मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश|
मनास उपदेश ११ ते १५

उपदेश - मनास उपदेश ११ ते १५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


११.
अरे मना शोक करिसी किती । हे तंव वांयां धनसंपति । आयुष्य भविष्य नाहीं तुझिये हातीं । हें अवघें अंतीं जायजणें ॥१॥
एक अर्बुद साठीं कोटि देखा । तीस लक्ष दहा सहस्त्र लेखा । सात शतें नवमास मापा । तया हिरण्यकश्यपा काय झालें ॥२॥
चौदा चौकडय लंकानाथा । नव्याण्णव सहस्त्र राया दशरथा । तेही गेले स्वर्गपंथा । मागें सर्वथा नुरलेचि ॥३॥
चौदा कल्प मार्कंडेया पडे । तैं लोमहर्षणाचा एक रोम झडे  । बकदालभ्याचे पुरे निमिषें मोडे । गेले येवढे अरे मना ॥४॥
बकदालभ्याचे पुरे निमिषें । तें वटहंसाचें उपडे पिच्छ । तयासि होता मत्युप्रवेश । तो एक श्वास भृंशुडीचा ॥५॥
मरणांत पुरे भृंशुडीचा । तैं एक दिवस कूर्माचा । नामा वि-नवी केशवाचा । वेगीं विठोबाचा पंथ धर ।\६॥

१२.
गणपति पूजिली ते दोंदिल भले । वैष्णव न भले अरे मनी ॥१॥
सीतळा पूजिली ते ह्मइसे भले । वैष्णव न भले अरे मनी ॥२॥
मैराळ पूजिले ते वाघे भले । वैष्णव न भले अरे मनी ॥३॥
सूर्य पूजिले ते घोडे भले । वैष्णव न भले अरे मनी ॥४॥
नामा ह्मणे जे कां विठ्ठलीं भजिले । ते वैष्णव  भले सत्य मना ॥५॥

१३.
धांवत धांवत जाईन वोरसे । दाटला उल्हासें कंठ माझा ॥१॥
अंतरींचें गुज सांगेन आपुलें । ह्लदयीं दाटले प्रेमअश्रु ॥२॥
पीतांबर छाया करूनि भक्तांसी । सांगेन मी खती तयापुढें ॥३॥
संतसमागमें दावीं कवतुकें । पाठवी भातुकें देऊनियां ॥४॥
नामा म्हणे मज आहे भरंवसा । मना तूं विश्वास दृढ धरीं ॥५॥

१४.
नको नको मना हिंडों दारोदारीं । कष्ट झाले भारी वांयांविण ॥१॥
कल्पना सांडोनि संतासंगें राहीं । सर्व त्यांचे पायीं सुख आहे ॥२॥
ज्याचिया दर्शनें शोक मोह जळे । पाप ताप पळे कळभय ॥३॥
जवळीच देखती पायाळावांचून । तें सुख निधान वैकुंठींचें ॥४॥
नामा ह्मणे आली शेवटील घडी । तों वईं आवडी हाचि एक ॥५॥

१५.
धणीवरी ध्यान करीं कांरे मना । या सुख निधाना विठोबाच्या ॥१॥
पंढरीये-तैसें सुख आहे त्याचे पायीं । अनुसरोनि राहीं एकवेळ ॥२॥
श्रीमुख साजिरें पाहीं दृष्टिभरी । जीवित्वाचें करीं निंबलोण ॥३॥
जेणें लक्ष धरोनि आहे पुंडलीक । तोचि भाव एक दृढ धरीं ॥४॥
नलगे गुरुमंत्र नलगे जप तप । उघडें स्वरूप विटेवरी ॥५॥
नामा ह्मणे जरी निकत संतचरन । तरीच प्रेमखून पावसील ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP