मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग पहिला|
अभंग ५४१ ते ५५०

विठ्ठलमाहात्म्य - अभंग ५४१ ते ५५०

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


५४१

श्रीमुख साजिरें कुंडलें शोभती । शंख चक्र हातीं पद्म गदा ॥१॥

पीतांबर कासें वैजंयंती कंठीं । टिळक लल्लाटीं चंदनाचा ॥२॥

मुगुट कुडलें झळके पाटोळा । घननीळ सांवळा विटेवरी ॥३॥

श्रीवत्सलांचन हृदयीं भूषण । एका जनार्दन तृप्त जाला ॥४॥

५४२

देव सुंदर घनसावळा । कासे सोनसळा नेसला ॥१॥

चरणीं वाळे वाकी गजर । मुगुट कुडलें मनोहर ॥२॥

बाही बाहुवटे मकराकार । गळांशोभे वैजयंती हार ॥३॥

एका जनार्दनीं ध्यान । विटे शोभे समचरण ॥४॥

५४३

घनाःश्याम मूर्ति नीलवर्ण गाभा । कैवल्याची शोभा शोभे बहु ॥१॥

कस्तुरी मळवट चंदनाची उटी । बाहुवटे कंठी गोरेपणें ॥२॥

एका जनार्दनीं चरणाची शोभा । अनुपम्य उभा भीमातटीं ॥३॥

५४४

रुप सावळें सुकुमार । कानीं कुडंलें मकराकार ॥१॥

तो हा पंढरीचा राणा । न कळे योगियंच्या ध्याना ॥२॥

पीतांबर वैजयंती । माथां मुकुट शोभे दीप्ती ॥३॥

एका जनार्दनीं ध्यान । विटे पाउलें समन ॥४॥

५४५

मूर्ति चतुर्भुज वेल्हाळ । शंख चक्र गदा कमळ ॥१॥

मुकुट शोभे कटीं मेखळा । कांसे मिरवें सोनसळा ॥२॥

कौस्तुभ वैजयंती माळ । अकार्णा नयन विशाळ भाळ ॥३॥

ऐसा सुंदर सांवळा । एका जनार्दनी पाहें डोळा ॥४॥

५४६

वैजयंती वनमाळा गळां । टिळक रेखिला कस्तुरी ॥१॥

अंगीं चंदन साजे उटी । शोभे कंठी कठसूत्र ॥२॥

शंख चक्र पद्म मिरवें करी । बाह्मा उभारीं भाविकां ॥३॥

वेधी वेधोनि आमुचें मन । शरण एका जनार्दन ॥४॥

५४७

रुप सांवळे गोमटें अंग । उटी चांग चंदनाची ॥१॥

अंगीं चंदन साजे उटी । शोभे कंठी कंठसुत्र ॥२॥

शंख चक्र पद्म मिरवे करीं । बाह्मा उभारी भाविका ॥३॥

वेधी वेधोनि आमुचें मन । शरण एका जनार्दन ॥४॥

५४८

मूर्ति सांवळी गोमटी । अंगीं केशराची उटी ॥१॥

मुगुट कुंडलें वनमाळा । टिळक रेखिला पिवळा ॥२॥

कणीं कुडल मकराकार । गळं शोभें वैजयंती हार ॥३॥

नेत्र आकर्ण सुकुमार । एका जनार्दनीं विटेवर ॥४॥

५४९

दोन्ही कर ठेवूनी कटीं । उभा भीवरेचे तटीं ॥१॥

रुप सांवळें सुंदर । गळां वैजंयती हार ॥२॥

कानां कुंडलें मकराकार । तेज न समाये अंबर ॥३॥

एका जनार्दनीं उदार । भीमातीरीं दिंगबर ॥४॥

५५०

परब्रह्मा पुतळा कौस्तुभ गळां । वैजयंती माळा कंठीं शोभे ॥१॥

शंख चक्र गदा पद्म शोभा करीं । पीतांबरधारी चतुर्भुज ॥२॥

कटीं कडदोरं वाळे वाक्या पायीं । सुंदर रुप कान्हाई शोभता ॥३॥

लेणीयाचें लेणे भुषण साजिरें । एका जनार्दनीं गोजिरें चरण दोन्हीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP