(इंद्रवज्रा)
एके दिनीं नारद येति मोदें । तेव्हां उमा-शंकरही विनोदें ।
बैसून ते बोलति रम्य गोष्टी । तों पातले पाहति त्यांस दृष्टी ॥१॥
देती तयां आसन पूजितात । त्यांना वदे पार्वति काय मात ।
लग्नास हा सूत सुयोग्य झाला । त्यातें सती योग्य दिसे तुम्हांला ॥२॥
तेव्हां वदे नारद पार्वतीला । निर्मी विधी दोन वधू सुताला ।
आहेत त्या योग्य सुतास दोनी । सिद्धी तशी बुद्धि असे गुणांनीं ॥३॥
(गीति)
सिद्धी बुद्धी दोनी, पाहुन लज्जित सुरुपशा नारी ।
कन्या मयासुराची, अश्वी हो प्रवर गौतमी नारी ॥४॥
जालंदर पत्नी हो, वृंदा नामें सुपूज्य ती तुळस ।
यासाठीं गणपतिला, विधि निर्मित कन्यका सती खास ॥५॥
जरि कार्य घडों आलें, रत्ना कोंदण सुयोग्य हेमाचें ।
पार्वति शंकर ऐकुन, परिवारासहित चालिले साचे ॥६॥
सिंधदैत्य वसे जी, गंडकि नगरी तियेंत विधि सहित ।
बंदींत देव होते, शंभू जाति तिथेंच ते त्वरित ॥७॥
गणपति मित्र बहू ते, होते संगें हरीत त्या सहसा ।
मार्गी पीडा करिती, असुर बहू तेधवां श्रवी व्यासा ॥८॥