मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश|
जनांस उपदेश ४७ ते ४८

उपदेश - जनांस उपदेश ४७ ते ४८

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


४७.
भक्त विठोबाचे भोळे । त्याचे पायीं ज्ञान लोळे ॥१॥
भक्तिवीण शब्दज्ञान । व्यर्थ अवघें तें जाण ॥२॥
नाहीं ज्याचे चित्तीं भक्ति । जळो तयाची व्युत्पत्ति ॥३॥
नामा ह्मणे ऐसें जाण । नाहीं भक्तासी बंधन ॥४॥

४८.
ऐसा संत विरळा भेटे भाग्ययोगें । आथिला वैराग्यें सप्रेमळ ॥१॥
सर्वभावें करूनि सर्वभूतीं करुणा । जेथें मीतूंपणा ठाव नाहीं ॥२॥
भजन तया नांव निर्विकार निकें । विश्र्वीं माझ्या देखे विठोबासी ॥३॥
अखंड ह्लदयीं तेचि आठवण । साजिरे सम-चरण विटेवरी ॥४॥
नादलुब्ध जैसा आसक्त हरिण । जाय विसरोन देहभाव ॥५॥
यापरी तल्लीन दृढ राखें मन । तयापरी श्रवण आव-डीचें ॥६॥
व्यवसायीं मन ठेवूनि कृपण । लाभाचें चिंतन सर्वकाळ ॥७॥
यापरी स्वहित अखंड विचारणें । करीं तें मनन सत्त्वशील ॥८॥
परपुरुषीं आसक्त जैसी व्यभिचारिणी । न लगे तिच्या मनीं घराचार ॥९॥
कीटकी भृंगीं जेंवि ऐसें अनुसंधान । निकें निज- ध्यासन दृढ होय ॥१०॥
सर्वभावें एक विठठलचि ध्यायीं । सर्वभूर्तीं पाही रूप त्याचें ॥११॥
सर्वांहूनि निराळा रजतमाहूनि वेगळा । भोगी प्रेमकळा तोचि भक्त ॥१२॥
सत्याचा सुभट नि:संगें एकट । वैराग्य उद्भट एकनिष्ट ॥१३॥
प्रारब्धाचे भागीं नेणें देहस्फुर्ति । अखंड ते धृति निरूपम ॥१४॥
निर्वासना मन निर्लोभ संपूर्ण । नेणें स्वरूपज्ञान संकल्पाचें ॥१५॥
अनुरागीं गोविंद गाईजे एकांतीं । या-परी विश्रांति आणिक नाहीं ॥१६॥
काया वाचा मन हा माझा अनु-भव । सांगितला सर्व आवडीचा ॥१७॥
नामा ह्मणे हेंहि बोलविले जेणें । उदार सर्वज्ञ पांडुरंग ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP