५८१
घेऊनि मौनपणाचा वेष । उभा सावकाश विटेवरी ॥१॥
न बोलेचि कोना न बैसेचि खालीं । पुरानें वेडावलीं अष्टादाश ॥२॥
भागलीं दर्शनें शास्त्रे वेवादितां । मतितार्थ पुरता न कळे तयां ॥३॥
शेष जाणूं गेला तोही मौनावला । वेदादिकां अबोला पडोनि ठाके ॥४॥
संगतीं संताचे भुलोनिया उभा । एक जनार्दनी शोभा न वर्णवे ॥५॥
५८२
पाउले गोजिरीं ध्यान विटे मिरवले । शोभते तान्हुले यशोदचे ॥१॥
न कळे पुरणां शास्त्रादि साम्यता ॥ तो हरी तत्त्वतां पढरीये ॥२॥
एका जनार्दनीं ऐक्यरुप होऊनी । भक्तांची आयणी पुरवितसे ॥३॥
५८३
परा ही पश्यंती मध्यमा वैखरी । वसे तो श्रीहरी पंढरीये देखा ॥१॥
चारी वाच तय सदोदित गती । पुराणें भाडती अहोरात्र ॥२॥
वेद श्रुति नेति नेति म्हणताती । तो पुडंलिकापुढें प्रीती उभा असे ॥३॥
सनकसनंदन जयासी पै ध्याती । तो हरी बाळमूर्ति खेळतसे ॥४॥
योगियां ह्रुदयींचे ठेवणें सर्वथा । एक जनार्दनीं तत्त्वतां वोळखिलें ॥५॥
५८४
परेहुनि परता वैखरिये कानडा । विठ्ठल उघडा भीतातटीं ॥१॥
शिणली दरुशनें भागली पुराणें । शास्त्राचियें अनुमानें न ये दृष्टी ॥२॥
नेति नेति शब्दे श्रुती अनुवादती । ते हे विठ्ठलामुर्ति विटेवरी ॥३॥
एका जनार्दनीं चहू वाचां वेगळा । तेणें मज चाळा लावियेला ॥४॥
५८५
योगियांचा योग साधन तें सांग । तो पांडुरंग विटेवरी ॥१॥
मुमुक्ष संपदा ज्ञानीयाचा बांधा । तो पांडुरंग विटेवरी ॥२॥
सच्चिदानंदघन अमुर्त मधुसुदन । एका जनार्दन विटेवरी ॥३॥
५८६
कर्मी कर्मठपणा धर्मीं धर्मिष्ठपणा । हीं दोन्हीं अनुसंधानें चुकती जगीं ॥१॥
कर्माचें जें कर्म धर्माचा अधिधर्म । तो हा सर्वोत्तम विटेवरी ॥२॥
निगमांचे निजसार अगमाचे भांडार । न कळे ज्याचा पार वेदशास्त्रां ॥३॥
एका जनार्दनीं श्रुतीसी नाकळे । तो भक्तिबळें उभा विटे ॥४॥
५८७
जगासी भुलवणा भाविकांचे मन । तो जनार्दन विटेवरी ॥१॥
कामारी कामारी ऋद्धिसिद्धि घरीं । तो परमात्मा श्रीहरीं विटेवरी ॥२॥
सनकसनंदन सगुण निर्गुणाचे गुण । एका जनार्दनीं विटेवरी ॥४॥
५८८
सिद्धि साधक जया ह्रुदयीं ध्याती । तो गोपिकेचा पती विठ्ठलराव ॥१॥
सांवळे सांवळें रुप तें सांवळें । देखितांचि डोळे प्रेमयुक्त ॥२॥
जीवांचें जीवन मनांचे उन्मन । चैतन्यघन पूर्ण विटेवरी ॥३॥
एका जनार्दनीं आनंद अद्वय । न कळें त्यांची सोय ब्रह्मादिकां ॥४॥
५८९
ध्यानाचे ध्यान ज्ञानाचें ज्ञान । ते सम चरण विटेवरी ॥१॥
भावाचा तो भाव देवाचा तो देव । वैकुंठीचा राव विटेवरी ॥२॥
कामाचा तो काम योगियां विश्राम । धामाचा तो धाम विटेवरी ॥३॥
वैराग्याचे वैराग्य मुक्तांचे माह्गेर । तो देव सर्वेश्वर विटेवरी ॥४॥
भोळीयाचा भोळा ज्ञानीयाचा डोळा । एका जनार्दनीं सोहळा विटेवरी ॥५॥
५९०
सप्त दिन जेणें गोवर्धन धरिला । काळिया नाथिला देउनी पाय ॥१॥
तो हा गोपवेषें आला पंढरपुर । भक्त समाचारा विठ्ठल देवो ॥२॥
बाळपणीं जेणें पूतनें शोषिले । अघ बघ मारिलें खेळे खेळ ॥३॥
कंसचाणुराचा करुनियां घात । केला मथुरानाथ उग्रसेन ॥४॥
समुद्राचे तटी द्वारके उभाविलें । सोळा सहस्त्र केलें कुटुबांसी ॥५॥
धर्माचीयें घरी उच्छिष्ट काढिलें । दृष्टा त्या वधिलें कौरवांसी ॥६॥
एका जनार्दनीं ऐशी बाळलीला । खेळ खेळोनी वेगळा पंढरीये ॥७॥