(गीति)
अवतारमिती वर्षे, शंभुसुता पूर्ण जाहली व्यासा ।
गौतम मुनीदि म्हणती, त्वत्पुत्रा जन्म जाहला दिवसा ॥१॥
पासुन तेथें येती, राक्षस बहु ते करावया पीडा ।
यास्तव या स्थानाची, वसती आपण खरोखरी सोडा ॥२॥
ऐकुन शंभु त्यजिती, पार्वतिसूतांसहीत वास्तव्य ।
आणखि प्रचूर संगें, गण घेउन ते त्यजीत वास्तव्य ॥३॥
इतुक्यामध्यें आला, कमलासुर तो तुमूल दल संगें ।
घेउन बरोबरी हें, कळतां प्रभु तो पुढें सरे वेगें ॥४॥
अंगापासुन त्यानें, अनंत सेनेस निर्मिलें त्वरित ।
दोघांच्या सैन्यांनीं, केला संग्राम तेधवां उचित ॥५॥
समरीं असूर दल तें, हटलें मागें बघून दैत्यपती ।
झाला सिद्ध पुढें तो, समरासाठीं बसे हयावरती ॥६॥
हयपति शिखिपति समरीं, आले समरास तेधवां करिती ।
कमळासुर शरवृष्टी, करिता झाला गजाननावरती ॥७॥
फेकी गणेश पाशा, पडला मानेवरीच बहु घायें ।
झाला विव्हल तेव्हां, कमळासुर कीं करीतसे हायें ॥८॥
सावध झाल्यावर तो, गणपति वदला तयास हा वेडया ।
उन्मत्तपणें व्यर्थचि, श्रमसी असुरा कशास ह्या खोडया ॥९॥
गणपति भाषण ऐकुन, क्रोधानें सायकांस बहु सोडी ।
नाटोपे राक्षस हा, मायाबलिं हो अनंत वेष घडी ॥१०॥
स्मराल सिद्धी बुद्धी, तों आल्या त्या समीप त्या समयीं ।
कमलासुर रक्ताच्या, बिंदूपासून जनीत मुर ठायीं ॥११॥
ते मुर भक्षायासी, आज्ञा दिधली त्वरीत सिद्धीस ।
भक्षी मुरांस तेव्हां, अटले मुर ते क्षणांत ठायांस ॥१२॥
गणपति इतुक्यामध्यें, त्रिशूल फेकी बहूत जोरानें ।
कमळासुर समरीं तो, झाला सत्वर द्विभाग त्रिशुलानें ॥१३॥
नंतर तेथें वसवी, सुंदरसें नगर विश्वकर्मा कीं ।
स्थापी गणेशमंदिर, ठेवी मयुरेशपूर नामा कीं ॥१४॥