१८२
खेळसी टिपर्या घाईं रे । वाचे हरिनाम गाई रे । टिपरीस टिपरी चुकुं जातां भाई । पडसी यमाच्या घाई रे ॥१॥
सहा चार अठरा गड्यांचा मेळा रे । टिपरीयांचा खेळ खेळा रे । एका खेळा दोन्हीं गुतला । यमाजी घालीला डोळा रे ॥२॥
वायं खेळ खेळतीसी बाळा रे । सावध होई पाहें डोला रे । एक एका जनार्दनी शरण जातां । चुकशील कळिकाळारे ॥३॥
१८३
अनुहत टिपरी घाई खेळ जाणें तो भाई रे । खोटा खेळ खेळोनि काय स्वतः अनुभव घेई रे ॥ धृ॥
मत्स्येद्रं कुळीं एक गोरख जाला । तो बहुत खेळ खेळला रे । पवन साधुनि अष्टांग योगे तेणेंचि बळें मातला रे ।
खेचरीं भूचरीं चाचरी धरुनीं अगोचरी मिळाली रे । गोल्हाट योग साधुनि तेणें काळ तो जिंकुनि गेला रे ॥१॥
निवृत्तिचा पोर एक ज्ञाना जाण तो खेळियामाजी शहाणा रे । कवित्व केला प्रकाश मातला प्रवृत्ति गाळिलें घाणा रे ।
असोनि भेला नसोनि गेला काळ केला आंकणा रे । भले भले गडी मिळाविले तेणें अकाय सांगु कवणा रे ॥२॥
जनार्दनाची सात पाँच पोरें त्यामाजी लाडका येका रे । एकही साधन न करी परी तो बळेचि मातला फुका रे ।
आपपर देही कांहींच नेणें रायासी म्हणे तो रंका रे । भलेंभले गडी मेळवोनि तेनें खेळ दाविला असका रे ॥३॥
तिघा जिणांचें खेळणें जालें चवर्थे एक उठविलें रे । अनन्यभावें सदगुरुचरणीं गुरुसी शरण गेलें रे ।
भवासी न भ्यालं कळलें म्हणोनि तिघांचि समान जालें रे । आपण जैसें पुर्ण तैसें एका जनार्दनी केलें रे ॥४॥