मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश|
वेषधार्‍यांस उपदेश ६ ते ८

उपदेश - वेषधार्‍यांस उपदेश ६ ते ८

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


६.
मुखीं नाहीं नाम । काय जपतो श्रीराम ॥१॥
काय आसन घालून । मुखीं नाहीं नारायण ॥२॥
टिळे टोपी माळा दावी । भोळ्या भाविकांसी गोवी ॥३॥
नामा ह्मणे त्याचा संग । नको चिंता होय भंग ॥४॥

७.
गोमुखीं गोवूनि काय जपतोसी । जपतप त्यासी विघ्न करी ॥१॥
नामसंकीर्तनें जळतील पापें । चुकतील खेपा चौर्‍यांशींच्या ॥२॥
उपवास करी उग्र अनुष्ठानी । तया चक्रपाणी अंतरतो ॥३॥
नामा ह्मणे ऐसे बहुतेक प्राणी । पचतील खाणी भ्रष्टलोक ॥४॥

८.
कांचनीक भक्ति सर्वकाळ करी । बहुतांचे वैरी हित नेणें ॥१॥
लोकांपुढें सांगे आम्ही हरिभक्त । न होय विरक्त स्थिति ज्याची ॥२॥
असंतोषी सदां अतितासी जाळी । सुक्रुताची होळी स्वयें केली ॥३॥
वेदमर्यादा सांडूनि चालती । हुंबतें घेती वार्‍यासवें ॥४॥
नामा ह्मणे आतां असो याचि मात । सुख नेणें हित कदा काळीं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP