२६७
कपटें पयपानसी । मोहें मोहनराशी । विषयी विष स्तनासी ।देवों आली ॥१॥
तंव तो सावध निजमुखीं । जिवासहित शोखी । सायुज्याच्या समसुखीं । समाधान बा ॥२॥
स्वरुपी घडोघडीं । म्हणें बापा सोंडीं । कृष्णमुखीं कुडी । सरती झाली बा ॥३॥
योगियां न कळे चित्तीं । सिद्धा दुर्लभ प्राप्ती । अंतीं कृष्णमुर्ती । हृदयावरी बा ॥४॥
पाजु आली विष । तियेसी परमसुख । कृष्णभजनीं दुःख । कवणा नाहीं बा ॥५॥
भक्ता परम प्राप्ती । द्वेषियां तेचि गती । एका जनार्दनीं प्रीति । वैरियां चार्हीं मुक्ति बा ॥६॥
२६८
निज पैसा समरसें । गोकुळा आली द्वेषे । कृष्णामुखीं विषें । निर्विष जाली ॥१॥
सोडीं सोडीं बा कान्हा । आक्रंदे पुतना । मागुती जनार्दना । मी न ये येथें ॥२॥
कृष्ण स्वानंदाचा कंदु । कंसासी विरोधु । विषय विषा पाजुं । पुतना आली ॥३॥
मी म्हणे बाळ तान्हें । त्वा शोषिलें जीवें प्राणें । मागुतें येणें । खुटलें बापा ॥४॥
ऐसा कैसा रे होसी । मी तुझी रे माउशी । परतोनी गोकुळासी । मी नये बापा ॥५॥
ऐसा कैसा बाळ । माझ्या शोखिल्या जीवनकळा । यशोदा वेल्हाळा । वाचली कैसी बा ॥६॥
एका जनार्दनी । द्वेषाच्या भावना । सायुज्यसदना । अरि वर्ग ॥७॥
२६९
अहं तृणावर्त बळी । प्रवेशला गोकुळीं । मोहममतेची राहाटोळी । भवंडीतसु ॥१॥
रज उधळले तेणें बळें । झाकोळले बुद्धीचे डोळे । कृष्ण आहे नाहीं हें न कळे । सकळिकांसी हो ॥२॥
श्रद्धा यशोदा म्हणे । माझा कृष्ण नेला कोणें । न दिसें रजोगुणें । मायें काय करुं वो ॥३॥
कैसें निबीड निबीड रज । मीचि न देखें मज । तेथें कृष्ण सोय निज । कवण दावी ॥४॥
तळमळीताहे मन । गेलें निधान । संतां सोय सविघ्र । बाधीना बा ॥५॥
बाळ सांवळें देखोनियां दिठी । आला धांवोनि उठाउठीं । कृष्णें घातली मिठी । अद्वैतपणें ॥६॥
वेगें नेला गगनावरी । कृष्णची गगनभरी । यावया जावया तिळभरी । वावो नाहीं बा ॥७॥
जडला कृष्ण अंगीं । कृष्णचि जाला वेंगीं । द्वैतभाव भंगीं । गेला त्याचा ॥८॥
संकल्प विकल्प पांख । उपडिलें दोन्हीं देख । येणें जाणें निःशेष । खुंटलें त्यांचें ॥९॥
कृष्णकारणीं हेंदुर्घट । आली भुलविली वाट । जिवनीं जेवीं मीठ । विरोनि जाय ॥१०॥
तृणावर्ता आवर्तु । भवंडी कृष्णनाथु । करणें देहा घातु । करुनी ठेला ॥११॥
पाहतां वेदविधी । द्वेत दृष्ट बुद्धी । एका जनार्दनीं । बैसविली निजपदीं ॥१२॥
२७०
गोकुंळींचा कान्हा अवतरला तान्हा । प्रथम पूतना शोषियेली ॥१॥
जन्मला वोखट घालुं आला वीट । पिढें महाबळभट पिटविला ॥२॥
वारा वाजे थोर सुटला आवर्तु । कृष्णें तृणावर्तु मर्दियेला ॥३॥
पाय होनोनिया मोडिला शकटु । कृष्ण अलगटु देवकीचा ॥४॥
मृतिका खादली वरितां पै देख । उदरीं तिन्हीं लोक दाखविलें ॥५॥
दहीं दुध चोरी आली बा मुरारी । माया दावें वरी बांधितसे ॥६॥
नऊ लक्ष गोप न पुरती उदरा । माया दामोदरा बांधितसे ॥७॥
दावा दामोदरु बांधिला मायेनें विमलार्जुन दोन्ही उद्धरिलें ॥८॥
वत्साचोनि रुपें आला पै असुर । झाडीं वत्सासुर झाडियेला ॥९॥
ध्यानस्थाचें परी बैसलासे तीरीं । बका दोन्हीं चिरी केल्या कृष्णें ॥१०॥
चेंडु वाचे मिसें नाथिला काळिया । फणीरंगी कान्हया नृत्य करी ॥११॥
इंद्रा मान हरी गोवर्धन करीं । धरोनि श्रीहरी व्रज राखे ॥१२॥
ताडाफळासाठीं धेनुक उठिला । कृष्णें निवटिला क्षणमात्रें ॥१३॥
वणवा गिळिला राखिलें गोपाळ । संतोषे सकळ नाचताती ॥१४॥
गोपाळ वासुरें अघासुर गिळी । कृष्णें दोन्हीं केली पहिल्या ऐसी ॥१५॥
वत्स वत्सपाळ नेले सत्य लोकां । अवघीं कृष्ण देखा होऊनि ठेला ॥१६॥
वळितं गोधनें गोपाळांशी खेळे । पाहतां निवतीं डोळे गोपिकांचे ॥१७॥
शरदऋतु शोभा शोभली रजनी । कृष्ण वृंदावनीं वेणु वाहे ॥१८॥
वेणुनादध्वनी वेधिल्या कामिनी । कृष्णादीपें हरिणी दीपियेल्या ॥१९॥
गोपीप्रती गोपी कृष्ण एक एकु । सहस्त्रघटीं अर्कू नसोनि दिसे ॥२०॥
वेणुनाद ध्वनि वेधिल्या गोपिका । रंगी त्या मायिका नाचविय्ल्या ॥२१॥
अरिष्टा अरिष्ट झाला कृष्णनाथु । केशिया आघातु केला तेणें ॥२२॥
गोकुळीं दैत्यासी केला आडदरा । थोर कंसासुर धाक पडे ॥२३॥
गोकुळा अक्रुर पाठविला रांगे । म्हणे आणी वेगें रामकृष्णा ॥२४॥
भाग्य भाव माझा कंसाचिया काजा । वैकुंठीचा राजा देखेन आजीं ॥२५॥
गाईचे रे खुर विष्णुपदांकित । पृथ्वी शोभत अक्रुर देखे ॥२६॥
ध्वजवज्राकुम्श कुंकुमांकित पदें । अक्रुर आनंदें डोलतसे ॥२७॥
तृणतरुवरां घाली लोटांगण । पुढती कृष्णचरण कैं देखेन ॥२८॥
पावला गोकूळां तंव वैकुंठ थोकडें । व्रज तेणें पांडे कृष्णमुखें ॥२९॥
देखोनियां कृष्ण विसरलां आपणां । आक्रुर श्रीकृष्ण चरणीं लोळे ॥३०॥
जाणोनि त्याचा भावो वेगीं निघे देवो । चला मथुरा पाहों आजीं आम्हीं ॥३१॥
व्रजीच्या अंगना करिताती रुदना । मागुता कैं कान्हा देखो आतां ॥३२॥
रथारुढ हरी पाहाती नरनारी । यमुना परतीरीं उतरले ॥३३॥
मारुनी रजक घेतलीं लुगडीं । गोपाळ आवडीं श्रृंगारिले ॥३४॥
पाटाउ परिकर नेसले पितांबर । कासे मनोहर नाना मेचु ॥३५॥
अक्रुरें जाउनी कंसा जाणविलें । मथुरेसी आले रामकृष्ण ॥३६॥
ऐसें ऐकोनि कंस दचकला मनीं । सर्व रुप नयनीं कृष्ण देखे ॥३७॥
चंदन कचोळी भेटली कुब्जा । वैकुंठीचा राज चर्चियेला ॥३८॥
कुब्जा म्हणे हरी चला माझे घरीं । सुमनेंही वरी श्रुंगारिली ॥३९॥
हातीं धरोनी बरी ते केली साजिरी । कंस भेटीवरी येईन घरां ॥४०॥
माळीयें सुमनें श्रृंगारिला हरी । वैकुंठ पायरीं केली तया ॥४१॥
मुक्त मुमुक्ष विषयीं हे लोक । पाहाती कौतुक कृष्णलीला ॥४२॥
मथुरे चोहाटाचा चालिला राजवाटा । टाकिला दारवंटा धनुर्याग ॥४३॥
तेथें अतिबळें कुवलया उन्मत्त । पेली महावुत कृष्णावरी ॥४४॥
त्यासी हाणोनिया लात उपडिलें दोन्हीं दांत । घायें महावत मुक्त केलें ॥४५॥
यागीचें कादडें केलें दुखंड । बळी ते प्रचंड रामकृष्ण ॥४६॥
घेऊनि गजदंत पावले त्वरित । मारिले अमित वीर कृष्णें ॥४७॥
न धरत पैं वेगीं आला मल्लरंगीं । कंस तो तवकेकें चाकाटला ॥४८॥
माल मल्लखडा करीतसे रगडा । कृष्ण तो निधडा एकपणें ॥४९॥
मुष्टीकचाणुर घायें केला घातु । कोपला अंनतु कंस पाहें ॥५०॥
चाणुर मुष्टिक हातें निवटिलें । दैत्य धुमसिलें अनुक्रमें ॥५१॥
रणरगडा अशुद्धचा सडा । कृष्ण कंसा कडा उठावला ॥५२॥
न लगतां घायें धाकें सांडी देहो । मथुरे केला रावो उग्रसेन ॥५३॥
सोडिलीं पितरें तोडिलें बंधनें । एका जनार्दने मुक्त केली ॥५४॥
२७१
जो साक्षात परब्रह्मा । करुं निघाला चोरीकर्म ।
धरुनी बाळलीला संभ्रम । आवडी परम नवनीताची ॥१॥
सवें नवलक्ष संवगडे । पशुपाल वेडे बागडे ।
सुदामा बोले बोबडें । ते आवडे गोविंदा ॥२॥
थोगला अत्यंत वांकुडा । जो निजाचा निजगडा ।
कृष्ण गुज सांगे त्या पुढां । होई गाढा चोरीकार्मा ॥३॥
घ्या रे सामुग्री चोखट । खेडे सराटे निकट ।
माजीं बांधारे बळकटा । शब्द कांहीं करुं नका ॥४॥
वस्त्र गाळिव मृत्तिका । घेउनी प्रवेशतं शंकु नका ।
सकळ गृहींचा आवांका । मज ठाउक समाचार ॥५॥
गोपाळ म्हणती चक्रपाणी । चोरीकर्म ऐकिलें श्रवणीं ।
परी खडे सराटे मृतिका घेउनी । न देखो कोणीही रिगाले ॥६॥
कृष्ण म्हणे एका निवाडे । रचिताती पत्रांचे उतरंडे ।
पाहतां न दिसती दृष्टीपुढे । जैं अंधार पडे रजनीचा ॥७॥
भीतरी प्रवेशोनी एकीकडे । सव्य अपसव्य टाकावे खडे ।
पात्रीं नाद उमटती धडाडे । जाउनी रोकडे आणावे ॥८॥
शिंकीं लांबविलीं अंतराळीं । काठी टोंचुनी पाडावी दुळी ।
धार लागेल मोकळी । मिळोनि सकळीं प्राशन करा ॥९॥
साचल एकतील गौळणी । कवाडें धरतील धांवोनी ।
सराटे पसरा आंगणीं । पायीं चुंबकोनी गुंतती ॥१०॥
तेहि चुकवोनि येती अबला । तरी मृत्तिका घाला त्यांचे डोळां ।
नेत्र चोळतील तंव तुम्हीं पळा । नवलकळा सांगितली ॥११॥
हांसें आलें कृष्णातरीं । मग प्रवेशलें घरोघरीं ।
कवाडें उघडोनि भीतरीं । अंतरीं प्रवेशलें ॥१२॥
हळुं हळूं ठेविती पाउलें । तंव गर्जती वांकीया वाळे ।
जन ऐकतील म्हणोनि गोपाळें । कर्णीं अंगोळी घातलीं ॥१३॥
कृष्ण नायके तंव जग बधीर । कृष्ण न देखे तंव अंध जगत्रय ।
कृष्ण न चाले तंव पांगुळ सर्वत्र । चालक सर्व श्रीकृष्ण ॥१४॥
सांचलें दहींपात्रें काढिती । थिजलें घृत करीं घेती ।
कांही भक्षिती कांही खाती । तोंडा मखिती निजल्यांच्या ॥१५॥
एकापुढें एक धांवती । एक एकाचें लोणी हिरोनी घेती ।
एक एकातें झोंबती । वाटा मागती चिमटोनी ॥१६॥
देखोनी नवनीताची भांडीं । पेंदा नाचे दुपांडी ।
उगा पोरा म्हणोनी धरी शेंडी । गोळा तोंडी लाविला ॥१७॥
शिकें उंच न पावे कर । काठी टोचोनी पाडिलें छिद्र ।
कृष्ण निजमुखीं लावी धार । देखोनी गोपाळ गजबजिलें ॥१८॥
गोपाळ म्हणती कृष्णासी । जाई बा सकळ दुधतुपेंसी ।
येरु म्हणे लागा रे कोपराशी । घ्या रे सावकाशी दोहींकडे ॥१९॥
तंव वाकुंड्यानें केली टवाळी । टांचें तुडवोनि पोरें उठविलीं ।
ती मातेसी बोभाईली ॥ तंववत्से सोडिलीं वडजानें ॥२०॥
वत्सें करिती स्तनपान । बाळकें करिती रुदन ।
गोपी उठल्या गजबजोन । तंव नवनीतें वदन माखलें ॥२१॥
वृद्धा सांडोनि शेजेसी । उठतां देखिलें सुनेसी ।
सासु देखतां तोंड पुसीं । येउनी केशी धरियेली ॥२२॥
तुंचि भक्षिणी नवनीत । आणि दुसर्याचें नांव सांगत ।
ऐशा सासु सुना भांडत । आपण तेथोनि निघाले ॥२३॥
मग पळाले सकळ । दुजे गृहीं प्रवेशलें गोपाळ ।
गौळणी निद्रें व्यापिल्या सकळ । टवाळी नवल मांडियेली ॥२४॥
शिंकी लांबविलीं दुरीं । यत्न करिती परी न येती करीं ।
मग वेंघोनी एक एकाच्या खांद्यावरी । उतरती दहींपात्रें ॥२५॥
उतरंडी दुरी लाविल्या न कळती । सव्य अपसव्य खडे टाकिती ।
पात्रीं लागतां नाद उठती । तेंचि घेउनि येती हरिपाशीं ॥२६॥
सुखसेजे गोपी बाळी । निद्रिस्त देखोनि अंबरें फेडिलीं ।
तरुण देखोनी मुली । टवाळी थोर मांडिली ॥२७॥
तंव गजबजोनी सुंदरा । एके करें सांवरी चिरा ।
जाउनी धरी मधलीया द्वारां । सकळ चोरां कोंडिलें ॥२८॥
तंव पुढें देखोनी वनमाळी । म्हणे भला रे सांपडलासी ये वेळा ।
तंव धरुं वेल्हाळी । नयनीं गुरळीं घातली ॥२९॥
नेत्र चोळी व्रजकामिनी । आपण तिचा हात धरुनी ।
गोपाळातें खूनवोनी । सकळ तेथोनी पळाले ॥३०॥
येरी धावें पाठोपाठे । तंव पायीं चुबकले सराटे ।
वाम करी धरुनि बोटें । बैसे गुतोंनी धरणीवरी ॥३१॥
तंव दुसरी धांवली गोपिका । तिच्या नयनीं घातली मृत्तिका ।
नेत्र चोळीत अधोमुखा । देखोनि यदुनायक हांसतसे ॥३२॥
मग चोरीकर्म सोडिनी । सकळ प्रवेशले सदनीं ।
प्रातःकाळ झालिया गौळनी । गार्हाणीं सांगों आलिया ॥३३॥
यशोदे म्हणती सकळां । तुझिया पुत्राची नवलकळा ।
कानी न ऐकीली न देखों डोळां । सुना सकळीं विटंबिल्या ॥३४॥
एक मह्णती यशोदेम सुंदरे । तुझी गांवची वस्ती पुरे ।
उठवितो निजलीं पोरें । फेडी चिरें करी नग्न ॥३५॥
खालीं ठेवोनि नवनीत मांजरामुखी चाटवीत ।
आपण खदखदां हांसत । ऐसें विटबित नानापरी ॥३६॥
एक म्हणे गौळणी । माझे भक्षिलें क्षीण लोणी ।
उच्छिष्ट मुखासी लावोनी । आपण तेथोनि पळाला ॥३७॥
एक म्हणे माझी सोडिलीं वासुरें । उठविलीं निजली पोरें ।
शिंकी तोडिलीं एकसरें । फोडिल्या त्वरें माथणी ॥३८॥
गोपिकांसी बुझविते सुमती । म्हणे निर्गुणासी गुण लविती ।
तुमचें खादलें किती निश्चिती । संगा तितुके देईन ॥३९॥
किती भक्षिलें रें गोविंदा । तंव कृष्णापुढेंअ आली राधा ।
तिचे स्तन धरुन हांसे गदगदां । म्हणे येवढा मुद्धा होता तिच्या ॥४०॥
हांसों आलों राधिकेसी । गौळणी गेल्या घरासी ।
यशोदा म्हणे कृष्णासी । सोडी वेगेसी गोधनें ॥४१॥
जो वेदासी अगोचरा । श्रुतीसी न कळे ज्याचा पार ।
वर्णितां श्रमाला फणीवर । तो गुण गंभीर श्रीकृष्ण ॥४२॥
माथां मुगुट तेजःपुजं । नयन श्रवनीं सांगे गुज ।
ललाटी कस्तुरी नोज । तळपे तेज तळवीया ॥४३॥
वैजयंती वनमाआळा । सुरंग गुजाहार गळां ।
कंठी मिरवे मेखळा । झलके कळा कौस्तुभाची ॥४४॥
मुगुटा सुमने वैष्टिलीं मयुरपिच्छें शिरी खोविलीं ।
मग चालिले तये वळीं । जाळी पृष्ठीवरी टाकिलीं ॥४५॥
काळीं कांबळी खांद्यावरी । कासे खोविली शृंग मोहरी ।
जाला नंदाचा खिललरी । हांकिली झडकरी गोधनें ॥४६॥
बळिराम राजीवनयनु । अलंकारमंडित शुद्ध तनु ।
चालिले गोपाळ घेऊनी धेनु । दोघे बाळ नंदाचे ॥४७॥
सवें नव लक्ष संवगडे । पशुपाळ वेडेबागडे ।
गोरज उधळले चहुकडें । पावले थंडी यमुनेच्या ॥४८॥
गाई सोडिल्या सैरावैरा । भ्रमती सुखें खाती चारा ।
वडज्या म्हणे पेद्यां पोरा । आणी सत्वर पलशपत्रें ॥४९॥
मथुरेचे मीष करुनी । हाटा निघालिया गौळणी ।
माथा दहीं दुध घृत लोणी । त्यामाजीं मुख्य राधा ॥५०॥
गगन गर्जे वाक्या वाळे । घनदाट चालती उताविळे ।
मनीं इच्छिती कृष्णसोहळे । तंव देखिलें वदज्यानें ॥५१॥
टाळी पिटोनी उठे वोजे । म्हणे कृष्ण आलें खाजें ।
धावोणी आला गोपीसमाजे । उभ्या थोकविल्या गौळणी ॥५२॥
तंव वडज्या करी झगडा । एकसरें धांवला वाकुडा ।
पात्रें फोडिलीं कडाडा । धरुनी रोकड्या आणिल्या ॥५३॥
कृष्णें राधा धरली करीं । एका करें लोणी चोरी ।
एका करेकं फेडी निरी । एका करें कंचुकीं ॥५४॥
हांसों आले राधिकेसी । सोंडी गोवळ्या सलगीं कायसी ।
भुलली कृष्णरुपा झाली पिसी । लोणी पुसी कृष्णमुखा ॥५५॥
ऐस विनोद विचित्र केला । करीतसे घननीळा सावळा ।
घ्या रे आतां सामुग्री चला । अति क्षुधा लागली ॥५६॥
पाहुनी कल्पतरुची छाया । घडिया घालिती बैसावया ।
बैस म्हणती यदुराया । करुं काला आवडीं ॥५७॥
पेंदा घाली पत्रावळी । वडज्या सोडी मोटा जाळीं ।
वांकुडा बैसवीं गोपाळमंडळी । वाढिताती पत्रशाखा ॥५८॥
नानापरेंचीं पक्कान्नें । षडरस बहुत अन्नें ।
गोडी सांगतां अनन्यें । पसरतीं पदर इंद्रादिकीं ॥५९॥
सकळां वाढिलें परिपुर्ण । सकळ म्हणती ब्रह्मार्पण ।
संतासीं कळली खुण । घालिती ग्रास कृष्णमुर्खीं ॥६०॥
तंव जेवितां केली टवाळी कृष्णापुढें होती गुळपोळी ।
ती उचलोनी पत्रावळी । न राहे जवळी दुरी गेला ॥६१॥
वाकुल्या दावी कृष्णापुढां । नेत्रा खूणवितसे गाढा ।
वाकुड्यातें हाणोनि थोबाडा । धरुनी रोकडा आणिला ॥६२॥
धरिली वांकुड्याची शेंडी । उच्छेष्ट घाली तयां तोडीं ।
पेंदा नाचे दुपांडीं । थोगला गडी सांपडला ॥६३॥
सरलें पुढलें पक्वान्न । कृष्णें आणिलें दध्योदन ।
मग पेंदा म्हणे आपण । कृष्नासी पैं ॥६४॥
आवड वडज्याची थोरी । पेंदा म्हणे टाका दुरी ।
कां टाकितां म्हणोनी रुदन करी । बुझावी श्रीहारी स्वानंदें ॥६५॥
एकांसी दाउनी शेखीं । घालिती दुसर्याचे मुखीं ।
कां रे पोरें म्हणोनी तवकी । डोळे रोखी वांकुडा ॥६६॥
ऐसे खेळती सकळ मिळोनी । तंव देव पाहाती विमानीं ।
वंचलों म्हणती अभिमानी । कृष्णशेष न मिळेची ॥६७॥
नोहे श्रीकृष्णची शेषप्राप्ती । मग एकमेकंसी बोलती ।
गोपाळ यमुनेतीरीं येती । चला शीघ्र गती जाऊं तेथें ॥६८॥
विमानें ठेवोनी अंतराळीं । कृष्ण शेषालागीं तें वेळीं ।
देवीं मत्स्यरुपें धरलों । यमुनेमाजीं रिगती ॥६९॥
ब्रह्मादिक मत्स्य जालें । हें श्रीकृष्णासी कळलें ।
जाणोनि गोपाळां बोलें । म्हणे हात धुवुं नका ॥७०॥
सहज उदकाची वाटाळी ॥ अकर्मकार गोवळी ।
हात पुसिले कांबळी । एक टिरीसी पुसती ॥७१॥
उठलें घोंगडीया झाडोनी । खेळ खेळत आले वृदांवनीं ।
तुळही प्रदक्षणी करुनी । खोविल्या शिरीं मंजुरीया ॥७२॥
तंव इतक्यांत लोपल्या माध्यान्ह । आस्तमान गेला दिनमान ।
श्रीकृष्णा म्हणे वचन । चला जाऊं घराप्रती ॥७३॥
देहुडा उभा राहुनी गायी खुणविल्या वेणुधनी ।
टवकारिल्या चारा विसरुनी । आल्या मुरडोनीं त्वरित ॥७४॥
गाई मेळविल्या हरी । गोपाळ घालती हुंबरी ।
डांगा झेलिती अंबरीं । पावे मोहरी वाजविता ॥७५॥
सुदामा जाला वेत्रधारी ।\ ऐसे गोपळ गजरीं ।
चालिले मग झदकरी । पेंदा छरीछत्र तरुचें ॥७६॥
वडजा घेऊनि अशोक डाहाळी । वारीतसे मुखावरील धुळी ।
वाकुंडा फोडी कौतुकें आरोळी । ग्रामाजवळी पातलें ॥७७॥
रामकृष्ण आले ऐकोनी । उताविळ झाल्या गौळणी ।
रांगोळ्या नानापरी आंगणीं । घालिताती सप्रेमें ॥७८॥
नव लक्ष आरत्या करी । घेऊनि उभ्या गोपिका नारी ।
भावें ओवाळिला श्रेहरी । लोण उतरी यशोदा ॥७९॥
गाई निघाल्या गोठनी । गोपाळ गेले आज्ञा घेउनी ।
आपण प्रवेशले निजभुवनीं । सिंहासनीं बैसलें ॥८०॥
ऐसा बाळक्रीडेचा सोहळा । आनंद जाहला सकळां ।
एका जनार्दनी देखिला श्रीबाळक्रीडा संपविली ॥८१॥