मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग पहिला|
अभंग १४९१ ते १५१०

नामपाठ - अभंग १४९१ ते १५१०

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीराम व श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


१४९१

संताचा महिमा देवचि जाणें । देवाची गोडी संतांची पुसणें ॥१॥

ऐसी आवडी एकमेकां । परस्परें नोहे सुटिका ॥२॥

बहुत रंग उदक एक । यापरी देव संत दोन्ही देख ॥३॥

संताविण देवा न कंठे घडी । उभयतां गोडी एक असे ॥४॥

मागें पुढें नहो कोणी । शरण एका जनार्दनीं ॥५॥

१४९२

देवाचे सोईरे संत रे जाणावें । यापरतें जीवें नाठवी कोणा ॥१॥

पडतां संकट आठवितसे संतां । त्याहुनी वारिता नाहीं दुजा ॥२॥

म्हणोनि घरटी फिरे तया गांवीं । सुदर्शनादि मिरवी आयुधें हातीं ॥३॥

लाडिकें डिंगर वैष्णव ते साचे । एका जनार्दनीं त्याचें वंदी पाय ॥४॥

१४९३

संत देवाचा लाडका । देव तेणें केला बोडका ॥१॥

अर्थ पाहतां सखोल असे । बोडका देव पंढरी वसे ॥२॥

संत लाडका देव बोडका । म्हणे जनार्दन लाडका एका ॥३॥

१४९४

पंढरीये देव आला । संतभारें तो वेष्टिला ॥१॥

गुळासवें गोडी जैसी । देवासंगें दाटी तैसी ॥२॥

झालें दोघां एकचित्त । म्हणोनि उभाचि तिष्ठत ॥३॥

एका जनार्दनीं भाव । संतापायीं ठेविला जीव ॥४॥

१४९५

पुंडलिक संत भला । तेणें उद्धार जगाचा केला ॥१॥

तयाचे वंदावें चरण । कायावाचामनें करुन ॥२॥

उपाधिसंग तुटती व्याधी । एका जनार्दनीं समाधी ॥३॥

१४९६

अंकिला देव संतद्वारीं । भिक्षा मागें तो निर्धारीं ॥१॥

मज द्याहो प्रेमभिक्षा । देव बोले तया प्रत्यक्षा ॥२॥

नाम गाणें हेंचि दक्ष । एका जनार्दनीं प्रत्यक्ष ॥३॥

१४९७

संतचरणरज वंदुनीं तत्त्वतां । सायुज्य भक्ति माथां पाय देऊं ॥१॥

थोरीव थोरीव संतांची थोरीव । आणिक वैभव कांही नेणें ॥२॥

संतापरतें दैवत नाहीं जया चित्तीं । तोचि एकपुर्णस्थिति ब्रह्माज्ञानीं ॥३॥

संत तोचि देव जयांची वासना । एका जनार्दनीं भावना नाहीं दुजीं ॥४॥

१४९८

उघड बोलती संत । जैसा हेत पुरविती ॥१॥

मनीचें जाणती ते सदा । होऊं नेदी विषयबाधा ॥२॥

अज्ञान सज्ञान । तारिती कृपें करुन ॥३॥

संतापायें ज्याचा भाव । तेथें प्रवटेचि देव ॥४॥

एका जनार्दनींबरा । द्यावा मज तेथें थारा ॥५॥

१४९९

अभक्तां देव कंटाळती । परी सरते करीतीं तंव त्या ॥१॥

म्हणोनि महिमा त्यांचा जगीं । वागविती अंगीं सामर्थ्य ॥२॥

तंत्र मंत्रा नोहे बळ । भक्ति प्रेमळ पाहिजे ॥३॥

आगमानिगमाचा पसारा । उगाचि भारा चिंध्यांचा ॥४॥

वेदशास्त्रांची घोकणी । ती तो कहाणी जुनाट ॥५॥

पुरातन वाटा असती बहु । त्या त्या न घेऊं यामाजी ॥६॥

एका जनार्दनीं सोपा मार्ग । संतसंग चोखडा ॥७॥

१५००

उदार संत एक जगीं । वागवितीं अंगीं सामर्थ्य ॥१॥

काय महिमा वर्णू दीन । पातकीं पावन करिती जगीं ॥२॥

अधम आणि पापराशी । दरुशनें त्यांसी उद्धार ॥३॥

लागत त्यांच्या चरणकमळीं । पापतांपां होय होळी ॥४॥

एका जनार्दनीं भेटतां । हरे संसाराची चिंता ॥५॥

१५०१

संत कृपाळुं उदार । ब्रह्मादिकां न कळे पार ॥१॥

काय वानूं मी पामर । थकले सहा अठरा चार ॥२॥

नेति नेति शब्दें । श्रुति विरालिये आनंदें ॥३॥

एका जनार्दनीं शरण । धरा माझी आठवण ॥४॥

१५०२

स्वर्ग जयाची पायरी । मोक्ष ज्यांचा आज्ञाधारीं ॥१॥

ऐसा संतांचा महिमा । पायवणी ये शिवब्रह्मा ॥२॥

ब्रह्माज्ञानाची ती मात । कोण तया तेथें पुसत ॥३॥

भुक्ति मुक्ति लोटांगणी शरण एका जनार्दनीं ॥४॥

१५०३

मोक्षमुक्ति काकुलती । संतांप्रती येताती ॥१॥

करा माझा अंगिकार । नाहीं थार तुम्हांवीण ॥२॥

हेंचि द्यावें आम्हांलागुनी । तुमचें चरणीं वास सदा ॥३॥

एका जनार्दनीं करी विनंती । कींव भकिती संतांप्रती ॥४॥

१५०४

घालितां संतापायीं मिठी । पुर्वज वैकुंठी उद्धरती ॥१॥

ऐसा संतांचा महिमा । वानुं न शके शिवब्रह्मा ॥२॥

इच्छिलें तें फळ । जन पावती सकळ ॥३॥

एका जनार्दनीं विश्वास । संत दासांचा मी दास ॥४॥

१५०५

संतचरणींचा महिमा । कांहीं न कळें आगमां निगमां ॥१॥

ब्रह्मा घाले लोटांगण । विष्णु वंदितो आपण ॥२॥

शिव ध्यातो पायवणी । धन्य धन्य संतजनीं ॥३॥

तया संतांचा सांगात । एका जनार्दन निवांत ॥४॥

१५०६

संतसंगत घडे । सायुज्यता जोडे ॥१॥

मुक्ति लागती चरणीं । ब्रह्माज्ञान लोटांगणीं ॥२॥

एका जनार्दनीं सांगात । घडतां होय देहातीत ॥३॥

१५०७

पहातां संतसमुदाय । भुक्ति मुक्ति तेथें देव ॥१॥

जातां लोटांगणीं भावें । ब्रह्माज्ञान अंगं पावें ॥२॥

तयाचे उच्छिष्टाचा कण । शरण एका जनार्दन ॥३॥

१५०८

संतदरुशनें लाभ होय । ऐसा आहे अनुभव ॥१॥

पुराणीं महिमा सांगें व्यास । संतदया सर्वांस सारखी ॥२॥

यातिकुळ हो कां भलतें । करिती सरते सर्वांसी ॥३॥

एका जनार्दनीं शरण । संतमहिमान वेगळें ॥४॥

१५०९

जें सुख संतसज्जनाचे पायीं । तें सुख नाहीं आणिके ठायी ॥१॥

तुकितां या सुखाचेनी तुके । पैं वैकुंठ जाले फिकें ॥२॥

पाहोंजातां लोकीं तिहीं । ऐसें न देखें आणिकें ठायीं ॥३॥

नवल या सुखाची गोडी । हरिहर ब्रह्मा घालिती उडी ॥४॥

क्षीरसागर सांडोनी पाही । अंगें धांवे शेषशाई ॥५॥

एका जनार्दनीं जाली भेटीं । सुख संतोषा पडली मिठी ॥६॥

१५१०

सुख अपार संतसंगीं । दुजें अंगीं न दिसे कोठे ॥१॥

बहु सुख बहुता परी । येथेंची सई नसेची ॥२॥

स्त्रिया पुत्र धन सुख । नाशिवंत देख शेवटीं ॥३॥

एका जनार्दनीं संतसुखा । नोहे लेखा ब्रह्मांडी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP