उपदेश - मुमुक्षूंस उपदेश ५१ ते ५५
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
५१.
गुरूच्या वचनें होईल पैं ज्ञान । न कळे प्रेम खूण विठोबाची ॥१॥
वेदीं हें विचारा पुराणातें पुसा । विठोबाचा कैस प्रेम भाव ॥२॥
साधकासी सिद्धि होईल पैं प्राप्ति । न कळे निरूति प्रेम खूण ॥३॥
नामा म्हणे सोडा जाणीवेचा सीण । संतांची हे खून जाणे संत ॥४॥
५२.
कृपेचा कोंवळा रघुनाथ दास । धरीन त्याची कास सर्वभावें ॥१॥
सांडूनि सर्व संगु होईन शरणागत । करिती मनो-रथ पूर्ण माझे ॥२॥
भवसिंधूचा पार उतरोनि निर्धारी । त्या-परती सोयरीं नाहीं सृष्टीं ॥३॥
अंतरींचें गुज सांगती श्रवणीं । अमृत संजीवनीं रामनाम ॥४॥
तेणें त्रिविधताप हरती मनींचे । जाणती जीवींचे झाले कष्टे ॥५॥
तो जीवलग जननी परिस लोभा-परु । सर्वस्व उदारु प्राणसखा ॥६॥
नामा त्याचे बळें झेलतु यमासी । रिघोनि पाठींसी केशवाच्या ॥७॥
५३.
प्रीति नाहीं रायें वर्जियेली कांता । परि तिची सत्ता जगावरी ॥१॥
तैसे दंभधारी आम्ही तुझे भक्त । घालूं यमदूत पा-यांतळीं ॥२॥
रायाचा तो पुत्र अपराधी देखा । तो काय आणिका दंडवेल ॥३॥
बहात्तर खोडी देवगण कंठीं । आम्हां जगजेठी नामा म्हणे ॥४॥
५४.
बोलवरी बोलती । श्रुति वाखाणिती । हरि पाविजे ती गति । वेगळी असे ॥१॥
तुज न पवे गा तें स्वप्न । हरिशब्द एकचि ब्रह्म । पाविजे तें वर्म । वेगळें असे ॥२॥
एक जाणीव खटपट । करिसी ते सैराट । हरि पाविजे ती वाट । वेगळी असे ॥३॥
एक आहेत तार्किक । चार्वाकादी बादक । हरि पाविजे तें सुख । वेगळें असे ॥४॥
एक चातुर्यवक्ते । व्युत्पन्न कवित्वें । संत रंजविते । लोका-चारी ॥५॥
जिहीं तुज जाणितलें । तिहीं मौन धरिलें । नामा म्हणे ते पावले । भक्तियोगें ॥६॥
५५.
आझां संगती नावडे कांहीं । म्हणोनि झालों बा विदेही । दु:खमूळ संगतीचें । आम्ही नव्हों त्या गांवीचे ॥१॥
आम्हा नाहीं रूप नांव । वस्तीची नाहीं एक ठाब । मग ध्या इच्छेसि धांव । आम्ही नव्हों त्या गांबींचे ॥२॥
स्नान केलें गंगा-तीरीं । गंध लविलें पंढरपुरीं । संध्या केली कृष्णातिरीं । आम्ही त्या नव्हों त्या गांबींचे ॥३॥
भिक्षा केली कोल्हापुरीं । भोजन केलें महाद्वारीं । निद्रा केली माहुरीं । आम्ही त्या नव्हों त्या गांबींचे ॥४॥
ऐसियाची संगत करीं । त्याचे चरण ह्लदयीं धरीं । नामा ह्मणे या संसारीं । आम्ही त्या नव्हों त्या गांबींचे ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP