मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश|
वेषधार्‍यांस उपदेश ३२

उपदेश - वेषधार्‍यांस उपदेश ३२

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


३२.
भुजंग विखार पवनाचा आहार । परि योगेश्वर म्हणों नये ॥१॥
पवनाच्या अभ्यासें काया पालटी । परि तो वैकुंठीं सरता नहे ॥२॥
शुद्ध करी मन समता धरोनि ध्यान । तरीच भवबंधन तुटेल रे ॥३॥
पवित्र गंगाजळ मीन सेवी निर्मळ । परि दुष्ट केवळ कर्म त्याचें ॥४॥
अवचिता हेतु सांपडला गळीं । न सुटे तयेवेळीं तीर्थो-दकें ॥५॥
घर सांडोनियां वन सेविताती । वनीं कां नसती रीस व्याघ्र ॥६॥
काम क्रोध लोभ न संडवे मनीं । असोनियां वनीं कोण काज ॥७॥
बहुरुप्याचा नटा माथां भार जटा । भस्म राख सोटा हातीं दंड ॥८॥
धोति पोति कर्मावेगळा आदेसें । हुंबरत असे अंगबळें ॥९॥
त्रिपुंड्र टिळे अंगीं चंदनाची उटी । घालेनियां कंठीं तुळसी-माळा ॥१०॥
व्यापक हा हरि न धरिती चित्तीं । लटिकीयाची गति गातु असे ॥११॥
मीतूंपण जरी हीं दोन्हीं सांडी । राखिसी तरी शेंडी हेंचि कर्म ॥१२॥
मानसी तूं मुंडीं देहभाव सांडी । वासनेसी दंडी आत्ममयें ॥१३॥
मन हें दर्पण करोनि निर्मळ । पाहे पां केवळ आत्मास्वयें ॥१४॥
तुझा तूं केवळ तुजमाजी पाहीं । नामा म्हणे ध्यायी केशिराजु ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP