मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग पहिला|
अभंग ३५१ ते ३६०

पंढरी माहात्म्य - अभंग ३५१ ते ३६०

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


३५१

उदंड मंत्र उदंड तीर्थे । परी पवित्र निर्धार पंढरीये ॥१॥

उदंड महिमा उदंड वर्णिला । परी या विठ्ठलावांचुनी नाहीं ॥२॥

उदंड भक्त उदंड शिरोमणी । एका जनार्दनीं चरण उदंडची ॥३॥

३५२

बहुत तीर्थ क्षेत्रें बहुतापरी । न पावती सरी पंढरीची ॥१॥

वाहे दक्षिणभाग भीमा । पैल परमात्मा विटेवरी ॥२॥

मध्य स्थळीं पुडंलीक । दरुशनें देख उद्धार ॥३॥

वाहे तीर्थ चंद्रभागा । देखतां भंग पातकां ॥४॥

एका जनार्दनीं सार । क्षराक्षर पंढरी हे ॥५॥

३५३

उदंड तीर्थें क्षेत्रें पाहातां दिठीं । नाहीं सृष्टी तारक ॥१॥

स्नानें पावती मुक्ति जगा । ऐशी चंद्रभागा समर्थ ॥२॥

पुडलिका नमस्कार । सकळ पूर्वजां उद्धार ॥३॥

पाहतां राउळाची ध्वजा । मुक्ती सहजा राबती ॥४॥

एका जनार्दनीं विठ्ठल भेटी । मग लाभा नये तुटी ॥५॥

३५४

उदंड तीर्थ महिमा वर्णिला । परी नाहीं भेटला पांडुरंग ॥१॥

पंढरींसारखे तीर्थ महीवरी । न देखों चराचरीं त्रैलोक्यांत ॥२॥

ऐसा नामघोष संतांचा मेळ । ऐस भक्त्कल्लोळ नाहीं कोठें ॥३॥

एका जनार्दनीं अनाथा कारण । पढरीं निर्माण भूवैकुंठ ॥४॥

३५५

प्रभासादि क्षेत्रें सप्तपुर्‍या असती । परी सरी न पावती पंढरीची ॥१॥

दरुशनें चित्त निवे पाहतां बरवें । शंख चक्र मिरवे चहुं करीं ॥२॥

पीतांबर परिधान वैजयंती माळा । शोभे सोनसळा अंगावरी ॥३॥

एका जनार्दनीं पाहतां रुपडें । उभें तें उघडें विटेवरी ॥४॥

३५६

उदंड क्षेत्राची पाहिली रचना । पंढरी ते जाणा भुवैकुंठ ॥१॥

तीर्थ आणि देव संतसमागम । ऐसें सर्वोत्तम कोठें नाहीं ॥२॥

सागरादि तीर्थ पाहतां पाहिलें । परी मन हें वेधलें पंढरीये ॥३॥

एका जनार्दनीं सुखाची विश्रांती । पाहतां विठ्ठलमुर्ति लाभ बहु ॥४॥

३५७

उदंड तीर्थे उदंड क्षेत्रें । परि पवित्र पंढरी ॥१॥

उदंड देव उदंड दैवतें । परि कृपांवतं विठ्ठल ॥२॥

उदंड भक्त उदंड संत । परी कृपावंत पुडलीक ॥३॥

उदंड गातो एक एका । परी एका जनार्दनीं सखा ॥४॥

३५८

जें जें क्षेत्र जें जें स्थळीं । तें तें बळी आपुलें ठायीं ।१॥

परे ऐसें माहात्म्य नाहीं कोठें । जें प्रत्यक्ष भेटे हरिहर ॥२॥

ऐत संतसामगाम । ऐसा निरुपम नाममाहिमा ॥३॥

दिंडी टके मृदंग नाद । नाहींभेद यातीसी ॥४॥

एका जनार्दनीं निजसार । पंढरी माहेर भुलोकीं ॥५॥

३५९

बहु क्षेत्रें बहु तीर्थ । बहु दैवतें असतीं ॥१॥

परी नये पंढरीराम । वाउगा श्रम होय अंतीं ॥२॥

देव भक्त आणि नाम । ऐसें उत्तम नाहीं कोठें ॥३॥

एका जनर्दनी तिहींचा मेळ । पाहतां भूमंडळ पंढरीये ॥४॥

३६०

गंगा सागरादि तीर्थे भूमीवरी । परि पंढारीची सरी न पवती ॥१॥

श्रेष्ठांमांजी श्रेष्ठ तीर्थ पं समर्थ । दरुशनें मनोरथ पूर्ण होती ॥२॥

ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक । ऐसे वैष्णव देखे नाही कोठें ॥३॥

गाताती वैष्णव आनंदें नाचती । सदोदित कीर्ति विठ्ठलाची ॥४॥

एका जनार्दनीं पंढरीचा हाट । भूवैकुंठ पेठ पंढरी देखा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP