दानवापरी ॥२२॥
आधीं आंग्लविद्येचा संस्कार । त्यावरी आंग्ल ज्ञाता भिषग्वर । तेथें आचाराचा विचार । कैसा राहे ॥२३॥
न पाही जातिधर्म । विषम जयातें वाटे सम । विषय सागरीं विराम । सदा पावे ॥२४॥
खानपानाचा सोडिला विचार । नीति अनीतीच्या पैलावर । सत्यासत्याचा विसर । पडला तयासी ॥२५॥
त्या न कळे पापपुण्य । सदा आपुल्या नादीं रममाण । करी पूर्ण योग्याचें ( ? ) लक्षण । ज्ञानावांचूनी ॥२६॥
वासुदेवातें चैनीस्तव । होती पैशाची भारी हाव । श्रीनाथ देई भूमिगत द्रव्य । ऐसा लौकिक ऐकिला ॥२७॥
आला धांवत श्री - दर्शनी । म्हणे आमुचें द्यावें द्रव्य काढुनी । प्राप्तीचा अर्ध चरणीं । अर्पण करूं ॥२८॥
नाथें केलें हास्यवदन । तुझें सांभाळी धन । तव गृहीं पश्चिमें गुप्तधन । सांठविलें असे ॥२९॥
अरें हें धन दो दिसांचे । तुज पुरणार नाहीं साचें । जातां हे दिन उन्नतीचें । मग रडशील ॥३०॥
तुझें धन जो परमार्थ । त्याचाच धरीं अर्थ । नको भुलूं रें व्यर्थ । मायापाशीं ॥३१॥
काळाचा नियम नाहीं । केव्हां करील तव होळी । उगीच गुंतसी माया जाळीं । जिवलगा ॥३२॥
या विषयपंकीं तूं रमसी । देह - धनही घालविसी । क्षणिक सुखातें भुलसी । करिसी आत्मघात ॥३३॥
तुझे सर्व सखे सोयरे । हे मधुमक्षिकेसम बा रे । तव द्रव्य - मधु हरूनी सारे । चावा घेतील ॥३४॥
अल्पायुषीं मानव देह । अर्ध तरी निद्रेंत जाय । अर्ध्यामाजीं उदराचा कलह । राहिलें मग शून्य ॥३५॥
तरी आतां जागा होई । सत्कर्माच्या मार्गी जाईं । तुज भेटेल लवलाही । अपार धन ॥३६॥
ऐसा नानापरी बोध केला । भक्त हृदयाचा काला झाला । निजकृतीचा पश्चात्ताप झाला । आला शरण पदांसी ॥३७॥
निजलो होतों विषय - पंकांत । त्वां मज सावध केले अवचित । माझें शरीर केलें धूतवस्त्र । दीनानाथा ॥३८॥
आतां मातें उद्धरावें । सोडिली सारीं पूर्व वैभवें । त्या मार्गी आतां न जाय । महाराजा ॥३९॥
धन्य नाथाची कृती । वळविला भक्त दुष्कृति । तयाची केली विषयतृप्ती । चार वाक्यांत ॥४०॥
विनायक होता आधींच शुद्ध । त्यास नाथ करी विशुद्ध । परि अशुद्ध वासुदेवा सिद्ध । करी तो धन्य ॥४१॥
सुवर्णातें लागाया बावन्न कस । न लागती बहू सायास । परि सुवर्ण करी लोहास । तेंचि अतुल सामर्थ्य ॥४२॥
शुभ्र वस्त्र गुलाबी कराया । न लागती कष्ट रंगारिया । परि कृष्णातें गुलाबी चढवाया । अधिक सामर्थ्य लागे ॥४३॥
ओल्या वृक्षासेसे जल । देतां वृक्ष फोंफावेल । परि शुष्कासि पल्लव आणील । तोचि अगाध कृतीचा ॥४४॥
दिशा उजळतां सूर्यप्रकाश । होणें हा निसर्ग - विलास । परि अंधः कारीं करील प्रकाश । तोचि स्वयंतेजी ॥४५॥
नाथांचें न कळे सामर्थ्य । सर्व करिती निसर्गविरहित । अज्ञानासी ज्ञानवंत । अपंडितासी पंडित ॥४६॥
शुद्ध पश्चात्तापानलें । जाळिलें पूर्व पाप सगळें । मग नाथें अनुग्रहजलें । शांत केलें ॥४७॥
होतां अनुग्रह प्रभूचा । जाहला । पुनर्जन्म तयाचा । विसरला पाश भवाचा । सदा रंगें आपुल्या रंगीं ॥४८॥
नाथें दिधली ज्ञानमुद्रा । त्यांतच लावी लय सदा । सोडी सारा गृह धंदा । वासुदेव ॥४९॥
वडिलीं केली सावकारी । होतीं कुळें अनेक परी । तिकडे लक्ष न देई भवारी । राहे नित्य अनुष्ठानीं ॥५०॥
घेणें बुडालें देणें उदेलें । परि हे शांतीचे भोगिती डोहोळे । दुष्काळानेंही बहुत गांजिलें । तरी वृत्ती न हाले ॥५१॥
घरें दारें विक्रीस निघालीं । परि शमता नाहीं ढळली । मग सद्गुरु माउली कळवळली । घेतला कारभार स्वकरीं ॥५२॥
नाथ करी सुतासी चाकरीं । गृहाची दुरुस्ती स्वयें करी । शेताचीही खबरदारी । घेई प्रभु हा ॥५३॥
पाही गुरांचें चारापाणी । वृक्ष वेलीला घाली पाणी । धन्य मापी हा चक्रपाणी । भक्ताघरीं ॥५४॥
ऐसा करोनी भक्त - संसार । मग सांगे योगीवर । आतां येई वृत्तीवर । करी प्रपंच ॥५५॥
मज पाही प्रपंचांत । तोचि तुझा रे परमार्थ । मग हा वासुदेव भक्त । करी संसार ॥५६॥
वैद्यकीचा धरिला छंद । देई उत्तम औषध । कदां न राही बद्ध । कोणापाशींही ॥५७॥
असला रोगी भयंकर । त्यास देई पुड्या चार । परमार्थाचा येतां आहेर । जांईं टाकुनी तैसाची ॥५८॥
बहुत होती रोगमुक्त । कोणी धरिती मृत्युपंथ । कोणी धन देती बुडविती । तरी खंती नाहीं ॥५९॥
नाहीं दंभाचा लेश जवळ । न दावी अंतर दुज्याजवळ । रोमरंध्रीं खेळवी खेळ । श्रीगुरुचा ॥६०॥
वासुदेवाची पत्नी अन्नपूर्णा । ती केवळ अन्नपूर्णा । करी सहाय्य परमार्था पूर्ण । पतिराया ॥६१॥
धौति नेति क्रियासंपन्न । प्राणायामें परिपूर्ण । वाटे शांतिदेवी अवतीर्ण । जाहली येथें ॥६२॥
नाथाचें शक्तिसर्वस्व । एक जाणे वासुदेव । घेई नानापरी अनुभव । योगेंद्राचे ॥६३॥
अन्नपूर्णेची एक कन्या । मथुरी नामें धन्या । जियेचें रूप घेई योगीराणा । ऐका ती कहाणी ॥६४॥
एकदां वासुदेवाची पत्नी । जाई कन्येसह पितृभुवनीं । नाथे आज्ञापिलें पत्रांनीं । मथुरीस गृहीं आणावें ॥६५॥
परि आल्या कांहीं अडचणी । म्हणोनि न पाठविलें तयांनीं । पुनरपि लिहिलें प्रभूंनीं । आणावें सत्वर ॥६६॥
भवितव्यता होती विलक्षण । मथुरी झाली अस्वस्थ जाण । विषमज्वरानें छाया घालून । पीडीलें तिजलागीं ॥६७॥
मग नाथें लिहिलें कठिण पत्र । आणावें सप्तदशदिनांत । पाठविली विभूति त्वरित । द्यावया कन्येसी ॥६८॥
जाहले सप्तदश दिवस । परि न पाठविले बालिकेस । कळवळा आला मातामहास । क्षीण कन्या न पाठवी ॥६९॥
दुर्दैव कैसें ओढवलें । कन्येतें कोणी घेरिलें । मूर्छित रत्न तें झालें । एकाएकीं ॥७०॥
आणिलें वैद्य थोर थोर । विभूतीचा झाला विसर । मथुरी गेली सत्वर । इहलोक सोडुनी ॥७१॥
पांच वर्षांची बाला कोमल । स्वभावें अत्यंत प्रेमळ । विवेक शांतीचें हें फल । गोजिरें का नसावें ॥७२॥
बोले मधु मधु बोल । वागे श्रेष्ठापरी विमल । सदा आनंदी मुखकमल । करी लीला अपार ॥७३॥
मथुरी बाला निसर्ग - मनोहर । जिचा वर्ण अत्यंत गौर । गुलाबापरी ओष्ठ रुचिर । दंतपंक्ति शुभ्र कलिका ॥७४॥
मथुरी आवडे सर्वांसी । मथुरी घालवी वृत्ति उदासी । मथुरी प्रिय बालकांते जैसी । तैसीच वृद्धांसी ॥७५॥
ऐसी मथुरी कोमल वल्ली । अवचित सुकोनी गेली । सर्व जनता दुःखी झाली । मग मातापितरांचें काय ॥७६॥
जियेच्या पोटीं जन्मले । जियेच्या कुशीं खेळली । जियेनें कौतुकें वाढविली । तिच्या दुःखा पार नसे ॥७७॥
जियेचें प्रेमनिधान । होती नेत्र तुष्ट जिला पाहून । ती माता शोक करी दारुण । आठवूनि गुण कन्येचे ॥७८॥
मथुरें तूं पांच वर्षांची बाला । परि नाहीं दुखविलें मला । न कधींही हट्ट केला । बालिके तुवां ॥७९॥
मी असतां कधीं उदासी । तूं मिठी घालिसी गळ्यासी । प्रेमभरें मज पुसशी । “ आई काय झाले ॥८०॥
आई तुझें म्लानमुख । मज देई भारी दुःख । ” म्हणोनि लडिवाळपणें अंकीं । बैससी वेल्हाळे ॥८१॥
आतां मी झाले दुःखित । येईं ग सये धांवत । माझी घाली समजूत । बोबड्या बोलें ॥८२॥
तूं माझी एकच हिरकणी । नेली कालें हिरावोनी । आम्हा समर्थें जागृत केलें झणीं । परि दुर्दैव ओढवलें ॥८३॥
मथुरें तुझ्यावीण शून्य सदन । मज कांहीं गडे उमजेना । जाऊं पाहे माझा प्राण । तुजविणें लाडके ॥८४॥
ऐसा फोडी हंबरडा । आवरेना दुःखाचा ओढा । वासुदेव करी शांतवन सदा । परि निष्फल होई ॥८५॥
मथुरीचें चालणें बोलणें । मथुरीचें रूप गोजिरवाणें । मथुरीचें नानापरी खेळणें । हेंचि दिसें सर्वद ॥८६॥
जाहली वेडी बिचारी । मायापाश बिकट संसारीं । मग पातली प्रभूची स्वारी । नंदिग्रामीं ॥८७॥
देखोनि दुःखाचा कहर । नाथें केला उपदेश फार । परि प्रियकन्येचा विसर । न पडे मातेसी ॥८८॥
नाथ मनीं विचारी । आतां होणें लागे मथुरी । त्याविणें ही माया दुरी । होणार नाही ॥८९॥
मग पांच दिवस नाथ । करी बाललीला निजरूपांत । मी तुझी मथुरी खचित । मज जेऊं घालीं ॥९०॥
माझा नवा दे परकर । कंचुकी कशिदा जिच्यावर । मी मुलींसवें खेळणार । भातुकली गे ॥९१॥
तूंही येई आमुच्या घरीं । तुज भोजन देऊं खीरपुरी । आई मज अंकावरी । खेळवीं आतां ॥९२॥
ऐसे नाथ मथुरीसम बोल बोले । तों मातेतें बहुत दुःख आठवलें । प्रभु म्हणे हें विपरीत झाले । आतां काय करावें ॥९३॥
गुरुवारीं प्रभातकाळीं । पति पत्नीची जोडी पाचारिली । कां पडतां दुःखानलीं । काया भाजेल ॥९४॥
तुम्ही परमार्थी भक्त थोर । करितां मायेस्तव दुःख फार । हा अधोगतीचा मार्ग दुष्कर । कां ओढोनि घेतां ॥९५॥
पहा पहा हो तुमची मथुरी । ऐसें म्हणोनि दृष्टी वर करी । पाहती मातापिता वरी । तों मथुरी खेळे खालींच ॥९६॥
नाथ न दिसे तेथ । मथुरीच खेळ खेळत । आई मी आलें धावत । सांडी आतां दुःख तूं ॥९७॥
मज खाऊचा पुडा देई । कां पाहसी टकमक आई । मी तुझी मथुरी नाहीं । सांग काय ॥९८॥
ऐसे नाना खेळ केले । मग केवळ नाथ दिसले । म्हणती तुज काय हवें बाळें । मथुरी अथवा निजरूप ॥९९॥
मातापितरांची भ्रांति निमाली । नको देवा मथुरी बाळी । असतां तूं चिरसुखाची पुतळी । मथुरी मायारूप ॥१००॥
मथुरी हें परांचे धन । तूं आमुचें सदांचें धन । नको मथुरीचें मोहन । घालूं मोहनारे ॥१०१॥
तूंच माझी मथुरीबाळा । हें तत्व बिंबलें हृदयाला । पुन्हा न घेई दयाळा । ऐसें रूप ॥२॥
महाभक्त वासुदेव । ज्यांच्या गृहीं खेळे माधव । त्यांचे वर्णन काय । गावें मतिमंदें ॥३॥
वासुदेवाचें वैभव अनंत । कैसे येतील सर्व किरणांत । परि कांहीं अल्प सिद्धांत । दाखवीन ॥४॥
श्रीनाथें वासुदेवाप्रति । दिली ज्ञानेश्वरीची पोथी । हीच तुझी परमार्थाची ज्योती । जाण बाळा ॥५॥
ज्ञानेश्वरीची एकवीस पारायणें । करितां तुज होईल वेदांतज्ञान । हीच देणगी समर्पण । करीन भक्तोत्तमा ॥६॥
ऐसा आशीर्वाद दिधला । वासुदेवें सिद्धीस नेला । एक दिन ऐसा घडला । पोथी नाहीं पढियेली ॥७॥
प्रपंचाचे कष्ट होती । म्हणोनि निजूं पाहे ही मूर्ती । तों पंचकासह नाथ येती । उठविती बालका ॥८॥
श्रीपरमहंस शीलनाथ । श्रीसद्गुरु सांईनाथ । धुंडिराज पळुसीं गजानन शेगांवांत । गोपाळदास नाशिकीं ॥९॥
हें पंचायतन नाथांचें । परम होतें जिव्हाळ्याचें । चाले सूत्र एकमेकांचें । अंतः शक्तीनें ॥११०॥
नाथें पाठवितां प्रिय शिष्यास । हें पंचक ओळख देती त्यास । करिती नाथप्रभूच्या लीलेस । त्या सन्मुख ॥११॥
ऐशा पंचकासह नाथ । म्हणती वासुदेवा ऊठ बा ऊठ । ज्ञानेश्वरीचा वाची पाठ । आम्ही श्रोते बैसलों ॥१२॥
आतां किती काल आम्ही बैसावें । तूं स्वस्थ निद्रेस वरावें । नित्य नियम न मोडावें । कदा काळीं ॥१३॥
वासुदेवे केला नमस्कार । वाचिली पोथी सत्वर । एकदां श्री पंढरपूर । दाखवीन म्हणे नाथ ॥१४॥
दृष्टांतीं दाविलें पंढरपूर । प्रत्यक्ष न देखतां नगर । सर्व सांगे श्रीविठ्ठल मंदिर । कैसें असें ॥१५॥
आली एकादशी जवळ । भक्त विनवी दाखवा विठ्ठल । तों एकादशीचे दिवशी दयाळ । दाखवूं म्हणे ॥१६॥
आला तो पुण्य दिवस । होता मध्यान्हींचा प्रकाश । ठेवी कटेवरी करद्वयास । पहावा पांडुरंग ॥१७॥
तों जैसा श्रीपंढरपुरीं । नांदे भक्तकैवारी । तैसीच मूर्ती साजिरी । भक्तगणां दिसली ॥१८॥
श्रीमाधवनाथ वैश्वानर । सांगे हवन परमार्थपर । करी आपण संचार । विविध स्थलीं ॥१९॥
हवन करी वासुदेव । तों एके दिनीं मंत्र चुकोनि जाय । ‘ स ’ सोडुनी श ’ ध्वनि होय । मुखांतुनी ॥१२०॥
तों एकाएकीं “ थांब ” ऐसी । ध्वनी निघें पूर्वेसी । मनीं म्हणे हा भास मजसी । वाटतो गा ॥२१॥
पुनरपि त्याच अक्षरानें । करी हवन संतोषपणें । तैसिच ध्वनि ऐकतां वासुदेवानें । पाहिला मंत्र ॥२२॥
तों चूक दृष्टीस पडली । नाथ माउली मनीं चिंतली । पूर्ववत आहुती अर्पिली । अग्नि देवासी ।२३॥
येतांच प्रभूची स्वारी । हस्त ठेवी पाठीवरी । म्हणे मंत्र चुकतास तरी । कठिण झालें असतें ॥२४॥
श्रीनाथ केवळ त्रिकालज्ञानी । पाहे जनीं वनीं स्वप्नीं । ऐसे अनुभव निशिदिनीं । घेई भक्त वासुदेव ॥२५॥
या नंदिग्रामीं श्रीनाथ । करिती अनेक हवनें नित्य । इक्षुदंडपलश बिल्वपत्र । इत्यादि साहित्य - मंत्रें ॥२६॥
अपूर्व केल स्वाहाकार । परि नवग्रहांचें हवन थोर । कोटी आहुति घेई वैश्वानर । या ग्रामीं ॥२७॥
अनेक स्वाहाकार करी देव । परि ते सर्व भक्तास्तव । ऐसा संकल्पूनी करी भाव । लोकोपकारार्थ ॥२९॥
नंदिग्रामीं बाग महादेव । जो नितांत शांत स्वयमेव । आम्र कदंब वट वैभव । शोभवी त्या उपवना ॥१३०॥
मध्ये विलसें श्रीशंकर । बांधिलें मंदिर मनोहर । तयाच्या घुमटीं चौफेर । बसविले तापसी ॥३१॥
बघोनि मुनींचे पुतळे । कारागिरांचें कौशल्य कळे । चेतन देणें राहिलें । एकच तेथें ॥३२॥
सुवर्णाचा दिसे कळस पताका त्यावरी हालवी चित्तास । भिंतीवरी चित्रांचा प्रकाश । पुराणकालींच्या ॥३३॥
भोंवतीं शुष्क नदीचें वाळवंट । उपवनाला दगडी कोट । परि न रुचलें सरितेस द्वैत । म्हणोनि तट पाडीला तियेनें ॥३४॥
ऐशा पवित्र आश्रमांत । नाथ करी यज्ञ श्रेष्ठ । केलें हवन कुंड उचित । यज्ञासी जें ॥३५॥
हातीं घेवोनी मृत्तिका । नाथ स्वयें करी कुंड देखा । अज्ञातवासाच्या कौतुका । येथेंही करी ॥३६॥
येसगांवीं योगेश्वर । भिंतीस गिलावा करी सुंदर । येथेंही करणी घेऊन करी । बाललीला ॥३७॥
कुंडास केल्या मेखळा । नाभीहि रचिली विधीला । सूत्राचाहि फरक तयाला । ठेविला नाहीं ॥३८॥
जैसें शास्त्रीं कुंडविधान । तैसें करी प्रभु आपण । येती विद्वान तैलंगण ब्राह्मण । म्हणती धन्य कारागीर ॥३९॥
शास्त्र नियमानुसार । आजचि देखिले प्रकार । करिती सद्गुरुसी नमस्कार । साष्टांग भावें ॥१४०॥
आघाडा दर्भ औदुंबर । पिंपळ तेवीं खदिर । शमी रुई वृक्षांच्या रुचिर । घेई समिधा नाथ देव ॥४१॥
त्या सर्वांचें वीत प्रमाण । शुभ मुहूर्तीं आणवी तोडून । मुहूर्तेंच तांदूळ घृत तेल आणी । मुहूर्तराज श्रीनाथ ॥४२॥
आणविली धेनु सवत्स । तिचें पूजन करी नाथ । मृगाजिनावर होई स्थिर । आसनबद्ध ॥४३॥
सवें घेई प्रिय बालाना । तेंवि विश्वान ब्राह्मणां । या ऋत्विजांसह नारायणा । आहुती देई नारायण ॥४४॥
पंच दश घटिका नित्य । राहे प्रभु आसनस्थ । इतर बालें असमर्थ । बसावया इतुका काल ॥४५॥
नाथ प्रेमाचा सागर । देखोनि श्रांत प्रिय कुमर । म्हणे उठावें एक पळ भर । पुनरपि बैसावें ॥४६॥
आपण राहे अचल । सोशी धूम्राचें लोळ । परि नियम न करी चंचल । धन्य नियम तयाचा ॥४७॥
यापरी पांच दिन । करी स्वाहाकार दयाघन । वाढे उल्हास दैनंदिन । प्रभुरायाचा ॥४८॥
आली पूर्णाहुतीची वेळ । तो प्रसंग बहु अमोल । नाथसुतांच्या चित्तीं अचल । राहिला प्रसंग हा ॥४९॥
घेउनी घृत पांच शेर । एकटाच टाकी घृत धार । वाटे शिवजटेंतुनि गंगाधार । पडे अग्निकुंडांत ॥१५०॥
नाथ भासला शिवरूप भास कशाचा प्रत्यक्ष स्वरूप । अग्निकुंडींही देव दैदिप्त । पाहिला कित्येकीं ॥५१॥
करोनी अंजुली बालमूर्ती । अग्निकुंडामाजी दिसती । अंजुलींत सोडी घृत धार ती । जाहला तदाकार ॥५२॥
नगरावासी जन बहु आले । कित्येकीं नारिकेल समर्पिले । तीन प्रहर झाले । परि नाथ उभे तैसेच ॥५३॥
मग वासुदेवे पायावरी । मस्तक ठेवितां येई देहावरी । म्हणे कोठें बालमूर्तीची स्वारी । अंतर्धान पावली ॥५४॥
वासुदेव म्हणे ती मूर्ती मूर्तीत । समरस पावली नाथ । मग पोट धरोनी हांसत । अर्थ कळे एकासीच ॥५५॥
त्यानंतर अवभृतस्नान । करी हे योगिभिर्ध्यान । करोनि मंडप उंच चौकोन । ठेविल्या फळ्या त्यावरी ॥५६॥
तेथें ठेविला चौरंग । वरी बसे नाथ जो दावी चौरंग । लंगोट कांसे कसिला मग । लावी तेथ समाधीं ॥५७॥
शत घागरीहुनी अधिक । आणिती उष्ण जल भक्त । टाकिती हर्षुनी अनेक । परि नाथ शून्य ॥५८॥
मंडपाखालीं भक्त मेळा । स्नानास्तव सरसावला । रोगी निरोगीचा जमला । एकच मेळा ॥५९॥
या तीर्थराजाचें स्नान । जयानें केले भावपूर्ण । तो जाहला दुःखमुक्त, निधान । लाभलें तया ॥१६०॥
जेंवि प्रसाद घ्यावयातें । बालें सरसावती नेटे । तेंवि झालें आज तेथें । स्नानास्तव ॥६१॥
वृद्ध तरुणही झाले बाल । म्हणती कैं स्नान लाभ होईल । यथाशक्ति करिती बळ । पुढे सरसावया ॥६२॥
ऐशा पांच घटी पर्यंत । नाथ मस्तकीं वाहे धार संतत । परि चलन वलनही किंचित । केलें नाहीं ॥६३॥
मग पाण्याची धार संपली । नाथ मुखांतुनि गंगा वाहू लागली । एक घटिका अखंड राहिली । धन्य हें नवल ॥६४॥
केलें ब्राह्मणसंतर्पणा । देई तांबूल दक्षिणा । देई नाथजी विद्वज्जना । जरतारी शाली ॥६५॥
नाथें भरविला दरबार । बोलिला शिष्य संभार । वासुदेव जोडोनि कर । सन्मुख उभा असे ॥६६॥
वासुदेवाचे निमित्तानें । ज्ञानामृत पाजिलें प्रभूनें । ती कथा प्रकाशिजे किरणे । तेवीसाव्या ॥६७॥
जया लाभला ऐसा देव । तयाचें जीवित पुण्यमय । घेईल मुक्तीचा डोह । म्हणे नाथसुत ॥१६८॥
इति श्री माधवनाथ दीपप्रकाशे नाथसुत विरचिते वासुदेवशिष्यपावनं नाम द्वाविंशतितमः किरणः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP