मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग पहिला|
अभंग १८४१ ते १८६०

सद्गुरुमहिमा - अभंग १८४१ ते १८६०

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीराम व श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


१८४१

जनार्दनें माझें केलें असे हित । दाविला देहातीत देव मज ॥१॥

नाठवे भाव अभावना तें कांहीं । स्वर्ग मोक्षनाहीं चाड आम्हां ॥२॥

देहांचें देहत्व देहपण गेलें । एका जनार्दनीं केलें विदेहत्व ॥३॥

१८४२

धन्य गुरु जनार्दन । स्वानंदाचें जें निधान ॥१॥

तेणें केला हा उपकार । दावियेलेंक परात्पर ॥२॥

त्याच्या कृपें करुनि जाण । प्राप्त झालें ब्रह्माज्ञान ॥३॥

एका जनार्दन सदगुरु । जनार्दन माझा पैं आधारु ॥४॥

१८४३

माझी जनार्दन माउली । प्रेमपान्हा पान्हावली ॥१॥

तीच नित्य मज सांभाळी रात्रंदिवस सर्वकाळीं ॥२॥

आठवितों वेळोवेळां माझा तिजलागीं कळवळा ॥३॥

एका जनार्दनीं बाळ । माता रक्षीं पैं स्नेहाळ ॥४॥

१८४४

वेद तो आम्हां जनार्दन । शास्त्र तें आम्हां जनार्दन । पुराण जनार्दन । सर्वभावें ॥१॥

सुख जनार्दन । दुःख जनार्दन । कर्म धर्म जनार्दन । सर्वभावें ॥२॥

योग जनार्दन । याग जनार्दन । पाप आणि पुण्य । तेंही जनार्दन ॥३॥

यापरे सर्वस्व अर्पी जनार्दन । एका जनार्दनीं साधे भजन ॥४॥

१८४५

आमुचा आचार आमुचा विचार । सर्वभावें निर्धार जनार्दन ॥१॥

आमुचा दानधर्म यज्ञ तें हवनक । सर्व जनार्दन एकरुप ॥२॥

आमुचा योगयाग तप तीर्थाटन । सर्व जनार्दन रुप असे ॥३॥

आमुचें आसन मुद्रा जनार्दन । एका जनार्दन भजन हेंचि खरें ॥४॥

१८४६

स्वजनीं जनार्दन विजनीं जनार्दन । जीव तो जनार्दन जीवनकळा ॥१॥

जनक जनार्दन जननी जनार्दन । जन तो जनार्दन होऊनी ठेला ॥२॥

भाव जनार्दन स्वभाव जनार्दन । देव जनार्दन जेथें तेथें ॥३॥

एका जनार्दनीं आकळे जनार्दन । एका जनार्दन निश्चळ तेथें ॥४॥

१८४७

आम्हां जप जनार्दन तप जनार्दन । स्वरुप जनार्दन जनीं वनीं ॥१॥

आम्हां कर्म जनार्दन धर्म जनार्दन । ब्रह्मा जनार्दन जन सहित ॥२॥

आम्हां योग जनार्दन याग जनार्दन । भोग जनार्दन अहर्निशी ॥३॥

आम्हां ध्येय जनार्दन ध्यान जनार्दन । एका जनार्दन ज्ञानरुप ॥४॥

१८४८

दुरवरी वोझें वाहिलासे भार । आतां वेरझार खुंटलीसे ॥१॥

माझिया पैं मनें मानिला विश्वास । दृढभावें आस धरियेली ॥२॥

सांपडला मार्ग उत्तमाउत्तम । गेलें कर्म धर्म पारुषोनी ॥३॥

एका जनार्दनीं पाहतां निश्चित । निवारली भ्रांति देहा देव ॥४॥

१८४९

शांती क्षमा दया ज्ञानविज्ञान । निरसले जाण भेदाभेद ॥१॥

यापरतें सुलभ आम्हां एक नाम । मोक्ष मुक्ति धाम फोलकट ॥२॥

न करुं सायास ब्रह्माज्ञान आटी । योगाची कसवटीं वायां तप ॥३॥

एका जनार्दनीं एक जनार्दनीं । जनींवनीं संपुर्ण भरलासे ॥४॥

१८५०

पावलों प्रसाद । अवघा निरसला भेद ॥१॥

द्वैताद्वैत दुर ठेलें । एकपणें एक देखिलें ॥२॥

जन वन समान दोन्हीं । जनार्दन एकपणीं ॥३॥

एका जनार्दनीं लडिवाळ । म्हणोनि करावा सांभाळ ॥४॥

१८५१

माथां ठेवोनियां पाव । माझा देहींच केला दीव ॥१॥

नवलाव पायाचा मी केला । माझा देहींचे देवपणा नेला ॥२॥

पायींपराक्रम पंचानन । पायीं निरसला देह अभिमान ॥३॥

पायीं देहासी पाहें ठावो । पायीं देहचि केला वावो ॥४॥

नवल पायाचा हा भावों । पायीं निरेचि देहीं देवो ॥५॥

एका जनार्दनाच्या पायीं । देह विदेह दोन्हीं नाहीं ॥६॥

१८५२

अभिनव सांगतां विस्मयो दाटला । देहींच भासला देव माझ्या ॥१॥

नवल कृपेंचें विंदान कैसें । जनार्दनें सरसें केलें मज ॥२॥

साधनाची आटी न करितां गोष्टी । हृदयसंपुष्टीं दाविला देव ॥३॥

एका जनार्दनीं एकपणें शरण । नवळे महिमान कांहींमज ॥४॥

१८५३

तळीं पृथ्वीं वरी गगन । पाहतां अवघेंचि समान ॥१॥

रिता ठाव नाहीं कोठें । जगीं परब्रह्मा प्रगटे ॥२॥

स्थावर जंगम पहातां । अवघा भरला तत्त्वतां ॥३॥

भरुनीउरला दिसे । एका जनार्दनी हृदयीं वसे ॥४॥

१८५४

सहा चार अठरा बारा जे वर्णिती । चौदांची तों गति कुठित गे माय ॥१॥

पांचासी न कळे सात पैं भांडती । आठांची तो गति कुंठित जाली गे माय ॥२॥

नवल मौनावलें दशम स्थिरावलें । एका दशें धरिलें हृदयीं गे माय ॥३॥

द्वादशा पोटीं त्रयोदशा होटीं । एका जनार्दनाचे दृष्टी उभा गे माये ॥४॥

१८५५

पंधरा भागले सोळांसी न कळे । सतरा वेडावले न कळे माय ॥१॥

एकुणवीस भले विसांतें पुसती । तयांसी ती गति न कळे गे माय ॥२॥

एकवीस वेगळे विसीं मुराले । तयांचे तयां न कळे गे माय ॥३॥

तेवीस चोवीस वर्तें जगाकारीं । एका जनार्दनीं पंचविसावा हृदयीं गे माय ॥४॥

१८५६

एक ते एक एकासी कळेना । उगेचि कल्पना घेतीं वेडे ॥१॥

एकवांचुनी नाहीं एक सर्वां ठायीं । एकचि हृदयीं पुरें बापा ॥२॥

एकातें आवडी धरितां प्रेमें पोटीं । दुजा ठाव सृष्टीं कोठें असे ॥३॥

एका जनार्दनीं एकाची आवडी । एकपणें गोडी एक जाणें ॥४॥

१८५७

एक दोन असे करिती विचार । एकाचें अंतर एका न कळें ॥१॥

दोन ऐसें एक सर्वा ठायीं वसे । योगियां न दिसे एक दोन ॥२॥

जयासाठीं सर्व करिती आटाआटी । एक दोन सृष्टी भरलेसे ॥३॥

एका जनार्दनीं एक दोन वेळां । जनार्दनीं कळातीत जाणें ॥४॥

१८५८

कैंचें सुख कैंचें दुःख । कैंचा बंध कैंचा मोक्ष ॥१॥

कैंचा देव कैंचा भक्त । कैंचा शांत कैंचा अशांत ॥२॥

कैंचे शास्त्र कैंचा वेद । कैंची बुद्धि कैंचा बोधा ॥३॥

जन नोहें जनार्दन । एका जनार्दनीं भजन ॥४॥

१८५९

अवघेंचि त्रैलोक्य आनंदाचे आतां । चरणीं जगन्नाथा चित्त ठेलें ॥१॥

माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । अनाथांचा नाथ जनार्दन ॥२॥

एका जनार्दनीं एकपणें उभा । चैतन्याची शोभा शोभलीसे ॥३॥

१८६०

नेणें मंत्र तंत्र बीजाचा पसारा । जनार्दन सोईरा घडला मज ॥१॥

भक्ति ज्ञान विरक्ति नेणें पैं सर्वथा । मोह ममता चिंता कांहीं नेणें ॥२॥

योगयाग कसवटी कांहीं नेणों आटी । सेव देखों सृष्टी जनार्दन ॥३॥

काया वाचा मन ठेविलें चरणीं । एका जनार्दनीं सर्वभावें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP