(गीति)
होता चवदा वर्षे, गणपतिला पूर्ण तेधवां व्यास ।
मुनि गौतमादि आले, शिवदर्शन योजुनी पुढें परिसा ॥१॥
पार्वति वदली त्यांना, राक्षसविघ्नास नाहिंसें व्हावें ।
ऐसा उपाय सांगा, ऐकुन कथि इंद्रयाग या नांवें ॥२॥
पार्वति शिवआज्ञेनें, मुनिंकरवीं इंद्रयाग आरंभी ।
गणपति बघण्या आला, मंडपिं गेला सु-याग प्रारंभीं ॥३॥
इतक्यामध्यें तेथें, राक्षस कल नी द्वितीय मुर विकल ।
म्हैसेरुपीं आले, गणपति धरि त्यांस कीं जसा काल ॥४॥
गर गर फिरवुन फेकी, मृत झाले तेधवांच तत्काल ।
नंतर कुंडासंनिध, येउन निरखी गणेश शिवबाळ ॥५॥
बस्तास पूजितां कीं, फल देइल कामधेनु परि काय ।
ऐसें वदून सारें, याज्ञिक-पायस त्वरीत तो खाय ॥६॥
विध्वंसी यज्ञासी, यास्तव कोपे प्रचूरसा इंद्र ।
जिरवा गणेश मस्ती, देवांना ज्ञापितो स्वयें इंद्र ॥७॥
मयुरेशपूर सोडुन, अग्नी गेला म्हणून लोकांची ।
झाली दैना पाहुन, गणपति वन्ही नटून हरि त्यांची ॥८॥
नंतर इंद्रें केली, वायूला निरविसीच कीं आज्ञा ।
व्हावें गुप्त तुम्हीं कीं, पाहूं त्यांची कशी असे प्रज्ञा ॥९॥
इंद्रें उपाय केले, ते झाले सर्वथैवसे व्यर्थ ।
तेव्हां इंद्र गणेशा, आला कर जोडुनीच शरणार्थ ॥१०॥