४३
गोकुळामाजी कृष्णें नवल केलें । स्त्री आनि भ्रतारा विंदान दाविलें ॥१॥
खेळ मांडिला हो खेळ मांडिला । न कळे ब्रह्मादिकां अगम्य त्याची लीळां वो ॥२॥
एके दिनीं गृहा गेले चक्रपाणी । बैसोनी ओसरी पाहे पाळतोनी लोनी ॥३॥
गौळणी आली घरां म्हणे शारंगपाणी । चोरीचे विंदान पाळती पाहसी मनीं ॥४॥
चोरी करावया जरी येसी सदनीं । कृष्णा धरुनी तुझी शेंडी बांधीन खांबालागुनी ॥५॥
एका जनार्दनीं ऐसे बोले व्रजबाळी । दाविलेंअ लाघव ब्रह्मादिकां न कळे ते काळीं ॥६॥
४४
उठोणि मध्यरात्रीं तेथें आला सांवळा । सुखसेजे पहुडली देखे गोपी बाळा ॥१॥
पती आणि गौळणी एके सेजे पहुडली । बैसोनियां सेजे विपरीत करणी केली ॥२॥
धरुनी गोपी वेणी दाढी पतीची बांधिली । न सुटे ब्रह्मादिकी ऐशी गांठ दिधली ॥३॥
करुनी कारण आले आपुले मंदिरा । यशोदे म्हणे कृष्णा काय केलें सुंदरा ॥४॥
जाहला प्राप्तःकाळ लगबग उठे कामिनी । वोढातसे दाढी जागा झाला तो क्षणीं ॥५॥
कां गे मातलीस दिली दाढी वेणी गांठी । एका जनार्दनीं आण वाहे गोरटी ॥६॥
४५
उभयतां बैसोनि क्रोधें बोलती । कैशीं जाहलीं करणी एकमेक रडतीं ॥१॥
गोदोहन राहिलें दिवस आला दुपारी । धाउनी शेजारी येती पहाती नवलपरी ॥२॥
शस्त्रें घेउनियां ग्रंथीं बळे कपिती । कपितांचि शस्त्रें आन कापें कल्पांतीं ॥३॥
घेऊनियां अग्नि लाविताती दाढी वेणी । न जळेचि वन्ही ऐशी केली कृष्णें करणी ॥४॥
ऐसा समुदाव लक्षावधि मिळाला । बोल बोलती बोला भलतेंचि बरळा ॥५॥
धावूंनिया नंदनारायतें सांगती । एका जनार्दनीं नवल विपरित गती ॥६॥
४६
नंदे आणिविलें उभयंता राजबिंदी । गोवळे आणि गोवळी भोवंतीं जनांची मांदी ॥१॥
येवोनि चावडीये उभयंता रडती । म्हणे नंदराव कैशी कर्मांची गती ॥२॥
अकावरी बैसोनी सांवळा गदगदां हांसें । विंदान दाविले तुज बांधिलें असे ॥३॥
आमुची तूं शेडीं काल बांधीन म्हणसी । न कळे देवाची माव देवें बांधिलें तुजसी ॥४॥
आतां माझी गती कैशीं हरी ते सांगा । करुणाभरीत देखोनि गेलें लागह वेगा ॥५॥
एका जनार्दनी करूणाकर मोक्षदानी । सहज दृष्टी पाहतां सुटली ग्रंथी दोनी ॥६॥
४७
आल्हादयुक्त गोपिका आली आपुलें सदनीं । नंदासहित मोक्षदानी प्रवेशलें भुवनीं ॥१॥
म्हणे यशोदा बा कृष्णा न करी तूं खोडी । बोलती गोपिका वाईट त्या जगझोडी ॥२॥
एका जनार्दनीं माझा अपराध नाहीं । जया जैसा भाव तया तोचि देहीं ॥३॥