मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग पहिला|
अभंग ८०१ ते ८१०

रामनाममहिमा - अभंग ८०१ ते ८१०

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


८०१

श्रीरामानामें तुटती यातना । म्हणोनि रामराणा दृढ धरा ॥१॥

यमाची यातना तुटेल निर्धारें । चुकतील फेरे चौर्‍याशींचे ॥२॥

जन्ममरणाचा तुटेल तो बोध । ठसावतां बोध रामनाम ॥३॥

एका जनार्दनीं नामापरतें थोर । नाहीं नाहीं निर्धार केला व्यासें ॥४॥

८०२

नाम जपे सर्वकाळ । त्यासी भयभीत काळ ॥१॥

रामी लीन ज्याची वृत्ती । त्याच्या दासी चारी मुक्ती ॥२॥

रामनामी जिव्हा रंगे । तोचि परब्रह्मा अंगें ॥३॥

म्हणे एका जनार्दनीं । राम दिसे जनीं वनीं ॥४॥

८०३

रामनाम ज्याचे मुखीं । तो नर धन्य तिहीं लोकीं ॥१॥

रामनामें वाजेटाळी । महादोषा होय होळी ॥३॥

रामनाम सदा गर्जे । कळेकाळ भय पाविजे ॥४॥

ऐसा रामनामीं भाव । तया संसाराचि वाव ॥५॥

आवडीने नाम गाय । एका जनार्दनीं वंदी पाय ॥६॥

८०४

जो देवांचें पद सोडी । सदा गोडी अंतरीं ॥१॥

पापें पळती रामनामें । खंडताती कर्माकर्में ॥२॥

नामें कळिकाळासी धाक । यमदुतां न मिळे भीक ॥३॥

ऐसा नामाचा महिमा । नाहीं आणिक उपमा ॥४॥

आवडी जो नाम गाय । एका जनार्दनीं वंदी पाय ॥५॥

८०५

रामनाम मुखीं गाय । यम त्यांचेंवंदी पाय ॥१॥

ऐसा नामाचा महिमा । सरी न पावेचि ब्रह्मा ॥२॥

उत्तमाउत्तम नाम । सर्व सुखासी विश्राम ॥३॥

एका जनार्दनीं नाम । भवसिंधु तारक धाम ॥४॥

८०६

या रे नाचुं प्रेमानंदे । रामनामचेनि छंदें ॥१॥

म्हणा जयरामा श्रीराम । भवसिंधु तारक नाम ॥२॥

ऐसी नामाची आवडी । काळ गेला देशोधडी ॥३॥

आवडीने नाम घोका । म्हणे जनार्दन एका ॥४॥

८०७

उघड दृष्टी करुन पाहुं । रामकृष्णनामें ध्याऊं ।

अहोरात्र मुखीं गाऊं । राम हरी वासुदेव ॥१॥

हेंचि अध्यात्माज्ञानाचें वर्म । येणें घडतीकर्माकर्म ।

ब्रह्माविद्येचा आराम । येणें पावे सर्वथा ॥२॥

सदा वाचे नामावळी । महा दोषा होय होळी ।

कळीकाळ पायांतळीं । ब्रह्मानंदें गर्जतां ॥३॥

एका जनार्दनीं नाम । भवसिंधु तारक धाम ।

साधकांचा श्रम । येणें दुर सर्वथा ॥४॥

८०८

नाहीं सायासाचें काम । वाचे वदा रामनाम ॥१॥

बहु कर्मा सोडवण । वाचेसि न घडे मौन ॥२॥

राम चिंता ध्यानीं मनीं । कळिकाळ वाहे पाणी ॥३॥

एका जनार्दनीं राम । वाचे उच्चारा निष्काम ॥४॥

८०९

जया हेत नामीं ध्यास । नेणें आणिक सायास ।

कोण लेखी संसारास । नामापुढें तृणवत ॥१॥

आम्हां नामाचें भूषण । नामें सुखासी मंडण ।

नामें होतसे खंडण । नानापरी पापांचे ॥२॥

जपतां नाम मंत्रावळी । काळ कांपतसे चळी ।

एका जनार्दनीं नव्हळी । रामनामें अतर्क्य ॥३॥

८१०

कलीमाजीं सोपें घेतां रामनाम । नाहीं कांहीं श्रम जपतप ॥१॥

न लगे साधन पंचाग्री धुम्रपान । नामेंचि पावन युगायुगीं ॥२॥

योगयाग यज्ञ न लगे वेरझारा । नाममंत्र पुरा जप आधीं ॥३॥

एका जनार्दनीं निश्चयो नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP