मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग पहिला|
अभंग ५७१ ते ५८०

विठ्ठलमाहात्म्य - अभंग ५७१ ते ५८०

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


५७१

वेदें सांगितले पुराणीं आनुवादलें । शास्त्र बोलें बोलत पांगुळलें ॥१॥

न कळेचि कोना शेषादिकां मती । कुंठिता निश्चितई राहियेल्या ॥२॥

श्रुती अनुवादती नेती नेति पार । तोचि सर्वेश्वर उभा विटे ॥३॥

एका जनार्दनीं ठेवुनी कटीं कर । उभा असें तीरीं भीवरेच्या ॥४॥

५७२

वेदांचा विवेक शास्त्रांचा हा बोध । तो ह परमानंद विठ्ठलमूर्ती ॥१॥

पुराणासी वाड साधनांचे कोड । ते गोडांचे गोड विठ्ठलमूर्ती ॥२॥

ब्रह्मादि वंदिती शिवादी ज्या ध्याती । सर्वांसी विश्रांती विठ्ठलमूर्ती ॥३॥

मुनीजनांचे ध्यान परम पावन । एका जनार्दनीं पावन विठ्ठलमूर्ती ॥४॥

५७३

वेदीं जैसा वर्णिला । तैसा विटेवरी देखिला ॥१॥

पुराणें सांगती ज्या गोष्टी । तो विटेवई जगजेठी ॥२॥

शास्त्रें वेवादती पाहीं । तोचि विटे समपाई ॥३॥

न कळे न कळे आगामां निगमाहीं । न कळे सीमा ॥४॥

जाला अंकित आपण । एका जनार्दनीं शरण ॥५॥

५७४

जयाचिया अंगीं सकळ त्या कळा । तो परब्रह्मा पुतळा पंढरीये ॥१॥

वेदांती सिद्धांती थकले धादांती । परी एकाचीही मती चालेचिना ॥२॥

वानितां वानितां जाहलासे तल्पक । सहस्त्र मुखीं देख मौनावला ॥३॥

एक मुखें वानुं किती मी पामर । एका जनार्दनीं साचार न कळेची ॥४॥

५७५

जयाची समदृष्टी पाहुं धावे मन । शोभते चरण विटेवरी ॥१॥

कानडें कानडें वेदांसी कानडें । श्रुतीसी जो नातुडें गीतीं गातां ॥२॥

परात्पर साजिरें बाळरुप गोजिरें । भाग्यांचे साजिरे नरनारी ॥३॥

एका जनार्दनी कैवल्य जिव्हाळा । मदनाची पुतळा विटेवरी ॥४॥

५७६

वेदांचे सार निगमाचे माहेर तो हा परात्पर उभा विटे ॥१॥

शास्त्रांचे निजगह्र पुराणाचे निजसार । तो हा विश्वभर उभा विटे ॥२॥

काळाचा तो काळ भक्तांचा प्रतिपाळ । तो हा दीनदयाळ उभ विटे ॥३॥

एका जनार्दनीं शोभे दीनमणीं । भक्त भाग्य धणी पंढरीये ॥४॥

५७७

जया कारणें वेद अनुवादती । शास्त्रे पुरणें भांडती ॥१॥

तो हा देवाधिदेव बरवा । विठ्ठल ठावा जगासी ॥२॥

नये श्रुतीसी अनुमाना । तो देखणा पुडंलीका ॥३॥

आगम निगमां न कळे पार । एका जनार्दनीं निर्धार ॥४॥

५७८

रोकेडेंचि ब्रह्मा ब्रह्माज्ञानाचें गोठलें । तें उभें असे ठेल पंढरीये ॥१॥

नये अनुमाना वेदांत सिद्धातियां । मा ब्रह्माज्ञानिया कोण पुसे ॥२॥

चारी वाचा जेथें कुंठीत पै जाहल्या । मौन त्या राहिल्या वेदश्रुति ॥३॥

एका जनादनी सारांचे हें सार । परब्रह्मा निर्धार पंढरीये ॥४॥

५७९

शेषादिक श्रमले वेद मौनावले । पुरणें भागलीं न कळे त्यांसी ॥१॥

तोचि हा सोपा सुलभ सर्वांसी । विठ्ठल पंढरीसी उघड लीळा ॥२॥

शास्त्राचिया मता न कळे लाघव । तो हा विठ्ठलदेव भीमातीरीं ॥३॥

कर्म धर्म जयालागीं आचरती । ती ही उभी मूर्ति विटेवरी ॥४॥

आगमां निगमां न कळे दुर्गमा । एका जनार्दनी प्रेमा भाविकांसी ॥५॥

५८०

अंकित अंकिला भक्तांचा कैवारी । वेद निरंतरी वाखाणिता ॥१॥

तें रुप गोजिरें सांवळें साजिरें । उभे तें भीवरे पैलथडीं ॥२॥

योगीयांचे ध्यान पारुषलें मन । ते समचरण विटेवरी ॥३॥

एका जनार्दनी चहूं अठरा वेगळा । न कळे ज्यांची लीला सनकादिकां ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP