उपदेश - वेषधार्यांस उपदेश २१ ते २५
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
२१.
हरिभक्त म्हणविणें हरिदर्शना नाहीं जाणें । बोलतां लजिरवाणें अहोजी देवा ॥१॥
पतिव्रता म्हणविणें आणि परपुरुषीं विचारणें । बोलतां लजिरवानें अहोजी देवा ॥२॥
क्षत्रिय म्हण-विणें आअणि पाठिशीं घाय साहणें । बोलतां लजिरवानें अहोजी देवा ॥३॥
पितृभक्त म्हणविणें आणि पितृआज्ञा न करणें । बोलतां लजिरवानें अहोजी देवा ॥४॥
ऐसे भक्त किती गेले अधोगति । नामा ह्मणे श्रीपति दास तुझा ॥४॥
२२.
कडू वृंदावन साखरें घोळिलें । तरी काय गेलें कडू-पण ॥१॥
तैसा तो अधम करो तीर्थाटण । नोहे त्याचें मन निर्मळत्व ॥२॥
बचनाग रवा दुग्धीं शिजविला । तरी काय गेलेआ त्याचा गुण ॥३॥
नामा म्हणे संत सज्जन संगतीं । ऐशासही गति कळांतरीं ॥४॥
२३.
दावी जडबुद्धि जारण मारण । नागवें हिंडणें काय काज ॥१॥
दावी उग्र तप केले उपवास । फिरतांही देश काय काज ॥२॥
काय काज तरी होसील फसीत । स्मरोर अनंता सर्व-काळ ॥३॥
नामा म्हणे नव्हे उदंड उपाय । घरीं आधीं पाय विठोबाचे ॥४॥
२४.
लांब लांब काय सांगशील गोष्टी । करा उठाउठी निरभिमान ॥१॥
मी तूं पण जंव दंभ गेला नाहीं । साधिलें त्वां न कांहीं तत्त्वसार ॥२॥
अहंभाव देहीं प्रपंचाचे दृष्टी । काय चाले गोष्टी रोकडी ते ॥३॥
नामा ह्मणे ऐसें नेणती विचार । जाती निरंतर यमपंथें ॥४॥
२५.
वेदाध्ययन करिसी तरी वैदिकचि होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥१॥
पुराण सांगसी तरी पुराणीकचि होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥२॥
गायन करिसी तरी गुणीजन होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥३॥
कर्म आचरसी तरी कर्मठचि होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥४॥
यज्ञ करिसी तरी याज्ञिकचि होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥५॥
तीर्थ करिसी तरी कापडीच होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥६॥
नामा ह्मणे नाम केशवांचे घेसी । परीच वैष्णच होसी अरे जना ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP