१४१
आत्मोत्कर्षं न मार्गेत परेषां परिनिन्दया ।
स्वगुणैरेव मार्गेत विप्रकर्षं पृथग्जनात् ॥१२।२८७।२५॥
दुसर्यांची निंदा करुन आपला उत्कर्ष साधण्याची इच्छा धरुं नये. आपल्या आंगच्या गुणांच्या जोरावरच सामान्य लोकांपेक्षां वरचढ होण्याची इच्छा करावी.
१४२
आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।
सुखं वा यदि वा दु:खं स योगी परमो मत: ॥६।३०।३२॥
(श्रीकृष्ण म्हणतात) अर्जुना, आपणांला जसें सुखदु:ख होतें तसेंच सर्व प्राण्यांना होतें, अशा बुध्दीनें जो सर्वत्र सारखेंच पाहतो तो योगी परमश्रेष्ठ होय.
१४३
आददानस्य चेद्राज्यं ये किचित्परिपन्थिन: ।
हन्तव्यास्त इति प्राज्ञा: क्षत्रधर्मविदो विदु: ॥१२।१०।७॥
राज्य घेण्याच्या कामीं जर कोणी अडथळा करतील, तर त्यांचा वध करावा असें क्षत्रधर्म जाणणारे शहाणे लोक सांगतात.
१४४
आदावेव मनुष्येण वर्तितव्यं यथाक्षमम् ।
यथा नातीतमर्थं वै पश्चात्तापेन युज्यते ॥११।१।३५॥
आधींपासूनच मनुष्यानें योग्य रीतीनें वागावें. म्हणजे गोष्ट हातची गेल्यावर त्याकरितां पश्चात्ताप करण्याची पाळी येणार नाहीं.
१४५
आदित्यचन्द्रावनिलानलौ च ।
ध्यौर्भूमिरापो हृदयं यमश्च ।
अहश्च रात्रिश्च उभे च संध्ये
धर्मश्च जानाति नरस्य वृत्तम् ॥१।७४।३०॥
सूर्य, चंद्र, वायु, अग्नि, आकाश, पृथ्वी, जल, तसेंच आपलें अंत:करण, यम, दिवस, रात्र सकाळसंध्याकाळचा संधिप्रकाश आणि धर्म इतक्यांना मनुष्याचें (बरेंवाईट) कृत्य समजतें.
१४६
आपदर्थे धनं रक्षेत् दारान् रक्षेध्दनैरपि ।
आत्मानं सततं रक्षेत् दारैरपि धनैरपि ॥१।१५८।२७॥
(बकवधपर्वांत ब्राह्मणस्त्री पतीला सांगते) संकटप्रसंगीं उपयोग व्हावा म्हणून धनाचें रक्षण करावें. धनाचा त्याग करुनसुध्दां स्वस्त्रीचें रक्षण करावें आणि धनाचा व स्त्रीचा त्याग करुन देखील नेहमीं स्वत:चें रक्षण करावें.
१४७
आपदेवास्य मरणात् पुरुषस्य गरीयसी ।
श्रियो विनाशस्तध्दयस्य निमित्तं धर्मकामयो: ॥५।७२।२७॥
द्रव्यनाश हें मनुष्याला मरणापेक्षाहीं अधिक मोठें संकट होय. कारण, त्याचा धर्म व काम ह्या दोनही पुरुषार्थांचें साधन द्रव्य हें आहे.
१४८
आभ्यन्तरं भयं रक्ष्यम् असारं बाह्यतो भयम् ॥१२।१०७।२८॥
आपापसांतील भयाचें प्रथम निरसन केलें पाहिजे. कारण, बाह्य लोकांपासून उत्पन्न होणार्या भयाचें फारसें महत्त्व नसतें.
१४९
आरब्धान्येव कार्याणि सुपर्यवसितानि च ।
यस्य राज्ञ: प्रदृश्यन्ति स राजा राजसत्तम: ॥१२।५७।३२॥
ज्या राजाचीं आरंभिलेलीं कार्यें चांगल्या रीतीनें तडीस गेल्यानंतरच दृष्टीस पडतात तो राजा सर्वांत श्रेष्ठ होय.
१५०
आर्तिरार्ते प्रिये प्रीति: एतावन्मित्रलक्षणम् ।
विपरीतं तु बोध्दव्यम् अरिलक्षणमेव तत् ॥१२।१०३।५०॥
आपण दु:खी झालों असतां ज्याला दु:ख होतें व आपण सुखी झालों असतां ज्याला सुख होतें तोच मित्र होय आणि त्याच्या उलट स्थिति असणें हें शत्रूचेंच लक्षण जाणावें.
१५१
आर्येण हि न वक्तव्या ।
कदाचित् स्तुतिरात्मन: ॥७।१९५।२१॥
आर्य मनुष्यानें केव्हांही आत्मस्तुति करुं नये.
१५२
आलस्यं मदमोहौ च चापलं गोष्ठिरेव च ।
स्तब्धता चाभिमानित्वं तथाऽत्यागित्वमेव च
एते वै सप्त दोषा: स्यु: सदा विद्यार्थिनां मता: ॥५।४०।५॥
आळस, गर्व व मोह, चंचलपणा, जनसमुदायांत जाणें, उध्दटपणा, अभिमान आणि आपणांस येत असलेलें दुसर्यास न सांगणें हे विद्यार्थ्यांचे नेहमीं सात दोष होत. (दोष आठ भरत असतां सात म्हटले आहेत.)
१५३
आशां कालवतीं कुर्यात् कालं विघ्नेन योजयेत् ।
विघ्नं निमित्ततो ब्रूयात् निमित्तं चापि हेतुतु: ॥१।१४०।८८॥
(प्रसंगविशेषीं शत्रूला) आशाही दाखवावी पण तिला काळाची मर्यादा सांगावी आणि तो काळ आला म्हणजे ती सफल होण्याच्या मार्गांत विघ्नें उपस्थित करावीं. त्या मुळाशीं कांहीं मतलब असावा. (कोणीकडून तरी गोष्ट लांबणीवर टाकावी.)
१५४
आशां महत्तरां मन्ये पर्वतादपि सद्रुमात् ।
आकाशादपि वा राजन् अप्रमेयैव वा पुन: ॥१२।१२५।६॥
(युधिष्ठिर भीष्मांना म्हणतो) राजा, मला वाटतें कीं, वृक्षाच्छादित पर्वतापेक्षां आणि आकाशापेक्षांही आशा ही मोठी आहे. खरोखर तिच्या मोठेपणाला सीमाच नाहीं !
१५५
आशीविषैश्च तस्याहु: सड्गतं यस्य राजभि: ॥१२।८२।२४॥
जो राजेलोकांच्या समागमांत राहतो तो खरोखर सर्पांच्याच सहवासांत राहतो.
१५६
आश्चर्याणामनेकानां प्रतिष्ठा भगवान् रवि: ॥१२।३६२।२॥
भगवान् सूर्यनारायण अनेक चमत्कारांचें आश्रयस्थान आहे.
१५७
आश्रमांस्तुलया सर्वान् गृहस्थाश्रम एकत: ॥१२।१२।१२॥
(नकुल युधिष्ठिराला म्हणतो) हे राजा, एकीकडे बाकीचे तीन आश्रम व एकीकडे एकटा गृहस्थाश्रम ठेवला तरी बरोबरी होईल असें ज्ञात लोक म्हणतात.
१५८
इच्छतोरत्र यो लाभ: स्त्रीपुंसोरमृतोपम: ।
अलाभश्चापि रक्तस्य सोऽपि दोषो विषोमम: ॥१२।३२०।६९॥
परस्परांची इच्छा करणार्या स्त्रीपुरुषांना परस्परांचा लाभ होईल तर तो अमृततुल्य असतो आणि न होईल तर तें दु:खही विषतुल्यच होय.
१५९
इज्याध्य्यनदानानि तप: सत्यं क्षमा दम: ।
अलोभ इति मार्गोऽयं धर्मस्याष्टविध: स्मृत: ॥५।३५।५६॥
यज्ञ, अध्ययन, दान, तप, सत्य, क्षमा, इंद्रियनिग्रह आणि निर्लोभता असा आठ प्रकारचा धर्मप्राप्तीचा मार्ग सांगितलेला आहे.
१६०
इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृंहयेत् ।
बिभेत्यल्पश्रुताद्वेदो मामयं प्रहरिष्यते ॥१।१॥२६८॥
(रामायण महाभारतादि) इतिहास आणि पुराणें ह्यांच्या अभ्यासानें वेदाध्ययनाची पूर्तता करावी. कारण, अर्धवट शिकलेल्या मनुष्याविषयीं वेदाला अशी धास्ती वाटते कीं, हा माझ्यावर प्रहार करील. (म्हणजे अर्थाचा अनर्थ करुन दुरुपयोग करील.)