मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग पहिला|
अभंग ८७१ ते ८८०

रामनाममहिमा - अभंग ८७१ ते ८८०

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


८७१

वाचे सदा रामनाम । तया न बाधी क्रोध काम ॥१॥

हेंचि एक सत्य सार । वायां नको वेरझार ॥२॥

संसार वायां न म्हणे सार । करी परमार्थ विचार ॥३॥

एका जनार्दनीं रामनाम । वाचे वदे तुं निष्काम ॥४॥

८७२

साधन तें साधा वाचे । नाम म्हणा गोविंदाचें ॥१॥

तेणें तुटेल बंधन । वाचे गातां रामकृष्ण ॥२॥

नामासरसींवाजे टाळी । महा पापा होय होळी ॥३॥

हा तो पुराणीं निश्चय । नाम निशिदिनीं गाय ॥४॥

आवडीनें नाम गाय । एका जनार्दनीं वंदी पाय ॥५॥

८७३

वोखद घेतलिया पाठीं । तेणें तुटी होय रोगा ॥१॥

पथ्य साचार साचार । नामीं धरा निर्धार ॥२॥

वोखदासी कारण पथ्य । भवरोगीयां रामनामें मुक्त ॥३॥

एका जनार्दनीं करा । श्रीराम राम उच्चारा ॥४॥

८७४

अभिमान नका धरुं पोटीं । होय अर्थासवें तुटी ॥१॥

म्हणोनि स्मरा रामराम । तेणें पावाल निजधाम ॥२॥

विहित करा आपुलें कांहीं । आठवा वाचे राम देहीं ॥३॥

काकुलती येतां जनां । शरण एका जनार्दनीं ॥४॥

८७५

अहोरात्र वाचे वदा । राम गोविंद नामची ॥१॥

तेणें तुटे भेदाभेद । निरसे संसाराच्या कंद ॥२॥

ध्यानीं मनीं आणि शयनीं । वाचे वदा चक्रपाणी ॥३॥

ध्येय ध्याता ध्यान । आठवावें मधुसुदन ॥४॥

एका जनार्दनीं घोका । आवडीनें रामसखा ॥५॥

८७६

इतुकी करावीहे जोडी । रामनामीं धरा गोडी ॥१॥

आणिक नलगे साधन । एकलें मन जिंका पूर्ण ॥२॥

एका जनार्दनीं मन । देवा पायीं बांधून ॥३॥

८७७

उठतां बैसतां खेळता बोलतां । चालतांनिजतां राम म्हणा ॥१॥

आसनीं शयनी भोजनीं परिपुर्ण । वाचे राम नारायण जप करीं ॥२॥

कार्याकारणीं समाधीं उन्मनीं । राम ध्यानींमनीं जपे सदा ॥३॥

एकांती लोकांती देहत्यागांअंती । रामनाम वस्ती जिव्हेवरी ॥४॥

एका जनार्दनीं वाचे वदे राम । अखंड निष्काम होसी बापा ॥५॥

८७८

नको कर्म धर्म वार्ता । सुखें करा हरिकथा । भवजन्मव्यथा । येणें तुटे तुमची ॥१॥

सोपें साधनाचें सार । वाचे नरहरी उच्चारी । भयें चुके येरझार । चौर्‍यांशींची ॥२॥

नका वेदशास्त्र पाठ । नामें धरा नीट वाट । पंढरी हे पेठ । भूवैकुंठ महीवरी ॥३॥

म्हणोनि करा करा लाहो । वाचे रामनाम गावो । एका जनार्दनी भावो । दृढ ठेवा विठ्ठलीं ॥४॥

८७९

उत्तम मध्यम कनिष्ठ यांचें नाहीं काम । जपावें तें नाम आधीं आधीं ॥१॥

वर्णाश्रम धर्म याचें नाहीं काम । जपावें तें नाम आधीं आधीं ॥२॥

रज तम सत्व यांचें नाहीं काम । जपावें तें नाम आधीं आधीं ॥३॥

एका जनार्दनीं हें परतें सारा । जपा रघुवीरा एका भावें ॥४॥

८८०

काळिकाळावरी नाम । जाले जैसे मनोधर्म । वदतं पुरुषोत्तम । पुण्य जोडे असंख्य ॥१॥

वाचे सदा श्रीराम । तेणें पुरे सर्व काम । मोक्षामार्ग सुगम । नाम उच्चारणें जोडें ॥२॥

आधीं पाहिजे विश्वास । म्हणा आम्हीं विष्णुदास । पापाच तो लेश । कद नुरे कल्पातीं ॥३॥

धरा वैष्णव सांगात । आणिक नका दुजा हेत । एका जनार्दनीं चित्त । रामनामीं असों द्या ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP