मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग पहिला|
अभंग ४४१ ते ४५०

पंढरी माहात्म्य - अभंग ४४१ ते ४५०

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


४४१

श्रीमुखाचें सुख पाहतां पाहतां । नयन तत्त्वतां वेधलें माझें ॥१॥

सांवळां सुंदर कटीं ठेवुनीं कर । रुप तें नगर भीमातीरीं ॥२॥

नित्य परमानंद आनंद सोहळा । सनकादिक या स्थळीं येती जातीं ॥३॥

वैष्णवांचा थाट टाळ घोळ नाद । दिंड्या मकरंद हर्ष बहु ॥४॥

सन्मुख ती भीमा वाहे अमृतमय नीर । जडजीवां उद्धार स्नानमात्रें ॥५॥

एक जनार्दनीं मुक्तांचे माहेर । क्षेत्र तें साचार पंढरपूर ॥६॥

४४२

देहनिशा क्रमोनि मी तंव आलिये । इहीं वैष्णवीं आणिलें पंढरीये ॥१॥

बाई वो मन ध्यान लागलें पंढरीचे । तें तंव जागृती स्वप्नी नवचे ॥२॥

नयन नाच्ती सुखाचा हा गोंधळू । साचे सन्मुख देखोनि श्रीविठ्ठल ॥३॥

आनंदु आसमाय होतीं मना पोटीं । नवल वालभों विठ्ठली जालीं भेटीं ॥४॥

मी आन न देखें वो नाइकें काणीं । ठासा ठसावला अभिन्नपणीं वो ॥५॥

जनीं न संता संचारू जाला देखा । एका जनार्दनीं धरिला एकी एका वो ॥६॥

४४३

सारुनी दृश्य देखतां जालीसे ऐक्याता । पाहे कृष्णनाथा पंढरीये ॥१॥

कर ठेउनी कंटीं बुंथी वाळुवंटीं । वैजयंती कंठीं आती माझी ॥२॥

एका जनार्दनींशरण त्याची कृपा पूर्ण । पाहतां पाहतां मन हारपालें ॥३॥

४४४

तेथें मुख्य हरिहर । शोभे चंद्रभागा तीर ॥१॥

जाऊं चला पंढरपुर । भेटुं आपल्या माहेरा ॥२॥

आर्त सांगुं जीवींचा । पुनीत ठाव हाचि साचा ॥३॥

हरिहरां होय भेटीं । वास तयांसी वैकुंठीं ॥४॥

एका जनर्दनीं शरण । पंढरी पुण्यठाव भीवरा जाण ॥५॥

४४५

साधन तें सार पंढरीचीवारी । आन तुं न करी सायासाचें ॥१॥

वेद तो घोकितां चढे अभिमान नाडेल तेणें जाण साधन तें ॥२॥

शास्त्रमतवाद कासया पसार । करी सारासार वारी एक ॥३॥

पुराण सांगतां मन वेडावलें । निंदुं जें लागलें आणिकांसी ॥४॥

ग्रंथ पाहावें तरी आयुष्य क्षणीक । व्यर्थ खटपट करुनी काई ॥५॥

एका जनार्दनीं सारांचे पैं सार । विठ्ठल त्रिअक्षर जप करी ॥६॥

४४६

उदंड तीर्थे पृथ्वींच्या ठायीं । ऐसा महिमा नाही कोणें जागीं ॥१॥

तया पुंडलीकें आम्हा सोपें केलें । परब्रह्य्मा उभे ठेलें विटेवरी ॥२॥

भुवैकुंठ पंढरी क्षेत्र । पवित्रा पवित्र उत्तम हें ॥३॥

म्हनोनी करा करा लाहें । एकदां जा हो पंढरीये ॥४॥

एका आगळें अक्षर । एका जनार्दनी निर्धार ॥५॥

४४७

काशी क्षेत्र श्रेष्ठ सर्वांत पवित्र । परी तेथें वेंचे जीवित्व श्रेष्ठ तेव्हा ॥१॥

तैसी नोहे जाण पंढरी हे । पेठ वैकुंठा वैकुंठ जुनाट हें ॥२॥

न लगें वेंचणें धन वित्त जीव । मुख्य एक भाव पुरे येथें ॥३॥

दरुशनें मुक्ति प्राणिया सर्वथा । चुकती नाना चळता पापांचिया ॥४॥

एका जनार्दनीं पंढरीसी जा रे । प्रेमसुख मागा रे विठ्ठल देवा ॥५॥

४४८

सप्तपुर्‍या क्षेत्र पवित्र सोपार । तयांमांजी श्रेष्ठ पंढरपुर ॥१॥

जा रे आधीं तया ठाया । जेथें वास वैकुंठराया ॥२॥

पुंडलिकांचे दारुशनें । तुटती प्राणीयांची बंधनें ॥३॥

स्नान करितां भीमेसी । पुर्वज उद्धरई सरसी ॥४॥

एका जनार्दनीं पावन । देव क्षेत्र तीर्थ उत्तम जाण ॥५॥

४४९

उत्तम स्थळ पंढरी देखा । उभा सखां विठ्ठल ॥१॥

एकदां जा रे तये ठायीं । प्रेमा उणें मग काई ॥२॥

भाग्य जोडले सर्व हातां । त्रैलोकीं सत्ता होईल ॥३॥

मोक्षामुक्ती तुम्हीपुढें । दास्यत्व घडे तयांसी ॥४॥

एका जनार्दनीं त्याचे भेटी । सुखसंतोषा पडेल मिठी ॥५॥

४५०

एकदां जारे तेथवरी । पहा पुंडलीक हरी ॥१॥

जन्मा आलीया विश्रांती । निरसेल अवधी भ्रांती ॥२॥

विठ्ठलपायीं ठेवा भाळ । जन्म मग तुमचा सुफळ ॥३॥

पुंडलीकां नमस्कार । विनवणी जोडीन कर ॥४॥

म्हणे एका जनार्दनीं । पंढरी पुण्याची अवनी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP