मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश|
जनांस उपदेश ४९ ते ५०

उपदेश - जनांस उपदेश ४९ ते ५०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


४९.
पिता शिकवी पुत्रासी । नको जाऊं बापा हरिकथेसि । तेथें पांचा तोंडांची विवशी । ते वैष्णवें आणिली आहे ॥१॥
तिचिया गळां रुंडमाळा । अंगीं स्मशानींचा उधळा । कंठीं सर्पाचें हळाहळ । गजचर्म पांघुरलें ॥२॥
नको जाऊं बापा तेथें । मागुता न येशीं रे येथें । जे जे पाहूं गेले तियेतें । ते आले नाहीं मागुते ॥३॥
चंद्र पाहों गेला तियेसी । ओढूनि बांधिला भाळेसी । तैसा पडसी अभरंवशीं । मग मुकशी संसारासी बापा ॥४॥
वारितां वारितां ध्रुव गेला । तो नेऊनि अढळपदीं घातला । बळीस देश-वटा दिधला । तो घातला पाताळीं ॥५॥
नारदा दिधली कांसवटी । हनुमान केला हिंपुटी । रुक्मांगदाची वैकुंठी । नगरी नेऊनि घातली ॥६॥
तिचें वैष्णव लहाणें । कळों नेदिती आपुलीं विंदानें । हरि-कथांरंगीं नाचणें । नामकल्लोळीं ॥७॥
तीस दहा हात अकरा डोळे । ती किती काळाची न कळे । भयानक श्रीमुख कमळें । हातीं घे-ऊनि हिंडतसे ॥८॥
भस्म डौर त्रिशूल हातीं । ते न वर्णवे वेदश्रुतीं । तीसी नाहीं कुळ याती । आपपर ते कैचें ॥९॥
ते वेदशास्त्रां अगो-चर । ती सवें असे एक ढोर । कोठें न मिळेचि बिढार । ह्मणोनि स्मशांनीं वसतसे ॥१०॥
ऐसी ती थोर लांव । तिसी गांव ना शीव । कोठेंचि न मिळे ठाव । म्हणोनि समुद्रीं ॥११॥
तेथें सर्पाचें अंथरूण करी । निद्रा उदका भीतरीं । तया वैष्णवा माझारीं । निरंतरी वर्ततसे ॥१२॥
सांगेन ते परियेसीं । आहे ती संत मह-तापाशीं । आणि हरिकथेसी । बैसली असे ॥१३॥
ह्मणवोनी विश्वासें तूं जासी । मुकसी आपल्या संसारासी । नामा विनवी श्रोतयांसी । हें बोलणें वेदांचें ॥१४॥

५०.
ऐसा आज्ञापी भक्तांसी आपण । त्यागा अभिमान तुह्मीं जाणा ॥१॥
जाणावें प्रत्यक्ष स्वरूप सगुण । सर्व नारायण तोचि दिसे ॥२॥
दिसे गोपाळांसी गोपिकांसहित । आनंदें डल्लत ह्मणे नामा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP