मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश|
द्वितीय किरण

दीपप्रकाश - द्वितीय किरण

Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.


श्रीसद्गुरुनाथायनमः ॥
जयजयाजी सद्गुरुनाथा । ज्ञानसमुद्रा ज्ञानवंता । वेदही श्रमती गातां गातां । लीला तव अपार ॥१॥
तूं ब्रह्मा विष्णु पशुपति । तूं सावित्री रमा पार्वती । तूं सकल देवांची मूर्ति । जगद्गुरो ! ॥२॥
सुवर्णाची एकच खाण । परी अलंकार असती भिन्न । तैसी दृश्यवस्तु तुझीच खूण । जरी भिन्न दिसती त्या ॥३॥
तूं स्वयें अससी निर्गुण । परी लीलेनें होसी सगुण । करिसी विराटरूप धारण । प्रकृतिसंगें घेउनी ॥४॥
पातालादि पाय उरू । महीतल ही कटी थोरू । आकाश ही नाभि रुचिरू । स्वर्लोक हें वक्षस्थल ॥५॥
महर्लोक ही तुझी मान । जनलोक हें तुझें वदन । तपोलोक हें भाल जाण । सत्यलोक मस्तक ॥६॥
शब्द तुझें श्रोत्रेंद्रिय । गंध हे घ्राणेंद्रिय । अंतरिक्षलोक - नेत्रद्वय । चंद्रसूर्य ह्या बाहुल्या ॥७॥
उदक ही टाळू सुंदर । जिव्हा सर्व रसांचें सार । वेद ही वाणी मधुर । हास्य ही माया प्रभूची ॥८॥
यमराज हा प्रभूच्या दाढा । विषयप्रीती - दंतांचा सांगाडा । नेत्रकटाक्षें अनंत ब्रह्मांड । उत्पत्तिस्थितिलय करी ॥९॥
लज्जा प्रभूचे उच्च ओष्ठ । लोभ हा अधरोष्ठ । धर्म हे त्याचे स्तन स्पष्ट । अधर्म हा पृष्ठभाग ॥१०॥
प्रजापति हें उपस्थेंद्रिय । पर्वत अस्थींचें समुदाय । सकल सरिता नाड्यांचा संग्रह । वृक्ष हे रोम रोम ॥११॥
वायु प्रभूचा श्वासोच्छ्वास । कालगतीचा करी प्रकाश । खेळवी त्रिगुण खेळास । ऐसेंरूप अद्भुत ॥१२॥
मेघ हे प्रभूचे केस शाम । संधिकालाचें वस्त्र उत्तम । हृदयीं होई माया विराम । मनसा चंद्र शीतल ॥१३॥
महत् तत्त्व हे चित्तस्थान । मनु ही बुद्धीची खूण । पुरुष हें निवासस्थान । जगन्नाथाचें ॥१४॥
नाथा ! तुझा विराटरूप विस्तार । सांगतां होईल ग्रंथविस्तार । म्हणूनी संक्षेपें सार । कथिलें म्यां ॥१५॥
तुझ्या विराटरूपा वांचून । कोठेंहि नसे अन्य स्थान । जैसें दुग्धीं नवनीत पूर्ण । तैसा तूं व्यापक सर्वांत ॥१६॥
या विराटरूपांत माझें मन । जाईळ सत्वर विरोन । ऐसें करी विंदाण । विराटरूपा माधवा ॥१७॥
तुझें रूप इतुकें विशाल । मग चरित्र कैसें असेल । ऐसें तर्कितां मवाळ । अंतरें मी होतसे ॥१८॥
परी जैसा सागरीं बिंदु । टाकितां समरस करी तो सिंधु । तैसी ही कृति कृपासिंधु ! । सांठवी चरित्र - सागरीं ॥१९॥
प्रथम किरणीं मंगलाचरण । करविलें नाथें सकलां नमन । द्वितीय किरणीं जन्मकथना । करवी माझा सद्गुरू ॥२०॥
खोटा कारभार निरसावया । प्रभूस येणें लागे रूपीं या । खोटीच लावोनी माया । खोटी कृति करितसे ॥२१॥
जगीं असत्याचा झाला सुकाळ । सत्यानें काढिला पळ । जिकडे तिकडे विचित्र खेळ । जाहली दुःखी आर्यभू ॥२२॥
अधर्म - निशाचरें धिंगाणा । चालविला सार्‍या भुवना । कोणाही कर्तव्य सुचेना । स्वातंत्र्यता हरपली ॥२३॥
शब्दाचा झाला गलबला । कृतीचा फुटला डोळा । जनसंघ सैरावैरा पळाला । दाही दिशा ॥२४॥
कोणी कोणी धर्म सोडिती । कोणी उज्वल धर्मा पंगु करिती । कोणी नूतन पंथी म्हणविती । कीर्तिस्तव ॥२५॥
कोणी अभ्यास - योगा निंदिती । कोणी भक्तिज्ञान सोडिती । कोणी परांचे पोवाडे गाती । ऐसी चावटी जाहली ॥२६॥
जाहला सारा अंधःकार । म्हणोनी घेतला अवतार । दुष्कृताचा करी संहार । माधवनाथ ॥२७॥
अवतार घ्यावया नाथ । शोधी भूमि पवित्र । श्रीचित्रकूट पर्वत । जेथें राहिला रामराणा ॥२८॥
रामचंद्र नामें ब्राह्मण । वैद्यविद्या शास्त्रज्ञ । होता धन्वंतरींच जाण । पांगरी बुद्रुक ग्रामांत ॥२९॥
स्वधर्मीं वर्ते तो द्विज । लोकोपकार हें त्याचें ओज । रोगमुक्त करी सहज । राव रंका सारखा ॥३०॥
न घेई द्रव्य कोणाचें । दुःखितासाठीं हृदय तयाचें । तळमळे म्हणोनि दिनरातीं साच । फिरे त्या नाशिक प्रांतांत ॥३१॥
तयांचे चिरंजीव मल्हारपंत । हाच नाथांचा जन्मदाता । जो श्रीतुकया परि सर्वथा । करी सुखें संसार ॥३२॥
तयाची कांता देवी मथुरा । तियेच्या कुशीं जन्मला माधव हिरा । ऐकावा जन्म वृत्तांत सारा । श्रोतेजनीं ॥३३॥
भगवंतराव नामें पितामह । अवंतीस होतें वास्तव्य । करिती सेनापतित्व । शिंदियांचे ॥३४॥
भाऊराव तयांचा सुत । हाच मथुरेचा जनक सत्पात्र । होता घोगर - ग्रामीं राहत । कन्या पितामहगृहीं ॥३५॥
अवंती नगरीं परम पावन । जे आदिनाथाचें स्थान । परमार्थाचे नंदनवन । अवंती नगरी एकची ॥३६॥
ज्योतिर्लिंग श्रीमहाकाल । तेथें नांदें तमालनील । चिताभस्मांकित तनु विशाल । जयाची शोभें सर्वदा ॥३७॥
क्षीप्रा स्वेच्छें जेथें वाहे । कई मंद कई द्रुतगति होये । कोठें बाला कोठें यौवनी राहे । कोठें वृद्धा दिसे ती ॥३८॥
ऐशा नाना अवस्थेंत । विहरे क्षिप्रामाता नित्य । करी जीवांचा उद्धार सतत । कालत्रयीं ॥३९॥
जेथें भर्तृहरी विक्रमें । राज्य केलें त्रिविक्रमें । जेथें नवनाथ अनुक्रमें । योगमाया खेळविती ॥४०॥
जेथें गोवळी खेळवी शिवासी । वेश्या लाजवी पतिव्रतेसी । जी सर्व सुखाची मिराशी । त्या नगरीसी किती गावें ॥४१॥
जी वैभवानें सदा डोले । जिला गाती संत सगळे । सकल कलासमूह लोळे । जियेच्या पदीं ॥४२॥
होती महावीरांची स्वामिनी । सकल जगताची पालिनी । जिच्या दर्शनास्तव स्वर्गभुवनीं । देव विमानीं दाटती ॥४३॥
ऐशी पावन पुरी सांप्रत । जाहली दीन दुःखित । आठवी भूप रत्नें गत । जे मंगलमणी तियेचे ॥४४॥
जरी झाले म्लान वदन । परी न सोडी पावित्र्यापण । अनेक जीवां करी पावन । निज दर्शनें ॥४५॥
ऐशा पुण्यपुरींत मथुरा माता । नांदत असतां सावचित्ता । जाई महाकाल दर्शनीं तत्वतां । श्रावण सोमवारी ॥४६॥
वंदोनियां शिवासी । माता परतली गृहासी । सारोनी पूजादि नियमांसी । जाहली ध्यानस्थ अंबिका ॥४७॥
तों गृही आला एक महंत । माथां शोभला जटाजूट । अंगीं विभूति कांसे लंगोट । उभा मथुरेच्या समोर ॥४८॥
देखोनियां योगेश्वर । मथुरा घाली साष्टांग नमस्कार । येरू म्हणे तूं चतुर । होशील सिद्ध माता ॥४९॥
तुज पुत्र होतील अनेक । परी एकच अलौकिक । होईल लोकोद्धारक । हा निश्चय जाण पां ॥५०॥
सिद्धें देउनी ऐसा वर । पूजेस दिधला महाशंकर । करी वो पूजा निरंतर । महादेवाची ॥५१॥
ऐसी आज्ञा करून । साधु पावला अंतर्धान । मथुरा बाला चकित होऊन । देहभान विसरली ॥५२॥
नवल साधूचें वाटलें । पुढील भविष्य कथिलें । परी कर्म करावया लाविलें । साधकासि आधीं ॥५३॥
सिद्धें दिधला जो महादेव । तो देवगांवी करी वास्तव्य । शोभवी श्रीव्यंकटेशराव । मंदिर आदरे ॥५४॥
ऐसें बहुकाल आक्रमितां । मथुरा प्रसवली एका पुत्रा । जो सत्वगुणाचा भोक्ता । अण्णा नामें प्रवर्ते ॥५५॥
त्रयवर्षांनंतर । जाई यात्रेसि हा परिवार । त्रिस्थळीं यात्रा थोर । भक्तिभावें करिताती ॥५६॥
त्रिस्थळीं यात्रेचें महिमान । पुराण ग्रंथी विशद जाण । अवश्य करावें अवलोकन । सकल सज्जन श्रोतृवृन्दें ॥५७॥
तीर्थयात्रा शुद्धीसी कारण । तीर्थयात्रा करी दोष हरण । करितां भावें तीर्थाटण । मनुज स्वयें तीर्थ होय ॥५८॥
भूवरी असती तीर्थे अनंत । कोणी करावें गणित । परी त्रिस्थळीं यात्रेंचें महत्व । विशेष असे ॥५९॥
ऐसी प्रयाग काशी गया । त्रिस्थळीं यात्रा करोनियां । चित्रकूटीं येती भेटावया । बंधुराया ॥६०॥
चित्रकूटाचें वर्णन । कराया नाहीं सामर्थ्य जाण । जैसें वदवी नाथ - नारायण । तैसेंच बोलेन ॥६१॥
जयातें वाल्मिक तुळसी गाती । तदितर कविही सजविती । तेथें नाथसुत मंदमति । काय गाईल ॥६२॥
चित्रकूट हें निसर्गाचें । जाहलें निधान साचें । जेथें वास्तव्य श्रीरामाचें । महती तेथील काय गावी ॥६३॥
पर्वताची भव्यश्रेणी । शोभविलें त्या वृक्षराजींनीं । वाहें सरिता पयोष्णी । मंद मंद ॥६४॥
रवी न होई तीव्रतर । चंद्रही न होई शीतकर । एकमेकां साह्यकर । होई चित्रकूट निसर्ग ॥६५॥
सेविती सारे रामचरण । राम हेची त्यांचे जीवन । सदा रामस्वरूपीं निमग्न । धन्य ते निसर्ग ॥६६॥
सरिता घाली स्नान रामा । भूमीं पृष्ठी घेई मेघः शामा । सिंहासन मनोभिराम । होई पर्वतराज ॥६७॥
तरुवर हीं छत्र चामरें । ढाळिती प्रभुवरी प्रेमभरें । मेघ गर्जोनी मधुरस्वरें । करी नौबद नाद ॥६८॥
बकुल मालती चंपक । पूजिती आदरें रघुनायक । तुलसी मंजरी राम - मस्तक । अवघ्राणिती ॥६९॥
श्रीरामचंद्रा सन्मुख । पारिजातक तेवी चंपक । पसरिती गालीचा मोहक । निज रूपाचा ॥७०॥
चंडोल करी उच्च गायन ! कोकिला काढी मधुर तान । नाचे मयूर आनंदाने । उभारोनि पिसरा ॥७१॥
वायू करी धूप समर्पण । सूर्यप्रभा घेई दीप नीरांजन । नानाविध नैवेद्य फळ जाण । अर्पिती प्रभूला ॥७२॥
नाना वनस्पती तांबूल । खाई रामराय दयाळ । चंद्रसूर्य हें पंचारति उज्वल । भावयुक्त करिती ॥७३॥
पक्षी गाती मंत्रपुष्पांजलीं । कामिनी सुमनें शय्या केली । त्यावरी मूर्ति पहुडली । दाशरथीची ॥७४॥
ऐसी पूजा अहोरात्र । करिती चित्रकुटीचे संत । न करिती भंग नियमांत । कदा कालीं ॥७५॥
श्रीराम पावला विराम । परी न सोडिती आपुला नियम । कर्मयोग शिकविती उत्तम । मानव जीवां ॥७६॥
कितीहि केलें वर्णन । परी तें हो अपूर्ण । ऐसें मनोहर स्थल अन्य । नाहीं भूवरी ॥७७॥
अत्री ऋषींची भार्या । नाम जियेचें अनसूया । वाहे जलप्रवाह । तन्नामाचा ॥७८॥
करावया संध्यास्नान नित्य । पतीस होती कष्ट बहुत । म्हणोनि तपोबळेंसरिता स्त्रोत । आणी संनिध देवी ती ॥७९॥
अत्रीऋषींचें आश्रमस्थान । अद्यापीही शांतवी नयन । पहावा श्रीहनुमान । हनुमान धारीं ॥८०॥
अनेक संत विभूति । या पुण्य भूवरी तप करिती । परमानंद रसा परमानंद रसा चाखिती । अनेक पंथे ॥८१॥
देखोनि योगियांची विवरें । वाटे नको संसृतीचें वारें । पिंड ब्रह्मांडाचे खेळ सारे । येथें खेळूं ॥८२॥
या चित्रकूटा जवळी । ‘ करवी ’ ग्रामवस्ती झाली । तेथें येईं माऊली । पतीसह नाथांची ॥८३॥
पूर्वी होता मथ थोर । तया खालीं गुंफा रुचिर । त्यांत समाधि चौफेर । आदिनाथांची ॥८४॥
तेच नाथांचें मूलस्थान । अनुग्रह दीक्षेचें ठिकाण । गुरुकृपेची खूण । तेथेंच प्रगटे ॥८५॥
ऐशा मठांत विठ्ठलनाथें । बांधिलें मंदिर स्वहस्ते । सेविलें तीन तपें व्यंकटेशाते । राहोनी स्वयें गिरीस ॥८६॥
विठ्ठलनाथां दृष्टांत झाला । देव म्हणे मी येतों तव गृहाला । वैश्य गृहीं तांदूळ थैला । त्यांत पाहीं मजलागी ॥८७॥
विठ्ठलनाथें प्रभूस आणिलें । प्रेमें हृदयासीं कुरवाळिलें । देवभक्त दोघे भेटले । मग दुजेपण राहीना ॥८८॥
घेवोनि त्या देवाधिदेवा । स्थापिले मंदिर अभिनवा । करी सोहळा उत्साहें बरवा । नानापरी नाथजी ॥८९॥
झाली प्रसिद्धी दशदिश । अनेक येती करवीस । पुरवून घेती लालसा । दर्शनाची ॥९०॥
जे असमर्थ यावया गिरीस । त्या दृष्टांत देई परेश । म्हणें मी आलों करवीस । विठ्ठलनाथमंदिरी ॥९१॥
तुम्ही तेथें देतां नवस । मज पावेल हें खास । नका करूं कष्टद प्रवास । श्रीगिरीचा ॥९२॥
ऐसा कित्येकां साक्षात्कार झाला । जनसमूह सारा धावला । कामी निष्कामी जनाचा सोहळा । लीन होई नाथपायीं ॥९३॥
कोणी म्हणती पुत्र द्यावा । कोणी मागती द्रव्य ठेवा । कोणी म्हणती घडो सेवा । भक्तियुक्त ॥९४॥
चौघडे वाजती प्रत्यहीं । नित्य निशीभार्गव होई । षोदशोपचारें पूजाही । करिती अनेक ॥९५॥
विठ्ठलनाथ राही अयाचित । परी प्रभू करी सर्व यथास्थित । जेथें अवतरला लक्ष्मीकांत । तेथें उणे केवीं ॥९६॥
विठ्ठलनाथ महायोगी । प्रार्थी देवास प्रसंगी । देवा ! मी शून्यमार्गी । मज नको ही खटपट ॥९७॥
हंसूनी बोल व्यंकतरमण । वत्सा ! ही मम माया जाण । पाही पाही रे नेत्र उघडून । यांतील वर्म वेगळेंची ॥९८॥
दुर्वाचा कल्क सेवून । केलें विठ्ठलनाथें तपाचरण । षट्चक्रें भेदून उड्डाण । करी विहंगम मार्गे ॥९९॥
विठ्ठलनाथें केला चमत्कार । फिरवती विधिरेषा सत्वर । वंध्येसी दिधले कन्याकुमार । ‘ बांसबरेली ’ ग्रामीं ॥१००॥
ऐशा विठ्ठलनाथ मंदिरी । येई नाथमाता ईश्वरीं । देखोनि हर्ष झाला अंतरीं । नाथजीच्या ॥१॥
मथुरामाता गर्भिणी होती । झाली सात मासांची भरती । म्हणोनि बंधु - गृही आणिती । मल्हारदादा ॥२॥
परी या आगमनाचें अंतरंग । जाणे विठ्ठलनाथ श्रीरंग । म्हणे माझ्या अंशाचा भाग । जन्म येथेंच घेईल ॥३॥
बघोनी अंतरी हें चित्र । मथुरेस ठेवोनि घेई नाथ । देवभांडार उघडोनि त्वरित । म्हणे वस्ती येथेंच करी ॥४॥
कन्येपरी मथुरेचे । करी संगोपन साचें । पुरविले डोहाळे सतीचे । जे जे वांछित ॥५॥
मथुरा म्हणे वाटे करावें भजन । नको नको तामसी अन्न । करीन केवळ दुग्ध प्राशन । राहीन एकांतीं ॥६॥
क्षणांत उठे क्षणांत बैसे । क्षणांत फाडी जरीची वस्त्रे । क्षणांत रडे क्षणांत हांसे । मथुरामाता ॥७॥
सोडी मर्यादेचें पटल । उच्च स्वरानें गाई कोमल । म्हणे मी सोहम् विमल । मज कुणाचें भय नाहीं ॥८॥
ऐसे देखोनी डोहळे । नाथ वृत्ती उचंबळे । म्हणे भले गे भले । डोहळे तुझे ॥९॥
परी देखोनी ऐसे चार । जन म्हणती हें वेड थोर । यांतील तत्त्व जाणे चतुर । एकच विठ्ठलनाथ ॥११०॥
ऐसे जातां मास दोन । उगवला शक सतराशें एकूणऐंशी दिन । नगरांत करिती ध्वजारोपण । जिकडेतिकडे ॥११॥
सडे संमार्जनें घातलीं । सर्व नगरी शृंगारिली । मंगलवाद्यांची गर्दी झाली । चोहोंकडे ॥१२॥
जणूं नाथबालकाचें स्वागत । करावया करिती थाट । नरनारी उल्हासित । आज सारे जाहले ॥१३॥
नारी करोनी वेणी फणी । नानापरी भूषणें घालुनी । उंची वस्त्रेंहि नेसोनि । सिद्ध जाहल्या ॥१४॥
बालिकांचा आनंद थोर । वर्णवेना कवीस साचार । मातेसी म्हणती गोजिर्‍या । देई वस्त्र भूषणें ॥१५॥
कोणी चिरडी कोणी परकर । कोणी म्हणती घालीन हार । कोणी म्हणती शिरावर । चढवीन कळस सोन्याचा ॥१६॥
कोणी पायी घालोनी तोरड्या । नाचती वेड्य़ा वांकुड्या । वेडाविती बंधूस धाकुट्या । दाखवोनी भूषणें ॥१७॥
प्रभातींच बालें स्नान करोन । लाविती भाली रक्तचंदन । म्हणती आम्ही जरीचें लेणें । आज लेवूं ॥१८॥
आज करूं सरस्वती पूजन । बांधवां करू प्रसाद अर्पण । हातीं धरोनी मंगल तोरण । मिरवूं ग्रामांत ॥१९॥
शुभ कार्ये करायास । वृद्ध तरुणा वाटे हौस । आनंदाचा झाला कळस । करवीं - ग्रामीं ॥१२०॥
श्री मंदिराचा आनंद । वर्णितां नाथसुत होई जडबुद्ध । जेथें प्रत्यक्ष आनंद । तेथें उपमा दुजी न साहे ॥२१॥
विठ्ठलनाथ पूर्णानंद । तयाचा पौत्रही आनंद । जेथें ‘ पूर्णस्य पूर्णमादाय ’ हा छंद । तेथें अपूर्णता कैसी ॥२२॥
लाविल्या ध्वजा दाही दिशा । बांधिली तोरणें बहुवसा । पुष्पमालांचा गंधमधुरसा । वायुसवें खेळला ॥२३॥
वाद्यें वाजतीं सुस्वर । दुंदुभी नाद गर्जे भेर । भजनी टाळ मृदंगाचे स्वर । चित्तास मोह पाडिती ॥२४॥
नाचती प्रेमें भक्तजन । गाती भूपावली काकडा छान । शर्करा लोणी नैवेद्य समर्पण प्रभूस करिती ॥२५॥
आज सृष्टी ही आनंदली । ती शुभ्र पातळ नेसली । लावी रक्त मळवट भालीं । घेई रविदीप पंचारति ॥२६॥
ऐशा मंगलकालीं मथुरादेवी । करोनी नित्य पूजा बरवी । वंदोनी बालाजी भूदेवी । प्रदक्षिणा आरंभिली ॥२७॥
घाली एकादश प्रदक्षिणा । तो उदरव्यथा झाली दारुणा । गेली त्वरित प्रसूतगृहीं जाणा । तों उदया आला भास्कर ॥२८॥
मथुरादेवी पुत्र प्रसवली । ही वार्ता कर्णोपकर्णी झाली । बाह्यदृष्टीनें नाथास कळली । नाचती मग आनंदें ॥२९॥
नाथ म्हणे मम कार्य झालें । मदंशेंच बाळ जन्मास आलें जैसी बीजें तैसी फलें सत्य होतील ॥१३०॥
केले नाथें महोत्साह । करवी झाली शर्करामय । आले द्विजांचे समुदाय । शांतिपाठ गावया ॥३१॥
जो आला शांतीचे उदरीं । ज्याचें रूप ही शांतीच खरी । जयाचें कर्य शांतीच्या लहरी । त्यापुढें शांतिपाठ गाती ॥३२॥
परी हें लौकिकी कार्य । म्हणोनी करी नाथसदय । करी सटवाईस देव । बाळाचें भाग्य लिहावया ॥३३॥
बोलावुनी ज्योतिषी तज्ञ । केलें पौत्राचें टिपण । करी यथासांग विधान । बाह्योपचारें ॥३४॥
होता द्वादश दिवस । करिती नामकरण विधीस । ठेविलें माधव या नामास । विठ्ठलनाथजीनें ॥३५॥
दृष्टी चाले दृष्टी बोले । दृष्टी हाले दृष्टी डोले । दृष्टेनेंच दृश्य सगळें । प्रतीत होई ॥३७॥
परी ऐसी दिव्य - दृष्टि । पाहिजे आधीं अदृष्टीं । घेता सद्गुरूची भेटी । सहज लाभेल ॥३८॥
जातां सद्गुरूसी शरण । तो दृष्टीवरील शाई निरसून । घालील स्वतेज - तेजःकण । विद्युत् योगे ॥३९॥
एका सद्गुरूसी हें सामर्थ्य । त्यावीण नसे त्रिभुवनांत । म्हणोनी व्हावें शरणागत । सद्गुरूपायीं ॥१४०॥
जन्मकिरण झालें संपूर्ण । पुढील किरणी बालपण । वदवील सद्गुरू नारायण । नाथसुतासी ॥४१॥
भलें केलें नाथराया । भक्ताची दुर्बलता नेली विलया । चढविल्या दोन पायरिया । प्रकाश - मंदिराच्या ॥४२॥
तव प्रकाशाचा मार्गही पाही । मज दिसत नव्हता आई ! । म्हणोनी कृपा - ज्योति लवलाही । दाखविली त्वां ॥४३॥
इतुकेंही करोनी स्वस्थ । बैसला नाही सद्गुरुनाथ । धरोनी नाथसुताचा हात । मार्गी नेई ॥४४॥
जेथें प्रत्यक्ष गुरुदेव । नाथसुता करी सहाय्य । तेथें कल्पनांचा समूह । केवीं राहील ॥४५॥
ओढ्यासी गंगौघ मिळतां । तो गंगेत मुरजोनी तत्वतां । पावे गंगेसी समता । गंगारूप ॥४६॥
तेवीं नाथ सुताच्या कल्पना । नाथपायींच होती तल्लीन । देई कवि हें विशेषण । नाथची मातें ॥४७॥
येरव्ही नाथसुताचें मूढपण । नाथसुत जाणें संपूर्ण । कर्ता करविता करुणाघन माधव नाथ ॥१४८॥
इति श्रीमाधवनाथदीपप्रकाशे नाथसुतविरचिते जन्मकथनं नाम द्वितीय किरण समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP