९०१
आनंदें करुनी संसारीं असावें । नाम आठवावें श्रीरामाचें ॥१॥
नामाचियां योगे संसार तो चांग । येरव्हीं तें अंग व्यर्थ जाय ॥२॥
ऋषी मुनी सिद्ध संत महानुभाव । रामनामें भवा सुखें केला ॥३॥
नामें होयसुख असुअख नामे निरसें दुःख । रामनाम एक हृदयीं धरा ॥४॥
एका जनार्दनी नामाचा आठव । सुखदुःख भाव दुराविला ॥५॥
९०२
पुरुष अथवा नारी आलिया संसारीं । वाचे हरी हरी भलत्या भावें ॥१॥
सुफळ संसार एका रामनामें । वाउग्या त्या भ्रमें पतन घडे ॥२॥
जन्ममरणाचा तोडॊनियां फांसा । वेगीं हृषिकेशा भजा आधीं ॥३॥
एका जनार्दनीं किती हें सांगावें । गुंतलेती हावे वाउगें तें ॥४॥
९०३
भवरोगासी वोखद । रामनाम हेंचि शुद्ध ॥१॥
येणे तुटे रोग व्यथा । भुक्ति मुक्ति वंदिती माथा ॥२॥
न लगे आणिकाचे काम । वाचे वंदें रामनाम ॥३॥
पथ्य एक शुद्ध क्रिया । एका जनार्दनीं लागे पायां ॥४॥
९०४
योग याग तप नलगे साधन । वाचे रामकृष्ण जपे आधीं ॥१॥
कायिक वाचिक मानसिक भाव । तेणें सर्व ठाव एकरुप ॥२॥
संसार सांकडें भ्रमिष्टासी पडे । उच्चारितां नाम तया न पडे सांकडें ॥३॥
एका जनार्दनीं नेम हाचि राम । सोपें तें वर्म गूढ नको ॥४॥
९०५
रामकृष्ण ऐसें नाम । सुलभ सोपें तें सप्रेम । उच्चारितां नित्य नेम । तया पेणें वैकुंठ ॥१॥
नका करुं आळस कोणी । लहान थोर धरा मनीं । तुटेल आयणी । जन्म आणि मृत्यूची ॥२॥
आहे मज भरंवसा । एका जनार्दनीं ठसा । आळस नका करुं सहसा । लहान थोर सकळ ॥३॥
९०६
सोपा मंत्र वाचे हरीहरी म्हणा । तुटेल बंधना यमाचिया ॥१॥
न करी आळस हाचि उपदेश । येणें सावकाश तरती जगीं ॥२॥
कलीमाजीं सोपें रामनाम ध्यान । यापरतें साधना आन नाही ॥३॥
एका जनार्दनीं न करीं आळस । रामनाम घोष मुखें करीं ॥४॥
९०७
नामधारक हो कां भलता । त्याचे चरणीं ठेवीन माथा ॥१॥
न म्हणे उत्तम अधम । मुखीं जपतां रामनाम ॥२॥
यातीकुळाचें कारण । नाहीं नामविण ॥३॥
नाम जपे तोचि श्रेष्ठ । एका जनार्दनीं वरिष्ठ ॥४॥
९०८
राम म्हणोनि दीन येती काकुलती । त्याच्या यातनेचे दोषे सांगावे किती ॥१॥
काय साचलें नाठवे पाप । नामें निष्पाप महादोषी ॥२॥
चित्रगुप्त जव पाहे वही । कोरडें पान रेघही नाहीं ॥३॥
खोडी ना मोडीसमुळ उडे । एका जनार्दनीं नामें पाप झडे ॥४॥
९०९
अवघे जन्म उत्तम । वाचे स्मरा रामनाम ॥१॥
अवघे वदती नाम साचें । धन्य धन्य ते दैवाचे ॥२॥
संतसंग सदा । अवघा तया हाचि धंदा ॥३॥
अवघे वर्ण उत्तम । भेदाभेद नाही काम ॥४॥
अवघा एका जनार्दन । भेदाभेदाचें नाहीं कारण ॥५॥
९१०
तुज सगुण जरी ध्याऊं तरी तुं परिमित होशी । तुज निर्गुण जरी ध्याऊं तरी तूं लक्षा न येसी ।
साचचि वेद पुरुषा न कळे श्रुति अभ्यासेंसी । तो तुं नाभाचा जो साक्षी शब्दें केवीं आतुडसी ॥१॥
राम राम रामा सच्चिदानंद रामा । भवसिंधु तारक जयतुं मेघःश्यामा ।
अनंत कोटी ब्रह्मांडधीशा अनुपम्य महिमा । अहं सोहं ग्रासुनी हें तो मागतसे तुम्हां ॥२॥
अष्तांगयोगें शरीर दंडुनि वायुसी झुंज घेवो । बहुसाल अंतराल तयाचा येतसे भेवों ।
कर्मचि जरी आचरुं रुढ धरुनियां भावों । विधिनिषेध माथा अंगी वाजतसे घावो ॥३॥
तीर्थयात्रेसी जाऊं तरी तें तीर्थ दुरी राहे । पर्वकाळ विचारितां नित्यकाळ वायांजाये ।
हाती जपमाळा घेउनी अगणित गणूं पाहे । तेथें पापिणी निद्रा घाला घालुनिया जाये ॥४॥
गृहशिखासुत्र त्यजुनी संन्यास करुं । न नासे संकल्प तयाचा धाक थोरु ।
तेथें मन निश्चळ न राहे यासी काय बा करुं । वेषचि पालटे न पालटे अहंकारु ॥५॥
जनीं जनार्दन प्रत्यक्ष डोळा कां न दिसे त्यासी । ममतांहकृतीनें योगी बुडविलेंसाधन आश्रमासी ।
एका जनार्दनीं सिद्ध साधन कां न करसीं । सांडी मांडी न लगे मग तूं रामचि होसी ॥६॥