सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ८१ ते १००
लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.
८१
अर्थाध्दर्मश्च कामश्च स्वर्गश्चैव नराधिप ।
प्राणयात्रापि लोकस्य विना ह्यर्थं न सिध्यति ॥१२।८।१७॥
(अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो) अर्थ (द्रव्य) असेल तर धर्म, काम आणि स्वर्ग ह्यांची प्राप्ति होते. फार काय, पण लोकांची जीवितयात्रा देखील अर्थावांचून चालणार नाहीं.
८२
अर्थानामीश्वरो य: स्यात् इन्द्रियाणामनीश्वर: ।
इन्द्रीयाणामनैश्वर्यात् ऐश्वर्याभ्दृश्यते हि स: ॥५।३४॥६३॥
जो मनुष्य संपत्तीचा मालक असून इंद्रियांचा दास होऊन राहतो तो इंद्रियांवर ताबा नसल्यामुळें ऐश्वर्यापासून भ्रष्ट होतो.
८३
अर्थानारभते बालो नानुबन्धमवेक्षते ॥२।१५।१४॥
अज्ञ मनुष्य निरनिराळ्या कामांना हात घालतो पण पुढील परिणामाकडे लक्ष देत नाहीं.
८४
अर्थी तु शक्यते भोक्तुं कृतकार्योऽवमन्यते ।
तस्मात्सर्वाणि कार्याणि सावशेषाणि कारयेत् ॥१२।१४०।२०॥
कोणत्याही मनुष्याला आपली गरज आहे तोंवरच त्याचा उपयोग करुन घेतां येतो. एकदां त्याचें कार्य झालें म्हणजे तो आपली पर्वा करीत नाहीं. ह्यास्तव कोणतेंही काम पूर्णपणें न करतां त्यांतील अवशेष ठेवावा.
८५
अर्थेन हि विहीनस्य पुरुषस्याल्पमेधस: ।
विच्छिध्यन्ते क्रिया: सर्वा ग्रीष्मे कुसरितो यथा ॥१२।८।१८॥
ज्याप्रमाणें ग्रीष्मऋतूंत लहान नद्यांना खांडवें पडतात, त्याप्रमाणें द्रव्यहीन अशा मंदबुध्दि पुरुषाच्या सर्व क्रिया छिन्न विच्छिन्न होऊन जातात.
८६
अर्थेभ्यो हि विवृध्देभ्य: संभृतेभ्यस्ततस्तत: ।
क्रिया: सर्वा: प्रवर्तन्ते पर्वतेभ्य इवापगा: ॥१२।८॥१६॥
पर्वतांपासून नद्या उगम पावतात त्याप्रमाणें सर्व बाजूंनीं द्रव्य संपादन करुन त्याची वाढ झाली म्हणजे त्यापासून सर्व कार्य सिध्द होतात.
८७
अर्थे सर्वे समारम्भा: समायत्ता न संशय: ।
स च दण्डे समायत्त: पश्य दण्डस्य गौरवम् ॥१२।१५।४८॥
(अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो) सर्व प्रकारचे उद्योग द्रव्यावर अवलंबून आहेत ह्यांत संशय नाहीं आणि तें द्रव्य दंडाच्या (नियामक शक्तीच्या) अधीन आहे. ह्यावरुन दंडाची थोरवी केवढी आहे पाहा !
८८
अर्धं भार्यां मनुष्यस्य भार्या श्रेष्ठत्तम: सखा ।
भार्या मूलं त्रिवर्गस्य भार्या मूलं तरिष्यत: ॥१।७४।४१॥
स्त्री हें पुरुषाचें अर्धें अंगच होय. स्त्री हाच पुरुषाचा सर्वोत्तम मित्र होय (धर्म, अर्थ व काम ह्या) तीनही पुरुषार्थांचें मूळ स्त्रीच आहे. संसार तरुन जाण्य़ाची इच्छा करणार्याचें मुख्य साधन स्त्रीच.
८९
अलातं तिन्दुकस्येव मुहूर्तमपि हि ज्वल ।
मा तुषाग्निरिवानचिंर् धूमायस्व जिजीविषु: ॥५॥१३३।१४॥
(विदुला माता संजयास म्हणते) टेंभुरणीच्या लाकडाच्या कोलतीप्रमाणें थोडा वेळ कां होईना, पण चमकून जा. केवळ जिवाची आशा धरुन ज्वाला न निघणार्या तुसाच्या (कोंडयाच्या) अग्नीसारखा नुसता धुमसत राहूं नको.
९०
अल्पोऽपि ह्यरिरत्यर्थं वर्धमान: पराक्रमै: ॥२।५५।१७॥
शत्रु क्षुद्र असला तरी तो आपल्या पराक्रमानें प्रबल होत जाऊन, बुंध्याशी असलेलें वारुळ जसें अखेर झाडाला खाऊन टाकतें, त्याप्रमाणें आपल्या प्रतिपक्ष्याचा नाश करतो.
९१
अवज्ञानं हि लोकेऽस्मिन् मरणादपि गर्हितम् ॥३।२८।१२॥
ह्या जगांत मानखंडना होणें हें मरणापेक्षांही दु:खदायक आहे.
९२
अविद्वांसमलं लोके विद्वांसमपि वा पुन: ।
नयन्ति ह्यपथं नार्य: कामक्रोधवशानुगम् ॥१३।४८।३७॥
जगांत कोणी विद्वान असो, किंवा अविद्वान् असो, तो कामक्रोधांच्या तडाफ्यांत सांपडला कीं, स्त्रिया त्याला नि:संशय कुमार्गाला नेतात.
९३
अविश्वासो नरेन्द्राणां गुह्यं परममुच्यते ॥१२।८५।३४॥
कोणाचाही विश्वास न धरणें हें राजे लोकांचें एक मोठें रहस्य आहे.
९४
अविसंवादनं दानं समयस्याव्यतिक्रम: ।
आवर्तयन्ति भूतानि सम्यक्प्रणिहिता च वाक् ॥५।३८।३६॥
सरळ बुध्दीनें दिलेलें दान, वचनाचें परिपालन आणि नीट विचार करुन केलेलें भाषण ह्यांच्या योगानें सर्व लोक आपलेसे करुन घेतां येतात.
९५
अवृत्तिर्भयमन्त्यानां मध्यानां मरणाद्भयम् ।
उत्तमानां तु मर्त्यानाम् अवमानात्परं भयम् ॥५।३४।५२॥
निकृष्ट स्थितींतील लोकांना उपासमारीचें भय वाटतें, मध्यम लोकांना मरणाचें भय वाटतें. परंतु उत्तम कोटींतील मनुष्यांना अपमानाचें फार भय वाटतें.
९६
अवेक्षस्व यथा स्वै: स्वै: कर्मभिर्व्यापृतं जगत् ।
तस्मात्कर्मैव कर्तव्यं नास्ति सिध्दिकर्मण: ॥१२।१०।२८॥
(भीम युधिष्ठिराला म्हणतो) असें पाहा कीं, जगांतील सर्व प्राणी आपआपलीं कर्में करण्यांत गुंतलेलें आहेत, तस्मात्, कर्मच केलें पाहिजे. कर्मावांचून सिध्दि नाहीं.
९७
अव्यापार: परार्थेषु नित्योध्योग: स्वकर्मसु ।
रक्षणं समुपात्तानाम् एतद्वैभवलक्षणम् ॥२।५४।७॥
(धृतराष्ट्र दुर्योधनाला म्हणतो) परद्रव्याचा अपहार करण्याच्या फंदांत न पडणें, आपल्या कामांत नेहमीं दक्ष असणें आणि संपादन केलेल्या द्रव्याचें रक्षण करणें ही वैभव मिळविण्याचीं लक्षणें होत.
९८
अव्याहृतं व्याहृताछ्रेय आहु:
सत्यं वदेव्ध्याहृतं तत् द्वितीयम् ।
प्रियं वदेव्ध्याहृतं तत्तृत्तीयं
धर्म्यं वदेव्ध्याहृतं तच्चतुर्थम् ॥५।३६।१२॥
कांहीं तरी बोलण्यापेक्षां मुळींच न बोलणें हें चांगलें असें म्हणतात. बोलणे सत्य असलें पाहिजे ही दुसरी गोष्ट होय. सत्य असूनही तें प्रिय असलें पाहिजे ही तिसरी गोष्ट होय आणि सत्य व प्रिय असूनही तें धर्माला अनुसरुन असलें पाहिजे ही चौथी गोष्ट होय.
९९
अशड्कितेभ्य: शड्केत: शड्कितेभ्यश्च सर्वश: ।
अशड्क्याभ्दयमुत्पन्नम् अपि मूलं निकृन्तति ॥१।१४०।६१॥
संशयास्पद मनुष्यांवर मुळींच विश्वास ठेवूं नये. इतकेंच नव्हे ज्यांच्याविषयीं कोणाला शंका वाटत नाहीं, अशांचा देखील विश्वास धरुं नये. कारण विश्वासू मनुष्याकडून कांहीं संकट उत्पन्न झालें तर तें समूळ नाश करतें.
१००
अशाश्वतमिदं सर्वं चिन्त्यमानं नरर्षभ ।
कदलीसंनिभो लोक: सारो ह्यस्य न विध्येते ॥११।३।४॥
(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे पुरुषश्रेष्ठा, आपण ज्याचें चिंतन करितों तें हें सर्व जग अशाश्वत आहे. ह्याची स्थिति केळीसारखी आहे. ह्यांत सार कांहींच नाहीं. (केळीचीं सोपटें काढीत गेलें असतां शेवटीं कांहींच सार उरत नाहीं, त्याप्रमाणें ह्या जगाची स्थिति आहे.)
N/A
References : N/A
Last Updated : March 16, 2022
TOP