(गीति)
अहिकन्यांनीं नेला, पाताळीं तो त्वरीत मयुरेश ।
वासुकि जनकापाशीं, नेला त्यांनीं धरुन मयुरेश ॥१॥
वासुकि शिरसीं होता, मणि हरिला तो त्वरीत मयुरेशें ।
घेउन जातां त्यावरि, चाल करी शेष क्रुद्ध आवेशें ॥२॥
मयुरें गणेश नमिला, सर्वांचा नाश तो करी खाशा ।
हतवीर्य शेष होतां, स्तविलें भावें करुन त्या ईशा ॥३॥
नंतर विनतासूतां, बंधांतुन मुक्त कीं करी शेष ।
श्येन जटायु तिसरा, संपाती हे प्रमूख अवशेष ॥४॥
विक्रम मयुराकडुनी, करवुन विनता सुतांस मुक्त करी ।
इच्छेपरी तियेच्या, वर्तुन सत्वर गणेश माघारी ॥५॥
भूवर आला तेथुन, राक्षस उदरीं सु-योग निद्रेंत ।
होते मित्र तयांना, उठवुन आणी त्वरीत सदनांत ॥६॥
सदनाचे बाहेरी, करिती बाळें बहूत कल्लोळ ।
तैशींच गृहामाजी, करिती बाळें बहूत कल्लोळ ॥७॥
ऐसें पाहुन मुनिंना, वाटे आश्चर्य तेधवां भारी ।
सांगे विधी कथा ही, व्यासाचें चित्त तें स्वयें हारी ॥८॥