मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
उपसंहार

क्रीडा खंड - उपसंहार

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(भुजंगप्रयात)

असे आर्य भूमी जगीं या पुनीत ।

महाराष्ट्र आहे तियेचाच प्रांत ॥

तयाचा असे हा पुणें एक भाग ।

तयाचा असे पौड नामैक भाग ॥१॥

(शार्दूलविक्रीडित)

आंबेगांव असे समीप लघुसें खेडें तिथें मी असें ।

जावी वेळ कशी मला पडतसे कोडें विवेकें असें ॥

हें कोडें उकली प्रभू गणपती देऊन स्फूर्ती अशी ।

सेवा ही करवी कवित्व करुनी वेळेस योजी अशी ॥२॥

(ओवी)

येथें आरंभीं काव्यास । शके सत्तावन दिवस ।

चैत्रशुद्ध प्रतिपदेस । गुरुवार योजिला साक्षेपें ॥३॥

परम पवित्र पवनातीरास । संपूर्ण झालें चिंचवड क्षेत्रास ।

मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेस । अठराशें अठ्ठावन भानुवारीं ॥४॥

सकल देवांमाजी गणपती । कार्यारंभीं त्यास पूजिती ।

निर्विघ्नपणें कार्यपूर्ती । करी म्हणूनी आद्यपूजा ॥५॥

यासाठीं करावें गणेशपूजन । दूर्वा शमी ताम्रसुमन ।

अनन्य भक्तीनें समर्पून । नित्य पूजन करावें ॥६॥

भक्त-प्रिय गजानन । भक्त-संकट निरसून ।

भक्‍तालागीं प्रसन्न होऊन । रक्षी सर्वदा ॥७॥

(गीति)

पहिला प्रणाम कविचा, गणपति आणी सरस्वती माता ।

दुसरा प्रणाम सूता, तिसरा निर्मी जगास त्या ताता ॥८॥

चवथा प्रणाम सविता, प्रणाम पंचम सुवेद निर्माता ।

षष्ठ प्रणाम दत्ता, सप्तम योजी पिता तशी माता ॥९॥

अठवा प्रणाम करितों, विद्या देई म्हणून त्या ताता ।

नववा प्रणाम संतां, दश योजी पंडितांस कवि आतां ॥१०॥

झालें पुराण कवुनी, गणेशचरणीं करीत अर्पण हें ।

सेवावें सुज्ञांनीं, हंसा-सम हें पठोन याचन हें ॥११॥

गणपति-प्रसाद समजुनी, प्रातःस्मरणीं म्हणून हें गावें ।

प्रार्थी कवी जनांना, कथिलें आहे तुम्हांस सद्भावें ॥१२॥

इच्छित सुपूर्ण सेवा, घडली प्रभुच्या कृपेंच समजावी ।

घेई गणेश करुनी, चरणीं याचि सुभक्‍ति मज द्यावी ॥१३॥

कवनें सुमनें आणुनि,करवी माला गणेश आवडिनें ।

अर्पी मम कंठीं ही, बुद्धी सांगे तदार्थ चिन्हांनीं ॥१४॥

झाले पुरे मनोरथ, करवी देवा सुभक्‍तिनें काम ।

याची तव चरणीं कीं, सदैव नांदो मुखीं तुझें नाम ॥१५॥

झालें कार्य पुरें हें, तृप्ती नाहीं अजून हें सत्य ।

सुचवावें कार्य दुजें, तृप्ती व्हावी असेंच सत्कृत्य ॥१६॥

देव गजाननचरणीं, अर्पी कवुनी पुराण हें तुमचें ।

मोरेश्वरसुत सेवक, नमितो बालक पदांस कीं तुमचे ॥१७॥

॥श्रीगजाननार्पणमस्तु॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP