मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश|
षोडश किरण

दीपप्रकाश - षोडश किरण

Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India.


श्रीसद्गुरुनाथायनमः --
नमन माझे श्रीसद्गुरूनाथा । माधवनाथा परम समर्था । तुझी कृती तूंच जाणता । इतरां अजाणीव ॥१॥
जीव मायेनें भ्रमला । नाना दिशेला वाहवला । न बैसे एका स्थळाला । वायुरूप ॥२॥
जैसे चक्र फिरे गरगरां । तैसा जीवाचा फेरा । सद्गुरूवीण दुसरा । त्यातें न थांबवी ॥३॥
जीव असो अपेशी । होवो भ्रष्ट आपैसी । होवो सर्वदा उदासी । त्यासि तूं तारिता ॥४॥
कल्पनेच्या मारे भरार्‍या । चिकित्सेचा उचलो गारा । दुर्वृत्तींच्या वर्षवोगारा । त्यासही सांभाळिसी ॥५॥
कैसाही येवो मानव । ठेवितां तव पदीं भाव । करिसी हृदयीं सांठव । तयाची तूं ॥६॥
जयास जैसी आवडी । तैसीच त्यातें क्रियाशुद्धी । देउनी मार्गी आधीं । लाविसी गा ॥७॥
तूं ब्रह्मत्त्वाचा बोध करिसी । तुज प्रीती बहु परेशीं । नाना विलास खेळशी । तिजसवें ॥८॥
तूं कल्याण रत्नहार । भक्तकंठी घालिसी चतुर । चित्तचकोरा सुधाकर । तूंचि नाथा ॥९॥
पंचदश किरण प्रकाश । तूं दाविला परेश । आतां किरण षोडश । प्रकाशवी ॥१०॥
गत किरणीं सदाशिव तात्या । कसोटीवरी । घाशिला तत्वतां । तया उज्वलता दिसतां । पुन्हा तापवी नाथ ॥११॥
उभयता पत्नी पती । होती विचार आणि शांती । परमार्था करिती पंचारती । प्रपंचासि दीप ॥१२॥
घेवोनि गृहस्थाश्रम । जो करील समाधी कर्म । तोचि श्रेष्ठ परम । महासाधू ॥१३॥
परि यास पाहिजे । उत्तम संगती जाणिजे । त्याविण न साधिजे । परमार्थ ॥१४॥
स्त्री असावी केवळ शांती । स्त्री असावी सती । स्त्री असावी सन्मती । जी आणी बळकटी ॥१५॥
स्त्री असावी सदाचारी । स्त्री असावी परोपकारी । जी पतीचें व्रत अंगीकारी । प्रेमभावें ॥१६॥
जैसी स्त्री असावी निर्मळ । तैसा पुरूषही असावा मंगळ । मग करितील ते मंगल । आपुलें कार्य ॥१७॥
पुरूष नसावा दुराचारी । पुरूष नसावा क्रोधविकारी । पुरूष नसावा कठोरी । अंतःकरणाचा ॥१८॥
पुरूष नसावा धर्मच्युत । पुरूष नसावा विषयरत । पुरूष नसावा स्वार्थयुत । स्त्रीछळक ॥१९॥
स्त्रीपुरूष ही चक्रेंरथाचीं । असावीं समतोलाचीं । त्याविणें स्वारी जीवेश्वराची । कैसी शिवपुरीं नेतील ॥२०॥
तीं चक्रें नसावी कुजकट । नातरी पावेल रथ अंत । मध्येंच राहील मार्गात । होईल फजीती ॥२१॥
यासाठीं स्त्री पुरूष । एकरूप असावीं खास । मग ते परमार्थास । अधिकारी होती ॥२२॥
ऐसा होतां अधिकारी । मग बुद्धि सारथी रथावरी । गुरूसेवेचा प्रतोद करीं । द्यावा तियेच्या ॥२३॥
वृत्ति अश्वातें जोडावें । मनाचें लगाम त्या चढवावें । बहकतां चाबूक मारावे । गुरूसेवेचे ॥२४॥
त्यायोगे प्रपंचरथ । निरंजन - पुराचा धरील पंथ । असतां चक्रें बळकट । मार्गी धोका नसे ॥२५॥
गुरूसेवेचे प्रकार दोन । एक अदृश्य दुजा दृश्य जाण । अंगिकारावें जें साधन । सुलभ वाटे ॥२६॥
सांगेन अदृश्य सेवा । तिचा विचार करावा । तीच वृत्ति पशूंचा बंडावा । मोडेल गा ॥२७॥
करोनि हृदय निर्मळ । तेथें स्थिरतारूप शाल । त्यावरीं गुरूपद विमल । स्थापावें ॥२८॥
करावी नित्य मानसपूजा । तीच पूर्तता करील काजा । मनोलयाच्या मौजा । सांगितल्या चतुर्दशी ॥२९॥
अद्वैत - जलाने चरणास । घालावें स्नान अवश्य । मग शुद्धभाव चंदनास । समर्पावें ॥३०॥
आणोनि निर्मनाच्या पुष्पमाला । ज्ञानसूत्रीं ओवी सगळ्या । त्यागरूपी अग्नि पाजळा । वासना - धूप लावावा ॥३१॥
प्रवृत्ति कापूस आणोनी । त्यास त्रिगुणाचा पीळ देउनी । शब्दशब्दांच्या घृती भिजवुनी । दीप लावावा ॥३२॥
आतां चतुर्विध पुरूषार्थ । हाचि नैवेद्य उक्त । स्वरूपरंगाचा तांबूल नित्य । द्यावा पदासि ॥३३॥
वैराग्य भक्तीची दक्षणा । पंचीकरणाची ज्योत जाणा । विज्ञानघृतीं भिजवून । करावी पंचारती ॥३४॥
अज्ञान कर्पूर वडी जाळावी । मौनाची पुष्पांजली वहावी । मग विषयावरी पाउले टाकावी । प्रदक्षिणेची ॥३५॥
ऐसी होता गुणातीत मती । मग करावी नमस्कृती । ही अदृश्य सेवेची गती । आचारावी ॥३६॥
आतां दृश्य सेवेचा विचार । जो योगीयांही असाध्यकर । ऐसा तयाचा गहन विचार । तोही सांगेन ॥३७॥
करावी अहर्निश सेवा । क्षणही वाया न दवडावा । दिवारातीं हाचि ठेवा । बाळगावा चित्तांत ॥३८॥
प्रभातीं सत्वर उठावें । मानसें श्रीगुरु - स्तोत्र गावें । सद्गुरु उठतां भावें । करावें वंदन ॥३९॥
शय्या स्वच्छ करावी । ती सुस्थलीं ठेवावी । अत्यादरें तयारी करावी । श्रींच्या प्रातर्विधीची ॥४०॥
धरोनी सद्गुरुकर । न्यावे दिशेसी दूर । जलपात्र साचार । वहावें आपण ॥४१॥
येतां प्रभु दिशेहुनी । गुरुपदासि मृत्तिकास्नान । मग करावे प्रक्षालन । शुद्ध जलें ॥४२॥
पात्र घासावें आपुल्या करें । मग मुखमार्जनाचें कार्य करावें । कडुलिंबाचें दांतवण करावें । आपुल्याचहस्तें ॥४३॥
ऐसा प्रातर्विधी सारोन । आणावे स्थानी परतोन । पानसुपारी देऊन । लागावें स्नानविधीस ॥४४॥
स्वयें पाणी तापवून । सद्गुरुस घालावें स्नान । मग सुवस्त्रें तनू पुसून । नेसवावा पीतांबर ॥४५॥
आणावी पुष्पें मधुतर । घासावें चंदन सत्वर । सर्व पूजेचा प्रकार । सिद्ध ठेवावा ॥४६॥
गुरुनें लावितां समाधी । आपण उभे राहून आधीं । निवारावी उपाधी । इतरांची ॥४७॥
पूजेचें सामान गुरुकरीं । आपणची द्यावें सत्वरीं । मन नैवेद्याची तयारी । करावी आपण ॥४८॥
घालोनी श्री गुरुंसीं भोजन । मग स्वयें अल्पप्रसाद ग्रहण । नातरी निद्रा मोहील जाण । पूर्ण भोजनीं ॥४९॥
द्यावें निर्मल पाणी । धोतरही नेसवुनी । आणावे श्रीगुरु आसनीं । कर धरोनीयां ॥५०॥
तांबुलही द्यावा आपण । वारा घालावा विंझणें । गुरुसन्मुख न बैसणे । कदापीही ॥५१॥
यापरीं सायंकाळी । सेवावा गुरुचंद्रमौळी । पद चुरोनी तयांच्या तलों । निद्रा घावी ॥५२॥
ऐसे वेचावें शरीर । पूजावा श्रीगुरुवर । मग करावे मानसोपचार । आनंदाने ॥५३॥
मीच होईन सद्गुरुंचे आसन । तयाचें दिव्य भुवन । भुवनांचे काष्ठ दगड जाण । होईन प्रेमें ॥५४॥
मी गुरुंचे पात्र होईन । त्यांतील जलही जाण । श्रीगुरुरायाचें भोजन । होईन मीच ॥५५॥
मी गुरुंचा शागीर्द । मीच हुजर्‍या सिद्ध । मी स्वयंपाकी गोड । होईन गुरुकरितां ॥५६॥
मी गुरुंचे शय्यागार । मीच विश्रांतीचे घर । मी होईन वस्त्र सुंदर । नाथांचे गा ॥५७॥
सद्गुरुंचा शब्द मज ब्रह्मपण । गुरुची आज्ञा मम उन्मनी । गुरुवाक्य वेदासमान । मानीन मी ॥५८॥
गुरु ज्या ज्या तत्वीं जाती । तेथेचि मी ठेवीन मती । गुरुसेवा हीच मुक्ती । सायुज्याची ॥५९॥
दृश्य - सेवा सुलभ वाटे । परि ती अशक्य मानवाते । म्हणोनि सेवावें अदृश्यपंथें । सद्गुरुराया ॥६०॥
गुरुसेवेचे फळ मोठें । मोक्षसुख लाभे आयते । गुरु सेवेनें चित्त सामावतें । चिद्रूपीं ॥६१॥
ही सकल भाग्याची स्वामिनी । साधका करी मुक्त जनीं । संसारांतुनी ओढुनी । नेई निजस्थानाप्रति ॥६२॥
जैसा पतिव्रतेसी पति आवडे । कीं वत्स पाही धेनुकडे । तैसे गुरुपदी जडे । तोचि धन्य ॥६३॥
ज्या दिशे गुरु जाती । तिकडेच ज्याची दृष्टी । गुरुच्या गह्री करी वस्ती । तोचि प्रसाद तया ॥६४॥
ऐसा जो जो गुरुभक्त । तोचि जाणावा जीवन्मुक्त । तो सहज समाधींत । नित्य राहे ॥६५॥
करा करा हो गुरुसेवा । त्याविणें लटका सर्व ठेवा । योग याग ही जाती वांया । सेवेवीण ॥६६॥
कलीची विचित्र स्थिती । द्यावया कृपण असती । लुटाया बहुत टपती । फुकाचे कीं ॥६७॥
सद्गुरु मागे दुर्बल चित्त । मग देई सर्व वित्त । परि तेंही न देती सद्भक्त । म्हणती कृपा करावी ॥६८॥
हे केवळ बाष्कळ बोल । सेवेवीण न मिळे फळ । गुरुसेवा हें मूळ । सकळ योगांचें ॥६९॥
हे सेवेचें व्रत । पाळी एकच वानवळे संत । इतर ते शब्दांत करिती सेवा ॥७०॥
हे गृहस्थाश्रमाचे नेते । उभयता आचरती व्रतें । समाधी योगाचें गोमटे । स्थान घेती ॥७१॥
ऐशा सुत कन्येसी । नाथ देती योगदीक्षेसी । पाहोन आसन सिद्वीस । आश्चर्य वाटे ॥७२॥
जाहलें आसन सिद्ध । उडूं लागले अखंड । जैसा चेंडूचा आघात शुद्ध । तैसी गति झाली ॥७३॥
योगांगाचें निरूपण । स्वतंत्र किरणीं करीन । म्हणोनि येथ संक्षिप्तपण । स्वीकारिलें ॥७४॥
आला आषाढमास । दुखणें झालें माईस । केलें अनेक उपचारास । परि गुण न येई ॥७५॥
तात्यांची प्रिय कांता । जी परमार्थाची देवता । जिच्या सहवासें सत्पंथा । लागलें गा ॥७६॥
परि नाही आला गुण । कृश झाली प्रतिदिन । नाथ आलें गांवाहून । तो देखती चित्र हें ॥७७॥
श्रीगोपाळ परमहंस । तेही येती गृहीं अवश्य । प्रेमें म्हणती माईस । सांग तव इच्छित ॥७८॥
तुज वाटेल देहसुख । तरि तेंहि देऊ एक । इच्छितां पूर्ण सुख । तेंही अर्पीन ॥७९॥
जे सकळ सृष्टीचे कर्ते । त्यास शरीर सुख अशक्य नव्हतें । परि नाथ कन्या माईतें । तें न रूचलें ॥८०॥
ती होती खरी पतिव्रता । म्हणे मज नको ही सौख्यता । मज पंढरपुरीं न्यावें आतां । समर्थ रामा ॥८१॥
पतिदेव मम संनिध । तूं ही परात्पराचा कंद । ऐशांत सोडितां देह छंद । मी मुक्त होईन ॥८२॥
या मायिक सुखाचा वारा । मज नको गा सद्गुरू जरा । तुझ्या तेजाचा तारा । ठेवी हृदयांत ॥८३॥
ऐकोनि ऐसें दिव्य वचन । सुखावलें सुखनिधान । मग नाथ सांगे खूण । वद्य षष्ठीची ॥८४॥
मी त्या दिवशी पंढरपुरीं । राहीन गे योगेश्वरीं । मज भेट देई खरी । त्या दिवशी ॥८५॥
तुज षष्ठीच्या दिनीं । मी भेटेन साजणी । हा निश्चय ठेवी मनीं । तुझे हित होय ॥८६॥
देऊनी ऐसा आशीर्वाद । निघाला श्री योगाभ्यासानंद । उद्धराया जन प्रचंड । जाई पंढरपुरीं ॥८७॥
षष्ठीचा दिवस उगवला । माईस बहुत हर्ष झाला । म्हणे आज पंढरीला । मज जावयाचें ॥८८॥
बोलावुनी पतीस । मी जाते पंढरीस । मज बोलावी जगदीश । भेटावया ॥८९॥
माझी चिंता न करावी । मज सहकारी असे देवी । सर्व तयारी करून द्यावी । पतिराया ॥९०॥
तूं केलेंस प्रेम भारी । मज दुखावलें नाहीं तिळभरी । तुज ऐसा पति खरोखरी । जन्मोजन्मीं मिळावा ॥९१॥
मी तुझ्या चरणाची दासी । परि नाहीं सेविलें पदासी । उलट घेतलें सेवेसी । जिवलगा ॥९२॥
मजसाठीं त्वां यत्न केलें । ते सर्व फळा आले । त्या योगेंच दिन पातले । पंढरीचे ॥९३॥
किती केलें त्वां उपकारा । नाहीं गणती प्राणेश्वरा । आतां पाठवी पंढरपुरा । ऐक विनवणी ॥९४॥
तूं वृक्ष मी वेल । अंतरूं कांही काल । मग तूंही क्षेत्रीं येशील । प्राणनाथा ॥९५॥
नको विरह मानूं माझा । मी जाते आपुल्या काजा । वाटते तेथे मजा । संसाराची ॥९६॥
करोनि तेथें सकल सिद्धी । तुज बोलावीन आधी । करी तूंही गर्दी । यावयाची ॥९७॥
सत्कार्यास्तव थोड्य़ा विरहा । सहन करी सखया । तव प्रपंच थाटाया । दुसरी कोण असे ॥९८॥
मज आजची जाऊं द्यावें । श्रीनाथाज्ञेसम वर्तावें । टाळितां मुहूर्त बरवे । नाथ जातील निघोनी ॥९९॥
तुम्ही भोजन करावें । मज दुग्ध पाजावें । उठा उठा हो ऐकावें । म्हणोनी धरिले चरण ॥१००॥
तात्यासाहेब होते परमार्थी । परि बघोनी करूण स्थिती । तन्नयनातूनी गळती । अश्रुधारा ॥१॥
नको शोक करूं दयाळा । मम गाडी चुकेल वेल्हाळा । सारोनियां विधी सगळा । मज तीर्थ द्यावे ॥२॥
कष्टोनि उठले तात्या । झाली भोजनाची पूर्णता । प्रिय पत्नीसी सन्निधता । केली सत्वर ॥३॥
मग सांगे ती देवता । तुम्ही वाचावी गीता । विष्णुसहस्त्रनाम गाथा । वाचतील ब्राह्मण ॥४॥
आणाहो गंगातीर्थ । टाकाहो मम मुखांत । श्रीनाथाची मूर्ती येथ । पातली पहा ॥५॥
नाथा मी तुमच्या सवें । भेटेन पांडुरंगा भावें । मज अंकावर घ्यावें । पतिराया ॥६॥
श्रीनाथ जयजय नाथ । जपला हा निर्वाण मंत्र । सोडिला देह पवित्र । देवतेनें ॥७॥
आलें पत्र तृतीय दिनी । तात्यासी पंढरीहुनी । माई आली धांवुनी । भेटावया ॥८॥
मज भेटली कडकडा । आतां तुम्ही खेद सोडा । करील प्रपंचाचा सवदा । तुम्हास्तव ॥९॥
प्रपंचाची ज्योती जातां । पूर्ण विरक्त झाले तात्या । परमार्थावीण अन्य वार्ता । न करिती ॥११०॥
उदर भरायास्तव नोकरी । निरासक्तीनें तो करी । पोटापुरतें द्रव्य स्वीकारी । बाकी देई धर्मार्थ ॥११॥
स्थापिली एक वेदशाळा । सर्वस्व अर्पी तियेला । अपौला मार्ग चालविला । सुरळीत तो ॥१२॥
परीक्षेसाठीं एके दिनीं । जाती तात्या ग्रामीं वणी । तो भेटला एक मुनी । दिगंबर ॥१३॥
धरोनी तात्यास हातीं । घेऊनी गेला गडावरती । करी बहुत चावटी । देवीसवें ॥१४॥
पुनरपि खाली आणी । हिंडविलें हातीं धरोनी । क्षणांत जाई यवनभुवनीं । क्षणांत ब्राह्मण ॥१५॥
ऐसें फिरतां फिरतां तो यती । एका द्विजगृहीं करी वस्ती । म्हणे येथेंच करूं भोजन प्रीतीं । एकमेव ॥१६॥
सर्व पदार्थ एक करून । जेविला तो त्यागी पूर्ण । भरतवी सदाशिवा हंसून । अपौल्या हस्तें ॥१७॥
ऐसा अधिकाराचा मोह । जिरवी यतिराय । चापट मारूनी काय । सांगता झाला ॥१८॥
पुनरपि गडावरी जाई । ती सटवाई नयनीं पाही । नायकता तुज फेकीन पाहीं । खळग्यांत ॥१९॥
जाहले तात्या वेडे । न घेती आढेवेढे । गेले त्वरित देवीकडे । गड चढुनी ॥१२०॥
तों देवी दिसली बालरूपांत । तात्या जाहले विस्मित । मग गडावरीच राहती । एक दिन ॥२१॥
दुसरे दिवशीं भोजनास बसती । तों एक कुमारी बैसली सांगाती । खाई भात तशी आमटी । तात्यासवें ॥२२॥
पाचारिती बल्लवासी । ही कोण बालिका ऐसी । परिचय नसतां बसे कैसी । मम ताटी ॥२३॥
बल्लव बोले साहेबाला । येथें कोणी नसे बाला । अंतरीं प्रकाश पडला । म्हणे ही देवीच ॥२४॥
विनवी तात्या अंबिकेसी । तूं जाई गे मंदिरासी । चाड नाहीं गे मजसी । तव भेटीची ॥२५॥
तूं माझी कुलस्वामिनी । नाहीं पूजिलें अजुनी । मग कां आलीस सिंहिणी । बालरूपें ॥२६॥
मी तुज नाहीं ऐसें स्तविलें । मग कष्ट त्वां कां घेतले । जाई जाई दयाळे । परतोनिया ॥२७॥
माझा देव श्रीनाथ । मीच सेवक एकनिष्ठ । नलगे आणीक दैवत । त्यावांचुनी ॥२८॥
ब्रह्मा विष्णु महेश्वर । जरि येतील येथवर । परी मी नाहीं मागणार । तयापाशीं ॥२९॥
थोर थोर तप करिती । त्यांसी न भेटसी भगवती । मी न इच्छितां बालमूर्ती । येसी धांवुनी ॥१३०॥
तुझा स्वभाव भारी लोचट । नको घेऊ व्यर्थ कष्ट । परि न बोलतां ग्रास गिळित । जगदंबा ॥३१॥
सोडिला तात्यानें नाद । म्हणती येवो घ्यावया प्रसाद । श्रीनाथांचें उच्छिष्ट खाद्य । पाहिजे नशिबीं ॥३२॥
त्या दिवसापासुनी । प्रत्यहीं येई जगन्मोहिनी । जेवी ताटीं हास्यवदनीं । सदाशिवाच्या ॥३३॥
मग तात्या काय करी । गुरुदेवा आधीं नैवेद्य करी । एका वाटींत पदार्थ भरी । तोचि समर्पी प्रभूसी ॥३४॥
तो नैवेद्य देवीस । न देती अल्पलेश । धन्य तयाच्या गुरुभक्तीस । देवी तुच्छ तयापुढें ॥३५॥
तात्याचें नित्य नियम । असती श्रीनाथासम । होवो कैसेही श्रम । परि नियम न सोडी ॥३६॥
क्रियेचें वाढलें बळ । त्यांतच होती अचल । फुललें नाभिकमळ । मा भैषीः नाद निघाला ॥३७॥
पावतां भ्रम क्रियेंत । हा नाद होई प्रगट । श्री माधव गुरुनाथ । अंतरींच सावध करी ॥३८॥
येतां प्रत्यक्ष श्रीनाथ । सांगे देवीची मात । विनवी जोडूनी हस्त । मज नको तें स्वरूप ॥३९॥
तूं करी गा मजसवें भोजन । मी तुज जेऊं घालीन । इतरांचे काय कारण । यावयाचें ॥१४०॥
नाथ म्हणे गा पुत्रराया । सर्व माझ्यांत पाहीं सया । मम रूपाची छाया । ठेवी त्यावरी ॥४१॥
ही देवीची कथा सदाशिवें । प्रत्यक्ष सांगितली भावें । ही दंतकथा नोहे । सज्जनहो ॥४२॥
ऐसे जेथें देवभक्त । तेथेंच पहावी प्रचीत । कृतीवीण बोलणे व्यर्थ । जगती या ॥४३॥
जगीं म्हणती गुरुची वाण । परि हें वचन अप्रमाण । मिळतां शिष्य सगुण । गुरु भेटतो अवश्य ॥४४॥
शिष्यासाठींच सद्गुरु । घेती नर अवतारू । करिती नाना चमत्कारू । शिष्यास्तव ॥४५॥
शिष्य कैसें असावें । हें दासबोधीं समर्थ देवें । कथिलें तें पठण करावें । एकचित्तें ॥४६॥
सच्छिष्य झाल्यावांचून । सद्गुरुची न होई ओळखण । यास्तव सच्छिष्य होऊन । सद्गुरु शोधावा ॥४७॥
जैसें रत्न परीक्षाया । रत्नपारखीच हवा । त्याविणें इतर ते वायां । गलबला करिती ॥४८॥
सच्छिष्याचें प्रमुख लक्षण । गुरुपदीं भाव अनन्य । गुरुवाक्य हें ब्रह्म । वाटें जया ॥४९॥
या गुणांचा करिता स्वीकार । तो होईल शिष्य पदवीधर । येर ते दिवाळखोर । स्वार्थलोलुप ॥१५०॥
सदाशिवाचें आख्यान । पुढील किरणीं होईल पूर्ण । सर्व श्रोते सज्जन । परिसोत ॥५१॥
मी बंधु सदाशिवाचा । व्यर्थ भूमिभार झालों साचा । अरत्रीं ना परत्रींचा । त्रिशंकूपरी ॥५२॥
जैसें वस्त्र तेलकट । कदापि नोहे शुभ्र सत्य । तें अन्यासही तीच गत । दाखवितें ॥५३॥
परि नाथ कृपायंत्राचे वाफेंत । तें ठेवितां उजळें होत । ऐसी आली प्रचीत । म्हणोनि पातलो येथें ॥१५४॥
इति श्रीमाधवनाथदीपप्रकाशे नाथसुत विरचिते सदाशिव शिष्यवराख्यान कथनं नाम षोडश किरणः सपाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP