मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग पहिला|
अभंग ४६१ ते ४७०

पंढरी माहात्म्य - अभंग ४६१ ते ४७०

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


४६१

न लगे करा खटपट । धरा पंढरीची वाट । विठ्ठलीं बोभाट । अठ्ठहास्य करावा ॥१॥

धरा संतांचा समागम । मुखीं उच्चारा रे नाम । जाते क्रोध आणि काम । दिगंतरीं पळोनीं ॥२॥

आशा मनशांचे काज । सहज दुर होतें निज । घडतां सहज । विठ्ठलचेअं दरुशन ॥३॥

एका जनार्दनीं मन । राखा पायीं तें नेमून । काया वाचा शरण तया पदीं होईजे ॥१॥

४६२

तरीच यावें जन्मा । ठेवा पांडुरंगीं प्रेमा ॥१॥

नाहीं तरी श्वानसुकर । जन्मा आले ते अपार ॥२॥

नेणें पंढरीची वारी । जन्मा आलातो भिकारी ॥३॥

संतसेवा दया नेणें । जन्मा आला तो पाषाण ॥४॥

कधीं करुं नेणें भजन । बैसें गृहीं मण्डुक जाण ॥५॥

नाहीं विश्वास मानसीं । एका जनार्दनीं म्हणे त्यासी ॥६॥

४६३

करुनी निर्धारा । जाय जाय पंढरापुर ॥१॥

उणें पडों नेदीं काहीं । धावें देव लवलाहीं ॥२॥

संकट कांहीं व्यथा । होऊं नेदी सर्वथा ॥३॥

शंख चक्र घेउनी करीं । एका जनार्दनीं घरटी करी ॥४॥

४६४

पंचक्रोशी पाप नसे । ऐसा देव तेथें वसे ॥१॥

चला चला पंढरपुरा । दीन अनाथांच्या माहेरा ॥२॥

चंद्रभागे करितां स्नान । होती कोटी कुळें पावन ॥३॥

एक जनार्दनीं भेटी । तुटे जन्ममरण गांठीं ॥४॥

४६५

देशाविरहित काळासी अतीत । ते देवभक्त पंढरीये ॥१॥

जाऊनियां कोणी पहा । देवाधिदेव विठोबासी ॥२॥

जन्ममरणाचे तुटतील फांसे । पाहतां उल्हासें देवभक्तां ॥३॥

एका जनार्दनीं विटेवरी निधान । लेवुनी अंजन उघडें पहा हो ॥४॥

४६६

भाव धरुनी शरण येती । तयां मोक्ष सायुज्यप्रांप्ती । ऐसी वेद आणि श्रुती । गर्जतसे सादर ॥१॥

म्हणोनी न करा आळस । सुखे जा रे पंढरीस । प्रेम कीर्तनाचा रस । सुखें आदरें सेविजे ॥२॥

पाहतां नीरा भीवरा दृष्टीं । स्नानें वास त्या वैकुंठीं । पुर्वजही कोटी । उद्धरती सर्वथा ॥३॥

एका जनार्दनीं सांगे । भाक दिधली पांडुरंगें । धन्य संचित जें भाग्य । तेंचि योग्य अधिकारी ॥४॥

४६७

मार्ग ते बहुतां आहेत । सोपा पंथ पंढरीचा ॥१॥

अमुपासी अमुप देतां । परी भरले ते सर्वथा ॥२॥

सुखाचिया भरल्या राशी । पाहीजे त्यासी त्यांने घ्यावें ॥३॥

न सरेचि ब्रह्मादिकीं । भरलें देखा भरतें ॥४॥

एका जनार्दनीं सुख । अलौकिक देख पंढरीये ॥५॥

४६८

जयां सुखाची आशा आहे । त्यांनी जावें पंढरीसी ॥१॥

अमुपासी अमुप देतां । परी भरले ते सर्वथा ॥२॥

सुखाचिया भरल्या राशी । पाहिजे त्यासी त्यांनें घ्यावें ॥३॥

न सरेचि ब्राह्मादिकीं । भरलेंदेखा भरतें ॥४॥

एका जनार्दनीं सुख । अलौकिक देख पंढरीये ॥५॥

४६९

जयां आहे मुक्तीचें कोडें । तें तें उघडें नांदत ॥१॥

वेगीं जाय पंढरपुरा । मुक्ति सैरा फुकटची ॥२॥

मोक्ष मुक्ति राबे द्वरी । वैष्णवा घरी कामारी ॥३॥

एका जनार्दनीं मुक्ति त्याग । वैष्णव पांग धरिती ॥४॥

४७०

महादोषीयासी ठाव । एका पंढरीचा राव ॥१॥

तयावीण दुजा नाहीं । आणिका प्रवाही नको पडुं ॥२॥

जाशी देशदेशांतरीं । कोठें ही सरी ऐसा नाहीं ॥३॥

ऐसा देव उभा वीटे । दावा कोठें आहे तो ॥४॥

ऐसा वैश्णवांचा मेळ । गदारोळ नामाचा ॥५॥

ऐसें चंद्रभागा तीर्थ । आहे समर्थ कोठें पां ॥६॥

ऐसा पुंडलीक संत । दरुशने तारीत जडजीवां ॥७॥

एका जनार्दनीं ठाव । वैकुंठराव उभा जेथें ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP