(साकी)
अष्टममासीं ऋतू वसंतीं माध्यान्हीं रवि येई ।
ऐशा समयीं रवितापानें उष्मा बहूत होई ॥१॥
धृ०॥सुन सुन बा व्यासा लीला प्रभु करि कैसा ।
यास्तव गिरिजा पुत्रासह तीं उद्यानीं गेली ।
लतामंडपीं सुखासनीं तीं निद्रित दोघें झालीं ॥२॥
मंचक राक्षस आला तेथें सुखासनीं तो शिरला ।
नंतर असुरें दोघांसह तो मंचक विहायिं नेला ॥३॥
जाणुन त्याच्या कर्तव्याला राक्षस शिखेस धरिला ।
आणखि शिशुनें मातेसह कीं मंचक करिं सावरिला ॥४॥
भूमीवरती येतां येतां राक्षस फिरवुन सोडी ।
आदळे तेव्हां शकलें झालीं जीव कुडि हा सोडी ॥५॥
दुंदुभि नामें राक्षस भेटे कुमाररुपा धरुनी ।
गजाननासी देवी विष-फल भक्षितसे आवडिंनीं ॥६॥
असुरापाशीं आणखि मागे भक्षाया फल देईं ।
नाहीं म्हणतां शिखा धरुनियां आसडुन वधिला तोईं ॥७॥