मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग पहिला|
अभंग १०७१ ते १११९

हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीराम व श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


१०७१

कलियुगामाजीं एक हरिनाम साचें । मुखे उच्चारितां पर्वत छेदी पापांचे ॥१॥

सर्वभावें भजा एक हरीचें नाम । मंगळा मंगल करील निर्गुण निष्काम ॥२॥

दोषी अजामेळ तोहि नामें तरला । हरिनामें गणिकेल्चा उद्धार जाहला ॥३॥

एका जनार्दनीं नाम सारांचें सार । स्त्रियादि अत्यंजा एका दांचि उद्धार ॥४॥

१०७२

जगीं तो व्यापक भरुनी उरला । शरण तूं तयाला जाय वेगीं ॥१॥

उघडा मंत्र जाण वदे नारायणा । नोहे तुज विध्व यमदुत ॥२॥

अखंड वाचेसी उच्चार नामाचा । तेणें कलीकाळाचा धाक नाहीं ॥३॥

एका जनार्दनीं संतसेवेविण । आणिक साधन नाहीं दुजें ॥४॥

१०७३

नाम हे नौका तारक भवडोहीं । म्हणोनि लवलाही वेग करा ॥१॥

बुडतां सागरीं तारुं श्रीहरी । म्हणोनि झडकरी लाहो करा ॥२॥

काळाचा तो फांसा पडला नाही देहीं । म्हणोनी लवलाही लाहो करा ॥३॥

एका जनार्दनीं लाहो कर बळें । सर्वदा सर्वकाळें लाहो करा ॥४॥

१०७४

दुजा छंद नोहे वाचे । वदे साचें हरिनाम ॥१॥

कोटी कुळें होती पावन । नामस्मरण करितांची ॥२॥

यम न पाहे तयाकडे । वांडें कोंडे नमस्कारी ॥३॥

विधी शची उमारमण । वंदिती चरण आवडी ॥४॥

म्हणे जनार्दनाचा एका । उपाय नेटका कलियुगीं ॥५॥

१०७५

सर्वांवरी वरिष्ठ सत्ता । वाचे गातां हरिनाम ॥१॥

साधन सोपें पाहतां जगीं । सांडावी उगी तळमळ ॥२॥

रामनामें करा ध्यास । व्हा रे उदास प्रपंची ॥३॥

एका जनार्दनीं मन । करा वज्राहुनी कठीण ॥४॥

१०७६

नामें पाषाण तरले । महापापी उद्धरिले । राक्षसादि आसुर तरले । एका नामें हरिच्या ॥१॥

घेई नाम सदा । तेणें तुटेल आपदा । निवारेल बाधा । पंचभुतांची निश्चयें ॥२॥

हो कां पंडित ब्रह्माज्ञानीं । तरती तारिती मेदिनी । शरण एका जनार्दनीं । नाम उच्चरणीं आनंद ॥३॥

१०७७

काळाचेंशासन । गातां श्रीहरीचे गुण ॥१॥

ऐसें सुलभ नाम वाचे । घेई घेई गोविंदाचे ॥२॥

संसाराचा छंद । येणें तुटे भवकंद ॥३॥

एका जनार्दनीं नाम । भवसिंधु तारक धाम ॥४॥

१०७८

जों विनटला श्रीहरिचरणीं । त्यासी भवबंधनीं श्रम नाहीं ॥१॥

देव उभा मागें पुढें । वारी सांकडें भवाचें ॥२॥

नामस्मरणीं रत सदा । तो गोविंद आवडे ॥३॥

त्याचे तुळणें दुजा नाहीं । एका पाही जनार्दनीं ॥४॥

१०७९

हरिनामें तरले । पशुपक्षी उद्धरले ॥१॥

ऐशी व्याख्या वेदशास्त्रीं । पुराणें सांगताती वक्त्री ॥२॥

नामें प्रल्हाद तरला । उपमन्यु अढळपदीं बैसला ॥३॥

नामें तरली ती शिळा । तारियेला वानरमेळा ॥४॥

हनुमंत ज्ञानी नामें । गणिका निजधामीं नामें ॥५॥

नामें पावन वाल्मिक । नामें अजामेळ शुद्ध देख ॥६॥

नामें चोखामेळा केला पावन । नामें कबीर कमाल तरले जाण ॥७॥

नामें उंच नीच तारिले । एका जनार्दनीं नाम बोले ॥८॥

१०८०

हरीचे नामें हरीचे भक्त । उद्धरले असंख्यात ॥१॥

दैत्य दानव मानव । रीस वानर जीव सर्व ॥२॥

वृक्ष पाषाणादि तृण । हरिनामें ते पावन ॥३॥

पशु पक्षी अबला । एका जनार्दनीं तरल्या ॥४॥

१०८१

हरीनामामृत तरले अपार । व्यास वाल्मिकादि निर्धार तरलें जाण ॥१॥

सेवेचिनि मिसें अक्रूर तरला । उद्धोध जाहला हृदयामाजीं ॥२॥

सख्यत्वयोगें अर्जुन तरला । प्रत्यक्ष भेटला कृष्णराव ॥३॥

दास्यत्व निकटीं हनुमंता भेटी । हृदय संपुटीं राम वसे ॥४॥

नामधारकपणें प्रल्हादु तरला । प्रत्यक्ष देखिला नरहरी ॥५॥

उपमन्यु बाळक दुधाचिया छंदें । तयासी गोविंदे कृपा केली ॥६॥

ऐसें अपरंपार तरलें नामस्मरणी । एका जनार्दनीं नाम जपे ॥७॥

१०८२

जेथें हरिनामाचा गजर । कर्म पळतसे दूर ॥१॥

नाम निर्दाळीं पापातें । वदती शास्त्र ऐशीं मतें ॥२॥

पापाचे पर्वत । नाम निर्दाळी सत्य ॥३॥

नाम जप जनार्दन । एका जनार्दनीं पावन ॥४॥

१०८३

ज्याचें देणें न सरे कधीं । नाहीं उपाधी संबंध ॥१॥

एका नामासाठीं सोपें । नारी अमुपें पातकी ॥२॥

शुद्ध अथवा अशुद्ध याती । होत सरती हरिनामें ॥३॥

एका जनार्दनीं नाम सार । उतरी पार भवनदी ॥४॥

१०८४

सुलभ सोपारें नाम मुखीं गातां । पातकांच्या चळथा कांपताती ॥१॥

हरिनाम सार वाचे तो उच्चार । तरलें नारीनर नाममात्रें ॥२॥

वेदांत सिद्धांत तयांचा संकेत । नामें होती मुक्त महापापी ॥३॥

एका जनार्दनीं वेदांचें निजसार । नाम परात्पर जपती सर्व ॥४॥

१०८५

भगवंतांची नामकीर्ति । अखंड वाचे जे वदती ॥१॥

धन्य तेचि संसारी । वाचे उच्चारी हरिनाम ॥२॥

प्रपंचाचें नोहें कोड । पुरे चाड हरिनामें ॥३॥

एका जनार्दनीं नाम गोड । होय निवाड जन्माचा ॥४॥

१०८६

हरि म्हणा बोलतां हरि म्हणा चालतां । हरि म्हणा खेळतां बाळपणीं ॥१॥

म्हणा हरिनाम पुरती सकळ काम । हरिनामें ब्रह्मा हातां चढें ॥२॥

हरि म्हणा उठतां हरि म्हणा बैसतां । हरि म्हणा पाहतां लोकलीला ॥३॥

हरि म्हणा आसनीं हरि म्हणा शयनीं । हरि अम्हणा भोजनीं ग्रासोग्रासीं ॥४॥

हरि म्हणा जागतां हरि म्हणा निजतां । हरिम्हणा झुंजतां रणांगणां ॥५॥

हरि महणा एकटीं हरि म्हणा संकटीं । हरि धरा पोटींभावबळें ॥६॥

हरि म्हणा हिंडतां हरि म्हणा भांडतां । हरि म्हणा कांडितां साळी दाळी ॥७॥

हरि म्हणा देतां हरि म्हणा मागतां । हरि म्हणा गातां पदोपदीं ॥८॥

हरि म्हणा देशीं हरि म्हणा परदेशीं । हरि म्हणा अहर्निशी सावधान ॥९॥

हरि म्हणा एकांतीं हरि म्हणा लोकांती । हरि म्हणा अंतीं देहत्यागीं ॥१०॥

हरि म्हणा धर्मता हरि म्हणा अर्थता । हरि म्हणा कामता सकाम काम ॥११॥

हरि म्हणा स्वार्थी हरि म्हणा परमार्थी । हरि म्हणा ब्रह्माप्राप्तीलागीं ॥१२॥

हरि म्हणा भावता हरि म्हणा अभावता । हरि म्हणा पावतां मोक्षपद ॥१३॥

हरि म्हणा निजनिधी हरि म्हणा आनंदि । हरि परमानंदि आनंद तो ॥१४॥

हरि म्हणा जनीं हरि म्हणा विजनीं । एका जनार्दनीं हरि नांदें ॥१५॥

१०८७

हरिनामीं ज्याची प्रीती । सदा वानिती हरिनाम ॥१॥

धन्य धन्य जन्म त्याचा । उच्चार वाचा हरिनाम ॥२॥

नेणती शीण योग यागीं । घेती जगीं हरिनाम ॥३॥

एका जनार्दनीं हरिनाम । उमेशी सांगे राम जप करी ॥४॥

१०८८

हरिवांचुनी ठाव रिता कोठें आहे । विचारुनी पाहें मनामाजीं ॥१॥

सर्व तो व्यापक भरुनि उरला । वाउगाचि चाळा वाहुं नको ॥२॥

एका जनार्दनीं भरुनि उरला । तो म्या देखियेला विटेवरी ॥३॥

१०८९

नाम जनार्दन वाचे । भय नाहीं कळिकाळाचें । सार्थक जन्माचे । नाम गातां निश्चयें ॥१॥

सोपा मंत्र जनार्दन । जग व्यापक परिपुर्ण । जन वन जनार्दन । एका रुप नाम घेतां ॥२॥

एका शरण जनार्दन । जनार्दन एकपणीं । आदि मध्य अवासानी । दाता एका जनार्दनीं ॥३॥

१०९०

योगियां न कळे वर्म । कोणा साधे शुद्ध कर्म । न घ्डे दान आणि धर्म । वाउगा श्रम जाणिवेचा ॥१॥

मुखें गाउं नाम वाचे । ब्रह्माज्ञान पुढें नाचे । भय नाहीं पापियां दुतांचे । आम्हांसी ते सर्वथा ॥२॥

ना करुं वाउग्या खटपटा । आगमनिगमांचा न घेऊ ताठा । वाउग्या त्या चेष्टा । नामविण न करुं ॥३॥

योगयाग न करुं तीर्थाटन । सुखें गाऊं जनार्दन । एका जनार्दनीं भजन । मुख्य मंत्र सोपरा ॥४॥

१०९१

नाम तें ब्रह्मा नाम तें ब्रह्मा । नामापाशीं नाहीं कर्म विकर्म ॥१॥

अबद्ध पढतां वेद बाधी निषिद्ध । अबद्ध नाम रटतां प्राणी होती शुद्ध ॥२॥

अबद्ध मंत्र जपतां जापक चळे । अबद्ध नाम जपतां जडमुढ उद्धरले ॥३॥

स्वधर्म कर्म करी पडे व्यंग । विष्णुस्मरणें तें समूळ होय सांग ॥४॥

मनापाशीं नाहीं विधिविधान । आसनीं शयनीं भोजनीं नाम पावन ॥५॥

एका जनार्दनीं नाम निकटीं । ब्रह्मानंदी भरली सृष्टी ॥६॥

१०९२

जगासी तारक हरि हा उच्चार । सर्व वेरझार खुटें जेणें ॥१॥

पाहता ब्रह्मांडीं व्यापका तो हरी । सबाह्म अभ्यंतरीं भरलासे ॥२॥

एका जनार्दनीं रिता ठाव कोठें । पुंडलीक पेठे उभा नीट ॥३॥

१०९३

श्रीगोविंदा मधुसूदना । ऐशा नामांची करिता उच्चारणा । तुटताती यमयातना । नाना पातकियाच्या ॥१॥

माना हाचि रे विश्वास । नामीं धरा दृढ वास । आणिक ते सायास । फोलकत न करावें ॥२॥

योगयाग कसवटी । नको नको कोरड्या गोष्टी । वांयाचि हिंपुटी । शिणती मुर्ख ॥३॥

शरण रिघा जनार्दनीं । एकपणें मन करुनी । एका जनार्दनीं ध्यानी मनीं । चिंतन तें असों द्यावें ॥४॥

१०९४

कृष्णाविण दुजे नेणती काया वाचा । जाला पांडवांचा सहकारी ॥१॥

वारिलें संकट भक्तांचा अंकित । धांवेचि त्वरित नाम घेतां ॥२॥

भोजनाची आस न धरा मानसीं । धांवतो त्वरेसी नाम घेतां ॥३॥

एका जनार्दनीं नामाची आवडी । घालितासे उडी वैकुंठाहुनी ॥४॥

१०९५

हरिनाम भजन कल्लोळ जेथे सदा । नोहे तेथें बाधा विषयाची ॥१॥

वेदशास्त्र देती ग्वाही । पुराणे तोहि बोलती ॥२॥

नामस्मरणे निरसे भेद । तुटे समुळ कंद संसार ॥३॥

निरसे भोग दुःखव्याधी । तुटे उपाधी शरीर ॥४॥

जनार्दनाचा एका म्हणे । नाम गाणें सतत ॥५॥

१०९६

जागृतीं स्वप्नीं आणि सुषुप्ती । तिहीं अवस्थात हरि म्हणतां मुक्ति ॥१॥

ऐसें वेदशास्त्रें गर्जती । विवादतीं पुराणें ॥२॥

नाम निरंतर मुखीं सदा । नोहे बाधा भौतिक ॥३॥

एका जनार्दनीं शरण । भुक्तिमुक्तिची नाहीं कारण ॥४॥

१०९७

हरिस्मरणीं सावध व्हावें । स्वहित आपुलें विचारावें ॥१॥

तरला प्रल्हाद आणि धुरु । उपमन्यु क्षीरसागरु ॥२॥

एका जनार्दनीं छंद । अवघा भरला श्रीगोविंद ॥३॥

१०९८

मुखाचा व्यापार । करावा हरिनाम उच्चार ॥१॥

पायांचा व्यापार । करावें तीर्थाटन निर्धार ॥२॥

हातांचा व्यापार । करावें दानधर्म सार ॥३॥

एका जनार्दनाचा निर्धार । मुखीं नामाचा उच्चार ॥४॥

१०९९

आवडीनें भावें हरिनाम गावें । सप्रेम नाचावें कीर्तनरंगीं ॥१॥

तरती तरती तरती संसार । आणिक विचार दुजा नाहीं ॥२॥

एका जनार्दनीं भावाचे माहेर । तरिजे संसार क्षणमात्रें ॥३॥

११००

आठवावें हरीचे गुण । तेणें मना समाधान ॥१॥

मग न जाय सैरावैरा । चुके जन्माच्या वेरझारा ॥२॥

एका जनार्दनीं ध्यान । सदा मनीं नारायण ॥३॥

११०१

सर्वकाळ आठवीं पाय । हाचि होय संकल्प ॥१॥

नेणें काहीं दुजीं मात । जागृती स्वप्नांत हरिविण ॥२॥

समाधि उन्मनीं आसनीं । शरण एका जनार्दनीं ॥३॥

११०२

नित्य वाचे वदे हरि । होय बाहेरी महापापा ॥१॥

ऐसा पुराणीचा बोध । वाचे गोविंदा आठवा ॥२॥

एका जनार्दनीं वेदवाणी । नारायणीं स्मरावें ॥३॥

११०३

नाहीं अटक काळ वेळ । सदा सोंवळें हरिनाम ॥१॥

भलते वेळीं भलते काळीं । वाचे वदा नामावळी ॥२॥

न लगे मुहूर्त अथवा योग । संकल्प सांग मनाचा ॥३॥

एका जनार्दनीं नेम । सोपें नाम जपतां ॥४॥

११०४

नामाचे पोवाडे वर्णिती साबडे । हरिनामें बागडे रंगले ते ॥१॥

नामापरतें आन नेणती सर्वथा । साधन चळथा वायां जाय ॥२॥

नाम निजधीर मानुनी भरंवसा । गाती ते उल्हासा रात्रंदिन ॥३॥

एका जनार्दनीं ध्यानीं आणि मनीं । नाम संजीवनीं जपतसे ॥४॥

११०५

अष्टांग साधन न करी वाउगें । धूम्रपान वेगें कासया करिसी ॥१॥

मनीं हरि धरीं मनीं हरि धरीं । वाउगा तुं फेरीं पडों नको ॥२॥

साधन फुकट वाउगे ते कष्ट । वेगें धरीं हरि वरिष्ठ मनामाजीं ॥३॥

साधन साधितां शिणताती मुनी । तो हरि कीर्तनीं नाचतसे ॥४॥

सायास न लगे करावें तें कांही । एका जनार्दनीं पायीं बुडी दिली ॥५॥

११०६

साधकांसी साधतां ज्ञान । तंव आडवें येत मायविघ्न ॥१॥

म्हणोनि करा हरिचिंतन । तेणें तुटे भवबंधन ॥२॥

सांडी सांडी थोरपण । व्हावें लीन कीर्तनीं ॥३॥

शरण एका जनार्दनीं । सांडा अभिमान संतजनीं ॥४॥

११०७

सर्वाभुतीं सारखा भाव । येणें माया तरे जीव ॥१॥

करितां अद्वैतपणें भक्ती । तेणें जीवा जीवन्मुक्ति ॥२॥

हरिनाम भजनाच्या कल्लोळ । जीव घेउनी माया पळे ॥३॥

एक करितां हरिभक्ति । एका जनार्दनीं तृप्ती ॥४॥

११०८

असंख्य वचने असोनी नसती । कोण तया रीती चालतसे ॥१॥

प्रमाण अप्रमाण देहींचा निवाडा । केलासे उघडा श्रुतींशास्त्रीं ॥२॥

हरि नाम वचन एकचि प्रमाण । हें तो अप्रमाण करील कोण ॥३॥

जनार्दनाचे वचनीं द्यावे अनुमोदन । एका जनार्दनीं प्रमण तेंचि होय ॥४॥

११०९

आमुचें हेचि साधन खरें । नाम बरें जनार्दन ॥१॥

नाहीं भय आणि चिंता । जन्ममरण वार्ता विसरलो ॥२॥

नाहीं येणें जाणें मरण धाक । अवघा एक जनार्दन ॥३॥

एका शरण जनार्दनीं । जनार्दन जनीं वनीं ॥४॥

१११०

आठवण ती हीच असो । वाचे वसो हरिनाम ॥१॥

काया वाचा आणि मन । करुं कीर्तन धुमाळी ॥२॥

धरुं वैष्णवांचा संग । टाकूं कुसंग लाजोनी ॥३॥

म्हणूं आम्ही हरीचे दास । एका जनार्दनीं निजदास ॥४॥

११११

मुखीं उच्चार हरिहर । करिताती निरंतर ॥१॥

नित्यरामकृष्णहरी । वदतसे पैं वैखरी ॥२॥

करिती देवाचे पैं ध्यान । वृत्ति झालीसे तल्लीन ॥३॥

एका जनार्दनीं नाम । हेंचि पाववी निजधाम ॥४॥

१११२

महा मात्रा हरीचे नाम । तरती अधमादि अधम । हाचि कालिमाजीं धर्म । नामापरते न देखें ॥१॥

जगीं नाम तारक नौका । आन उपाय नाहीं देखां । साधन साधितां साधकां । नामापरते थोर नाहीं ॥२॥

धरा विश्वास बांधा गांठी । नाम जप जगजेठी । एका जनार्दनीं भय पोटीं । नाहीं तुम्हा काळाचें ॥३॥

१११३

टाकूनियां निंदा स्तुतीचे वचन । तया नारायण जवळीं आहे ॥१॥

न लगे उपवास पारणें कारणें । सुखे नारायण घरा येती ॥२॥

ठायींच बैसोनि जपे नामावळी । पुर्ण कर्मा होळी होय तेणें ॥३॥

एका जनार्दनीं धरितां पायीं भाव । रमेसह देव घरी नांदें ॥४॥

१११४

सोपा मंत्र द्वदश अक्षरीं । वाचे जपे तुं निर्धारीं । अंतकाळीं हरी । न विंसबे तुजसी ॥१॥

धन्य धन्य मंत्रराज । तेणें साधिलें बहुकाज । आम्हं सांपडले निज । वैकुंठभुवनाचें निर्धारें ॥२॥

मन करीं गा बळकट । जपे वरिष्ठावरिष्ठ । एका जनार्दनीं वाट । सोपी मग सहजची ॥३॥

१११५

येणेंचि नामें तारिलें बहुतां । दोषी तो पुरता अजामेळ ॥१॥

गणिका आणि वाला अजामेळ भिल्लणी । गोपाळ गौळणी तारियेल्या ॥२॥

गजेंद्र तो पशु नाडितां जळचर । धांवे देव सत्वरें ब्रीदासाठीं ॥३॥

प्रल्हाद संकट पडता निवारी । चोखयाचें करी बाळंतपण ॥४॥

दामाजीचा महार होऊनियां ठेला । उणेंपण त्याला येवों नेदी ॥५॥

एका जनार्दनीं भक्तांचा अंकित । उभाचि तिष्ठत विटेवरी ॥६॥

१११६

देवाचें तें ध्यान । आठवावें रात्रदिन ॥१॥

मुगुट कुंडलें मेखळा । कांसे शोभे सोनसळा ॥२॥

शंख चक्र गदा पद्म । सदा उदार मेघःश्याम ॥३॥

ऐसा हृदयीं आठवा । एका जनार्दनीं सांठवा ॥४॥

१११७

जयाचीं ती अनंत नामें । अनंत अवतार अनंत जन्में ॥१॥

अगाध श्रीहरीचा महिमा । त्याचा पार नेणें ब्रह्मा ॥२॥

अवतार चरित्र नामें । परिसतां निवारे कर्में ॥३॥

जे जे अवतारी देव सगुण । गाईले निर्गुणाचे गुण ॥४॥

धन्य धन्य ते भाग्याचे । हरिगुण वर्णिती वाचे ॥५॥

कांहीं सगुण निर्गुण ठाव । अवघा एकचि देंहीं देव ॥६॥

एकपणे वेगळा । एका जनार्दनीं देखिला ॥७॥

१११८

जगदात्मा श्रीहरि आनंदें पूजीन । अंतरीं करीन महोत्सव ॥१॥

शांति सिंहासनीं बैसवीन भावें । बैसावें अवघें हारकारीन ॥२॥

द्वैत विसरुनि करीन पादपुजा । तेणें गरुडध्वजा पंचामृत ॥३॥

शुद्धोदक स्नान घालीन मानसीं । ज्ञानें स्वरुपासी परिमार्जन ॥४॥

सत्त्व क्षीरोदक देवानेसवीन । राजन प्रावर्ण पीतांबर ॥५॥

दिव्य अलंकार तोडर सोज्वळ । सहज स्थिती लेईल स्वामी माझा ॥६॥

भक्त नवविध घालूनि सिंहासन । एका जनार्दनीं पूजा करी ॥७॥

१११९

पूजिला श्रीपती एकविध भावें । होऊनि स्थिरावें हृदयामाजीं ॥१॥

करितसे विनमाणी प्रेमाचें अंजुळ । तेणें घननीळ तुष्टमान ॥२॥

एका जनार्दनीं सर्व भावें पूजन । जनीं जनार्दन पूजियेला ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP