मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश|
संसारिकांस उपदेश ३१ ते ३६

उपदेश - संसारिकांस उपदेश ३१ ते ३६

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


३१.
देहाचें ममत्व नाहीं जों तुटलें । विषयीं किटलें मन नाहीं ॥१॥
तंव नित्य सुख कैसेंनि आतुडे । नेणती बापुडे प्रेमसुख ॥२॥
मीच एक भक्त मीच एक मुक्ता । म्हणती पतित दुराचारी ॥३॥
नामा म्हणे तुझे कृपेविण देवा । केंवि जोडे ठेवा विश्रांतीचा ॥४॥

३२.
भक्तीविणें जिणें जळो लजिरवाणें । संसार भोगणें दु:खरूप ॥१॥
एक एक योनि कोटि कोटि फेरा । मनुष्य देहवारा मग लागे ॥२॥
वीस लक्ष योनि वृक्षामध्यें ध्याव्या । जळचरीं भोगाव्या मव लक्ष ॥३॥
अकरा लक्ष योनी किरडामध्यें घ्याव्या । दश लक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्यें ॥४॥
तीस लक्ष योनि पशूंचिये घरीं । मानवाभीत्तरीं चारी लक्ष ॥५॥
नामा ह्मणे तेव्हां नरदेह या नरा । तयानें मातेरा केला मूढें ॥६॥

३३.
शेवटिली पाळी तेव्हां मनुष्य जन्म । चुकलीया वर्म फेरा पडे ॥१॥
एक जन्मीं ओळखी करा आत्मारामा । संसार सुगम भोगूं नका ॥२॥
संसारीं असावें असोनि नसावें । कीर्तन करावें वेळोवेळां ॥३॥
नामा ह्मणे विठो भक्ताचिये द्वारीं । घेऊ-नियां करीं सुदर्शन ॥४॥

३४.
वावडी दुरीच्या दुरी उडतसे अंबरीं । हातीं असे दोरी परि लक्ष तेथें ॥१॥
दुडी वरी दुडी पाण्या निघाली गुजरी । चाले मोकळ्या करीं परी लक्ष तेथें ॥२॥
व्यभिच्यारी नारी परपु-रुष जिव्हारी । वर्ते घरोचारीं परि लक्ष तेथें ॥३॥
तस्कर नगरीं परद्रव्य जिव्हारी । वर्ते घरोघरीं परि लक्ष तेथें ॥४॥
धन लो-भ्यानें धन ठेवियलें दुरी । वर्ते चराचरीं परि लक्ष तेथें ॥५॥
नामा ह्मणे असावें भलतियां व्यापारीम । लक्ष सर्वेश्वरीं ठेऊनियां ॥६॥

३५.
भक्तीविण मोक्ष नाहीं हा सिद्धांत । वेद बोले हात उभारोनि ॥१॥
तरी तेंचि ज्ञान जाणाया लागुनि । संतां वोळगोनि वश्य किजे ॥२॥
प्रपंच हा खोटा शास्त्रें निवडिला । पाहिजे साक्षिला सद्‍गुरु तो ॥३॥
नामा म्हणे सेवा घडावी संतांची । घ्यावी कृपा त्याची तेंचि ज्ञान ॥४॥

३६.
हरीविण जिणें व्यर्थचि संसारीं । जग अलंकारी मिरवीत ॥१॥
देवाविण शब्द लटकें करणें । भांडा रंजविणें सभे-माजी ॥२॥
आचार करणेम देवावीन जो गा । सर्पाचिया अंगा मृदुपण ॥३॥
नामा म्हणे काय बहु बोलों फार । भक्तीविण नर अभागी तो ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP