३१
वाउगे ते बोल बोलती अबळा । कवण ते गोपाळा धरुं शके ॥१॥
प्रेमावीण कोण्हा न सांपडे हरी । वाउगी वेरझारी घरामध्यें ॥२॥
एका जनार्दनीं गोपीकांसीं शीण । म्हणोनि विंदान करीतसे ॥३॥
३२
नवल ती कळा दावी गोपिकांसी । लोणी चोरायासी जातो घरा ॥१॥
धाकुले संवगडे ठेवुनि बाहेरी । प्रवेशी भीतरीं आपणची ॥२॥
द्वारा झाकानियां बैसती गोपिका । देखियला सखा गोपाळांचा ॥३॥
एका जनार्दनीं धावुनि धरति । नवल ते रिती करितसे ॥४॥
३३
गोपी धावुनियां धरिती तयातं । उगा पाहे बहतें न बोले कांहीं ॥१॥
करिती गलबला मिळती सकळां । बोलती अबला वाईट तें ॥२॥
कां रें चोरा आतां कैसा सांपडलासी । म्हणोनि हातासी धरियलें ॥३॥
वोढोनियां नेती यशोदे जवळी । आहे वनमाळी कडेवरी ॥४॥
एका जनार्दनी यशोदेचे करीं । उभा श्रीहरी लोणी मागें ॥५॥
३४
घरोघरी कृष्ण धरिला बोभाटा । घेऊनि येती धीटा राजद्वारी ॥१॥
पाहती तो उभा यशोदे जवळी । वाउगी ती कळी दिसताती ॥२॥
गोपिका धांवती घेऊनियां कृष्ण । न कळे विंदान कांहीं केल्या ॥३॥
घेऊनियां येती तटस्थ पाहती । विस्मित त्या होती आपुले मनीं ॥४॥
एका जनार्दनींदावीत लाघव । न कळेंचि माव ब्रह्मादिकां ॥५॥
३५
मिळल्या गिपिका यशोदा जवळा । तटस्थ सकळां पाहताती ॥१॥
यशोमाती म्हणे आलेती कासया । वाउगें तें वायां बोलताती ॥२॥
एका जनार्दनीं बोलण्याची मात । खुंटली निवांत राहिल्या त्या ॥३॥
३६
आपुलिया घरा जाती मुकवत । नाहीं दुजा हेत चित्तीं कांहीं ॥१॥
परस्परें बोल बोलती अबळा । कैशीं नवल कळा देखियली ॥२॥
धरुनिया करीं जाती तेथवरी । उभा असे हरी जवळींच ॥३॥
एका जनार्दनीं न कळें लाघव । तटस्थ गोपी सर्व मनामाजीं ॥४॥
३७
आपुल्या मनासीं करिती विचार । न धरवे साचार कृष्ण करीं ॥१॥
योगीयांचे ध्यानीं न सांपडे कांहीं । तया गोपिकाही धरुं म्हणतीं ॥२॥
धारितां न धरवे तळमळ । वाउगा कोल्हाळ करिती वायां ॥३॥
एका जनार्दनीं शुद्ध भक्तिविण । पवे नारायण कवणा हातीं ॥४॥
३८
आभाविकांसी तो जवळीचा दुरीं । दुरीचा जवली हरी भाविकांसीं ॥१॥
म्हणोनि आभावें ठाकतीं गोपिका । त्या यदुनायका न धरती ॥२॥
वावुगे ते कष्ट मनींचा तो सोस । सायासें सायास शिणताती ॥३॥
एका जनार्दनींशीण गोपीकांसी । तेणें हृषीकेशी हांसतांसे ॥४॥
३९
न कळती भावेवीण रामकृष्ण । गोपिकांसी शीण बहुतची ॥१॥
बहुत मिळती बहुतांच्या मतां । तैशां गोपी तत्त्वतां शिणताती ॥२॥
एका जानार्दनीं प्रेमावीण देव । नकळे लाघव श्रीहरींचे ॥३॥
४०
भाविका त्या गोपी येतो काकुळती । तुमचेनि विश्रांती मजलागीं ॥१॥
मज निराकारा आकारासी येणें । तुमचें तें ऋण फेडावया ॥२॥
दावितो लाघव भोळ्या भाविकांसी । शाहणे तयासी न सांपडे ॥३॥
एका जनार्दनीं भाविकांवांचूनी । प्राप्त नोहे जाण देव तया ॥४॥
४१
भोळे ते साबडे गोपिका ते भावें । चुंबन बरवें देती तया ॥१॥
यज्ञमुखीं तोंड करी जो वाकुंडें । तो गोपिकांचे रोकडें लोणी खाये ॥२॥
घरां नेऊनियां घालिती भोजन । पंचामृत जाण जेवाविती ॥३॥
एका जनार्दनीं व्यापक तो हरी । गोकुळा माझारीं खेळ खेळे ॥४॥
४२
खेळतसे खेळ सवंगडियांसहित । गोपिकांचे हेत पुरवितसे ॥१॥
जयाचिये चित्तीं जे कांही वासना । तेचि नारायण पुरविणें ॥२॥
जया जैसा हेत पुरवीं तयांचा । विकला काया वाचा भाविकांचा ॥३॥
एका जनार्दनी भाविकांच्या पाठीं । धावें जगजेठी वनोवनीं ॥४॥