मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश|
त्रयोविंशतितम किरण

दीपप्रकाश - त्रयोविंशतितम किरण

Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.


श्रीसद्गुरुनाथायनमः --
जय जयाजी आदि देवा । अनंतवेषा अनंत नांवा । कैसा तुज प्राणिपात करावा । हेंही मज ना कळे ॥१॥
तूं अलक्ष अगोचर । अनादिसिद्ध निराधार । वृद्धि - क्षयाचा विचार । नाहीं तुजसी ॥२॥
तूं सर्वांतरीं व्यापक असुनी । न दिससी कोणा सगुणी । कैसें तुज आणावें ध्यानीं । निर्गुणरूपा ॥३॥
रामकृष्णादि अवतार । तेही तुझें नाहीं रूप खरें । ब्राह्मण क्षत्रियादि याति चार । नाहीं तुजपुढें ॥४॥
तूं बाह्य दृष्टीनें दिससी अन्य । परि अससी गा अनन्य । तुझें करवेना वर्णन । त्रिदेवांसही ॥५॥
अंगुली निर्देश करून । दाखवूं शकेना कोणी । नाहीं दृश्य एकही खूण । तव शुद्ध रूपाची ॥६॥
तूं केवळ अनुभव साधनें । जाणीव देसी निरंजना । जैसी पदार्थाची चवी शून्या । दाखविता नये ॥७॥
वेणूमाजीं वायू एक । परि तया छिद्रेंअनेक । काढी ऋषभ गांधारादिक । स्वर निराळे ॥८॥
आत्मदेवा तैसा तूं एक । परि अविद्येसवें रूपक । करूनि दाखविसी नाटक । सर्व रसांचें ॥९॥
तुज ज‘जानी जरी ओळखती । परि ते तुझ्यांतचि संचरिती । म्हणती आमुची शून्य गती । वर्णानातीत दाविता ॥१०॥
जैसें सिंधूमाजीं लवण । मिळतां होई सिंधुसमान । तैसें जाहले ज्ञानीजन । तुझ्यांत समरूप ॥११॥
तुझें रूप अनुभवाया । एकच समर्थ सद्गुरुराय । श्रीमाधवनाथरूपें सदया । अवतरलासी ॥१२॥
वासुदेव विनवी वसुदेवासी । लावी परमार्थ मार्गासी । विटलों आतां विषयविलासीं । तव कृपेनें ॥१३॥
नाथ आसन घालुनी बसला । बोधप्रवाह वाहूं लागला । करी स्नान भक्तमेळा । आनंदानें ॥१४॥
वासुदेव हा भगीरथ । आणी गंगा पवित्र । सकलांचें चित्त मलयुक्त । निर्मळ केले दयाळें ॥१५॥
नाथ म्हणे भक्त जन हो । जीव सदा दुःखानीं व्याप्त हो । जैसे सरकीभंवती असे हो । कापूस सदा ॥१६॥
पदरीं धन असतांही । त्याचें रक्षण कैसें होई । म्हणोनि चिंता रात्रंदिनही । मनुजातें ॥१७॥
नसतां धन तरीहिदुःख । करी उपवास अनेक । होती पुत्र कलत्रादिक । दुःखासीच कारण ॥१८॥
सुखासाठीं सुंदर नारी । पाहोनिया विवाह करी । परि ती दिसतां दुराचारी । दुःख अत्यंत ॥१९॥
जरी मिळाली सुशील नारी । रूपें असली कुरूप भारी । तरीहि जीव दुःख करी । रात्रंदिन ॥२०॥
नसतां पोटीं संतती । करिती नाना नवस प्रीतीं । प्रसवतां अमूप कारटीं । तरी चिंता जाळी हृदया ॥२१॥
ऐसा सुखाकरितां प्राणी । करी धडधड निशिदिनीं । परि न देखे सुख नयनीं । या संसारी ॥२२॥
दुर्गंधीत सुवास जाणा । कैसा राहील हो नंदना । ऐशा संसारयातना । भोगिती जीव ॥२३॥
या दुःखांतूनि मुक्त होण्यास । करावा परमार्थ अभ्यास । परमार्थावीण सुखाचा अंश । मिळणार नाहीं ॥२४॥
परमार्थ हा भासे कठीण । साधेना म्हणती जन । अंगीं वैराग्य बाणतां पूर्ण । परमार्थ साधे ॥२५॥
प्रपंचाचें कष्ट सुता । किती सतत उचलितां । परि दुःक तें सोशिता । विषय लोभें ॥२६॥
दुःख म्हणोनी रडती जीव । परि भवाची बहुत हाव । जैसा मृग जो जाळीं जाय । फासेपारध्याच्या ॥२७॥
जितके कष्ट संसारांत । तितुके न होती परमार्थांत । व्यर्थ करिता आपुला घात । उमजोनिया ॥२८॥
आतां परमार्थाची व्याख्या । तुम्हां सांगेन गा सेवका । या विश्वाचा चालक । एक परमात्मा ॥२९॥
तो न हाले न बोले । न डोले वा चाले । परि सर्वांभूतीं संचलें । तत्त्व जयाचें ॥३०॥
जयाला कधीही नाश नाहीं । जन्म मृत्यूचें वारें नाहीं । त्रिखंडी जयाची वस्ती पाही । परब्रह्म ॥३१॥
ह्या परब्रह्माचें ज्ञान होणें । यासीच परमार्थ म्हणणें । त्याचीं असतीं दोन साधनें । ज्ञान आणि कर्म ॥३२॥
ज्ञानाचेही भेद दोन । आगमजन्य विवेकजन्य । करावें वेदांतश्रवण । तें आगमजन्य ॥३३॥
जें असे स्वयं प्रकाशित । देहादिकांहुनी भिन्न खचित । ऐसी चित्तवृत्ति होणें उत्कट । विवेकजन्य ज्ञान हें ॥३४॥
आगमजन्यानें शब्दब्रह्म । किंवा अपरा विद्या नाम । विवेकजन्या परब्रह्म । अथवा पराविद्या ॥३५॥
जे अव्यक्त अचिंत्य । जन्मशून्य नाशरहित । जें अवयवा विरहित । न दाखवितां येई ॥३६॥
जें सर्वातें कारणीभूत । ज्यांच्या योगें जीव प्रगट । जें साक्षात्कारें नकळत । अनुभवियां ॥३७॥
तेंच परब्रह्म जाण । परम तेजाचें अधिष्ठान । तें मुमुक्षूचें ध्येय पूर्ण । परमानंदीं ॥३८॥
तयातें म्हणती श्रुती वचनें । सूक्ष्म विष्णूपद जाणें । भगवान ही उपाधी देणें । त्या परमात्मया ॥३९॥
जरी तें ब्रह्म अगोचर । परि उपासनेसाठी गोचर । भगवान नामें मुनिवर । संबोधिती म्हणोनी ॥४०॥
भगवान म्हणजें ऐश्वर्यसंपन्न । धैर्य कीर्ति लक्ष्मीवान । सर्वाभूतीं समान । परमेश्वर ॥४१॥
तयाचा घेणें साक्षात्कार । यासि म्हणति ज्ञान थोर । आतां अज्ञानाचा विचार । केला पाहिजे ॥४२॥
अविद्येतें म्हणती अज्ञान । जी घाली आत्मया बंधन । देहातें म्हणे मी मी आपण । मोहबळें ॥४३॥
देह केवळ पंचभूतांचा । नव्हे संबंध आत्मयाचा । घेई गृह क्षेत्रादिकाचा । उपभोग शरीर हें ॥४४॥
पुत्रपौत्रादींची उत्पत्ती । शरीर योगेंच होई निश्चितीं । आत्मा राहे अलिप्त मूर्ती । देहाहुनी ॥४५॥
देहाच्या उपभोगास्तव । सर्व कर्में करी मानव । आत्म्याहुनी भिन्न देह । आहे हें सिद्ध ॥४६॥
आत्मा हा सुखमय । तेंवि निर्मल ज्ञानमय । दुःख अज्ञान मलत्रय । हें पृथ्वीचे धर्म ॥४७॥
जी सर्व कार्यांचें कारण । जी विकारांचें स्थान । अनादि परी अंतवान । तीच प्रकृती ॥४८॥
प्रकृतीचे भेद दोन । माया तेंवि मायामोह जाण । मायेविषयीं प्रवचन । ऐकावें गा ॥४९॥
त्रैलोक्यीं एक पदार्थ आहे । जयातें ‘ सत् ’ हें नाम राहे । तोचि सर्व भरलेला हें । पूर्वीच कथियेलें ॥५०॥
या आत्म्यावांचुनी । नाही गा अन्य कोणी । जो न कळे जीवालागुनी । अनुग्रहाविणें ॥५१॥
त्या परमात्म्याची छाया । आहे केवळ ही माया । वासुदेव विनवी सदया । शंका एक वाटे ॥५२॥
परब्रह्मावीण नाहीं कोणी । ऐसें कथिलें सद्गुरूंनीं । आता माया कोठुनी । आणिली गा ॥५३॥
तंव हंसला श्रीज्ञानेश्वर । बाळा तूं मोठा चतुर । नाहीं मायेची जरूर । वास्तविक गा ॥५४॥
परि या जीवानें । नसतें जन्म दुःख घेणें । पोळला म्हणजे जाणें । गुरूकडे ॥५५॥
तैं श्रीसद्गुरुनाथ । मायेचा घेई खोटा पदार्थ । खोट्यासि खोटें हे उचित । कार्यकारण ॥५६॥
याचि मायेसी ईशशक्ती । किंवा त्रिगुणात्मिका मूर्ती । कार्यानुमेया म्हणती । ऐसीं अनंत नावें ॥५७॥
ही माया शक्तिद्वय । आवरण विक्षेप होय । होई आच्छादनमय । आवरण शक्ति ॥५८॥
विक्षेप शक्ति विचित्र ज्ञान । हींच शक्तीचीं कार्यें दोन । आतां याचें उदाहरण । सांगेन तुज ॥५९॥
होता एक संन्याशी । अवचित निद्रा लागली त्यासी । पाही विचित्र स्वप्नासी । तो तापसी ॥६०॥
जाहलों आपण चांडाल । केलीं हिंस्त्र कृत्यें सकल । आपदा करी बहुत छल । स्वप्नामध्यें ॥६१॥
येथे दोन शक्ती गोचर । तिचा करावा विचार । निद्रा येतां यतिवर । आश्रमा विसरला ॥६२॥
ही मायेची आच्छादन शक्ती । चांडाळादि देह विचित्री । जेंवि निद्रेच्या दोन शक्ती । तेंविच मायेच्या ॥६३॥
माया ही शुद्ध ब्रह्माश्रित । आहे अनादिच सत्य । परि ब्रह्मज्ञानें अंत । तिचा होईल ॥६४॥
मायेची उत्पत्ती मानितां । प्रपंच किंवा जीवापासूनि तत्वतां । अथवा परब्रह्मापासूनी मूर्ती । मानिली पाहिजे ॥६५॥
प्रपंचापासूनि प्रकृति मानावी । तरी प्रपंचातें मायावी । कन्येपासून कैसी आई । जन्म घेईल ॥६६॥
जीव हेंचि माया कार्य । त्यापासुनी उत्पत्ति न होय । शुद्ध ब्रह्म तें निरामय । कैसें प्रसवेल तियेसी ॥६७॥
बोले प्रभुसी वासुदेव भक्त । जो अनादि तो अनंत । परि माया अंतवंत । सद्गुरूनें कथिलेंसें ॥६८॥
देव म्हणे गा वासुदेवा । फेडीन तुझ्या संशया । एकानें घट केला नवा । सूर्योदयानंतर ॥६९॥
विचारी तो दुज्यासी । जैं मी रचिलें घटासी । तैं घटाचा अभाव म्हणसी । किंवा भाव ॥७०॥
येरू म्हणे घटाचा भाव । घटापूर्वी होता अभाव । मग घटकर्ता विचारी काय । ऐका ते बोल ॥७१॥
हा अभाव कधीं होता । जगाचे आरंभापासून तत्वतां । न सांगतां ये अभावोत्पन्नता । अनादि म्हणों लागे ॥७२॥
घटोत्पत्ति झाल्यावरी । तो अभाव कोठें वास करी । बोले दुसरा प्रत्युत्तरीं । अभाव आता नाही ॥७३॥
अभाव म्हणजे घट प्रागभाव । त्यातें शास्त्रीय हें नाव । आता घट प्रागभाव । नाश पावला ॥७४॥
तैसेंच मायेचें मूळ । न सांगता येई वेल्हाळ । ही अनादि परि अंतकाळ । तिचा होई ॥७५॥
माया केवळ खोटी । सांगावी कैसी हिची मूर्ती । काजव्या च्या कृतीनें ज्योती । कैसी लावावी ॥७६॥
वाळूचें कण रगडून । कोणी काढावें तेल पिळून । किंवा गगनातें गवसण । कैसी करावी ॥७७॥
वृक्षाची पाहुन छाया । कोण करील छेदन राया । बालांचा बागुलबुवा । कोण विदारील शस्त्रानें ॥७८॥
समुद्राचा घ्यावा अंत । किंवा आकाश तत्वाची सत्य । कोणी करावी मोजवी नित्य । हे अतर्क्य ॥७९॥
तैसें मायेचे रूप सांगणें । अशक्य आहे बा जिव्हेनें । तियेच्या कृतीनें तें जाणणे । भक्तवृंदे ॥८०॥
सांख्य म्हणती माया स्वतंत्र । परि हें दिसें अनुचित । मग तिचे कार्यसही नित्यत्व । येईल गा ॥८१॥
मायेचें कार्य संसार । जो जन्ममरणाचा आधार । त्याचा अंत नाही होणार । या मतानें ॥८२॥
जीवाची ही मुक्तता । नाहीं होणार गा सुता । संसारातें स्वतंत्र मानितां । सर्वत्र हाहाःकार ॥८३॥
जैसी पुरूषामध्ये वसे शक्ति । तैसीच ब्रह्मीं मायेची वस्ती । कीं कापुरीं परिमळ वस्ती । अथवा शर्करेंत गोडी ॥८४॥
ब्रह्म आहे अनादि । प्रकृतीसीही नाहीं आदि । परि ब्रह्म अनंतवादी । माया अंतवान ॥८५॥
एक दिसती असती वेगळे । हें पूर्वींच तुम्हातें कळलें । जैसे तप्त लोहाचे गोळे । दिसती अग्नीसम ॥८६॥
ब्रह्म गुणातीत माया गुणमयी । ब्रह्म निश्चल माया चंचल राही । ब्रह्म निवृत्तीच्या हृदयीं । माया प्रवृत्तीची ॥८७॥
ब्रह्म केवळ सदानंद । माया ही निरानंद । ब्रह्म जोडी विषयद्वंद्व । माया विषयपूर्ण ॥८८॥
ब्रह्म हा केवळ दिवस । माया पसरवी अंधतमास । ब्रह्म करी मुक्त जीवास । माया मोही उलट ॥८९॥
माया ही सकलतत्वांचें । उत्पत्तिस्थान साचें । आहे अधिष्ठान परमात्म्याचें । माया कार्य ॥९०॥
त्या तत्त्वांचें विवरण । करूं केव्हां तरी जाण । आजीं सक्षिप्त व्याख्यान । माया ब्रह्माचें ॥९१॥
आतां प्रकृतीचा दुसरा प्रकार । जो मायामोह अनिवार । जो वेदाध्यायनीं अंतर । करी साधकाला ॥९२॥
याची असे एक कथा । पूर्वी युद्ध होतें देवदैत्यां । देवासी जिंकिती मदोन्मत्त । दैत्यवर्ग ॥९३॥
देव जाती क्षीरसागरीं । विनविती आतां ऊठ हरी । आमुचें दुःख तूं निवारीं । भगवंता ॥९४॥
तूं मूर्त आणि अमूर्त । सर्व भूतात्मक अससी सत्य । अष्टधा प्रकृती ही तुझ्यांत । संचरे गा ॥९५॥
दंभपूर्ण ज्ञानशून्य । तैसें इंद्रियनिग्रह विहीन । हे दैत्य स्वरूप निर्माण । त्वांचि केलें ॥९६॥
क्रूरताही मूर्तिमंत । पाहोनि काया हो भयचकित । करितों भावें प्रणिपात । आवरी हें ॥९७॥
मग शरीरापासोनि जगन्नाथ । काढी मायामोह पुरूष सत्य । मोहिले सारे दैत्य । मायामोहें ॥९८॥
हा मायामोह कठिण । करी कर्तव्याचें विस्मरण । न करावें कधी भाषण । माया मोहासवें ॥९९॥
ऐसें मायेचें लक्षण । तुज सांगितलें पूर्ण । न पडावें पाशीं जाण । या प्रकृतीच्या ॥१००॥
माया ही मोठी दरी । न येऊं दे पुरूषा उपरीं । जों जों मानव प्रयत्न करी । तों तों जाई तिमिरीं ॥१०१॥
सत्स्वरूपासी आवरण । द्वैतासि देई स्फुरण । करी साधकाचें तुकडे जाण । माया राक्षसी ॥१॥
या मायेसी जिंकिलें । तेचि योगेश्वर झाले । करूं द्यावे तियेला चाळे । आपण स्वस्थ असावें ॥३॥
मायेपासुनी मुक्त व्हाया । घेई साधनचतुष्टया । सच्छास्त्र तप भक्ति या । चमथें वैराग्य ॥४॥
साधितां हें चार साधन । होई मन पवन लीन । मग सद्गुरु येईल धांवून । सोडवाया ॥५॥
संसार दुःखानें पोळिला । मुक्ततेची तळमळ जयाला । धांवणें लागे सद्गुरुदयाळा । त्याचें स्तव ॥६॥
माया राक्षसीचा नाश । करील सद्गुरु जो अविनाश । चाखवील शुद्ध तत्वास । अनुभवाच्या ॥७॥
आता ज्या देहीं या तत्वांची वस्ती । तयाचें निरूपण संक्षिप्तीं । तुज सांगेन वासुदेव मूर्ती । आनंदाने ॥८॥
पंचमहाभूतें अहंकार । बुद्धि प्रकृति पंच ज्ञानेंद्रियें थोर । पंच कर्मेंद्रियें मन साचार । दहा इंद्रियांचे दहा विषय ॥९॥
सुख दुःख द्वेष संघात । इच्छा चेतना धृति । ऐसी छत्तीस तत्वें असती । देहासी कारण ॥११०॥
या तत्वांचें विवरण । पृथ्वी आप तेज वायू जाण । आकाश हीं पंचभूतें वर्तमान । मायापोटीं असती ॥११॥
पंचमहाभूतानें देह होता । त्यासी होई जो नाचविता । तो अहंकर जाण सुता । लागे ज्ञानाच्या मागें ॥१२॥
जी सुखदुःखाची निवड करी । ज्ञानतत्वाची जननी खरी । आत्मा जीव आणि संधींत वास करी । ती बुद्धि तत्व ॥१३॥
आतां प्रकृति तत्व आठवें । जी सर्वभूतांचें विश्रांतिस्थान होय । जैसे तंतूच्या दशेंत वस्त्र असावें । हीच माया ॥१४॥
कान डोले त्वचा नाक जिव्हा । ही पंच ज्ञानेंद्रियें राया । वाचा हात शिश्न गुद पाया । कर्मेंद्रियें म्हणती पांच ॥१५॥
मनाचें विवरण मनोजयीं । त्रयोदश किरणीं पाही । जे बुद्धीकडे सदा पाहीं । वक्र दृष्टीनें ॥१६॥
शब्द स्पर्श रूप रस जाण । उच्चार मलमूत्र विसर्जन । वस्तुचें घेणें वा टाकणें । इत्यादि विषय दहा ॥१७॥
जीव पक्षी भेते शिवासी । ही सुखदशा ऐसी । तद्विरूद्धी स्थितीसी । दुःख म्हणती ॥१८॥
पूर्वीं जयाचा उपभोग घेतला । तयाची स्मृति होणे याला । इच्छा हें नांव बाळा । देती मुनिराया ॥१९॥
इच्छा तृप्त झाली नाहीं । मग एक अंकुर फुटे पाहीं । त्यासि द्वेष हें नाम देई । वासुदेवा ॥१२०॥
आतां अलिप्त सर्व साक्षीभूत । ज्या ब्रह्माची सत्ता चालत । तिला चेतना म्हणतात । योगीजन ॥२१॥
पंचतत्वें हीं एकमेकां वैरी । पाणी पृथ्वीचा नाश करी । पाण्यानें तेज हरी । वायुसवेंही झगडे ॥२२॥
आकाश करी वायुभक्षण । ऐसें एकमेकांत दुजेपण । त्याचें जी करी एकीकरण । धृति हें नाव तियेसी ॥२३॥
या सर्व तत्वाचें एकत्रत्व । त्यास म्हणती संघात । ऐसे छत्तीस तत्वांचे क्षेत्र । तुज कथिलें ॥२४॥
हींच तत्वें सर्व योनीसी । होतीं सत्वरजतमाऐसीं । या सर्वांची टांकसाळ जाणिसी । एकच प्रकृति ॥२५॥
ती उमटवी चार ठसे । स्वदेज अंडज जारज ऐसे । चौथा उद्भिज्य भासे । यांत भूतें समान ॥२६॥
तयाच्या जाती असती भिन्न । चौर्‍यांशी लक्ष योनी जाण । उपजातींची न करवे गणना । प्रकृतीवीण ॥२७॥
ही टांकसाळ ही विस्तार । अथवा आटणीचा प्रकार । परि तियेचा आधार । ब्रह्मत्वाचा ॥२८॥
देहाचे उत्पत्तींत । वादाचें रण होती । कर्मवादी म्हणती कर्मची मूळाम्त । संकल्पांत संकल्पवादेदे ॥२९॥
सांख्य म्हणती क्षेत्राचा । स्वामी प्राण साचा । तेथें वास प्रकृतीचा । सत्वरजतमान्वित ॥१३०॥
स्वभाववादी म्हणती सर्व निसर्गाचे । कालवादी महत्व वर्णिती कालाचे । वेदांही रहस्य क्षेत्राचें । पूर्ण कळलें नाहीं ॥३१॥
परि भगवद्गीता रूपानें । जी सांगितली श्रीकृष्णानें । त्याच तत्वांची वर्णनें । तुज निरूपिलीं ॥३२॥
या देहाचे प्रकार तीन । स्थूळ सूक्ष्म कारण । स्थूळ सर्वांस भासमान । सूक्ष्मासी लिंगदेह म्हणती ॥३३॥
तें असे अंगुष्ठप्रमाण । सर्व मनोवृत्तींचें स्थान । देहपातानंतरही विद्यमान । राहे कांहीं काल ॥३४॥
कर्माचें रूप कारण शरीर । यांसी जीव हें नम रूचिर । पुनर्जन्माचा आधार । कारण देह ॥३५॥
या सर्व देहाच्या सर्व तत्वांचें । येथे विवरण करणें अशक्य साचें । तुच केवळ लक्षणाचें । मुख्य प्रकार कथिले ॥३६॥
देहासी अवस्थाही तीन । जागृति स्वप्न सुषुप्ती जाण । त्यांचे ऐकावें विवरण । एकचित्तें ॥३७॥
जेथें शब्दादि विषयांची ओळख । देहाचा अभिमानी विश्वचालक । ती जागृतावस्था ऐक । आतां स्वप्नावस्था ॥३८॥
जागृतावस्थेचें ठायीं । जें पाहण्यांत ऐकण्यांत येई । त्याचा वासनारूप विस्तार होई । लिंग - देहाची अवस्था ही ॥३९॥
जेथे जाणणेंपण नाहीं । गाढ अवस्थेंत राही । निद्रावस्था नाम पाही । कारण - देहाचें ॥१४०॥
या देहाहून आत्मा भिन्न । हें योग प्रकरणी सोदाहरण । विनायकातें सिद्ध करून । दाविलें म्यां ॥४१॥
आत्मा आहे अशरीर । केवळ शुद्ध साचार । आहे सर्व सत्ताधार । आत्मदेव ॥४२॥
तो न दिसें तद्रूपावीण । यासाठीं घ्यावा अनुभव जाण । तो श्रीसद्गुरुकृपेवांचून । न भासे कदापी ही ॥४३॥
सद्गुरु पदीं दृढ भाव । मग मनाचा पूर्ण निश्चय । अभ्यास करितां प्राप्त होय । आत्मनिधान ॥४४॥
या आत्मशोधनाचा प्रकार । पहावा मुळाचा विचार । सर्वांचें मूळ परमेश्वर । ऐसी भावना दृढ ठेवावीं ॥४५॥
लांकूडफोड्या लांकूड फोडीं । तयासी साह्य कुर्‍हाडी । परि बलावीण ती बापुडी । काय करील ॥४६॥
त्या शक्तीचा जो स्वामी । तोच आत्मा जाण नामीं । हस्तेंद्रियानें करीं कर्म । काष्ठें तोडण्याचें ॥४७॥
ऐशा प्रत्येकाचें मूळ । शोधण्यांत दृष्टि करीं अचल । विषयवासना नष्ट होईल । नित्यानंदी राहसी ॥४८॥
करावें सर्व सृष्टीचें निरीक्षण । घ्यावें तियेपासून शिक्षण । व्हावें स्वस्वरूपीं निमग्न । या विचारानें ॥४९॥
याच पंथें अवधूतानें । जिंकिलें इंद्रियां पूर्णपणें । चोवीस गुरुंच्या योगानें । जाहला ज्ञानी ॥१५०॥
अवधूत कथा भागवतीं । अवश्य वाचावी दिनरातीं । श्रीएकनाथें रसवंती । केलें तियेला ॥५१॥
परमार्थाचा मुख्य ग्रंथ । श्रीएकनाथी भागवत । याचा पाठ करावा नित्य । विचारदिशा कळेल ॥५२॥
ऐसा श्रीसद्गुरुनाथ । बोधी वासुदेवाप्रत । वासुदेवाच्या अंतरांत । रंगले ज्ञान ॥५३॥
ज्ञानेश्वरी भागवत । आणविले नाथे ग्रंथ । देई वासुदेवा त्वरित । म्हणे हा तुज प्रसाद ॥५४॥
याचा करी नित्य पाठ । तुज कळेल सर्व वेदांत । वासुदेव छेदी । ऐसी सद्गुरुकृपेची गोडी । काय वर्णाची ॥५६॥
श्रीनाथ जया उपदेशी । तोचि म्हणावा तापसी । न सांठवी कुजक्या बीजासी । हृदयपेवांत ॥५७॥
पुढील किरणीं नाथ आई । जयापुराच्या मार्गी जाई । भक्तोद्वाराची करील नवलाई । म्हणे नाथसुत ॥५८॥
इति श्रीमाथवनाथ दीपप्रकाशे नाथसुतविरचिते ज्ञान कथनं नाम त्रयोविंशतितमः किरणः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP