मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश|
मुमुक्षूंस उपदेश ४६ ते ५०

उपदेश - मुमुक्षूंस उपदेश ४६ ते ५०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


४६.
संतांचे घरीम जाहला पाहुणेर । नामाचा वोगर वाढि-यला ॥१॥
घ्यारे ताटभरी घ्यारे ताटभरी । जेवा पोटभरी रामनाम ॥२॥
पायरव होईल दुर्जना न सांगावें । एकांतीं सेवावें म्हणे नामा ॥३॥

४७.
तप न करिसी जप ह्लषिकेशी । नाम अहर्निशीं राघोबाचें ॥१॥
तीर्थाचें हें तीर्थ नाम हें समर्थ । होइल कृतार्थ रामनामीं ॥२॥
साधेल साधन तुटेल बंधन । वाचे नारायण सुफल सदा ॥३॥
नामा म्हणे हरिनाम तें उच्चारी । तरीच उद्धारी इह लोकीं ॥४॥

४८.
व्रत तप न लगे करणें सर्वथा । न लगे तुह्मां तीर्था जाणे तया ॥१॥
आपुलेचि ठायीं असा सावधान । करा हरि-कीर्तन सर्वकाळ ॥२॥
न लगे तें कांहीं वर्जावें अन्न जीवन । लावा अनुसंधान हरीचे पायीं ॥३॥
न लगे योग याग न लगे संतत्याग । असों द्या अनुराग हरीचे पायीं ॥४॥
न लगे निरंजनीं करणें वास तुह्मां । दृढ धरा प्रेमा हरीचे नामीं ॥५॥
नामा म्हणे नाम दृढ धरा कंठीं । तेणें देईल भेटी पांडुरंग ॥६॥

४९.
तेहतीस कोटींची केली सोडवण । तो हा राम जपून धरा वेगीं ॥१॥
राघवाचें नाम वाचेसी उच्चारा । निजाचा सोयरा रामचंद्र ॥२॥
सागरीं ह्या शिळा तारिल्या अवलीळा । ब्रह्मयाची बाला उद्धरिली ॥३॥
रावण कुंभकर्ण विदारिले बाणीं । दिधली राजधानी शरणागता ॥४॥
वाल्मिक भविष्य कथूनियां गेला । रामें पवाडा केला तिहीं लोकीं ॥५॥
नामा म्हणे रामनाम हें दुर्लभ । शिव स्वयंभ हेंचि जपे ॥६॥

५०.
तप थोर देखिलें संसारीं । जो अखंड कीर्तन करी । त्याच्या तपा पुढारिले हरि । हें निर्धारें जाणा हो ॥१॥
धन्य धन्य विष्णुदास । ऐसा हरिनामीं सौरस । ते पितरांसहित वैकुंठ । सर्वकाळ क्रमिती ॥२॥
जप तप ज्ञान विठ्ठल । तयासी नाहीं काळवेळ । टाळी वाजवितांचि निर्मळ । महादोष हरतील ॥३॥
जेथें रामकृष्ण उच्चार । सकळ मंत्रांत मंत्रसार । पांचांही वदनीं शंकर । नित्य रामनाम जपतसे ॥४॥
तो हा पुंडलीकें उभा केला । आपण दृष्टिसमोर बैसला । कीर्तनें त्रैलोक्य तारिला । स्नानदानें पितरांसहित ॥५॥
न लगे करावे यज्ञ-भाग । न लगो आणिक मंत्रलाग । एक सेविलिया पांडुरंग । अनंत तीर्थें घडतील ॥६॥
पंचक्रोशी प्रदक्षिणा । नित्य नमस्कारीं  विठ्ठल चरणां । तरी घडेल पृथ्वीप्रदक्षिण । कोटिच्या कोटी अनंत ॥७॥
सप्तपुरीं द्वादश लिंगे । कीर्तनें डोलती लागवेगें । ऐसे भक्त तारिले पांडुरंगें । विटेवरी उभा नीट राहोनी ॥८॥
नामा सांगे गुह्य गोष्टी ।  विठ्ठल तारक एक सृष्टी । पंढरी देखिलिया दृष्टी । वैकुंठपद पाविजे ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP