३२१
जिता सभा वस्त्रवता मिष्टाशा गोमता जिता ।
अध्वा जितो यानवता सर्वं शीलवता जितम् ॥५।३४।४७॥
चांगलीं वस्त्रें परिधान करणार्याला सभेमध्यें मान मिळतो. गायी बाळगणार्या मनुष्याची मिष्टान्न खाण्याची हौस सिध्दीस जाते. ज्याच्यापाशीं वाहन असतें त्याला मार्ग सहज आक्रमण करतां येतो आणि शीलवान् पुरुषाचें सर्वच कांहीं सिध्दीस जातें.
३२२
जीर्णमन्नं प्रशंसन्ति भार्यां च गतयौवनम् ।
शूरं विजितसंग्रामं गतपारं तपस्विनम् ॥५।३५।६९॥
खालेल्ल्या अन्नाची प्रशंसा तें पचल्यावर करावी. तसेंच स्त्रीची तारुण्य उलटून गेल्यावर, शूराची लढाई जिंकल्यावर आणि तपस्व्याची तप:समाप्तीनंतर प्रशंसा करावी.
३२३
जीर्यन्ति जीर्यत: केशा दन्ता जीर्यन्ति जीर्यत: ।
चक्षु:श्रोत्रे च जीर्येते तृष्णैका न तु जीर्यते ॥१३।७।२४॥
वार्धक्यानें शरीर जर्जर झालें म्हणजे केस जीर्ण होतात, दांत जीर्ण होतात, डोळे आणि कानही जीर्ण होतात. परंतु एकटी तृष्णा (लोभ) मात्र जीर्ण होत नाहीं !
३२४
जीवन् भद्राणि पश्यति ॥४।३८।४२॥
कोणी झाला तरी आधीं जगेल तेव्हां मग चांगले दिवस पाहणार !
३२५
ज्ञातयो वर्धनीयाम् तैर् ये इच्छन्त्यात्मन: शुभम् ॥५।३९।१८॥
जे स्वत:चें कल्याण व्हावें असें इच्छितात त्यांनीं अगोदर आपल्या आप्तेष्टांचा उत्कर्ष करावा.
३२६
ज्ञानं तत्त्वार्थसंबोध: ॥३।३१३।९०॥
ज्ञान म्हणजे आत्मतत्त्वाचा सम्यक् बोध होणें.
३२७
ज्यायांसमपि चेत् वृध्दं गुणैरपि समन्वितम् ।
आततायिनमायान्तं हन्याद् घातकमात्मन: ॥६।१०७।१०१॥
मारण्याच्या इच्छेनें आपल्या आंगावर धावून येणारा आततायी मनुष्य वयानें मोठा असला, किंबहुना वृध्द असला आणि गुणसंपन्न जरी असला तरी त्यास ठार करावे.
३२८
तदा स वृध्दो भवति तदा भवति दु:खित: ।
तदा शून्यं जगत्तस्य यदा मात्रा वियुज्यते ॥१२।२६६।३०॥
ज्या वेळीं मनुष्याला मातेचा वियोग होतो त्या वेळींच तो खरा वृध्द होतो, त्या वेळींच तो खरा दु:खी होतो आणि त्या वेळींच त्याला सर्व जग शून्य वाटतें !
३२९
तदेवासनमन्विच्छेत् यत्र नाभिपतेत्पर: ॥४।४।१३॥
ज्या ठिकाणीं दुसरा कोणी येणार नाहीं (व ऊठ म्हणून म्हणणार नाहीं) अशीच जागा शोधून काढावी.
३३०
तद्विध्दि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिन: ॥६।२८।३४॥
(श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना,) प्रणाम केल्यानें, परोपरीनें प्रश्न विचारिल्यानें आणि सेवा केल्यानें तत्त्वद्रष्टे ज्ञानी लोक तुला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतील असें समज.
३३१
तप: श्रुतं च योनिश्चाप्येतत् ब्राह्मण्यकारणम् ।
त्रिभिर्गुणै: समुदितम् ततो भवति वै द्विज: ॥१३।१२१।७॥
तप, वेदाध्ययन व ब्राह्मणकुलांत जन्म ह्यांच्या योगानें ब्राह्मण्य प्राप्त होतें. ह्या तीन गुणांनीं युक्त असेल तरच तो द्विज संज्ञेला पात्र होतो.
३३२
तपसा प्राप्यते स्वर्गस् तपसा प्राप्यते यश: ।
आयु: प्रकर्षो भोगाश्च लभ्यन्ते तपसा विभो ॥१३।५७।८॥
(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) हे राजा, तपानें स्वर्ग मिळतो, तपानें यश प्राप्त होतें. आयुष्य, वैभव आणि सर्व प्रकारच्या उपभोग्य वस्तु तपानें प्राप्त होतात.
३३३
तपसा विन्दते महत् ॥३।३१३।४८॥
तपाच्या योगानें मनुष्य महत्पदाला पोचतो.
३३४
तप: स्वधर्मवर्तित्वम् ॥३।३१३।८८॥
तप म्हणजे स्वधर्माप्रमाणें वागणें.
३३५
तपोर्थीयं ब्राह्मणी धत्त गर्भं
गौर्वोढारं धावितारं तुरड्गी ।
शूद्रा दासं पशुपालं च वैश्या
वधार्थीयं क्षत्रिया राजपुत्री ॥११।२६।५॥
ब्राह्मणस्त्री गर्भ धारण करते तो त्यानें (जन्माला येऊन) तप करावें म्हणून, गायीनें ओझीं वाहणारा, घोडीनें धावणारा, शूद्र स्त्रीनें दास्यकर्म करणारा, वैश्य स्त्रीनें गुरें राखणारा आणि क्षत्रिय राजकन्येनें युध्दांत मारणारा किंवा मरणारा, गर्भ धारण केलेला असतो.
३२६
तरसा ये न शक्यन्ते शस्त्रै: सुनिशितैरपि ।
साम्ना तेऽपि निगृह्यन्ते गजा इव करेणुभि: ॥१२।१३९।३९॥
जबरदस्तीनें अथवा अत्यंत तीक्ष्ण शस्त्रांच्या योगानेंही ज्यांना दाबांत ठेवितां येत नाहीं तेसुध्दां, हत्ती हत्तिणींना वश होतात त्याप्रमाणें, सामोपचारानें वश करितां येतात.
३३७
तर्कोऽप्रतिष्ठ: श्रुतयो विभिन्ना
नैको ऋषिर्यस्य मतं प्रमाणम् ।
धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां
महाजनो येन गत: स पन्था: ॥३।३१३।११७॥
(धर्मतत्त्वांचा विचार करुं लागलें असतां) युक्तिवाद लंगडा पडतो, श्रुतिवाक्यें पाहावीं तर तीं निरनिराळ्या प्रकारचीं आहेत, ज्याचें मत सर्वांना प्रमाण आहे असा एकही ऋषि आढळून येत नाहीं. तात्पर्य, धर्माचें तत्त्व गुहेंत दडलेलें आहे. (म्हणजे अत्यंत गूढ आहे) अशा स्थितीत, थोर लोक ज्या मार्गानें गेले तोच मार्ग उत्तम.
३३८
तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते
कार्याकार्यव्यवस्थितौ ॥६।४०।२४॥
(श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात) कार्य कोणतें, अकार्य कोणतें ह्याचा निर्णय करण्याच्या कामीं तुला शास्त्रच प्रमाण मानिलें पाहिजे.
३३९
तृणानि भूमिरुदकं वाक् चतुर्थी च सूनृता ।
सतामेतानि गेहेषु नोच्छिध्यन्ते कदाचन ॥५।३६।३४॥
गवताचें आसन, स्वच्छ जागा, पाणी आणि चौथें सत्य व प्रिय भाषण ह्या चार गोष्टींची तरी सज्जनांच्या घरीं केव्हांही वाण पडत नाहीं. (ह्या चार वस्तु अतिथिसत्कारासाठीं नेहमीं सिध्द असतात.)
३४०
तेजसोर्हि द्वयोर्देवा: सख्यं वै भविता कथम् ॥५।१०।२॥
(‘तूं इंद्राशीं सख्य कर’ असें सांगण्याकरितां आलेल्या देवांना वृत्रासुर म्हणतो) देव हो, दोन तेजस्वी पुरुषांचें सख्य कसें व्हावयाचें ?