(पृथ्वी)
श्रवून शिशुभाषणा शिव करी विचारास तो ।
वरेण्यनृपतीकडे शिशु कसा त्वरें पोंचतो ।
विचार पडला शिवाजवळ पातला नंदि तो ।
शिशूस नृपतीकडे त्वरित नेउनी ठेवितो ॥१॥
अशा वृषभभाषणा श्रवुन दे शिशूसी शिवें ।
तया गगनमार्गिनें पुरि महिष्मतीसी जवें ।
शिशूजवळ राणिच्या निजवुनीच तो लौकरी ।
तिथून परते त्वरें शिवपुरास ये सत्वरी ॥२॥
वदे वृषभ शंकरा घडलि जी पथीं मात ती ।
पथीं प्रथम भेटली असुरि बाळ भक्षीत ती ।
तिला धरुनि गर्गरा फिरवुनी गिरीं फेकिली ।
पुढें चतुर गायकी पटु चमू मला भेटली ॥३॥
पथीं मजसिं पाहुनी अडविलें मला शंकरा ।
तया चरणिं शृंगिंही बहुत ताडिलें पामरा ।
सुपुच्छ फटके दिले श्वसन वातिं ही फेकिलें ।
अशीं बहुत संकटें निरसिं मी कृपें आपुलें ॥४॥
(गीति)
मोठा पराक्रमी तूं, अससी हें मजसि ठाउकें आहे ।
तुजसम विरळा भेटे, त्रिजगिं मी जाणतों तुला पाहें ॥५॥