११४५
चिंतनेंक नासतसे चिंता । चिंतनें सर्व कार्य ये हातां । चिंतनें मोक्ष सायुज्यता । घर शोधितसे ॥१॥
ऐसे चिंतनाचें महिमान । तारिले अधम खळ जन । चिंतने समाधान । प्राणिमात्रा होतसे ॥२॥
चिंतनें तुटे आधीव्याधी । चिंतने तुटतसे उपाधी । चिंतने होय सर्व सिद्धि । एका जनार्दनाचे चरणीं ॥३॥
११४६
चिंतने कंसासुर तरला । चिंतनें पूतनेचा उद्धार केला । चिंतने आनंद जाहला । अर्जुनादिकांसी ॥१॥
म्हणोनी करावें चिंतन । काया वाचा आणि मन । संतांचे चरण । नित्य काळ चिंतावें ॥२॥
चिंतन आअनीं शयनीं । भोजनीं आणि गमनागमनीं । सर्वकाळ निजध्यानीं । चिंतन रामकृष्णाचें ॥३॥
चिंतन हेंची तप थोरा । चिंतनें साधे सर्व संसार । एका जनार्दनीं निर्धार । नामस्मरण चिंतन ॥४॥
११४७
हरे भवभय व्यथा चिंतनें । दुर पळती नाना विघ्नें । कलीं कल्मष बंधनें । न बांधती चिंतनें ॥१॥
करा करा म्हणोनि लाहो । चिंतनाचा निर्वाहो । काळाचा तो बिहो । दुर पळे चिंतनें ॥२॥
हीच माझी विनवणी । चिंतन करा रात्रंदिनी । शरण एका जनार्दनीं । रामनाम चिंतावें ॥३॥
११४८
चिंतन तें सोपें जगीं । रामकृष्ण म्हणा सत्संगी । उणें पडॊं नेदी व्यंगीं । देव धांवे चिंतनें ॥१॥
चिंतन करितां द्रौपदीं । पावलासें भलते संधीं । ऋषिश्वरांची मांदी । तृप्त केली क्षणमात्रें ॥२॥
चिंतनें रक्षिलें अर्जुना । लागों नेदी शक्तिबाणा । होऊनी अंकणा । रथारूढ बैसला ॥३॥
चिंतनें प्रल्हाद तारिला । जळीं स्थळीं सांभाळिला । एका जनार्दनीं भला । चिंतनाचा अंकित ॥४॥
११४९
चिंतनें बळिद्वारें बंधन । चिंतनें ह्य समाधान । न म्हणे उच्छिष्ट अथवा पुर्ण । चिंतनेंची मुख पसरी ॥१॥
चिंतनें भोळे भाविक जन । तयाचें वारी नाना विघ्न । धर्माघरीं उच्छिष्ट जाण । चिंतनसाठी काढितसे ॥२॥
चिंतनासाठीं सारथी जाहला । चिंतनासाठी उभा ठेला । चिंतनेची गोविला । पुंडलिकें अद्यापी ॥३॥
चिंतनें उभा विटेवरी । न बैसे अद्यापि वरी । एका जनार्दनीं निर्धारी । चिंतन सोपें सर्वांत ॥४॥
११५०
चिंतनें धांवे भक्तांपाठीं । धरीं कांबळीं हातीं काठी । चिंतनें उठाउठी । बांधवितो आपणिया ॥१॥
ऐसा भुकेला चिंतनाचा । न पाहे यातीहीन उंचाचा । काय अधिकार शबरीचा । फळें काय प्रिय तीं ॥२॥
एका जनार्दनीं चिंतन । तेणें जोडे नारायण । आणिक न लगे साधन । कलीमाजीं सर्वथा ॥३॥
११५१
चिंतनें गणिका निजपदा । चिंतने अजामेळ तोहि सदा । बैसविला आपुले पदा । चिंतनेची सर्वथा ॥१॥
चिंतनें उद्धरी सर्वथा । न म्हणे यातिकुळ कुपात्रा । चिंतनें तारी सर्वत्रा । प्राणिमात्रा जगासी ॥२॥
पुराणें डांगोरा पिटती । चिंतनें उद्धार सर्व गती । न लगे नेम नाना युक्ति । नाम चिंता श्रीरामाचें ॥३॥
एवढें चिंतनाचें बळ । एका जनार्दनीं कृपाळ । यम काळवंदी सकळ । नामचिंतनीं सर्वदा ॥४॥
११५२
चिंतनासी न लगे वेळ । कांही न लगे तया मोल । वाचे वदा सर्वकाळ । राम हरी गोविंद ॥१॥
हाचि पुरे मंत्र सोपा । तेणें चुके जन्म खेपा । आणिक तें पापा । कधी नुरें कल्पातीं ॥२॥
चौर्यांशीची न ये फेरी । एवढी चिंतनाची ही थोरी । सांडोनी वेरझारी । का रे शिणतां बापुडी ॥३॥
एका जनार्दनीं चिंतन । वाचे वदा परिपूर्ण । तेणें घडे कोटीयज्ञ । नाम चिंतन जपतां ॥४॥
११५३
चिंतनी केला उद्धार । चिंतनें तरले नारीनर । पशुपक्ष्यादि साचार । चिंतनेची तारिले ॥१॥
एवढी चिंतनाची थोरी । महा पापा होय बोहरी । यातीकुळाची वारी । कोण पुसे थोरीया ॥२॥
भुक्तिमुक्तीचें सांकडें । तया न पडेचि बापुडें । चिंतनेंची कोंडें । सर्व हरे तयांचे ॥३॥
एका जनार्दनीं मन । दृढ ठेवावें बांधून । चिंतनेंचि जाण । सर्व लाभ घडती ॥४॥
११५४
चिंतनें पर्वकाळ रासी । येती अपैशा घरासी । चिंतन तें सार सर्वांसी । व्रतां तपांसी चिंतन ॥१॥
चिंतनें यज्ञ दान धर्म । चिंतनें घडे नाना नेम । आणिक तें वर्म । चिंतने घडे सर्वथा ॥२॥
चिंतनें वेदशास्त्र पुराण । नाना मंत्र तंत्र पठण । नाना तीर्थाचें भ्रमण । चिंतनें होय ठायींच ॥३॥
ऐसा चिंतनमहिमा । नाहीं आणिक उपमा । एका जनार्दनीं प्रेम । चिंतनें चिंतिता ॥४॥
११५५
चिंतनें उद्धरला पापी । महा दोषी केला निःपापी । तया म्हणती ऋषी तपी । पुराणीं तें सर्व ॥१॥
नारदें सांडोनिया मंत्र । केला जगी तो पवित्र । चिंतना एवढें पात्र । आन नाही सर्वथा ॥२॥
चिंतनें शुकादिक मुक्त । राजा जाहला परिक्षित । ऐसें अपार आहेत । चिंतनें मुक्त जाहले ते ॥३॥
चिंतनाची येवढी थोरी । गणिका नारी परद्वारी । वाचे उच्चारितां हरि । मोक्षधामीं बैसविली ॥४॥
चिंतनें हनुमंता समाधी । तुटोनि गेली आधिव्याधी । एका जनार्दनीं बुद्धि । चिंतनीच जडलीसे ॥५॥
११५६
चिंतनें बिभीषण मुक्त । चिंतनें जाहला जनक जीवमुक्त । चिंतनें कुळ सरित । सर्वेभावें हरि होय ॥१॥
आवडी चिंतावे चरण । दुजेंनको मानधन । नाम स्मरणावांचुन । चिंतनचि नसो ॥२॥
ऐसा एकविध भावें । चिंतन असो मनीं जीवें । एका जनार्दनी देव । तया पाठीं धांवतसे ॥३॥
११५७
जाईन पंढरी । हेंचि चिंतन धरीं । मग तो श्रीहरी । नुपेक्षी भक्तांतें ॥१॥
धरुनी पहा विश्वास । नका आणिक सायास । पहातसे वास चिंतनाची सर्वथा ॥२॥
न धरी माझें आणि तुझें । भार घाली पारे वोझें । एका जनार्दनीं दुजें । मग नाहीं तयातें ॥३॥
११५८
पंढरीस जावया । सदा हेत मानसीं जया । कळिकाळ वंदी पाया । तया हरिभक्तांतें ॥१॥
दृढ मनींच चिंतन । वाचे विठ्ठलचि जाण । होतु कां कोटी विघ्र । परी नेम नटळे सर्वथा ॥२॥
एका जनार्दनीं भाव । नपेक्षी तया देव । करुनि संसार वाव । निजपदी ठाव देतुसे ॥३॥
११५९
देहीं न धरी जो आशा । चित्त पंढरीनिवासा । स्मरणाचा ठसा । रात्रंदिवस जयातें ॥१॥
तोचि होय हरीचा दास । तेणें पुरती सर्व सायास । नाहीं आशापाश । चिंतनावाचुनी सर्वथा ॥२॥
ध्यानीं मनींनारायण । सदा सर्वदा हें चिंतन । एका जनार्दन मन । जडलेंसे हरिपायीं ॥३॥
११६०
चिंतन तें हरिचरण । हेंचि कालीमाजींप्रमाण । सर्व पुण्याचें फल जाण । नामस्मरण विठ्ठल ॥१॥
मागें तरले पुढे तरती । याची पुराणीं प्रचिती । वेद शास्त्र जया गाती । श्रुतीहि आनंदें ॥२॥
हेंचि सर्वांशी माहेर । भुवैकुंठ पंढरपुर । एका जनार्दनीं नर । धन्य जाणा तेथीचे ॥३॥
११६१
चिंतन तें करी सदा । रामकृष्ण हरि गोविंदा ॥१॥
हेंचि एक सत्य सार । वायां व्यत्पुत्तीचा भार ॥२॥
नको जप तप अनुष्ठान । वाचे वदे नारायण ॥३॥
एका जनार्दनीं भाव । अवघा देहीं पाहें देव ॥४॥