(गीति)
दुःस्थिति पाहुन सिंधू, क्रोधें शिरला सुरादळामाजी।
धरिली शिखा करांनीं, क्षितिं पाडी वीरभद्र व्यासाजी ॥१॥
नंतर सिंधूदैत्यें, असि खुपसुनी पुष्पदंत तो पोटीं ।
केला विव्हळ पुढती, शामल शिर विंधिलें महीं लोटी ॥२॥
दिसला शिवगण पुढती, नामें तो लंबकर्ण कीं त्याची ।
कापी मान पुढें तो, पायीं धरि रक्तलोचना तोची ॥३॥
आपटि रणीं त्वरीतचि, लत्तेनें सोमदत्त लोळविला ।
भृंगीचें उदर चिरी, दावानल शिरस छेदिता झाला ॥४॥
पंचानन चिरला कीं, पृष्ठीं ऐशी समस्त सुरसेना ।
केली विव्हळ पाहुन, परशू फेकी गणेश मुरहनना ॥५॥
परशूनें सिंधूचा, तुटला कर तेधवां दुजा हातीं ।
घेउन असीस सिंधू, धावे तत्काळ तो प्रभूवरती ॥६॥
जिकडे तिकडे गणपति, दिसती रणिं त्या समस्त सिंधूस ।
ऐसा प्रकार पाहुन, गोंधळला तो पळे गृहीं खास ॥७॥
लढतां लढतां सिंधू, समरांतुन तेधवां पळे व्यासा ।
विजयी गणेश झाला, स्तविती सारे रणांगणीं द्विजसा ॥८॥
घेई गणेश नंतर, स्वजनांचा त्या रणीं समाचार ।
समरीं आधीं दिसला, मूर्च्छितसा स्कंद हा महावीर ॥९॥
उठवी गणेश त्याला, आलिंगन देइ बंधु मग धीर ।
ऐसें वदून फिरवी, तनुवर कर तेधवां कृपाधार ॥१०॥
उठला षण्मुख तेव्हां, गणपतिनें त्यास पूशिलें पुढती ।
कैसा विचार करणें, गणपतिसी कथित यत्न एकान्तीं ॥११॥
अपणांपाशीं नाहीं, संजीवन कीं प्रमूख विद्या ही ।
यास्तव त्रिपूर युद्धीं, द्रोणगिरीवल्लि योजिली ती ही ॥१२॥
तातांनीं तेव्हां ती, आणिलि होती सजीव दल करण्या ।
आपण तीच अणावी, अपुल्या सैन्या सजीव कीं करण्या ॥१३॥
गणपति म्हणे तयाला, वल्लीही आणणार कोण असे ।
तोंवरि असुरांशीं कीं, लढणारे वीर कोण कोण असे ॥१४॥
ऐसें वदून त्यानें, गण सारे ते सजीव मायेनें ।
केले त्वरीत व्यासा, ऐके विधि हें म्हणे तया सुमनें ॥१५॥