९८९
एका आरोहणा नंदी । एका गरुड वाहे स्कंधीं ॥१॥
एका नित्य वास स्मशानीं । एका क्षीरनिधी शयनीं ॥२॥
एका भस्मलेपन सर्वांग । एका चंदन उटी अव्यंग ॥३॥
एका रुंडमाळा कंठीं शोभती । एका रुळे वैजयंती ॥४॥
एका जनार्दनीं सारखे । पाहतां आन न दिसे पारखें ॥५॥
९९०
एक बाळ ब्रह्माचारी । एक उदास निर्विकारी ॥१॥
एका शोभेंपाशुपत । एका सुदर्शन झळकत ॥२॥
एका करी पद्मगदा । एकपरशु वाहे सदा ॥३॥
ऐसे परस्परें ते दोघे । शोभताती ब्रह्मानंदें ॥४॥
एका जनार्दनीं ध्याऊं । तया चरणीं लीन होऊं ॥५॥
९९१
एका जटा मस्तकी शोभती । एका कीरीट कुंडलें तळपती ॥१॥
एका अर्धांगी कमळा । एका विराजे हिमबाळा ॥२॥
एका गजचर्म आसन । एक हृदयींश्रीवत्सलांछन ॥३॥
एका जटा जुट गंगा । एका शोभें लक्ष्मी पैं गा ॥४॥
एका जनार्दनीं दोघे । तयां पदीं नमन माझें ॥५॥
९९२
एका शोभे कौपीन । एका पीतांबर परिधान ॥१॥
एका कंठीं वैजयंती । एका रुद्राक्ष शोभती ॥२॥
एका उदास वृत्ति सदा । एका भक्तापांशीं तिष्ठे सदा ॥३॥
एका एका ध्यान करिती । एक एकातें चिंतिती ॥४॥
एका जनार्दनीं हरिहर । तया चरणीं मज थार ॥५॥
९९३
एक ध्याती एकामेंकीं । वेगळें अंतर नोहे देखा ॥१॥
ऐसी परस्परें आवडी । गुळ सांडुनी वेगळी नोहे गोडी ॥२॥
एकमेकांतें वर्णिती । एकमेकांतें वंदिती ॥३॥
एका जनार्दनीं साचार । सर्वभावें भुजा हरिहर ॥४॥
९९४
हरीचें चिंतन हरीचें हृदयीं । हरीचें चिंतन हरांचे हृदयीं ॥१॥
ऐशीं परस्परें गोडी देखा । काय वर्णावें तया सुखा ॥२॥
सुख पाहता आनंद । एका जनार्दनीं परमानंद ॥३॥
९९५
हरिहरांसी जे करिती भेद । ते मतवादी जाण निषिद्ध ॥१॥
हरिहर एक तेथें नाहीं भेद । कासयासि वाद मूढ जनीं ॥२॥
गोडीसी साखर साखरेस गोडी । निवाडितां अर्ध दुजी नोहे ॥३॥
एका जनार्दनीं हरिहर म्हणतां । मोक्ष सायुज्यता पायं पडे ॥४॥
९९६
एका वेलांटिची आढी । मुर्ख नेणती बापुडीं ॥१॥
हरिहर शब्द वदतां । यमदुतां पडतसे चिंता ॥२॥
कीर्तनीं नाचतां अभेद । उभयतांसी परमानंद ॥३॥
एका जनार्दनीं सुख संतोष । हरिहर म्हणतां देख ॥४॥
९९७
होऊनी वैष्णव । जो कां निंदी सदाशिव ॥१॥
त्याचें न पहावें वदन । मुर्खाहुनी मुर्ख पूर्ण ॥२॥
भक्तीचा सोहळा । शिवें दाविला सकळां ॥३॥
एका जनार्दनीं वैष्णव । शिरोमणी महादेव ॥४॥
९९८
होऊनियां विष्णुभक्त । शिवनिंदा जो करीत ॥१॥
तोची अधम चांडाळ । महादोषी अमंगळ ॥२॥
मुख्य मार्गाचा शिक्का । बंध होय तिहीं लोकां ॥३॥
एका जनार्दनीं शिव । उच्चारितां नाहीं भेव ॥४॥
९९९
शिव शिव नाम वदतां वाचे । नासे पातक बहुतां जन्माचें ॥१॥
जो मुकुटमणी निका वैष्णव । तयाचें नाम घेतां हरे काळांचें भेव ॥२॥
तिहीं लोकीं श्रेष्ठ न कळे आगमां निगमां । तयाची गोडी ठाऊक श्रीरामा ॥३॥
एका जनार्दनीं नका दुजा भावो । विष्णु तोची शिव ऐसा निर्वाहो ॥४॥
१०००
हरिहरांचे चिंतनीं । अखंड वदे ज्याची वाणी ॥१॥
नर नोहे नारायण । सदा वाचे हरिहर जाण ॥२॥
पळती यमदुतांचे थाट । पडती दुर जाऊनी कपाट ॥३॥
विनोदें हरिहर म्हणतां । मोक्षप्राप्ती तयां तत्त्वतां ॥४॥
एका जनार्दनीं हरिहर । भवसिंधु उतरी पार ॥५॥
१००१
भवसिंधुसी उतार । हरिहर म्हणतां निर्धार ॥१॥
हीच घ्या रे प्रचीत । सर्व पुरती मनोरथ ॥२॥
संसाराचा धंदा । वाचे म्हणा हरि गोविंदा ॥३॥
एका जनार्दनीं नाम । वाचे जप सोपा सुगम ॥४॥
१००२
हरिहरं भेद । नका करुं अनुवाद । धरितां रे भेद । अधम तो जाणिजे ॥१॥
वैष्णव निका संभ्रम । महादेव सर्वोत्तम । द्वैताचा भ्रम । धरुं नको ॥२॥
आदिनाथ परंपरा । चालत आली तो पसारा । जनार्दनें निर्धारा । उघडे केलें ॥३॥
गुह्मा जाप्य शिवांचें । उघडें केलें पां साचें । एका जनार्दनीं वाचे । रामनाम ॥४॥
१००३
एकाची स्तुती एकाची निंदा । करितां अंगीं आदळे बाधा ॥१॥
अर्धांगीं लक्ष्मी वंदावी । चरणीं गंगा ती काय निंदावी ॥२॥
ऐसा नाहीं जया विचार । भक्ति नोहे अनाचार ॥३॥
एका जनार्दनीं शरण । एकपणे जनार्दन ॥४॥
१००४
ॐ नमोजी सदाशिवा । ब्रह्मादिकांन कळे लाघवा । तुम्हीं स्वामी देवाधिदेवा । ध्यान करितासां कवणाचें ॥१॥
ऐक रमणीय पार्वती त्रैलोक्यांत ज्याची कीर्ति । पुराण वेद जया वानिती । तो श्रीपती ध्योतीं मी ॥२॥
आवड कीर्तन चित्ती । रंगीं नाचतो जया वैकुंठपति । माझी धांव तेथें निश्चिती । ते सुखविश्रांती काय सांगूं ॥३॥
भाळे भोळे हरीचे दास । कीर्तनरंगीं नाचती उदास । त्यांच्या भार वाहें मी सर्वेश । उणे तयांस येऊं नेदीं ॥४॥
ऐसा अनुवाद कैलासगिरीं । गिरिजेसी सांगे त्रिपुरारी । एका जनार्दनीं सत्य निर्धारी । कीर्तनगजरीं उभे तिन्हीं देव ॥५॥
१००५
अलंकार जाहलेपणें । जेवीं असे निखळ सोनें ॥१॥
नाम भिन्न रुप एक । देहीं देहात्मा तैसा देख ॥२॥
गोडी आणि गुळ । नोहे वेगळे सकळ ॥३॥
जीव शिव नामें भिन्न । एकपणें एकचि जाण ॥४॥
एका जनार्दनीं शरण । भेदरुपें दिसे भिन्न ॥५॥
१००६
जगाचा जनक बाप हा कृपाळू । दीनवत्सल प्रतिपाळु पांडुरंग ॥१॥
पहा डोळेभरी द्वैत तें टाकुनी । करील झाडणी महत्पापा ॥२॥
ज्या कारणें योगी साधन साधिती । ती हे उभी मुर्ति भीमातटीं ॥३॥
एका जनार्दनीं भक्त करुणाकर । ठेवुनी कटीं कर उभा विटे ॥४॥
१००७
अभेदावांचुन न कळे भक्तीचें महिमान । साधितां दृढ साधन । विठ्ठलरुप न कळे ॥१॥
येथें पाहिजे विश्वास । दृढता आणि आस । मोक्षाचा सायास । येथें कांहीं नकोची ॥२॥
वर्ण भेद नको याती । नाम स्मरतां अहोरात्री । उभी विठ्ठलमूर्ति । तयापाशीं तिष्ठत ॥३॥
आशा मनिशा सांडा परतें । कामक्रोध मारा लातें । तेणेंचि सरतें । तुम्हीं व्हाल त्रिलोकीं ॥४॥
दृढ धरा एक भाव । तेणें चरणीं असे ठाव । एका जनार्दनीं भेव । नाहीं मग काळाचें ॥५॥