मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग पहिला|
अभंग १५११ ते १५३०

नामपाठ - अभंग १५११ ते १५३०

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीराम व श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


१५११

संतसुखा नाहीं पार । तेणें आनंद पैं थोर ॥१॥

ऐशी सुखाची वसती । सनकादिक जया गाती ॥२॥

सुखें सुख अनुभव । सुखें नाचतसे देव ॥३॥

तया सुखाची वसती । एका जनार्दनीं ध्यातसे चिंत्तीं ॥४॥

१५१२

अमृता उणें आणिता संतजन । नाम अमृत खूण पाजिताती ॥१॥

नाशिवंत यासी अमृत उपकार । अनाशिवंता नामामृतसार ॥२॥

नाशिवंत देह नाशिवंत जीव । नाशिवंत ठाव जगडंबर ॥३॥

एका जनार्दनीं संताचिये दृष्टी । नाशिवंत सृष्टी सजीव होती ॥४॥

१५१३

संत ते सोयरे जिवलग सांगाती । भेटतां पुरती सर्व काम ॥१॥

कामधेनु कल्पतरु चिंतामणी । उदार चुडामणी याहुनी संत ॥२॥

देऊं परिसाची यासी उपमा । परी ते अये समा संताचिये ॥३॥

एका जनार्दनीं संतांचा सांगात । पुरती सर्व आर्त जीवींचें जें ॥४॥

१५१४

जे या नेले संता शरण । जन्ममरण चुकलें त्या ॥१॥

मागां बहुतां अनुभव आला । पुढेंहि देखिला प्रत्यक्ष ॥२॥

महापापी मूढ जन । जाहले पावन दरुशनें ॥३॥

एका जनार्दनीं संत । कॄपावंत दयाळू ॥४॥

१५१५

मागें संतीं उपकार । केला फार न वर्णवें ॥१॥

पाप ताप दैन्य गेलें । सिद्धची जाहले सर्वमार्ग ॥२॥

दुणा थाव आला पोटीं । संतभेटी होतांची ॥३॥

शरण एका जनार्दनीं । पावन जनीं संत ते ॥४॥

१५१६

संतांचा उपकार । सांगावया नाहीं पार ॥१॥

आपणासारिखें करिती । यातिकुळ नाहीं चित्तीं ।२॥

दया अंतरांत वसे । दुजेपणा तेथें नसे ॥३॥

उदारपणें उदार । एका जनार्दनीं निर्धार ॥४॥

१५१७

भाग्यवंत संत होती । दीन पतीत तारिती ॥१॥

नाहीं तया भाग्या पार । काय पामर मी बहूं ॥२॥

चुकविता जन्म जरा । संसारा यापासोनी ॥३॥

एका जनार्दनीं शरण । पतीतपावन संत तें ॥४॥

१५१८

भाग्यवंत होती संत । दीन पतीत तारिती ॥१॥

उपदेश विठ्ठल मंत्र । देती सर्वत्र सारिखा ॥२॥

स्त्रिया शुद्र अथवा बाळें । कृपा कल्लोळे एकचि ॥३॥

एका जनार्दनीं शरण । पतीतपावन संत होती ॥४॥

१५१९

संतांचे संगती । पाप नुरे तें कल्पांती ॥१॥

ऐसा संतांचा महिमा । नाहीं द्यावया उपमा ॥२॥

तीर्थ व्रत जप दान । अवघें टाका वोवाळुन ॥३॥

संतचरणींचे रजःकण । वंदी एका जनार्दन ॥४॥

१५२०

संतचरणीचें रजःकण । तेणें तिन्हीं देव पावन ॥१॥

ऐसा महिमा ज्याची थोरी । वेद गर्जें परोपरी ॥२॥

शास्त्रें पुराणें सांगत । दरुशनें प्राणी होती मुक्त ॥३॥

शरण एका जनार्दनीं । ठाव द्यावा संतचरणीं ॥४॥

१५२१

संतचरणीं आलिंगन । ब्रह्माज्ञानी होती पावन ॥१॥

इतर सहज उद्धरती । वाचे गातां ज्यांची कीर्ति ॥२॥

लाभे लाभ संतचरणीं । मोक्षसुख वंदी पायवणीं ॥३॥

शरण एका जनार्दनीं । उदार संत त्रिभुवनीं ॥४॥

१५२२

संताचें चरण ध्यातां । हारपली जन्मव्यथा ॥१॥

पुढती मरणाचें पेणें । चुकती जन्मजरा तेणें ॥२॥

संतसमुदाय दृष्टी । पडतां लाभ होय कोटी ॥३॥

शरण एका जनार्दनीं । काया कुर्वडीं संतचरणीं ॥४॥

१५२३

संतांच्या दरुशनें । तुटे जन्ममरण पेणें ॥१॥

ऐसा संतांचा महिमा । बोलतां नाहीं वो उपमा ॥२॥

तीर्थ पर्वकाळ यज्ञ दान । संतचरणीं होती पावन ॥३॥

शरण एका जनार्दनीं । संत पावन इये जनीं ॥४॥

१५२४

अपार महिमा संतांचा । काय बोलुं मी वाचा ॥१॥

मागें तरले पुढें तरती । जदजीवा उद्धरती ॥२॥

नाममात्रा रसायन । देउनी तारिती संतजन ॥३॥

ऐशा संतां शरण जाऊं । एका जनार्दनीं ध्याऊं ॥४॥

१५२५

संत दयाळ दयाळ । अंतरीं होताती प्रेमळ ॥१॥

शरण आलियासी पाठीं । पहाताती कृपादृष्टी ॥२॥

देउनियां रसायना । तारिताती भवार्णव जाणा ॥३॥

संतांसी शरण जावें । एका जनार्दनीं त्यांसी गावें ॥४॥

१५२६

संत श्रेष्ठ संत श्रेष्ठ । पातकी नष्ट तारिती ॥१॥

ऐसा आहे अनुभव । पुराणीं पहाहो निर्वाहो ॥२॥

वेद शास्त्र देती ग्वाही । संत श्रेष्ठा सर्वा ठायीं ॥३॥

एका जनार्दनीं संत । ब्रह्मादिकां न कळे अंत ॥४॥

१५२७

धन्य धन्य जगीं संत । कृपावंत दीनबंधु ॥१॥

कृपादृष्टी अवलोकितां । परिपुर्ण समदृष्टी ॥२॥

अगाधा देणेंऐसें आहे । कल्पातीं हें न सरेची ॥३॥

एका जनार्दनींचित्त । जडो हेत त्या ठायीं ॥४॥

१५२८

तुटती बंधनें संतांच्या दारुशनें । केलें तें पावन जगीं बहु ॥१॥

महा पापराशी तारिलें अपार । न कळे त्यांचा पार वेदशास्त्रां ॥२॥

वाल्मिकादि दोषी तारिलें अनुग्रही । पाप तेथें नाहीं संत जेथें ॥३॥

पापताप दैन्य गेलें देशांतरीं । एका जनार्दनीं निर्धारी सत्य सत्य ॥४॥

१५२९

उदापरणें संत भले । पापीं उद्धरिलें तात्काळ ॥१॥

ऐसे भावें येतां शरण । देणें पेणें वैकुंठ ॥२॥

ऐसें उदार त्रिभुवनीं । संतावांचुनीं कोण दुजें ॥३॥

एका जनार्दनीं शरण । संत पतीतपावन ॥४॥

१५३०

पतीतपावन केलें असें संतीं । पुराणीं ती ख्याती वर्णियेली ॥१॥

सदोषी अदोषी तारिलें अपार । हाचि बडिवार धन्य जगीं ॥२॥

नाना वर्ण याती उत्तम चांडाळ । उद्धरिलें सकळ नाममात्रें ॥३॥

एका जनार्दनीं दयेचें सागर । संतकृपा धीर समुद्र ते ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP