१७७१
संतद्वारी कुतरा जालों । प्रेमरसासी सोकलों ॥१॥
भुंकत भुंकत द्वारां आलों । ज्ञान थारोळ्या बैसलों ॥२॥
कुतरा भुंकत आला हिता । संतीं हात ठेविला माथां ॥३॥
कुतर्या गळ्यांची सांखळी । केली संतानी मोकळी ॥४॥
एका जनार्दनीं कुतरा । दांत पाडुनी केला बोथरा ॥५॥
१७७२
मनाची तो खुटलीं गती । संत संगती घडतांचि ॥१॥
बहु जन्मांचा तो लाग । फीटला पांग जन्मोजन्मीं ॥२॥
कृतकृत्य थोर जाहलों । सुखें पावलों इच्छित ॥३॥
एका जनार्दनीं चित्त । जाहलें निवांत ते ठायीं ॥४॥
१७७३
जीवेंभावें जाहलों दास । नाहीं आस संसारा ॥१॥
नाशिवंता पाठीं धांवे । कोन हावे भोगील ॥२॥
जन्मजरामरण फेरा । या संसारा आंचवलों ॥३॥
जाहला संतसमागम । भवभ्रम फिटला ॥४॥
एका जनार्दनीं काम । मन जाहलें तें निष्काम ॥५॥
१७७४
माझे मनीं आनंद जाहला । बोलतां बोला नवजाय ॥१॥
एक संत जाणती खुण । येरा महिमान न कळे ॥२॥
हृदयींच उदय दिसे । लाविलें पिसे देवानें ॥३॥
शरण एका जनार्दनीं । करी विनवणी सलगीनें ॥४॥
१७७५
आजी नवल झालें वो माय । पाहण्या पाहण्या पाहणें दृष्टी धाये ॥१॥
ऐसा लाघवी सुखकर मूर्ती । संतसंगे जाली मज विश्रांती ॥२॥
योगीश्वर जया चिंतिती । सनकादिक जया ध्याती ॥३॥
योग साधनें नातुडे जो माये । एका जनार्दनीं कीर्तनीं नाचतु आहे ॥४॥
१७७६
संगती बावनाचें रावलों सर्व भावें । चंदन होऊनी सवें ठेलों मी वो ॥१॥
वेधिला जीव माझा संतचरणीं । आन दुजें मना नाठवेचि स्वप्नी ॥२॥
जागृति स्वप्न सुषुप्तीचा ठाव । अवघा देखे देवाधिदेव ॥३॥
पहातां पाहांता मन नाहीसें जालें । एका जनार्दनीं केलें मज ऐसें ॥४॥
१७७०
आम्हांसी ती मुख्य संतसेवा प्रमाण । विठ्ठलकीर्तन वाचें गाऊं ॥१॥
दुजे नेणों स्वप्नीं विठठलवांचुनीं । जनीं मनीं निरंजनीं देखा हेंचि ॥२॥
संताचियां पायीं मस्तक ठेवून । आवडी चरणा विठ्ठलांच्या ॥३॥
एका जानार्दनीं जनार्दन एकपणीं । विठ्ठलां वाचूनीं दुजें नेणों ॥४॥
१७७८
माझी मुख्यं उपासना । लागेन चरणां संतांच्या ॥१॥
भांडवल तें हेंचि देख । भक्तियुक्त उपासना ॥२॥
मन वसो संतापायीं । आर्त ठायी कीर्तनीं ॥३॥
एका जनार्दनीं । विनवणी करीतसे ॥४॥
१७७९
दुजेपणी दृष्टी न घालुं । सर्वा चालु एक सत्ता ॥१॥
हाचि पुर्वीचा संकल्प । निर्विकल्प नाम जपूं ॥२॥
नाहीं काहीं वाटावाटीं । करुं एकवटी मनाची ॥३॥
एका जनार्दनीं उदास । जाहलों दास संतचरणीं ॥४॥
१७८०
भुक्ति मुक्ति कारणें तुज न घाली सांकडें । संतासी रोकडे शरण जाऊं ॥१॥
हाचि माझा नेम उपासना भक्ति । आणिक विश्रांती मज नाहीं ॥२॥
एका जनार्दनीं सेवेवाचूनीं । आन नेनें जाण दुजें कांहीं ॥३॥
१७८१
काया वाचा आणि मन । संत चरण प्रमाण ॥१॥
ऐसें चालत आलें मागें । तया वाउगेंक कोण करीं ॥२॥
उपासना मार्ग आधीं । भाविकांसी ती समाधी ॥३॥
एका जनार्दनीं आस । आहे पायांस दास्यत्वें ॥४॥
१७८२
वैष्णवा भुषण मुद्रांचें श्रृंगार । तुळशी परिकर वाहती कंठीं ॥१॥
तयांचियां पायीं माझा दंडवत । सदा जे जपत नाम मुखीं ॥२॥
आसनीं शयनीं भोजनीं नित्यता । स्मरणी जे तत्त्वतां रामनाम ॥३॥
पुण्यपावन देह जन्माचें सार्थक । एका जनार्दनीं कौतुक त्याचे मज ॥४॥
१७८३
धन्य धन्य भुमंडळी । वैष्णव बळीं वीर गाढें ॥१॥
कळिकाळाचे न चले बळ । नामें सबळ वज्रकवची ॥२॥
विठ्ठल देव पाठी उभा । तेथे लाभा काय उणें ॥३॥
एका जानर्दनीं मुक्ती । तेथें दास्यत्व करिती ॥४॥
१७८४
पैलनामें गर्जती वीर । हरीचे डिंगर लाडके ॥१॥
धन्य धन्य ते वैष्णव । सदा नामस्मरणीं जीव ॥२॥
महा वैष्णव निवृत्ती । नाम जपतां ह्य शांती ॥३॥
धन्य धन्य ज्ञानदेव । पातकी तारियेले जीव ॥४॥
धन्य सोपानदेव । म्हणता कळिकाळाचे नाहीं भेव ॥५॥
धन्य धन्य मुक्तबाई । एका जनार्दनीं वंदी पायीं ॥६॥
१७८५
जयाचियें द्वारी तुळशीवृंदावन । धन्य तें सदन वैष्णावांचे ॥१॥
उत्तम चांडाळ अथवा सुशीळ । पावन सकळ वैकुंठी होती ॥२॥
जयांचिया मळां तुळशीमाळा । यम पदकामळा वंदी त्याच्या ॥३॥
गोपीचंदन उटाई जयाचिया अंगीं । प्रत्यक्ष देव जगें तोचि धन्य ॥४॥
एका जनार्दनीं तयाच सांगात । जन्मोजन्मी प्राप्त हो कां मज ॥५॥
१७८६
जीवा शिवा एकपण । तुमचा चरणांचे महिमान ॥१॥
गेलें अज्ञान हारपोनी । लाविलें तें आपुलें ध्यानीं ॥२॥
कर्म धर्म पारुषले । अवघे जाहले परब्रह्मा ॥३॥
उगविली गोंवागुतीं । एका जनार्दनीं प्रचीती ॥४॥
१७८७
ऐकोनि संतकीर्ति । मना जालीसे विश्रांती । नाहीं पुनरावृत्ती । जन्माची तया ॥१॥
धन्य धन्य संतजन । मज केलें वो पावन । विश्रांतीचें स्थान । हृदयीं माझ्या ठसविलें ॥२॥
बहु जाचलों संसारें । बहु जन्म केले फेरे । ते चुकविले सारे । आजी कृपा करुनी ॥३॥
शरण एका जनार्दनीं । माझें हरिलें मीपण । तुम्हीं कृपा करुन । अभय वर दिधला ॥४॥
१७८८
जडजीवासी उद्धार । करावयासी निर्धार ॥१॥
पापी दोषी जैसे तैसे । लाविलें कांसे अपुलिया ॥२॥
जया जें जें गोड लागें । तें तें अंगेंक देताती ॥३॥
एका जनार्दनीं शरण । शरणागता नाही न्युन ॥४॥
१७८९
संताचिया माथां चरणांवरी माझा । देहीं भाव दुजा नाहीं नाहीं ॥१॥
नामांचे चिंतन करिती सर्व काळ । ते माझे केवळ मायबाप ॥२॥
मायबाप म्हणो तरी लाजिरवाणें । चुकविलें पेणे संतजनीं ॥३॥
ज्या ज्या जन्मा जावें मायबाप दोन्हीं । परी संतजन निर्वाणी मिळतीना ॥४॥
येचि देहीं डोलां संताची देखिलें । एका जनार्दनीं वंदिलें चरण त्यांचे ॥५॥
१७९०
धर्माचें वाट मोडे । अधर्माची शीग चढे । तैं आम्हां येणें घडे । संसारस्थिती ॥१॥
आम्हां कां ससारा येणें । हरिभक्ति नामस्मरणें । जडजीव उद्धरणें । नामस्मरणें करुनी ॥२॥
सर्व कर्म ब्रह्मास्थिती । प्रतिपादाव्या वेदोक्ती । हेंचि एक निश्चिती । कारण आम्हां ॥३॥
नाना मतें पाषांड । कर्मठता अति बंड । तयाचें ठेंगणें तोंड । हरिभजनें ॥४॥
विश्वरुप सृष्टी । अर्जुना दाविली दृष्टी । भिन्नं भेदाची गोष्टी । बोलुं नये ॥५॥
एका जनार्दनीं । धरिती भेद मनीं । दुर्हावले येथुनी । निंदक जाण ॥६॥
१७९१
संतांचा विभुती । धर्मालागीं अवतरती ॥१॥
धर्मरक्षणाकारणें । साधु होताती अवतीर्ण ॥२॥
जगा लावावें संप्तर्थीं । हेंचि साधुचि पैं कृती ॥३॥
एका जनार्दनीं साधु । हृदयीं वसे ब्रह्मानदु ॥४॥