मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश|
जनांस उपदेश ११ ते १३

उपदेश - जनांस उपदेश ११ ते १३

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


११.
कांरे तूं शिणतोसि घरदार बंधनें । वांयांचि व्यसनें आणितोसी ॥१॥
भजें यादवराया लागें त्याच्या पायां । आणिक उपायां करूं नको ॥२॥
सर्वभावें हरिभजन तूं करी । भक्ति दे पुढारी तारीक सत्य ॥३॥
नामा ह्मणे दया मांडी सोडीं माया । भजन लवलाह्या हरीचें करीं ॥४॥

१२.
वासनेचा त्याग करारे सर्वथा । या भावें अनंता शरण जावें ॥१॥
कृपेचा सागर नुपेक्षी निर्वाणीं । कलिकाळाहूनि सोडविलें ॥२॥
भक्ताचा पाळक अनाथाचा कैवारी । ब्रिदें चराचरीं वर्णि-ताती ॥३॥
शरीरसंपत्तीचा सोडा अभिमान । मन करा लीन कृष्ण-रूपीं ॥४॥
आसनीं शयनीं चिंतितां गोविंदु । तेणें तुटे कंदु भव-व्याधि ॥५॥
परदारा परदासांचे पीडन । सांडूनि भजन करा त्याचें ॥६॥
करा सर्वभावें संतांची संगति । नाहीं अर्थाअर्थीं जन्मा येणें ॥७॥
शुकसनकादिक प्रल्हाद जनक । परीक्षिती मुख्य बिभिषण ॥८॥
भीष्म रुक्मांगद नारद उद्धव । शिबि कवि देव इत्यादिक ॥९॥
शास्त्रांचें हें सार वेदां गव्हार । नाम परिकर कलियुगीं ॥१०॥
नामा म्हणे नको साधन आणिक । दिल्ही मज भाक पुंडलिकें ॥११॥

१३.
पहा परदारा जननिये समान । परद्रव्य पाषाण म्हणोनि मानी ॥१॥
निदेसी तूं मुका होऊनि तत्त्वतां । परद्वेषीं निरुतां न घालीं दृष्टि ॥२॥
ऐसें दृढ मनीं धरूनि राहसी । तरी माझें पावसी निजपद ॥३॥
पराकारणें प्राण वेंचि जो सर्वथा । जाणे परव्यथा कळवळोनि ॥४॥
परसुख संतोष धरी जो मानसीं । जरी परलो-कासी जाणें आहे ॥५॥
देहाचा अभिमान न धरावा चित्तीं । धरावी उपरति उपशमु ॥६॥
सर्वकाल प्रीति संतांचि संगति । गावीं अनु-रागें प्रीति नामें माझीं ॥७॥
सर्वांभूतीं सर्वदा ऐसी समबुद्धि । सांडावी उपाधि प्रपंचाची ॥८॥
सर्वकाळ परमात्मा आहे सर्वदेशीं । हे भावना अहर्निशीं दृढ धरीं ॥९॥
संतसमुदाय मिळती जेथें जेथें । जावें तेथें तेथें लोटांगणीं ॥१०॥
चिंता न करीं नाम्या येणें तरसी जाण । तुज सांगितली खूण निर्वाणींची ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP